उगवतीचे रंग
जॅकपॉट
ही गोष्ट आहे साधारण पाच वर्षांपूर्वीची. त्यावेळी मी ' घे भरारी ' या नावाचा लेख नुकताच लिहिला होता आणि तो समाज माध्यमांद्वारे वाचकांपर्यंत पोहोचला होता. हा लेख ' सीबिस्कीट ' या चित्रपटाशी संबंधित होता. या चित्रपटात असे दाखवले आहे की सीबिस्किट या नावाचा एक अश्व रेस खेळताना जबर जायबंदी होतो. सगळ्यांना असे वाटते की यापुढे हा रेस मध्ये भाग घेऊ शकणार नाही. परंतु आश्चर्य म्हणजे त्यातूनही तो उभा राहतो भरारी घेतो आणि रेस जिंकतो. एका दुर्दम्य इच्छाशक्तीची ही अत्यंत प्रेरणादायी अशी कथा आहे. एके दिवशी हा लेख वाचून मला एका वाचक भगिनीचा फोन आला. त्या म्हणाल्या," नमस्कार, मी सरिता वाकलकर पुण्याहून बोलते आहे. मी आपला ' घे भरारी ' हा लेख वाचला. आपण हॉर्स रेसिंगशी संबंधित आहात का ? आपण रेस खेळता का ?" असे प्रश्न त्यांनी विचारले आणि मी आश्चर्यचकित झालो.
मी म्हटले," नाही बुवा. मी फक्त त्या चित्रपटाबद्दल लिहिले. हॉर्स रेसिंग बद्दल मला फारशी माहिती नाही आणि मी कधी रेस खेळलो नाही. पण आपण असे का विचारता आहात ? " त्या म्हणाल्या," कारण मी हॉर्स रेसिंगशी संबंधित आहे. मी रेस खेळले आहे." आता आश्चर्यचकित होण्याची माझी पाळी होती. मी म्हटले," काय, आपण रेस खेळता ?" त्या म्हणाल्या एकेकाळी मी रेस खेळत होते आणि त्यात मी उत्तम प्रकारे पैसेही मिळवले आहेत. आता माझे वय ८३ वर्षे आहे." म्हणजे साधारण त्या माझ्या आईच्या वयाच्याच होत्या. हॉर्स रेसिंग हा अजूनही एक प्रकारचा जुगारच मानला जातो आणि अशा या अश्व शर्यतीत चक्क एका महिलेने भाग घ्यावा. तोही ४०/४५ वर्षांपूर्वी ! आणि अशा महिलेचा मला फोन यावा याचे मला आश्चर्य वाटले. त्याहूनही जास्त आश्चर्य मला या गोष्टीचे वाटले की त्यांनी या वयात माझा लेख वाचून मला फोन केला होता.
मला त्यांच्याबद्दल खूपच कुतूहल वाटले. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यावेसे वाटले. नंतर माझे आणि त्यांचे काही वेळा फोनवर संभाषणही झाले. त्यांनी मला पुण्याला आल्यानंतर भेटीसाठी येण्याचे निमंत्रण दिले. आपण काही पुस्तके लिहिल्याचेही त्यांनी सांगितले. आणि माझा पत्ता विचारून त्यांनी लिहिलेले ' जॅकपॉट 'हे पुस्तक मला पाठवून दिले. हे पुस्तक हातात आल्यानंतर मी जणू काही एक अद्भुत कादंबरी वाचतो आहे किंवा एखादा उत्कंठावर्धक चित्रपट पाहतो आहे असेच मला वाटले. हे पुस्तक संपेपर्यंत मला खाली ठेवावेसे वाटेना.
सरिताताईंचा जन्म नामदेव शिंपी समाजात झाला. त्यांच्या वडिलांचे पुण्यात बुधवार पेठेत शंकरराव पाटसकर अँड कंपनी या नावाचे कापडाचे दुकान होते. एका मोठ्या एकत्र कुटुंबामध्ये त्या राहत होत्या. त्यांच्या वडिलांनी दोन लग्ने केली. त्यांच्या आईला एकूण दोन मुली आणि चार मुलगे होते. तर शकुंतला या नावाच्या दुसऱ्या आईला चार मुली आणि दोन मुलगे होते. त्यांना दोन सख्खे काका होते. त्यांचे वडील पुरोगामी विचारांचे होते. त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड होती. सिनेमा, नाटक, मेळे यासारख्या विविध कार्यक्रमांना ते जात असत. जाताना आपल्या सोबत घरातील मुलांना देखील बरोबर नेत असत. त्यामुळे मुलांमध्ये आपोआपच सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड निर्माण झाली, वैचारिक दृष्ट्या मुले प्रगल्भ झाली आणि त्या माध्यमातून अनौपचारिक असे शिक्षणही त्यांना मिळाले.
सरिताताईंचे शिक्षण भावे हायस्कूल, कसबा पेठेतील म्युनिसिपल शाळा, सेवासदन इत्यादी ठिकाणी नववीपर्यंत झाले. त्या अभ्यासात हुशार असून त्यांना शिक्षणाची आवड होती. आईने त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. त्यांच्या लहानपणीचा एक प्रसंग पुस्तकात दिला आहे. शाळेतील एका श्रीमंत घरच्या एका विद्यार्थिनीच्या सुंदर चपला त्यांना आवडल्या आणि त्यांनी कोणाचे लक्ष नाही असे पाहून त्या चपला चोरून आणल्या आणि घरात लपवल्या. परंतु जेव्हा त्यांच्या आईच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा आई त्यांना अतिशय रागावली आणि त्या चपला शाळेत परत करून ये नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही अशा प्रकारची ताकीद दिली.
त्यांच्या सावत्र आईने म्हणजेच शकुंतला बाईंनी त्यांचे लग्न तिथून जवळच असणाऱ्या वाड्यातील एका मुलाशी लावण्याचा घाट घातला. हा मुलगा, हे घर योग्य नाही असे त्यांना मनोमन वाटत होते. त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीला निक्षून विरोध केला. शिक्षणाची आवड असल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेला बाहेरून बसायचे असे त्यांनी ठरवले आणि त्यासाठी एक क्लास लावला. याच दरम्यान पुढे योगायोगाने श्री शंकरराव वाकलकर यांच्याशी ओळख झाली. त्यांचे विचार आणि मने जुळली आणि एकमेकांना कायमस्वरूपी साथ देण्याचा निश्चय त्यांनी केला. शंकरराव वाकलकरांचे पुण्यात स्टेशनरीचे एक प्रसिद्ध दुकान होते. तेथून केवळ पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी स्टेशनरीचा पुरवठा केला जात असे. शंकरराव हे ब्राह्मण समाजातील होते. अशा रीतीने सरिताताईंच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. त्यांच्या आणि शंकररावच्या वरचेवर भेटी होऊ लागल्या. मात्र एक मोठी अडचण होती. ती म्हणजे दोघांच्याही घरून त्यांच्या लग्नाला मोठा विरोध होता.
एकदा ते आळंदीला दर्शनासाठी गेले असताना मंदिरातील पुजाऱ्याने त्यांना नवरा-बायको समजून आशीर्वाद दिला. हा शुभशकुन समजून आपल्या एका मित्राच्या घरी ते राहिले. आणि तेथेच त्यांनी एकमेकाला वरमाला घातली. आपण लग्न केले आहे हे आपल्या घरच्यांना कळू न देता हे दोघेही एक भाड्याचे घर घेऊन वेगळ्या राहीले. त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. त्यांच्या गाठीभेटी, त्यांच्यातील प्रेम या सगळ्या गोष्टी जशा रोमांचक होत्या तशाच अनेक अडचणींना देखील त्यांना तोंडही द्यावे लागले. परंतु दोघांचेही एकमेकांवर जीवपाड प्रेम असल्यामुळे त्यांनी या सर्व अडचणींवर मात केली. सरिताताईंना आपल्या मनाजोगता जोडीदार मिळाला होता आणि शंकररवांना आपली आवडती सहचारिणी.
यथावकाश त्यांच्या संसार वेलीवर तीन फुले उमलली. दोन मुली आणि एक मुलगा. अनिता, तरिता आणि चेतन. या मुलांच्या शिक्षणाकडे आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार कसे होतील याकडे सरिताताईंनी अत्यंत काळजीपूर्वक लक्ष दिले. त्यांच्यावर संस्कार केले. शंकररावांचे जरी त्यांच्यावर जीवापाड प्रेम होते तरी त्यांच्या स्वच्छतेच्या सवयी जगावेगळ्या होत्या किंबहुना काही वेळा त्याचा अतिरेक ते करत असत. पण त्यांच्या या सगळ्या लहरी देखील सरिताताईंनी सांभाळल्या.
शंकररावांना नवनवीन मोटार गाड्या घेण्याची आणि चालवण्याची आवड होती. त्याचप्रमाणे हॉर्स रेसिंग मध्ये त्यांना खूप रस होता. घोड्यांच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी ते बऱ्याच वेळा रेस कोर्स वर जात असत. घोड्यांवर पैसे लावत असत. काही वेळा जिंकत आणि काही वेळा हारतही. मग ते काही वेळा आपल्या सोबत सरिताताईंनाही घेऊन जाऊ लागले. सुरुवातीला अशा ठिकाणी जाणे सरिताताईंना आवडत नव्हते परंतु त्यांना लवकरच त्याची सवय झाली. शर्यतीत कोणता अश्व जिंकेल याबद्दलचे त्यांचे अंदाज बऱ्याच वेळा बरोबर येऊ लागले. कोणता अश्व जिंकेल याचे संकेत त्यांना नकळत आपल्या अंतरातून मिळायला लागले.
मग त्यांनी अश्व शर्यतीचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला. त्यांचे गणितही उत्तम होते. त्याचा त्यांना या अभ्यासात उपयोग झाला. शर्यतीत कोणता अश्व जिंकेल याबद्दलचे त्यांचे अंदाज, त्यांचा अभ्यास किंवा त्यांचे भाकीत बरोबर येऊ लागले. आता त्यांना अश्व शर्यतीतून चांगल्या प्रकारे कमाई होत होती. हे करत असताना मात्र त्यांनी आपल्या घराकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. अनिताला जग फिरण्याची आवड होती. त्याप्रमाणेच तिने आपले क्षेत्र निवडले आणि ती एअर होस्टेस झाली. तरिता राज्यशास्त्र हा विषय घेऊन बीए झाली. पुढे ती एल एल बी उत्तीर्ण झाली. चेतन देखील अभ्यासात अतिशय हुशार होता. तो इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला. अनिता एअर होस्टेस झाली आणि मग तिच्याबरोबर शंकरराव आणि सरिताताई जवळपास संपूर्ण जग फिरले. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ची त्यांनी स्थापना केली. सरिताताईंना अनेक मोठमोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला.
आयुष्यात जसे सुखाचे दिवस येतात तसाच दुःखाचाही काळ येतो. अशीच संकटे सरिताताईंवर ओढवली. २००३ मध्ये शंकर रावांचे दुःखद निधन झाले आणि सरिताताईंवर फार मोठा आघात झाला. या दुःखातून सावरत नाही तोच अनिताला कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले आणि २००६ मध्ये ती देखील हे जग सोडून गेली.
जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याजवळ इतरांना सांगण्यासारखा आणि आगळावेगळा असा अनुभवाचा खजिना आहे. त्यात जसं वैविध्य आहे तसाच रंगपंचमीच्या रंगांचा ताजेपणाही आहे. आपलं आयुष्य त्यांनी जणू एका धुंदीत घालवलं परंतु ते जगताना त्या कधीच बेधुंद झाल्या नाहीत. त्यांचे पाय सतत जमिनीवरच राहिले. त्यांच्या ' जॅकपॉट ' या आत्मचरित्रात त्यांनी कोणताही आड पडदा न ठेवता सगळ्या गोष्टी जशा घडल्या तशाच सांगितल्या आहेत. त्यांच्या भाषेमध्ये एक नैसर्गिक सौंदर्य असल्यामुळे वाचक अत्यंत उत्कंठेने हे पुस्तक वाचत जातो आणि ते पूर्ण केल्याशिवाय ते खाली ठेवण्याची इच्छा होत नाही इतके ते मनोवेधक झाले आहे. हे पुस्तक वाचताना सरिताताईंचा प्रांजळपणा जसा जाणवतो तशीच जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती आणि त्यांची रसिकता ठायी ठायी जाणवल्याशिवाय राहत नाही.
आज सरिताताईंचे वय ८८/८९ वर्षे आहे. वयानुसार त्या थकल्या आहेत परंतु स्मरणशक्ती उत्तम आहे. मी पुण्यात गेलो तेव्हा त्यांची सहकुटुंब भेट घेतली. त्यांनी आमचे उत्तम आदरातिथ्य केले. मी माझी काही पुस्तके देखील त्यांना भेट दिली. अजूनही रोज काहीतरी वाचन केल्याशिवाय त्या झोपत नाहीत. त्यांचे ' जॅकपॉट ' हे पुस्तक मुळातून वाचण्यासारखे आहे. इतरही काही पुस्तके त्यांनी लिहिली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात पूर्वीचे पुणे, त्याचप्रमाणे त्यांच्या काही हृदयस्पर्शी आठवणी यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. परंतु ती पुस्तके आता उपलब्ध होऊ शकली नाहीत. पण खरोखरीच इतरांनी प्रेरणा घ्यावी अशा प्रकारचे त्यांचे जीवन आहे. त्यांना मिळालेले जॅकपॉट हे त्यांच्या प्रयत्नांचे आणि अभ्यासाचे फलित आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१/१०/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा