मुख्य सामग्रीवर वगळा

एका थरारक प्रवासाचा साक्षीदार होताना...

उगवतीचे रंग 

 एका थरारक प्रवासाचा साक्षीदार होताना...

माझ्या डोळ्यासमोर घडलेली ही घटना !नुकत्याच पडलेल्या पावसानं पोर्च ओलीचिंब झाला होता. मातीचा सुगंध हवेत दरवळत होता. गार वाऱ्याने अंगावर शिरशिरी आणली. मी खुर्चीत बसून पावसाचा आस्वाद घेत होतो.

तेवढ्यात माझ्या नजरेला तो दिसला –

लहानसा मिलीपीड ! मराठीत ज्याला आपण वाणी किंवा पैसा म्हणतो. आपल्यापैकी अनेकांनी तो पाहिला असेल. त्याचीच ही गोष्ट ! आपण त्याला हात लावल्याबरोबर तो आपले शरीर आक्रसून गोलाकार करून घेतो. एखाद्या नाण्यासारख्या दिसतो. म्हणून त्याला पैसा म्हणत असावेत. काळसर शरीर, शरीराच्या खालच्या दोन्ही बाजूला एक पिवळसर रंगाची पट्टी, डोक्यावर अँटेनासारखे दिसणारे दोन संवेदनावाहक, आणि शेकडो पायांची एकसंध लयबद्ध चाल. अगदी छोटासा जीव, पण कसा निर्धाराने पुढे चालत होता ! जणू स्वतःशीच म्हणत होता

"चला, आजचा प्रवास सुरू!"

त्याच्या हालचालीतून जणू मला त्याचा उत्साह जाणवला. पण त्याची वाटचाल सोपी नव्हती. नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे पाण्याचे एक छोटेसे तळे साचले होते. पावसाचे थेंब अजूनही त्यावर नाचत होते.

तो मनाशी म्हणाला, " ही तर माझ्यासाठी प्रचंड नदीच आहे ! यात पडलो तर वाहून जाईन." 

त्याने एका पायाने पाणी चाचपलं. थंडावा अंगावर शिरशिरी आणणारा.

" नाही, नाही... वळसा घालायलाच हवा !"

तो पाण्याच्या काठाने सावधपणे सरकू लागला. वळणावर एखादी बस किंवा रेल्वेगाडी वळावी तसा तो वळला.

थोडं पुढे जातो न जातो तोच जमिनीतली एक फट त्याच्या नजरेत आली.

मी तर ती फक्त रेषेसारखी पाहत होतो, पण त्याच्यासाठी ती खोल दरी होती.

" बापरे, भयंकर! यात पडलो तर परत वर यायचा प्रश्नच नाही. पण घाबरून चालणार नाही !"

तो फटीला सुरक्षितपणे वळसा घालून तो हळूहळू पुढे गेला.

अजूनही त्याच्या मार्गातील अडचणी संपल्या नव्हत्या. आता समोर उभा ठाकला पोर्चमधला उंच खांब.

"अरे बापरे ! हा तर प्रचंड डोंगर आहे. चढून वर जाणं शक्य नाही. वळसा घ्यावा लागेल."

त्याने खांबाभोवती पूर्ण फेरी मारली. प्रत्येक पावलात धाडस आणि शहाणपण दोन्ही होतं.

त्याच्या दृष्टीने मोठा डोंगर असलेला तो खांब तो पार करतो न करतो तोच एक मोठी वाऱ्याची झुळूक आली. ओली जमीन घसरट झाली.

मिलीपीड क्षणभर डगमगला, एका बाजूला वाकला.

" अरे देवा ! मी पडणार का ?"

पण मन शांत ठेवून आणि प्रसंगावधान राखून त्याच्या शेकडो पायांनी जमिनीची एकदम पकड घेतली आणि तो स्थिरावला.

" नाही ! मी हार मानणार नाही. अजून प्रवास बाकी आहे !"

तो पुन्हा पुढे चालू लागला – आता जास्त वेगाने, जणू स्वतःलाच धीर देत.

शेवटी तो एका कोरड्या, सुरक्षित कोपऱ्यात पोहोचला.

थोडा वेळ स्थिरावला, मग शांतपणे बसला. स्वतःशीच म्हणाला...

" हे ठिकाण माझ्यासाठी सुरक्षित आहे. इथपर्यंत पोहोचलो. विजय मिळाला !"

मी हे सगळं एका दृष्टीक्षेपात पाहत होतो. हा छोटासा प्रवास माझ्या डोळ्यांसमोर जणू एखाद्या चित्रपटासारखा साकार झाला होता.

अचानक मला वाटलं की त्याच्या जागी जणू एक बस चालली आहे.

बसचालक रस्त्यात येणाऱ्या अडथळ्यांना कौशल्यपूर्वक टाळतो आहे.

समोर पाणी दिसतं – तो वळसा घेतो.

खड्डा दिसतो – तो मोठ्या कौशल्यानं बस वळवून खड्डा पार करतो. जणू पाण्यातून कौशल्यपूर्वक नाव वल्हवणारा नावाडीच !

बसचालकाला वाटेत एक खांब दिसतो. खांबाला बस धडकणार नाही याची काळजी घेऊन तो सावधपणे वळतो.

आणि सगळे प्रवासी सुरक्षित पोहोचतात.

त्या क्षणी माझ्या मनात एक विचार चमकून गेला –

मी या छोट्या जीवाचा संपूर्ण प्रवास एका नजरेच्या टप्प्यात पाहिला.

कदाचित परमेश्वरही वरून आपल्या आयुष्याकडे असाच पाहत असेल.

आपल्या आयुष्यातही पूर येतात, खड्डे येतात, अडथळे येतात.

पण जर आपण मिलीपीडप्रमाणे सावध, धीराने आणि चिकाटीने वळसा घेत राहिलो,

तर आपणही आपल्या इच्छित गंतव्यापर्यंत पोहोचू शकतो. तो छोटासा मिलीपिड जणू मला सांगत होता...

"आपल्या पावलांवर विश्वास ठेवा, प्रवास सुरू ठेवा. संकटे अडथळ्यांना घाबरू नका. शेवटी विजय आपलाच आहे."

माझ्या डोळ्यासमोर एक भव्य नाट्य घडून गेले होते किंवा एक जिवंत चित्रपट साकार झाला होता. विधात्याची ही कलाकृती पाहून मी थक्क झालो होतो.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
१५/९/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...