मुख्य सामग्रीवर वगळा

नवरात्र पर्व - शक्तीचा जागर

उगवतीचे रंग 

 नवरात्र पर्व– शक्तीचा जागर

पावसाळा संपण्याच्या बेतात आहे. सगळीकडे वातावरणात चैतन्य भरून राहिले आहे. शेतातील पिके काढण्यासाठी तयार झाली आहेत. अशाच सुंदर वातावरणात अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रची सुरुवात होते. नवरात्री म्हणजे केवळ उत्सव नाही तर दैवी रूपातील स्त्री शक्तीची पूजा, शक्ती रूपात असलेल्या देवीची उपासना आणि अंतरातील शक्ती जागवण्याचा हा पर्वकाळ !

अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी घराघरात घट बसवला जातो. या घटस्थापनेचा संबंध हा थेट आपल्या कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो. आपल्या शेतात जी पीकं पिकवली जातात, ज्यातून आपलं पोट भरतं त्याबद्दल श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते, घरी नवीन धान्य आलेलं असतं. घटस्थापनेला घटासमोर शेतातील माती आणली जाते. त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं. एक प्रकारे हे बीज परीक्षणच असतं. दसऱ्यापर्यंत ते पीक त्या घटासमोर उगवतं. या नऊ दिवसात आदिमाया, आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्यांचीही पूजा केली जाते.

देवघरात ठेवलेला कलश, वाजणारे शंख-घंटानाद आणि मनात जागणारा उत्साह – हे सगळं मिळून एक दिव्य, शुद्ध आणि पवित्र वातावरण तयार होतं. घटस्थापना म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही; ती आपल्यातील सुप्त शक्तींना जागे करण्याची प्रक्रिया आहे. कलशातील सुपिक माती म्हणजे जणू आपल्या जीवनाची भूमी, त्यात पेरलेले बी किंवा धान्य म्हणजे आशा, श्रद्धा आणि नवी सुरुवात यांचे प्रतीक आणि अखंड दिवा म्हणजे आपल्या अंतःकरणातील विवेक आणि तेज अखंड जागृत ठेवावं यांचा संदेश देणारा मंगल दीप.

आपण महाराष्ट्रातील लोक विशेष भाग्यवान आहोत ते या अर्थाने की आपल्या महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. त्या रूपात तेथे माता भगवतीचा जागृत निवास आहे. फक्त आपण त्या दृष्टीने आणि श्रद्धेने त्याकडे बघायला हवे.

जेव्हा जेव्हा पृथ्वीवर असुर उन्मत्त झाले आणि देवांनाही आवडेनासे झाले तेव्हा तेव्हा देवीने अवतार धारण करून त्या राक्षसांचा नाश केला. दुर्गादेवीने महिषासुराचा नाश केला. म्हणूनच नकारात्मक शक्ती आणि वाईट गोष्टी नष्ट होण्याच्या दृष्टीने नवरात्रातील साधना आणि उपासना अत्यंत महत्त्वाची ठरते.

कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी – ऐश्वर्य, समृद्धी आणि मंगलकारकतेची अधिष्ठात्री आहे. या देवीने कोल्हासुराचा वध केला त्यामुळे या ठिकाणाला कोल्हापूर असे नाव पडले.

तुळजापूरची श्रीतुळजाभवानी – पराक्रम, शौर्य आणि अन्यायाविरुद्धच्या लढाईची प्रेरणा देणारी आहे. महाराष्ट्राची ही कुलस्वामिनी मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास या दोघांचीही ही कुलस्वामिनी होती हे विशेष !

 तुळजाभवानी देवीच्या बाबत अशी कथा सांगितली जाते की कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती ही अत्यंत पतिव्रता स्त्री होती. परंतु तिचे तप आणि पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न कुंकूर नावाच्या एका दैत्याने केला. संकटात सापडलेल्या अनुभूतीने आर्त स्वरात देवीचा धावा केला देवी पार्वती त्वरेने तिथे धावून आली आणि तिने त्या दैत्याचा संहार केला. त्वरेने धावणारी ती त्वरजा. म्हणून ती तुळजा झाली.

माहूरची श्रीरेणुकामाता – मातृत्वाची करुणामयी मूर्ती, जीवनदायिनी शक्ती आहे. माता रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी होती. ती अत्यंत पतिव्रता होती. ती एकदा नदीवर पाणी आणण्यासाठी गेली असताना तिने चित्ररथ गंधर्वाची जलक्रीडा पाहिली आणि तिच्या मनात आपल्या पतीसह अशाच प्रकारची जलक्रीडा करावी असा विचार आला. जमदग्नी ऋषींनी आपल्या तप:सामर्थ्याने तिच्या मनातील विचार ओळखला आणि ते अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी आपल्या पुत्रांना तिचा वध करण्यास सांगितले. परंतु अशा प्रकारचे कृत्य करण्यास कोणीही तयार झाले नाही शेवटी परशुरामाने आपल्या पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून माता रेणुकेचा वध केला. त्यानंतर जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामाला वर मागून घेण्यास सांगितले. तेव्हा परशुरामाने आपल्या आईला आणि तिने भावांना जिवंत करण्यास सांगितले. नांदेड जिल्ह्यात माहूरगड येथे तिचा निवास आहे. तेथेच परशुरामांचेही एक मंदिर आहे.

 वणीची श्रीसप्तशृंगी – अर्धे शक्तीपीठ मानले जाणारे, भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. शृंग म्हणजे शिखर. सात शिखरांवर विराजमान असलेली म्हणून या देवीचे नाव सप्तशृंगी असे आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील डोंगरावर तिचा वास आहे. 

महाराष्ट्रातील या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी धाव घेतात आणि एक नवीन ऊर्जा, चैतन्य आपल्या सोबत घेऊन जातात.

काही वर्षांपूर्वी मी अंबाबाईच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तो अनुभव आजही माझ्या मनात ताजा आहे. पहाटेची वेळ होती. मंदिराच्या सभामंडपात टाळ-मृदुंगाचा गजर चालू होता. वातावरणात एक अद्भुत गूढता होती. गाभाऱ्यातील दिव्याच्या उजेडात महालक्ष्मीचे ते मोहक दर्शन झाले आणि अंगावर शहारे आले. घंटानाद, शंखनाद आणि पुजाऱ्याच्या मुखातून होणारे मंत्रोच्चार – जणू देवी स्वतः समोर येऊन उभी राहिली आहे असे भासत होते. त्या क्षणी वाटले, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी तिचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. मंदिरातून बाहेर पडलो तेव्हा मनात एक अद्भुत शांतता आणि समाधान भरून राहिले होते.

 हेमाडपंथी बांधणी असलेले हे मंदिर अत्यंत प्राचीन आहे. ही देवी ऐश्वर्य देणारी असल्यामुळे तिला हिरण्यमयी महालक्ष्मी असेही म्हटले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की वर्षातून दोन वेळा नैसर्गिकरित्या सूर्याचे किरण मंदिरातील मातेच्या मूर्तीवर जणू सुवर्ण किरणांचा अभिषेक करतात. मावळतीच्या सोनेरी किरणांनी उजळलेली महालक्ष्मीची मूर्ती अत्यंत मनोहर दिसते.

नवरात्र म्हणजे फक्त उत्सव नाही, तर दैवी स्त्रीशक्तीला वंदन करण्याचा काळ. देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा या काळात केली जाते.

शैलपुत्री (शौर्य), ब्रह्मचारिणी (साधना), चंद्रघंटा (शांती), कूष्मांडा (सर्जनशीलता), स्कंदमाता (मातृत्व), कात्यायनी (धर्मरक्षण), कालरात्री (भीषण शक्ती), महागौरी (शुद्धता) आणि सिद्धिदात्री (पूर्णत्व व सिद्धी).

हे नऊ दिवस म्हणजे आपल्या मनातील नऊ गुणांना जागृत करण्याची संधी आहे – धैर्य, साधना, शांतता, सर्जनशीलता, करुणा, न्याय, निडरता, शुद्धता आणि पूर्णत्व.

महाराष्ट्रात नवरात्र मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जाते. गावागावांत देवीचे गोंधळ होतात, जोगवा मागितला जातो, भजनी मंडळांचे भजनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात, देवीच्या पुढे होमहवन, सप्तशतीचे पाठ अशा अनेक गोष्टींचे आयोजन केले जाते. एक अनोखे भक्तीचे पर्व तयार होते आणि वातावरणात एक दैवी ऊर्जा भरून राहिलेली असते म्हणूनच या काळात केलेली देवीचे उपासना अधिक फलदायी ठरते. शहरांमध्ये गरबा-दांडिया, सामूहिकपणे सर्वांनी एकत्र येऊन केलेली देवीची आरती, मिरवणुका आणि जागरण यामुळे हा उत्सव अधिक रंगतो. मात्र अलीकडे या उत्सवात ध्वनी प्रदूषण होऊ लागले आहे आणि मूळ उद्देश बाजूला पडून नको त्या गोष्टींचा शिरकाव होतो आहे.

असे म्हणतात की नवरात्रोत्सवाची लोकप्रिय परंपरा बंगालमधून संपूर्ण भारतात पसरली. बंगालमध्ये दुर्गापूजा हा एक भव्य सांस्कृतिक महोत्सव असतो. खास उभारलेल्या मंडपातील भव्य मूर्ती, ढोल वाद्यांचा गजर, विविध खेळांचे आणि उपक्रमांचे आयोजन– या सर्वामुळे तिथे नवरात्राला एक अद्वितीय रंग चढतो. अनेक लोक हा नवरात्रीचा उत्सव पाहण्यासाठी प. बंगालमध्ये गर्दी करतात. भारतात रामलीला आणि रावणदहनाने हा उत्सव रंगतो, तर गुजरातमध्ये दांडिया-गरबा नवरात्राचा आत्मा बनतो.  देशाच्या विविध भागात हा उत्सव निरनिराळ्या प्रकारे साजरा होतो.

नवरात्र हा फक्त उत्सव नाही, तर आत्मिक साधनेचा, नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचा आणि अंतःकरणातील दीप प्रज्वलित करण्याचा काळ आहे. या नऊ दिवसांत आपण फुलं, नारळ, नैवेद्य अर्पण करतो, पण त्याचबरोबर आपल्या भीती, राग, मत्सर यासारख्या नकारात्मक गोष्टीही मनातून काढून टाकाव्यात. नवरात्र आपल्याला सांगते – देवी तुमच्या बाहेर नाही, ती तुमच्या आत आहे. तिला जागं करा, तिच्या साहाय्याने तुमच्या जीवनातील अंधारावर विजय मिळवा.

या नवरात्रीला घटस्थापनेच्या दिवशी एक प्रार्थना आपण सगळे आपल्या मनाशी करूया –

" हे माते, आमच्या जीवनात तेज, धैर्य, शांती आणि आनंद येऊ दे. आमच्यातील सुप्त शक्ती जागृत होऊ दे आणि आमच्या अंतःकरणातील वाईट शक्तींशी झुंजण्याचे बळ आम्हाला मिळू दे, वाईटावर विजय मिळवण्याचं बळ दे. सर्वत्र मंगल होऊ दे. 

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥


© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२०/९/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...