मुख्य सामग्रीवर वगळा

आणि बिबट्या पळाला...

उगवतीचे रंग 

आणि बिबट्या पळाला...

​रात्री टीव्हीवर बातम्या पाहत असताना नाशिक आणि नगर भागात बिबट्याने किती थैमान घातले ते दाखवत होते. बिबट्याच्या दहशतीने लोक घाबरले होते. त्या बातम्या पाहतच मी झोपी गेलो. मी गाढ झोपलो असताना अचानक मला एक भीतीदायक डरकाळी ऐकू आली. मी दचकून जागा झालो. पाहतो तर काय समोर चक्क एक बिबट्या! त्याचे डोळे अंधारात चमकत होते.  तो अगदी समोर आणि मी त्याच्या शिकारीच्या टप्प्यात. बापरे ! आता काही खरं नाही. माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझ्यात कुठून एवढे बळ आले कुणास ठाऊक, पण भीती वाटण्याऐवजी माझ्या डोक्यात काहीतरी केमिकल लोचा झाला आणि मला थेट 'शोले' चित्रपटच आठवला. समोर साक्षात मृत्यू उभा होता आणि माझ्यातला 'गब्बर सिंग' जागा झाला होता.

​बिबट्याने पुन्हा एकदा गुरगुरत माझ्याकडे पाहिले. मी थरथरत्या हाताने चादर सावरली आणि मनातल्या मनात म्हणालो, "जो डर गया, समझो मर गया!"

​बिबट्या एक पाऊल पुढे आला. त्याचा पवित्रा पाहून मला वाटलं तो आता झडप घालणार. पण मी ही काय कच्च्या गुरुचा चेला नव्हतो. मी बेडवर उभा राहिलो आणि पूर्ण ताकदीने ओरडलो, "अरे ओ सांबा! लगा निशाना इस बिबटे पर. अब तेरा क्या होगा बिबट्या ?"

​माझ्या अशा अनपेक्षित ओरडण्याने बिबट्या सुद्धा दोन मिनिटं कन्फ्युज झाला. तो डोळे विस्फारून माझ्याकडे बघतच राहिला. समोरच्या सावजाकडून त्याला अशा प्रकारच्या प्रतिसादाची अपेक्षा अजिबात नसावी. आतापर्यंत त्याचा अनुभव असा होता की समोरचे सावज त्याला पाहिले की गर्भगळीत होत होते. पण इथे तर वेगळाच प्रकार होता. मनात नक्कीच विचार आला असेल की, "शिकार करायला आलोय की  शिकार व्हायला ?"

बिबट्याला आतापर्यंत स्वतःबद्दल फार आत्मविश्वास होता. गावोगावच्या माता आपल्या बाळाला झोपवताना त्याची भीती दाखवत होत्या. " बेटा सो जा नही तो बिबट्या आ जायेगा. " बिबट्या सुद्धा आपल्या साथीदारांना मोठ्या गर्वाने म्हणत होता, " कितना इनाम रखा है रे इन फॉरेस्ट वालो ने मुझपर ?" त्याचे साथीदार म्हणायचे," पुरे पाच लाख, सरदार. " आणि मग बिबट्या गडगडाटी हास्य करायचा. पण आता बिबट्याचा हा आत्मविश्वास पार डळमळीत झाला होता.

​ मी म्हटलं," गाववालोने भुखे कुत्तों के सामने रोटी डालना अब बंद कर दिया है. इसलिये यहा कुछ नही मिलेगा."

​बिबट्या बिचारा अजूनच गोंधळला. त्या गोंधळलेल्या अवस्थेत त्याने आणखी एक डरकाळी फोडली. बहुधा त्या परिस्थितीचा निषेध त्याने व्यक्त केला असावा. पण आता त्याच्या डरकाळीत ती पूर्वीची जरब राहिली नव्हती. त्याने एक पाऊल मागे घेतलं. मला वाटलं तो घाबरला. माझा आत्मविश्वास वाढला. मी कोपऱ्यात ठेवलेली काठी उचलली. मी म्हटलं," गब्बर से तुम्हे एक ही आदमी बचा सकता, है खुद गब्बर !"

​तसं जर बिबट्याने ठरवलं असतं तर समोरच्या भक्ष्याची शिकार करणं त्याला काही अवघड नव्हतं. पण आता त्याच्या डोक्यातही काहीतरी केमिकल लोच्या नक्कीच झाला होता. त्याला आता खात्री पटली होती की हा माणूस खायला योग्य नाही, कारण ह्याला शिकार बनवले तर आपलीच शिकार व्हायची आणि असा माणूस न खाल्लेला चांगला ! माणूस जातीचे भवितव्य उज्वल राहण्यासाठी अशी माणसे जगणे आवश्यकच !काही एक न बोलता तो खिडकीकडे चालू लागला. तो पाठ फिरवून जात असताना मी त्याला शेवटचा टोमणा मारलाच, "जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी!"

​बिबट्या खिडकीतून उडी मारून पळून गेला.

आता बिबट्याच्या घरी काय परिस्थिती असेल ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळले. त्याचा चेहरा पाहून बिबटीण बाईंनी नक्कीच विचारले असणार. " काय झाले शिकार मिळाली नाही का ?" बिबट्याचे उत्तर " नाही. आज माझीच शिकार व्हायची होती पण वाचलो." सौ बिबट म्हणाल्या, " का ? पळून आलात ? "

 बिबट्या म्हणाला " होय. " 

सौ बिबट, " कितने आदमी थे ? "

बिबट्या, " सिर्फ एक "

सौ बिबट, " सिर्फ एक आदमी और फिर भी वापस आ गये ?" 

एवढ्यात कसला तरी आवाज झाला आणि मला जाग आली. सगळं शांत झाल्यावर मी बेडवर धपकन बसलो आणि स्वतःशीच पुटपुटलो, "इतका सन्नाटा क्यूँ है भाई?"

​तेवढ्यात  बायकोचे उद्गार माझ्या कानावर आले. " अहो, कसला सन्नाटा आणि झोपेत कसले शोलेचे डायलॉग म्हणत होतात ! गब्बर काय, सांबा काय ? उठा सकाळचे आठ वाजले आता."

​तेव्हा मला कळलं, बिबट्या वगैरे काही नव्हता. हा सगळा रात्रीच्या बातम्या पाहण्याचा परिणाम होता. पण आता बिबट्या वगैरे काही नव्हता तो खिडकीतून पळून गेला होता आणि माझ्या अंगात रात्रीचा गब्बर अजून जागा होता. मी बायकोला ऑर्डर केली," चहा आण."

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२०/११/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...