उगवतीचे रंग
वृक्षमाता सालूमरदा थिमक्का
काही दिवसांपूर्वी सालूमरदा थिमक्का गेल्याची बातमी आपण सगळ्यांनी वृत्तपत्रात वाचली असेल. सालूमरदा हे त्याचं नाव नाही. कानडी भाषेत त्याचा अर्थ होतो ' झाडांची रांग.' रस्त्याच्या दुतर्फा अशी झाडांची रांग या स्त्रीने उभी केली म्हणून ती सालुमरदा.
संत तुकारामांच्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या उक्तीचा अर्थ हजारो वर्षांनी एका अशिक्षित आणि गरीब स्त्रीने त्यांच्या रूपाने आपल्या कृतीने सिद्ध केला. औपचारिक शिक्षण नाही, पण पर्यावरणाचे सखोल ज्ञान उपजतच होतं.अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेली आणि मोलमजुरी करणारी ही स्त्री. तिचा विवाह बिक्कल चिक्कय्या यांच्याशी झाला. पण दोघांनाही अनेक वर्ष मूल होऊ शकलं नाही. या गोष्टीला त्यांनी नियतीचा शाप न मानता, वृक्षांनाच अपत्य मानण्याचं ठरवलं. त्यांच्या पतीनेही त्यांना या कामात मनापासून साथ दिली.
त्यांनी लावलेले प्रत्येक वडाचे झाड आज एक नैसर्गिक 'कार्बन सिंक' म्हणून कार्यरत आहे. ही वटवृक्ष पिढ्यानपिढ्या वातावरणातील कार्बन डायऑक्साइड (CO2) शोषून घेतात आणि त्या बदल्यात ऑक्सिजन बाहेर टाकतात. थिमक्का यांनी आपल्या निष्ठेच्या बळावर एक नैसर्गिक CO2 फिल्टर तयार केला. त्यांच्या कार्यामुळे भूजल संवर्धन झाले आणि मातीची धूप थांबली. त्यांचे कार्य म्हणजे जागतिक तापमानवाढीच्या विरोधात केलेली एक स्थलांतरित (Local) आणि अत्यंत प्रभावी कृती होती.
थिमक्का यांच्या कार्याला त्यांच्या मानसपुत्र उमेश यांचा मोठा आधार लाभला. उमेश यांनी केवळ थिमक्का यांची वृद्धापकाळात सेवा केली नाही, तर या वृक्षारोपण मोहिमेचे व्यवस्थापन केले. दूरवरून पाणी आणणे असो, की या कार्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणे असो, उमेश हे थिमक्का यांच्या कार्याचे संवर्धक ठरले. त्यांच्या मदतीमुळेच थिमक्का यांच्या निस्वार्थ कार्याला पद्मश्रीसह अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
सालुमरदा थिमक्का यांना वटवृक्षाप्रमाणेच ११४ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे कार्य आजही जिवंत आहे.
"वृक्ष लावणारे निघूनिया जाती, तळी विसावते सानथोर।"
या उक्तीप्रमाणे, थिमक्का आणि त्यांचे पती आज नसले, तरी त्यांनी लावलेले वटवृक्ष आजही दिमाखात उभे आहेत. त्यांच्या शीतल छायेखाली वाटसरूंना सावली मिळते, प्राणी-पक्षांना आश्रयस्थान लाभते आणि परिसर शुद्ध राहतो.
थिमक्का यांनी जगाला दाखवून दिले की, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज नाही; त्यासाठी मनापासून इच्छा आणि निसर्गाप्रतीचे वात्सल्य आवश्यक आहे. त्यांचे जीवन चिरंतन प्रेरणास्रोत राहील आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटावर मात करण्यासाठी त्यांची 'वृक्षमाता' म्हणून असलेली भूमिका जगाला नेहमी दिशा देत राहील.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२६/११/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा