मुख्य सामग्रीवर वगळा

एक काळ ऐसा होता...

 उगवतीचे रंग

एक काळ ऐसा होता…


लिहिता लिहिता सहज काही ओळी सुचल्या…

एक काळ असा होता—

जेव्हा गुणवत्तेला मोल होते.

एक काळ असा होता—

जेव्हा कलेचे मोल होते,

हृदयातून उमटलेले गाण्याचे बोल होते.


एक काळ असा होता—

जेव्हा पैसा होता छोटा,

पण माणूस होता मोठा.

एक काळ असा होता—

विचारात मतभेद होते,

पण माणसाबद्दलचा आदर अविचल होता.

एक काळ असा होता—

जात अन् धर्म किरकोळ होते,

पण माणूस सर्वांत महत्त्वाचा होता.

या ओळी सुचण्याचं कारण म्हणजे आज आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक घटना.

तरीही, पूर्वी सर्व काही चांगलेच होते आणि आज सर्वच वाईट आहे, असा माझा हेतू अजिबात नाही.

आजही इमानदार आणि आदर्शांनी जगणाऱ्या असंख्य माणसांमुळेच समाजाचा तोल टिकून आहे.

फरक एवढाच आहे की त्यांचा आवाज गोंगाटात हरवून जातो.

मला आठवतात—महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

विचारांत फरक असूनही एकमेकांबद्दलचा आदर कधीच ढळला नाही.

नेहरू आणि सरदार पटेल—वेगवेगळ्या मतांचे, पण राष्ट्रकार्यासाठी परस्परांचा आदर राखणारे.

सावरकर–सुभाषबाबू, सावरकर–गांधीजी—मतभेद असले तरी टीका कधीच वैयक्तिक पातळीवर गेली नाही.

स्वातंत्र्याच्या काळात हे अग्रगण्य नेते होते, पण सभ्यता हीच त्यांची भाषा होती.

अगदी अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी यांची शैली तर आदर्शच ठरावी—

मतभेद व्यक्त करतानादेखील त्यांनी संयम, शब्दांची शिस्त आणि मर्यादा कधीच सोडली नाही.

दुर्दैवाने आज हा संयम लयाला जाऊ लागला आहे.

शब्दांचा उगम विचारातून नव्हे तर स्वार्थातून आणि रागातून होताना दिसतो.

विरोधकांशी मतभेद म्हणजे शत्रुत्व, आणि टीका म्हणजे चारित्र्यहनन—

असा एक धोकादायक प्रवाह हळूहळू समाजाच्या सर्वच स्तरांवर झिरपत चालला आहे.

निवडणुका आल्या की हा गोंगाट शिगेला पोहोचतो.

विचारसरणी, तत्त्वे, मुद्दे याऐवजी वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचे नाटक सुरू होते.

हे पाहताना  संवेदनशील व्यक्तीच्या मनाला वेदना झाल्याशिवाय राहत नाहीत.

याच काळात, अनेक तरुण आजही समाजकारणात निःस्वार्थ ध्येयाने येतात,

अनेक अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात,

अनेक स्वयंसेवी संस्थांची सेवा आजही प्रेरणादायी आहे.

समाजाचे शांत, निस्वार्थ काम करणारे हात आपल्याभोवती आहेत—

नकारात्मक गोष्टी आपल्यासमोर जास्त प्रमाणात येतात पण अशा गोष्टींकडे मात्र आपले फारसे लक्ष जात नाही.

गुणवत्ता असो वा नसो—सत्ता आपल्या घरातच राहावी, अशी धडपड अनेक ठिकाणी दिसून येते.

कधी योग्य उमेदवार डावलला जातो, तर कधी पैसा आणि जात या निकषांना अतिरेकी महत्त्व दिले जाते.

चित्रपटसृष्टीतील प्रेरणादायी उदाहरणे सांगताना पृथ्वीराज कपूर यांची घटना आठवते—

त्यावेळी राज कपूर यांनी चित्रपटसृष्टीत नुकतेच पदार्पण केले होते. सुरुवातीलाच त्यांना भालज पेंढारकर यांनी आपल्या चित्रपटात काम दिले. भालजी पेंढारकर यांनी राज कपूर यांना त्यावेळी तब्बल ५,००० रुपये मानधन दिले. ५००० रुपयांची किंमत त्यावेळी फार मोठी होती. तेव्हा पृथ्वीराज कपूर यांनी भालजींना विचारले

“ तुम्ही ही रक्कम त्याला त्याच्या गुणवत्तेमुळे दिली की माझा मुलगा आहे म्हणून ?”

आज असे शब्द बोलण्याची नैतिक ताकद कितीजणांत उरली आहे?

देवानंद यांनी मुलाच्या अभिनयक्षमतांचा वस्तुनिष्ठ विचार करून त्याला चित्रपटातून दूर राहण्यास सांगितले.

आजकाळ मात्र अभिनयाची किमान जाण नसलेली मुले–मुली मोठ्या नावांच्या जोरावर पुढे येताना दिसतात.

१९५० मध्ये बांगलादेशातील लाखो निर्वासित हिंदू भारतात आले होते. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती. प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला त्यावेळी केवळ सतरा अठरा वर्षांचीच होती. परंतु या निर्वासितांची अवस्था पाहून मधुबालाचे हृदय द्रवले आणि तिने आपली साठवलेली रक्कम ५१,००० रुपये या निर्वासितांच्या मदतीसाठी दिली. मुस्लिम असलेल्या मधुबालाने धर्माचा विचार केला नाही. तिच्यासाठी माणूस महत्त्वाचा होता. हीच खरी मानवतेची ओळख.

संगीताच्या विश्वात तर शकील बदायुनी, नौशाद आणि रफी

ज्यांनी ‘ओ दुनिया के रखवाले’ सारखी अमर निर्मिती दिली, त्यांच्या गीतात धर्म कुठेच नव्हता. होते ते फक्त भावना आणि सौंदर्य! तर ‘ ऐ मालिक तेरे बंदे हम ’ हे वसंत देसाई–लता मंगेशकर यांचं गीत पाकिस्तानातही प्रार्थना म्हणून गायले गेले. कला आणि मानवता यांना सीमा नसतात. त्या फक्त माणसाला जोडतात.


निसर्ग तर याच गोष्टी आपल्याला सांगतो

चंद्र, सूर्य, पाऊस, वारा—

हे सर्व सर्वांसाठी समान असतात.

झाड झाडासाठी सावली राखून ठेवत नाही.

नदी आपल्या पाण्याचा वेगळे कोणी हिशेब ठेवत नाही.

पण माणूस मात्र अजूनही माणसाला वेगळा ठरवण्यात गुंतलेला आहे.

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात

“ हे विश्वची माझे घर ” त्यांचे हे उद्गार फक्त आपल्या ओठांवर असतात पण आपण खरोखर तसेच जगतो का ?

मला माहिती आहे की हे सगळे खूप आदर्शवत आहे. पण त्या दिशेने एक पाऊल टाकल्यासही जग बदलण्याची शक्यता असते.

एक काळ असा होता—

ज्यावेळी भेदभाव कमी, आणि माणुसकी जास्त होती.

तो काळ पुन्हा यावा…

माणसाने माणसाला म्हणावं

मला फक्त तू हवा… तू हवा.

© विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव

२९/११/२०२५

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...