उगवतीचे रंग
विवाह : ' संस्कार ' की इव्हेंट मॅनेजमेंट ?
एका लग्नसमारंभाला उपस्थित राहायचं म्हणून गेलो होतो. मोठया घरचं लग्न होतं. वधू वर उच्चशिक्षित होते. समाजातील उच्चभ्रू मंडळी कार्यक्रमासाठी हजर होती. होमाचा विधी सुरु होता. वधुवर होमाला प्रदक्षिणा करत होते. गुरुजींचा मंत्रघोष सुरु होता. दोन फोटोग्राफर एक फोटो काढणारा आणि दुसरा व्हिडीओ शूटिंग करणारा यांची धावपळ सुरु होती. कॅमेऱ्यांच्या फ्लॅशचा लखलखाट चालू होता. होमाचा विधी आपल्याला कॅमेऱ्यात कशा प्रकारे बंदिस्त करता येईल याची धडपड चालली होती. त्यामुळे मध्येच गुरुजींना थांबावे लागत होते. त्याबद्दलची नाराजी गुरुजींच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. पण सगळ्यांपुढे गुरुजी अगतिक झालेले दिसत होते.
फोटोग्राफर्स वधूवरांना विविध सूचना देत होते. " थोडं उजवीकडे बघा. मान सरळ आणि समोर. थोडं हसा. इ. " वधूवरांना देखील त्या विधीपेक्षा त्या चाललेल्या चित्रीकरणात जास्त आनंद दिसत होता. माझ्या मनात आलं की या सगळ्या आधुनिकीकरणाच्या गडबडीत आपण आपल्या चांगल्या विधीपरंपरांची वाट लावली, नाही का ? आपल्या हिंदू संस्कृतीत ज्यांना सोळा संस्कार म्हटलं जातं त्यातील एक संस्कार म्हणजे विवाह. तो एक सुंदर सोहळा आहे. सोहळा म्हटलं की कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र येणं, आनंदाने त्यात सहभाग घेणं या सगळ्या गोष्टी आल्या. हा भावनांचा उत्सव असतो. अशा सोहळ्यात पूर्वी गाणी, गप्पा गोष्टी, जेवताना म्हणायचे श्लोक, नाव घेणे यासारख्या प्रकारांनी कार्यक्रमाची रंगत वाढत होती. मुहूर्ताचे गहू दळले जात. घरातील गृहिणींची त्यासाठी होणारी लगबग, त्यातील पारंपारिक गाणी या सगळ्या गोष्टी कार्यक्रमाला एक वेगळा रंग आणत. पण आता हे सगळे प्रकार जणू कालबाह्य झाल्यासारखे दिसतात. त्यासाठी कोणाला वेळही नाही आणि त्यांची माहितीही नसते.
विवाह सोहळा स्मरणीय जरूर झाला पाहिजे. त्यासाठी उत्तम नियोजन जरूर झाले पाहिजे. त्यातील आठवणी देखील जपून ठेवल्याच पाहिजेत यात दुमत नाही. पण कुठेतरी लग्नविधी आणि आधुनिकता यांचा सुरेख मेळ घालता आला पाहिजे. पण हल्ली विधी कमी आणि उपचार जास्त असा प्रकार होत चालला आहे.
लग्नसोहळा असो की अन्य कोणताही कार्यक्रम, हल्ली त्याला दिखाऊपणाचे स्वरूप जास्त येऊ लागले आहे. या सगळ्या गोष्टी सोहळा कमी आणि इव्हेंट जास्त असा प्रकार होतो आहे. इव्हेंट मॅनेजमेंट या नावाचा स्वतंत्र प्रकारच हल्ली अस्तित्वात आला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे लग्न समारंभासाठी खर्चही वाढला आहे. मेहंदी, वधूवरांचे आणि अन्य जवळच्या नातेवाईकांचे मेकअप, थीम सॉंग्स या सगळ्या गोष्टींवर अवाढव्य खर्च होतो आहे.
पूर्वी घरातील लग्नसमारंभ वा अन्य कोणताही कार्यक्रम असला तर घरातील किंवा नात्यातील लोक एकत्र येऊन त्या कार्यक्रमाची जबाबदारी वाटून घेत असत. हल्ली कोणालाच वेळ नसतो. त्यामुळे एका दृष्टीने इव्हेंट मॅनेजमेंट सारख्या गोष्टी या काळाची गरज आहेतच. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. सोहळा अधिक आकर्षक आणि देखणा होतो. इंग्रजी शब्द वापरायचा तर ' कॅची ' होतो. पण त्यातील नैसर्गिकपणा, गाभा कुठेतरी हरवून जातो.
अनेक नवीन गोष्टी या लग्नसोहळ्यासारख्या पारंपरिक कार्यक्रमात शिरल्या आहेत. त्या चांगल्या की वाईट हे जाणकारांनी ठरवावे. अशा गोष्टींमध्ये प्री वेडिंग शूट, वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये फोटो काढणे, लग्नाच्या आधी वधूवरांनी एकत्र येऊन डान्स करणे, ते डान्स बसवण्यासाठी आधी सराव करणे, त्यासाठी अगदी कोरिओग्राफरची मदत घेणे या गोष्टी होत असतात. एका लग्न समारंभात तर एका बाजूला विधी सुरू होते आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या पडद्यावर वधू-वरांचे प्री वेडिंग शूट दाखवण्यात येत होते. जमलेली सगळी मंडळी हे प्री वेडिंग शूट पाहण्यात मग्न होती. लग्नाचे जे विधी सुरू होते, त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. फक्त वधू वर, त्यांचे आई-वडील आणि गुरुजी एवढेच त्या सोहळ्यात मग्न होते. मला हा सगळा प्रकार विचित्र वाटला.
वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींच्या निमित्ताने वधुवर लग्नापूर्वीच अनेकदा एकत्र येत असतात. त्यातून कदाचित एकमेकांना अधिक जाणून घेणे, आवडीनिवडी समजून घेणे यासारख्या गोष्टींनाही मदत होत असावी. पण लग्नानंतर एकमेकांच्या सहवासाची जी उत्सुकता असते ती नक्कीच हरवत असावी. कसा असेल माझा जीवनसाथी ? तो मला समजून घेईल का ? अशा अनेक गोष्टींची उत्सुकता असते. मधुचंद्राचा रोमांचक कालावधी असतो परंतु या सगळ्या गोष्टी या आधुनिकतेच्या गडबडीत हरवत असाव्यात.
हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेले एक छान गाणे आहे.
लाजून हासणे अन् हासून ते पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
किती सुंदर ओळी ! या गोष्टी जेव्हा दोघे अनोळखी असतात आणि एकमेकांच्या सहवासासाठी उत्सुक असतात तेव्हाच त्यातील गोडी अधिक असेल हे सुज्ञास सांगणे न लगे.
जे जे नवीन आणि आधुनिक तेथे सगळेच वाईट आहे असे नाही काळानुसार काही गोष्टी बदलायला हव्यातच आपणही जुन्या गोष्टी टाकून देऊन नवीन गोष्टींचा स्वीकार करायला हवा परंतु जुन्या गोष्टी सगळ्याच टाकाऊ नसतात किंवा सगळ्याच नवीन गोष्टी चांगल्या असतात असेही नाही म्हणून दोघांचा सुवर्णांमध्ये साधता आला पाहिजे हा जेव्हा होईल तेव्हा आपले जीवन अधिक, आनंदी, सुखी आणि समाधानी होईल. आपल्या मुलांच्या लग्नात खर्चाचे पारडे जड असावे की संस्कारांचा भाग महत्वाचा असावा हे संबंधितांनी विचारपूर्वक ठरवणे आवश्यक आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
११/१२/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा