मुख्य सामग्रीवर वगळा

तुम्हीच आहात त्रिदेव

 उगवतीचे रंग 

तुम्हीच आहात त्रिदेव 

ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले 

 मला हे दत्तगुरु दिसले 

हे गाणं ऐकत होतो आणि मनात विचार आला की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे एकत्र गुरुदत्ताच्या ठायी विराजमान आहेत. मानवातही परमेश्वर आहे असे आपण म्हणतो. मग माणसातही ते असतील का ?

उत्पत्ती, स्थिती आणि लय या जगाच्या तीन अवस्था असतात असं आपण ऐकलेलं असतं. त्याचप्रमाणे या तिन्ही अवस्थांचे जनक अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असतात हेही आपण ऐकलेलं असतं. ब्रह्मदेव जगाची निर्मिती करतात, भगवान विष्णू पालन पोषण करतात आणि शंकर जगाचा लय किंवा संहार घडवून आणतात. हे सगळं आपण वेळोवेळी ऐकतो, वाचतो. आपली अशी समजूत होते की हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश दूर कुठेतरी वास्तव्य करीत असावेत. ब्रह्मदेव स्वर्गात, विष्णू क्षीरसागरात आणि शंकर हिमालयात. पण खरे पाहता हे त्रिदेव आपल्या अंतरातच वास करत असतात असाही त्याचा अर्थ घेता येईल. आपल्या स्वतःच्या आणि स्वतःभोवतीचे जग, परिस्थिती आपणच निर्माण करत असतो. तिचे पोषणही आपल्याकडूनच होते आणि विनाशही. कसे ते समजून घेऊ या. 

" तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार," असे सद्गुरु वामनराव पै सांगतात. ही साधी ओळ, पण जीवन बदलून टाकणारी. आपण जसे विचार करतो, तसा आपला संसार, आपलं आयुष्य घडतं. प्रत्येकात देव आहे, म्हणूनच आपणच असतो आपल्या जगाचे शिल्पकार, आपणच आपल्या जगाचे ब्रह्मा.

ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात, असे शास्त्र सांगते. पण जर थोडा विचार केला, तर लक्षात येतं की आपणही रोज आपल्या आयुष्याची नवी सृष्टी घडवतो. आपले विचार, भावना, कृती – हेच आपल्या जीवनाचं चित्र रंगवत असतात.

एके काळी माझ्या आयुष्यातला एक टप्पा असा होता की मन सतत खचलेलं असे. " हे माझ्याकडून होणार नाही ", " माझं नशिबच असं आहे " अशा नकारात्मक विचारांनी माझं मन व्यापून गेलेलं होतं.  परिणामी, आयुष्य उदास वाटू लागलं, आजूबाजूची माणसंही खटकू लागली. कशातच आनंद वाटेनासा झाला. पण एकदा वाचनात आलेली स्वामी विवेकानंदांची ओळ मला अंतर्बाह्य हलवून गेली. 

" तुम्ही जसे विचार कराल तसे घडाल. तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजाल तर दुर्बल व्हाल. तुम्ही स्वतःला शक्तिमान समजाल तर शक्तिमान व्हाल. "

ही ओळ वाचून मी जणू जागा झालो. आता आपण आपल्या विचारांची दिशा बदलायलाच हवी असे वाटू लागले आणि मी विचारांची दिशा बदलण्याचा निश्चय केला. नकारात्मक विचारांना दार बंद केलं आणि छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद शोधायला सुरुवात केली. मला एक उदाहरण आठवतं. माझ्या शाळेत एक विद्यार्थी होता. तो इंग्रजीत अतिशय कच्चा होता. मी त्याला दररोज इंग्रजीतील एक नवीन परिच्छेद वाचायला सांगितला. त्यातील नवीन शब्द त्यांचा अर्थ शोधून लिहून काढायला सांगितले. उच्चार सुधारण्यासाठी रेडिओवरील इंग्रजी बातम्या ऐकायला सांगितल्या. त्याशिवाय आपल्या पाठ्यपुस्तकातील धड्याचे मोठ्याने प्रकट वाचन करायला सांगितले. त्यानेही माझ्या सांगण्याप्रमाणे केले. सातत्य ठेवले. हळूहळू इंग्रजीत त्याची प्रगती होऊ लागली. मी त्याचे वाचन, लेखन पाहून कौतुक करत होतो.  त्याला रोज दोन प्रश्न जास्त सोडवायला सांगत होतो आणि प्रत्येक उत्तरानंतर त्याचं कौतुक करत होतो. काही महिन्यांत तो इतरांपेक्षा पुढे गेला. त्याचे उद्गार मला आजही आठवतात. तो हसून म्हणाला, " सर, मला वाटायचं मी कधीच शिकू शकणार नाही, पण तुम्ही म्हणालात मी करू शकतो, आणि मी खरंच ते करू शकलो." त्या मुलाचा आत्मविश्वास वाढताना पाहून मला जाणवलं – आपण दुसऱ्याचं जग बदलू शकतो, तर आपलं स्वतःचं जग का नाही?

मी प्रवासात असताना एकदा गावी मुक्काम होता. त्या गावात एक पुरातन मंदिर होतं. मी कोणत्याही गावात गेलो आणि मला वेळ असला की तेथील मंदिरे मी आवर्जून पाहतो. अशाच त्या प्राचीन मंदिरात मी गेलो होतो. सकाळची शांत वेळ होती, मंदिरात फक्त मी होतो. मंद दिव्याच्या प्रकाशात देवाचा गाभारा उजळून निघाला होता. मनाचा गाभाराही प्रसन्नतेनं उजळला होता. काही काळाची का होईना पण शांतीची ती अभूतपूर्व अनुभूती मला अंतर्बाह्य हलवून गेली. मनातील सगळे गुंते जणू आपोआप सुटले आणि मी स्वतःशीच पुटपुटलो " माझं जीवन मीच घडवणार, माझ्या जगाचा ब्रह्मा मीच आहे." त्या दिवसानंतर प्रत्येक संकटाकडे मी नवा दृष्टिकोन घेऊन पाहू लागलो. अडचण नुसती अडथळा न वाटता ती एक पायरी बनली, जी मला पुढे पुढे माझ्या ध्येयाप्रत नेत होती.

हळूहळू सभोवताल बदलायला लागला. लोकांचे तेच चेहरे आता अधिक जवळचे आणि आपुलकीचे वाटायला लागले, संधी मिळू लागल्या. खरंतर जग तेच होतं, पण बदललेलो होतो मी.

आपणच आपल्या आयुष्याचे ब्रह्मा आहोत. आपण जसा विचार करू, तसंच आपलं जग घडतं. आपल्या विचारांनी नवी निर्मिती घडवायची ताकद आपल्यात आहे. रागाऐवजी क्षमा निवडली की तणाव संपतो. भीतीऐवजी धैर्य निवडलं की मार्ग सापडतो. एकदा आपण आपल्याला हवं तसं आपल्या भोवतालचं जग निर्माण केलं की त्याचं जतन करणं म्हणजे ते टिकवणं आणि वाढवणं आपल्याच हातात असतं. या अर्थानं आपण आपल्या जगाचे पोषण करणारे विष्णूच असतो. आणि त्याग ( म्हणजेच संहार ) करायचा तो नकारात्मक विचारांचा, वाईट गोष्टींचा आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या वाईट सवयींचा. या अर्थाने भगवान शिवशंकर देखील आपल्यातच विद्यमान असतात. ' नसे राऊळी वा नसे मंदिरी ', देव अंतरात नांदे हेच खरं !

आजच्या गोंधळलेल्या काळात ही जाणीव फार महत्त्वाची आहे. आपल्या आतल्या या त्रिदेवांना जागं करूया. विचार तेजस्वी, कृती संवेदनशील आणि मन शांत केलं तर आपलं जीवन आपल्याला हवं तसं एक सुंदर शिल्प बनेल. कारण – आपणच आहोत आपल्या जगाचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. 

Ⓒविश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२६/०९/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...