मुख्य सामग्रीवर वगळा

वारसा : काय आणि कितीचा

उगवतीचे रंग 

वारसा : काय आणि कितीचा

 एका उद्योगपतीचं निधन झालं तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेच्या प्रसंगी जमलेली मंडळी चर्चा करीत होती की त्यानं किती धन मागे ठेवलंय ? करोडोंचा बँक बॅलन्स, कित्येक किलो सोनं, कारखाने, बंगले, गाड्या इ. लोकांच्या दृष्टीनं ' किती ' ही गोष्ट महत्वाची होती. एखादा भ्रष्ट राजकारणी देखील आपल्या आयुष्यात प्रचंड ' माया ' कमावतो. ' प्रेम ' नाही. तो गेल्यानंतर लोकांमध्ये चर्चा सुरु होते की त्याने ' किती ' धन मागे ठेवलंय ? लोकांच्या दृष्टीनं ' किती ' महत्वाचा ! खरं तर ' काय ' आणि ' किती ' हे केवळ प्रश्नार्थक शब्द नाहीत. ती जीवनमूल्ये आहेत. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्यानं ' काय ' मागे ठेवलंय हे कितीपेक्षा अधिक महत्वाचं. 

एका व्यक्तीला वाचनाची प्रचंड आवड होती. प्रचंड ग्रंथसंग्रह त्याने जमवला. आयुष्यात फारसे धन त्याने कमवले नाही. पण हे ग्रंथरूपी धन मात्र त्याच्याकडे भरपूर होते. आपल्या अंत्यसमयी त्याने आपल्या मुलाला जवळ बोलावून सांगितले, " बाळा, मी तुझ्यासाठी फारशी संपत्ती ठेवू शकलो नाही. पण ही पुस्तके आहेत. हेच माझ्या दृष्टीने धन आहे. हा माझा वारसा आहे. हा जप. " मुलावरही त्या व्यक्तीच्या वागण्याचे संस्कार झाले होते. तो म्हणाला, " बाबा, तुम्ही विचारांचा वारसा मागे ठेवून जात आहात. तो माझ्यासाठी महत्वाचा आहे. पैसा मी माझ्या कर्तृत्वाने मिळवीन. पण तुम्ही दिलेला वारसा जीवापाड जतन करीन, तो वाढवेन. " इथे  कितीपेक्षा ' काय ' महत्वाचे !

सामान्य माणसं जेव्हा ' कितीचा ' विचार करतात तेव्हा त्याला जोडून आणखी प्रश्न त्यांच्या डोक्यात यायला हवा. तो म्हणजे ' कसं '. खूप काही  कमावलं. पैसा, सोनंनाणं, बंगले, गाड्या इ. आयुष्यात पैसा,धन महत्वाचं तर आहेच ! पण ते ' कसं ' याला महत्व आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ' जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ' असं ते आहे का ?असं धन असेल तर ती लक्ष्मी ! नाहीतर ती नुसतीच संपत्ती. ' किती ' कमावलं याचीच आपण मोजदाद करत बसतो, नाही का ? पण कितीच्या आकड्यांच्या गर्दीत एक महत्त्वाचा प्रश्न राहूनच जातो. तो म्हणजे हे ' किती ' ' कसं ' कमावलं ? ' किती ' चा हव्यास आयुष्यभर संपत नाही. पण ते मिळवण्याच्या नादात आपण खूप काही गमावून बसतो. कितीच्या जगात चमक आहे, गजबज आहे. या जगाला आकड्यांची भूक असते. बँक बॅलन्स किती, जागा किती, प्रतिष्ठा किती ? आणि गंमत म्हणजे किती कमावलं याची माहिती सहज मिळते, पण ते कसं कमावलं याची खबर फार कमी लोक घेतात. कितीला जोडून कसं हा शब्द  सहजपणे येतच नाही. कारण कसं मध्ये प्रश्न आहेत… आणि कितीमध्ये गर्व. कसं मध्ये उत्तरदायित्व आहे… आणि कितीमध्ये टाळ्या ! कधी कधी या कितीचा दबदबा इतका वाढतो की ' कसं ' चा प्रकाश दिसेनासा होतो.

फार थोड्या व्यक्ती अशा असतात की ज्यांच्या बाबतीत ' काय ' आणि ' किती ' दोन्हींचे मूल्य अपरंपार असते. सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती. जे आर डी टाटा आणि रतन टाटा. यांच्यासारख्या व्यक्तींच्या संपत्तीचे मूल्य तर कित्येक कोटींच्या घरात जातेच पण त्यांनी आयुष्यभर ज्या मूल्यांचा पाठपुरावा केला, ती मूल्ये चिरंतन आहेत. सर्वांसाठीच मार्गदर्शक आहेत. 

रवींद्रनाथ टागोर, पु. ल. देशपांडे यांच्यासारखे अनेक थोर साहित्यिक होऊन गेले. त्यांनी कदाचित खूप काही मागे ठेवले नसेल. म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेत ' किती '. पण ' काय ' मागे ठेवलं याला निश्चितच महत्व आहे. त्याचं मोजमाप ' किती ' ची फुटपट्टी लावून आपल्याला करता येणार नाही. त्यांनी मागे ठेवला आहे तो मूल्यांचा वारसा ! त्यांनी मागे ठेवलं आहे ते जीवन जगण्याचं सौंदर्य ! ' या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ' असं मंगेश पाडगावकर सांगतात. पण ते का करायचं आणि कसं करायचं याचंही उत्तर त्यांच्यासारखे साहित्यिक आपल्या साहित्यातून देत असतात. ते आपल्याला माणसात देव शोधायला सांगतात. हाच त्यांचा वारसा आहे. त्यांची समृद्धी नोटांत मोजता येत नाही. ती असते त्यांच्या शब्दांत, स्वभावात आणि आचरणात. 

लता मंगेशकरांनी लाखो हृदयांना आपल्या सुरांनी जो आनंद प्रदान केला त्याची किंमत करता येईल का ? त्यांच्या संपत्तीचे मूल्य होऊ शकेल ? पण त्यांचा वारसा अमूल्य आहे. स्वरांची साधना, शुचितेची शिस्त, कलेप्रतीची निष्ठा आणि समर्पण, स्वभावातील नम्रता आणि ऋजुता याची मोजदाद किती आणि कशी करणार ? आज त्यांच्या पुढच्या पिढीतही हीच परंपरा जपली जाते. हाच खरा वारसा. थोर समाजसेवक बाबा आमटेंनी आपल्या सेवेचा वारसा मागे ठेवला आहे. तो त्यांच्या मुलांनी चालवला. आज त्यांची तिसरी पिढी सुद्धा तोच वारसा चालवते आहे. कित्येक कुटुंबांनी मुलांसाठी कोटींचा ठेवा ठेवलेला नसतो, पण त्यांनी ठेवलेला असतो ज्ञानाचा ठेवा,  ग्रंथभांडार आणि संस्कारांची बीजे. ही बीजे एकदा उगवली की छाया देतात पिढ्यानपिढ्या ! आणि कोणताही वारसा नीट समजून घेण्यासाठी एकच तराजू पुरतो ' काय ' ते स्वतःसोबत घेऊन गेले, आणि ' काय 'मागे ठेवून गेले. शेवटी जग विसरतं किती आणि आठवत राहतं ते काय. 

धनाचे रूप पाण्यापरी, कधी तरी जातेच वाहून 

मूल्यांचे दीप मात्र तेवत राहतात, वर्षानुवर्षे

आणि उजळतात वाटा आयुष्याच्या. 

ज्यांना ' किती ' आणि ' काय 'चे हे गणित समजले, त्यांचा वारसा आयुष्यभर दरवळत राहतो, सुगंधासारखा ! 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
७/१२/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...