उगवतीचे रंग
त्या ' मुलांच्या ' गंधकोषी
काही वर्षांपूर्वी मी अमरावतीच्या शाश्वत स्कूल या शाळेला भेट देण्यासाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या टेबलवर एक बोर्ड होता. त्यावर लिहिले होते Every child is unique. ' तारे जमीपर ' हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. त्यातील ईशान अवस्थी आठवतो का ? त्याला जेव्हा होस्टेलमध्ये दाखल केले जाते तेव्हा तो अतिशय दुःखी होतो आणि कोणाशीही बोलत नाही कारण तो आपल्या घरापासून आणि आईपासून तुटतो. या ईशानला डिस्लेक्सिया नावाची एक व्याधी आहे. तो b आणि d, 6 आणि 9 यासारख्या गोष्टींमध्ये फरक करू शकत नाही. पण ही व्याधी बुद्धिमत्तेशी संबंधित नाही. अशा मुलांना समजून घेणे जरुरीचे असते. या चित्रपटातील शिक्षकाचे काम आमिर खान या गुणी नटाने केले आहे. तो त्या मुलाला समजून घेतो आणि त्याच्यातील सुप्त गुणांना वाव देतो. त्याला असे आढळून येते की ईशान हा चित्रकलेमध्ये अतिशय प्रगती करू शकेल आणि तो त्याच्या त्या गुणांना प्रोत्साहन देतो. आणि होतेही तसेच. पुढे जी चित्रकला स्पर्धा घेतले जाते, त्यात ईशानच्या चित्राला प्रथम पारितोषिक मिळते. या चित्रपटातील हर बच्चा खास होत आहे हे वाक्य म्हणजे वरील Every child is unique हीच गोष्ट ध्वनीत करते.
पण आम्ही मुलांना शिकवताना नेमकी हीच गोष्ट विसरतो. सगळ्या मुलांना जणू एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. पण ही मुले वेगवेगळी आहेत, त्यांना प्रत्येकाला वेगळे व्यक्तिमत्व आहे, त्यांची आवड निवड वेगळी असू शकते या गोष्टी आम्ही दुर्लक्षित करतो किंवा सोयीस्कर विसरतो. आम्हाला हवी असते सतत ए ग्रेड किंवा 90% च्या पुढे परीक्षेतील गुण. आम्ही त्यांना रेसचे घोडे बनवतो. पण या सगळ्या खटाटोपात आम्ही त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. त्यांचे बालपण या सगळ्यात खुरटते. या फुलांना नीट उमलायला आम्ही वावच देत नाही ही आजची शोकांतिका आहे.
पक्षी छान उडू शकतात, मासे छान पोहू शकतात, हरणे धावू शकतात. पण हरणांना उडायला सांगता येणार नाही, पक्षांना पोहायला सांगता येणार नाही किंवा माशांना धावायला सांगता येणार नाही कारण प्रत्येकाचे गुणवैशिष्ट्य वेगळे आहे. हीच गोष्ट मुलांच्या बाबतीत सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवी. एखादा मुलगा उत्तम खेळाडू होऊ शकतो, एखादा उत्तम चित्रकार होऊ शकतो, एखाद्याला गाण्याचे अंग असते. अशा विविध प्रकारच्या क्षमता प्रत्येक मुलाच्या अंगी असू शकतात. एकाच मुलाकडून सर्व गोष्टींची अपेक्षा आपण करू शकत नाही. ज्या परमेश्वराने किंवा निसर्गाने आपल्याला घडवले आहे किंवा जन्म दिला आहे त्याची सुद्धा तशी अपेक्षा नाही.
रवींद्रनाथ टागोर हे थोर शिक्षणतज्ज्ञ होते आणि महान कवी, साहित्यिक. पण त्यांना शिक्षणाची पारंपारिक चौकट मान्य नव्हती. त्यांना स्वतःला देखील लहानपणी शिकताना अशा प्रकारच्या शिक्षणात रस वाटत नव्हता. म्हणूनच तर मोठेपणी त्यांनी त्यांच्या स्वप्नातल्या शाळेची म्हणजेच शांतीनिकेतनची निर्मिती केली. या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीनुसार शिकण्यासाठी वाव दिला गेला. त्यांच्या मते शिकणं हा आयुष्याचा ' उत्सव ' व्हावा. त्यांचे हात सर्जनशील व्हावेत. पु ल देशपांडे यांच्यासारखा महान लेखक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती रवींद्रनाथांच्या या शिक्षण पद्धतीने भारावून गेली. त्यांनी रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनात अनेक दिवस मुक्काम करून त्यांची शिक्षण पद्धती समजावून घेतली आणि ती वंगचित्रे, रवींद्रनाथ : तीन व्याख्याने यासारख्या पुस्तकातून आपल्यासमोर मांडली.
मुलांना केवळ पुस्तकातील किडे न बनवता त्यांना जीवनाचा सर्व बाजूंनी आनंद घेता यावा अशी दृष्टी विकसित करणे आवश्यक आहे. त्यांच्यात प्रेम आणि नैतिक मूल्ये रुजतील असे वातावरण आपण त्यांना उपलब्ध करून द्यायला हवे. त्यासाठी त्यांच्या स्तरावर जाऊन त्यांना समजून घेतील आणि समजून देतील अशा शिक्षकांची आवश्यकता आहे. म्हणून क्रीडांगणे मुलांच्या गजबजाटाने फुलली पाहिजेत, वाचनालयात मुलांची गर्दी हवी, वर्गामध्ये कठोर शिस्तीच्या ऐवजी हसत खेळत शिकता यायला हवे. अनावश्यक विषयांचे आणि पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हायला हवे. मुलांना शाळेत जाणे ही आनंदाची गोष्ट वाटली पाहिजे ती शिक्षा वाटता कामा नये. हे उगवते तारे आहेत, उमलती फुले आहेत ती कोमेजून जाता कामा नये याची दक्षता आपणच घ्यायला हवी. ही मुले म्हणजे आपले भविष्य आहे. यात पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आज मुलांना खेळण्यासाठी घरामध्ये भावंडं नाहीत, आजीआजोबा नाहीत. अशा वेळी आई वडिलांनी मुलांसाठी वेळ काढणे आणि त्यांना समजून घेणे, प्रसंगी त्यांच्यामध्ये खेळणे आवश्यक आहे.
वर्षातून केवळ एक दिवस बालदिन साजरा करून भागणार नाही. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य, त्यांच्या जीवनातील आनंद कायम राहायला हवा. त्या कळ्या आपल्या पूर्ण शक्तीनिशी उमलायला हव्या. त्या फुलांच्या गंधकोषी असे एक सुंदर गाणे आहे. त्यात कवीला फुलांच्या गंधकोषात परमेश्वराचाच वास आहे असे सुचवायचे आहे. त्यात एका अक्षराचा बदल करून त्या मुलांच्या गंधकोषी असे म्हणता येईल. त्यातही त्या परमेश्वराचा वास आहे. फक्त ही फुले आम्हाला नीट फुलवता आली पाहिजेत. म्हणजे त्यांचा सुगंध दूरवर पोहोचू शकेल.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१४/११/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा