उगवतीचे रंग
एज इज जस्ट अ नंबर
ऐंशी नव्वदीच्या वयातही काही माणसे एवढ्या कार्यक्षमतेने काम करताना दिसतात की त्यांचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही ! लेखनामुळे माझा अशा अनेक व्यक्तींशी योगायोगाने संबंध आला. आणि त्यांच्यासोबतचे नाते कायमचे जोडले गेले. ही सगळी मंडळी पितृतुल्य आणि मातृतुल्य आहेत. त्यांचे वागणे, बोलणे, त्यांची स्मरणशक्ती, त्यांचे लिखाण करणे या सगळ्या गोष्टी पाहिल्या की आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आयुष्याच्या संध्याकाळी देखील आपली ऊर्जा त्यांनी राखून ठेवली आहे. आपल्या वागण्या बोलण्यातून आजही ते इतरांना आनंद देत आहेत. या मंडळींजवळ ज्ञानाचा आणि अनुभवाचा मोठा खजिना आहे आणि जो जो त्यांच्या जवळ जाईल त्याला ते मुक्तहस्ताने तो वाटत असतात. कधी कधी त्यांचे हे वागणे पाहून स्वतःचीच लाज वाटते की आपले वय त्यांच्यापेक्षा बरेच कमी असताना खूप काही विसरतो, अनेक गोष्टी करायच्या राहतात, अनेक गोष्टी करायचा कंटाळा करतो. पण जेव्हा या व्यक्तींशी बोलणे होते तेव्हा मात्र एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. मग मी नव्या उत्साहाने कामाला लागतो.
पाच सहा वर्षांपूर्वी माझा एक लेख इंदापूर येथील आदरणीय प्रतिभाताई गारटकर यांच्या वाचनात आला. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. आज त्यांचे वय ९० वर्षांपेक्षा अधिक आहे. परंतु आजही त्या वाचन लेखनामध्ये आपला वेळ घालवतात. अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे अनेक कविता लिहिल्या आहेत. त्यांनी समर्थ रामदासांवर लिहिलेले श्रीसमर्थ रामदास जीवनकाव्य हे संगीत चरित्र अतिशय सुंदर आहे. यावरच आधारित असलेल्या रामदासायन याचे विविध ठिकाणी प्रयोग होत असतात. पुण्यात प्रयोग असला की त्या आवर्जून आम्हाला कळवतात. त्यांनी पती निधनानंतर आपले संपूर्ण कुटुंब सांभाळले, शेती सांभाळली, मुलांना वाढवले आणि हे करत असताना शिक्षिका म्हणून एक उत्तम असा नावलौकिक प्राप्त केला. त्या कधी पुण्यात आल्या तर मला आवर्जून कळवतात, फोन करतात. आम्ही त्यांना भेटायला जातो किंवा कधी कधी वेळ असेल तर त्यांना भेटण्यासाठी इंदापूरला देखील जातो. त्यांना भेटून आल्यानंतर एक वेगळे समाधान मिळते. या वयातही त्यांचे वागणे बोलणे पाहिले की हेवा वाटतो कुठेही काही विसरणे नाही, बोलताना समोरच्या व्यक्तीशी अत्यंत प्रेमाने बोलतील, त्याची प्रेमाने विचारपूस करणे, आदरातिथ्य करणे या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. त्या मला आपला लहान भाऊ मानतात. त्यांचा मुलगा प्रदीप गारटकर म्हणजे इंदापुरातील एक लोकप्रिय नेतृत्व आहे. राजकारणात असला तरी तो संयमी आणि शांत व्यक्तिमत्त्वाचा आहे.
मराठवाड्यातील कवी बी रघुनाथ यांच्या कन्या आदरणीय सुधाताई नरवाडकर या लेखनामुळे अशाच माझ्या संपर्कात आल्या. त्या लातूरला अनेक वर्षे शिक्षिका होत्या. आता त्यांचा मुक्काम नांदेडला असतो. त्यांची मुले, सुना आणि मुली उच्चशिक्षित आहेत आणि डॉक्टर आहेत. बरेच लेखन त्यांनी केले आहे. आज त्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. परंतु या वयातही त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांना जाणे, लेखन करणे सुरूच असते. त्यांची काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. उत्कृष्ट कविता आणि गझल लेखन त्या करतात. मी जेव्हा या म्हणजे डिसेंबर (२०२५ )महिन्यातील पाच तारखेला लातूरला एका लग्नासाठी म्हणून गेलो होतो त्यावेळी त्यांना मी इथे एका लग्नासाठी आलो आहे म्हणून मेसेज केला होता. योगायोगाने त्या देखील त्यावेळी तिथे एका लग्नासाठी आले होते परंतु ज्या मंगल कार्यालयात त्या लग्नासाठी आल्या होत्या ते कार्यालय आमच्या कार्यालयापासून बरेच लांब होते मी त्यांना म्हटले की आपण कुठे आहात आपला पत्ता कळवा मी आपल्याला भेटायला येतो परंतु त्यांनी मला माझा पत्ता विचारला आणि त्या स्वतः त्यांच्या मुलीसह मला भेटायला आल्या. त्यांच्या कवितेची दोन पुस्तके त्यांनी मला भेट दिली. माझे आणि त्यांचे आई- मुलाचे नाते आहे.
कालिंदीताई हिंगे. वय वर्षे ८६. मालेगावला असतात. तेथील प्रसिद्ध काकाणी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्तीनंतर वाचन लेखन त्यांनी सुरूच ठेवले. अनेक कार्यक्रमांना जाणे येणे, अनेक व्यक्तीची संपर्क साधणेही सुरूच होते. योगायोगाने माझेही लेखत्यांच्या वाचनात आले आणि त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्या माझ्याशी जोडल्या गेल्या. त्या कायमच्याच. मी त्यांना कालिंदी मावशी म्हणतो. साधारण दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या हेमंत सोमण या क्रांतिकारक भावाचे चरित्र सगळी माहिती मिळवून प्रसिद्ध केले. त्याने गोवा मुक्तीसंग्रामात भाग घेतला होता. त्यावेळीची सगळी कागदपत्रे मिळवून, अभ्यास करून त्यांनी हे चरित्र लिहिले. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. नंतर एक दोन वेळा मालेगावला जाण्याचा प्रसंग आला त्यावेळी घरी जाऊन त्यांना भेटूनही आलो. अत्यंत उत्साही असे हे व्यक्तिमत्व !
नाशिकचे अशोककाका धर्माधिकारी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होते. अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन आजच्या या पदापर्यंत पोहोचले. आता वय ८५ वर्षे असेल. पण अजूनही उत्साहाने कार्यरत आहेत. नियमाने वाचन लेखन करतात. दरवर्षी एका विषयाला वाहिलेला दिवाळी अंक ते आणि सौ काकू असे दोघे मिळून काढतात. यावर्षी त्यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराजांवर दिवाळी विशेषांक काढला आहे. त्यांचे दिवाळी विशेषांक अत्यंत वाचनीय आणि संग्राह्य असतात. समाजसेवेची त्यांना विशेष आवड आहे. दरवर्षी दिवाळीच्या सुमारास आदिवासी पाड्यांवर जाऊन भगिनींना साड्या वाटप करणे, मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवणे यासारखे उपक्रम ते राबवतात. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते चित्र काढायला शिकले आणि आता उत्कृष्ट चित्र काढतात. आपल्या प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली आहेत नाशिकला गेलो म्हणजे मी आवर्जून त्यांना भेटतो.
रमेशचंद्र कुलकर्णी. पितृतुल्य व्यक्तिमत्व ! वय वर्षे ८८. आता कल्याणला असतात. ३५ वर्षे महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात प्रथम वर्ग अधिकारी, कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी सेवा दिली. लेखनामुळेच माझा आणि त्यांचा संपर्क आला. त्यांनी स्वतः माझ्याशी संपर्क साधला. २०२० मध्ये त्यांनी पत्रसंवाद एक व दोन अशी दोन पुस्तके प्रकाशित केली. यात त्यांनी विविध मान्यवरांना लिहिलेली अत्यंत अभ्यासपूर्ण आणि वाचनीय अशी पत्रे आहेत. हा एक प्रकारचा खजिनाच त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. संतसाहित्याचे त्यांचे नियमित वाचन असते. साहित्य संमेलनास दरवर्षी उपस्थिती देतात. पर्यटन आणि बागकामाची आवड आहे सामाजिक कार्याची आवड आहे. संगीत ऐकणे, नाटक पाहणे, जुनी मराठी हिंदी गाणी ऐकणे ही त्यांची आवड आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत पुणे विद्यार्थी गृहात शिक्षण घेऊन ते मुख्य कार्यकारी अभियंता पदापर्यंत पोहोचले. ते एकटेच राहतात. आजही या वयात ते स्वतः सर्व कामे करतात. त्यांच्या सहवासात एक दिवस राहण्याचा योग आला. त्यांचा एकंदरीत उत्साह स्मरणशक्ती पाहून खरोखरच आश्चर्य वाटले. समर्थ रामदास स्वामी विचारधन या पुस्तकाचे त्यांनी संपादन केले आहे त्याचप्रमाणे कुलकर्णी कुलवृत्तांत व वंशावळ या पुस्तकाचे अभ्यासपूर्ण लेखन या वयातही केले आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी त्यांनी मला आवर्जून आमंत्रित केले होते. त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो. ज्यांना ज्यांना वाचनाची आवड आहे, त्या त्या रसिकांना त्यांनी स्वखर्चाने पोस्टाने आपली पुस्तके पाठवली आहेत.
वाचन लेखनातून असेच माझ्याशी जोडले गेलेले आणखी एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे अनिल नारायण कुलकर्णी, सांगली. आज त्यांचे वय साधारणपणे ८४ वर्षे तरी असावे. अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व आणि हसतमुख ! आधुनिकतेशी स्वतःला जोडून घेणारे, नव्या पिढीशी, नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे असे हे व्यक्तिमत्व ! भारत आणि जगभ्रमंतीचा अनुभव, कार्पोरेट विश्वातील काम या सगळ्यांमुळे त्यांच्या लेखनाला एक समृद्धी प्राप्त झाली आहे. समाजसेवेची आवड, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे काम ते अत्यंत आवडीने आणि उत्साहाने आजही करत आहेत. त्यांनी त्यांचे ' तरंग अंतरंग ' हे पुस्तक मला पाठवले. या पुस्तकात कथा, ललित लेख आणि व्यक्तीचित्रण आहे. जीवनावर आणि जगण्यावर भरभरून प्रेम करण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या लेखनातून प्रतिबिंबित होते.
प्रवीण कारखानीस, मुक्काम पोस्ट अंबरनाथ, जिल्हा ठाणे. वय वर्षे ८० पेक्षा अधिक असावे. एकटे राहतात आणि उत्साहाने सर्व कामे करतात. महाराष्ट्र बँकेतून मोठ्या अधिकार पदावरून ते निवृत्त झाले. लेखनाच्या माध्यमातूनच माझा त्यांचा संपर्क झाला. एक दिवस त्यांचा मला भ्रमणध्वनी आला आणि मग आमच्यातील बोलणे सुरू झाले. त्यांनी मला त्यांचे पुस्तक दिव्यत्वाची जेथे प्रतीती हे पाठवले. अजून माझी त्यांची प्रत्यक्ष भेट नाही पण त्यांच्या पुस्तकातून मल जे समजले ते असे की ते अत्यंत उत्साही आणि हरहुन्नरी व्यक्ती आहेत. त्यांनी फार पूर्वी आपल्या मोटरसायकलवरून काही देशांचा प्रवास केला आहे. त्याचप्रमाणे पर्यटनानिमित्त विविध देशांची भ्रमंती त्यांनी केली आहे. या प्रवासाविषयी, प्रवासात भेटलेल्या माणसांविषयी, निसर्गाविषयी त्यांनी भरभरून लेखन केले आहे. अष्टचक्री रोमायण आणि भ्रमंती देशविदेशांची, ज्योतीने तेजाची आरती, हावडा ब्रिजवरून अशा पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी पाकिस्तानातही भ्रमंती केली. मंजिल ए मकसूद या पुस्तकात त्यांनी पाकिस्तानचे दर्शन घडवले आहे. अनेक खेळाडू, गीतकार, संगीतकार, गायिका, चित्रपट कलावंत इत्यादींवर त्यांनी लेखन केले आहे. अशा व्यक्तींबद्दल ते सुरुवातीला अधिकाधिक जाणून घेतात, त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क आला असेल तर त्याचाही उल्लेख आपल्या लेखात करतात. अशा रीतीने त्यांची व्यक्तिचित्रणे अत्यंत रोचक, अभ्यासपूर्ण आणि वाचनीय झाली आहेत. दरवर्षी साहित्य संमेलनाला हजेरी लावतात. यावर्षीही साताऱ्याला होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी ते जाणार आहेत. लवकरच त्यांना भेटायला जाण्याचा विचार आहे. त्यांच्याशी बोलता बोलता मी सहज दिव्यत्वाची जेथ प्रचिती असं म्हणालो. पण त्यांनी माझ्या लक्षात आणून दिले की मूळ शब्द प्रतीती असा आहे. या सगळ्या मंडळींना आज या वयातही नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. त्यांचे वय म्हणजे केवळ एक आकडा, एक संख्या. एज इज जस्ट अ नंबर. खरे तर अशा प्रत्येक व्यक्तींवर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो आणि ठरवले तर एक स्वतंत्र पुस्तक देखील !
अशा अनेक व्यक्ती आहेत. अनेक व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत. परंतु आज फक्त काही मोजक्या व्यक्तींबद्दलच लिहिता आले. अशा व्यक्तींना पाहिले किंवा भेटले की एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. झाडावरून खाली पडलेले पिकलेले पान सुद्धा सुंदर दिसते तसेच सौंदर्य आणि गोडवा या व्यक्तींनी आपल्या व्यक्तिमत्त्वात टिकवून ठेवला आहे. जाळीदार पिकलेले पान सुंदर दिसते, तशा अनुभवाच्या जाळीमुळे ही व्यक्तिमत्वे समृद्ध आहेत. "तजुर्बा है उन्हें दुनिया का, वो धूप में सफेद हुए बाल नहीं,
वो तो उस रास्ते का नक्शा हैं, जहाँ अभी हमें चलना बाकी है।"कविवर्य बा भ बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे दिव्यत्वाची जेथे प्रतीती, तेथे कर माझे जुळती अशी ही सगळी व्यक्तिमत्त्वे आहेत. त्यांना प्रणाम.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१५/१२/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा