मुख्य सामग्रीवर वगळा

अदृश्य अस्त्रांचा धोका ( भाग दोन)

 उगवतीचे रंग 

अदृश्य अस्त्रांचा धोका (भाग दोन )

पहिल्या महायुद्धातच रसायन अस्त्र आणि वायू अस्त्र वापरण्याची स्पर्धा जर्मनी आणि दोस्त राष्ट्रांमध्ये सुरू झाली. क्लोरीन वायूला तरी वास आणि रंगरूप असते. तो ओळखला जाऊन त्याविरुद्ध काहीतरी प्रतिबंधक योजना करता येते. त्यामुळे जर्मनीने त्यापुढे जाऊन अशा वायूचे संशोधन करायचे ठरवले की ज्याला वास किंवा रंगरूप नसेल आणि त्याची मारक क्षमता क्लोरीन पेक्षा अधिक असेल. जर्मन संशोधकांनी फॉस्जेन हा वायू शोधला. या वायूला रंग रूप आणि गंध नव्हता. तो हुंगला तरी सुरुवातीला लक्षात येत नव्हते. या वायूची मारक क्षमता अफाट होती. ज्या ज्या परिसरात तो सोडला गेला, त्या परिसरातील माणसे, प्राणी एवढेच काय परंतु वनस्पती जीवन देखील नष्ट झाले. पुढे दोस्त राष्ट्रांनी देखील आपापल्या प्रयोगशाळेत हा वायू तयार केला. त्यांनी त्याचा वापर जर्मन सैन्यावर केला.अशा या वायूंच्या संशोधन काळात त्यांच्या मारक क्षमतेचे प्रयोग निरपराध अशा प्राण्यांवर केले जात होते. या चाचण्यांमध्ये अनेक प्राण्यांचे बळी गेले.

आपल्यावरील हल्ल्यामुळे जर्मनी सावध झाले त्यांनी आणखी अतिसंहारक अस्त्र बनवण्याचा निर्णय घेतला. या संशोधनातून जन्माला आला तो अत्यंत विषारी आणि घातक असा मस्टर्ड गॅस. या वायूचे बॉम्बस् तयार केले गेले. ज्यांच्यावर हा प्रयोग झाला त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली. त्यांची कातडी भाजल्यासारखी किंवा तळल्यासारखी फुगून वर आली. अंगावर प्रचंड फोड आले. उलट्या, वेदना आणि प्रचंड जुलाब. आणि काही तासातच माणसे दगावली. पुढे दोस्त राष्ट्रांनी देखील संशोधन करून मस्टर्ड गसची निर्मिती केली आणि जर्मन सैनिकांवर त्याचा प्रयोग केला. यात जर्मन सैन्याची देखील अपार हानी झाली.

पहिले महायुद्ध १९१८ मध्ये संपले. या युद्धात लाखो लोकांचा बळी गेला. रसायन अस्र आणि वायू अस्त्रांमुळे  किती लोकांचे बळी गेले याची अधिकृत माहिती दडवून ठेवण्यात आली. रासायनिक अस्त्र आणि वायू अस्त्रांची निर्मिती करणारे राष्ट्र आणि त्यांच्या प्रयोगशाळा यांच्या बद्दलही कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. १९१९ मध्ये व्हर्सायचा करार झाला. त्यानुसार रसायन, वायू अस्त्रांचा आणि जीव अस्त्रांचा वापर बेकायदेशीर ठरवण्यात आला. या करारावर रशिया वगळता ३८ राष्ट्रांनी सह्या देखील केल्या. पण या सगळ्या अस्त्रांची पुढील वाटचाल आणि प्रगती पाहता हा करार फक्त कागदावरच राहिला आणि जगातील विविध राष्ट्रांनी भयानक अशा संहारक अस्त्रांची निर्मिती केली असे आपल्याला इतिहास सांगतो.

अमेरिकेत जगातील सगळ्यात मोठी अशी रसायनअस्र निर्मितीची प्रयोगशाळा उभारण्यात आली. शेकडो रसायनस शास्त्रज्ञांची मदत घेऊन विषारी वायूंची निर्मिती करण्यावर भर देण्यात आला. यातूनच लेविसाईट नावाचे नवे रसायन अस्त्र निर्माण झाले. हे अस्त्र मस्टर्ड गॅस पेक्षा अधिक भयानक आणि संहारक होतं. इंग्लंडने देखील आर्सेनिक या अति विषारी वायूची निर्मिती केली. फ्रान्स, इटली, जपान हे देश सुद्धा या अस्त्रांचा वापर करू लागले.  जर्मनीत पुढे आणखी झालेल्या संशोधनातून नर्व्ह गॅस ( टॅबुन) जन्माला आला.  या वायूचा प्रयोग ज्यांच्यावर झाला त्यांच्या शरीराची काही मिनिटातच गठडी वळली गेली आणि नंतर ते गतप्राण झाले. परंतु जर्मनीतील रसायन शास्त्रज्ञ इथेच थांबले नाहीत. त्यांचे वेगवेगळे प्रयोग सुरू होते. साध्या सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त माणसे कशी मारता येतील याबद्दल त्यांचा विचार सुरू होता. युद्धात वापरण्यासाठी त्यांनी संशोधनाअंती एक रसायन असं तयार केले. त्याचे नाव होते सरीन. सरीनपेक्षा भयानक असं रसायन अस्र आजपर्यंत तयार झालं नाही यावरून त्याची भयानकता कळू शकेल. हा अत्यंत विषारी असा वायू आहे. याचा किंचितसा अंश जरी श्वासावाटे शरीरात गेला तरी तो काही मिनिटातच मृत्यू घडवून आणतो हा वायू सरळ मज्जासंस्थेवर हल्ला करतो. जर्मनीतील हुकूमशहा हिटलर याच्या हाती हे अस्र आले होते.

जर्मनीसारखी युरोपीय राष्ट्रे रसायन अस्र तयार करत असताना जपान हे आशियाई राष्ट्र काही स्वस्थ बसले नव्हते. जपान गढून गेले होते जंतू अस्त्र तयार करण्यात. जपान आणि चीन या देशांमध्ये ऐतिहासिक शत्रुत्वाची परंपरा अबाधित होती. चीनचे वर्चस्व कमी करून त्याला नामोहरम करण्यासाठी जपान भयानक अशा जंतू अस्त्रांचा शोध लावण्यात मग्न होता. आपण नेहमी ऐकतो की दुसऱ्या महायुद्धात जपानवर अणुबाँब टाकण्यात आले. त्यामुळे प्रचंड विध्वंस झाला मनुष्यहानी, वित्तहानी झाली. बिचाऱ्या जपानी लोकांनी खूप सहन केले आणि ते या सगळ्या भयंकर हानीतून बाहेर आले, त्यांनी प्रगती केली. पण जंतू अस्त्र आणि विविध नवनवीन अस्त्रे निर्माण करताना त्यांनी माणसांवर ज्या प्रकारचे प्रयोग केले त्याचे वर्णन अंगावर काटा आणणारे आहे. क्रौर्याची परिसीमा त्यांनी गाठली. अक्षरशः प्राण्यांवर प्रयोग करतात असे माणसांवर केले गेले. यासाठी तुरुंगात कितपत पडलेल्या आणि किरकोळ आरोप असलेल्या कैद्यांचा वापर केला गेला. असहाय्य स्त्री पुरुष पकडून आणले गेले. विशेषतः चिनी लोकांवर अशा प्रकारचे अघोरी प्रयोग करण्यात आले. काहींच्या शरीरात ग्लॅन्डर्सचे जंतू घुसवण्यात आले तर कोणाच्या शरीरात टायफॉइड, कॉलरा, पटकीचे जंतू ! कोणाला अँथ्रॅक्सचा बळी केले गेले. तर कोणाला एखाद्या गंभीर रोग झालेल्या रुग्णासोबत बांधले गेले. त्याला किती वेळात रोगाची बाधा होते हे पाहिले गेले. एखाद्या रुग्णाचे पोट किंवा पचनसंस्था बिघडली असेल आणि ती तपासायची असेल तर डॉक्टर भूल देऊन ऑपरेशन करतात. परंतु इथे मात्र त्या रुग्णांना तसेच टेबलवर बांधून झोपवले गेले आणि त्यांना भूल न देता तसेच त्यांचे पोट फाडण्यात आले किंवा इतर अवयवांचे देखील अशाच प्रकारे निरीक्षण केले गेले. एखादी व्यक्ती पाण्याशिवाय किती काळ जगू शकते हे पाहण्यासाठी एखाद्या व्यक्तीला अजिबात पाण्याचा थेंबही न देता ती किती वेळात तडफडून मरते याचा अभ्यास केला गेला. असे विविध विकृत आणि अघोरी प्रयोग जपान्यांनी या काळात केले. 

वास्तविक अशा प्रकारचे क्रूर प्रयोग करून मानवजातीला काळीमा फासणाऱ्या या संशोधकांना आणि राज्यकर्त्यांना त्यांच्यावर खटले दाखल करून जबर शिक्षा व्हायला हवी होती. युरोपातील काही देशांमध्ये अशा प्रकारचे आततायी कृत्य करणाऱ्यांना खटले भरून शिक्षा करण्यात आल्या. परंतु जपानी संशोधक आणि राज्यकर्त्यांबद्दल तसे काही झाले नाही. ते सगळे सुटले. अमेरिकेला जपानकडील या संशोधनाची माहिती हवी होती.  जंतू अस्त्रे आणि रसायन अस्त्रे यांचे आपले गुपित अमेरिकेला देण्यासाठी जपान तयार झाले आणि त्या बदल्यात अमेरिकेने जपानचे सगळे गुन्हे माफ केले. महासत्ता आपल्या वर्चस्वासाठी आणि सत्तेसाठी कशाप्रकारे दुटप्पीपणे वागतात त्याचेच हे निदर्शक होते. ( क्रमशः)

संदर्भ : युद्ध जीवांचे - गिरीश कुबेर आणि आंतरजालावरून मिळणारी माहिती 

© विश्वास देशपांडे , चाळीसगाव 

१/११/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

३०/१०/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...