उगवतीचे रंग
कागज के फूल
परवा मला एका गृहस्थांचा सकाळी सकाळी फोन आला. माझा लेख त्यांना आवडला होता म्हणून त्यांनी फोन केला. मग त्यांनी माझ्या पुस्तकांची चौकशी केली. कोणती पुस्तके आहेत, कोणत्या विषयावर लिहिलेली आहेत वगैरे. मला आनंद झाला पण तो आनंद क्षणिकच टिकला. कारण ते मला म्हणाले मला पुस्तके नकोत. मला असे लेख असतील तर पाठवत जा. मला त्यांच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले आणि वाईटही. माझे पुस्तके नकोत म्हणून वाईट नाही वाटले. परंतु पुस्तकांना नाकारण्याची ही प्रवृत्ती मला योग्य वाटली नाही. परंतु मी म्हटले की ठीक आहे मी तुम्हाला लेख पाठवत जाईन.
दुसरे एक गृहस्थ माझ्या गावातीलच होते. ते देखील माझ्या लेखांचे वाचक होते. एकदा ते मला भेटले आणि म्हणाले की तुमचे लेख मी नेहमी वाचतो. खूप छान असतात. तुमची पुस्तके कुठे मिळतील ? मी त्यांना म्हटलं की माझ्याकडे पुस्तके आहेत. तुम्हाला देऊ का ? मग म्हणाले," मला विकत नको. लायब्ररीत पुस्तके आहेत का तुमची ? म्हटलं हो आहेत. मग म्हणाले," मी तिथून घेऊन वाचेन. " मी स्वतःशी म्हणालो," हरकत नाही. कुठून का होईना, पुस्तक घेऊन वाचल्याशी कारण !"
काही दिवसांपूर्वी मी पुण्यात गेलो होतो. गणेशोत्सवापूर्वीचे ते दिवस होते. एका ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन भरले होते. त्या प्रदर्शनाबाहेर एका प्रकाशकाने आपल्या प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेली पुस्तके प्रदर्शित केली होती. सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन पाहण्याआधी किंवा नंतर लोकांनी येऊन किमान आपल्या स्टॉलवरील पुस्तके चाळावीत अशी त्यांची अपेक्षा होती. काही प्रमाणात तसे झालेही. पण पुस्तक विक्रीचा प्रतिसाद मात्र फारसा आशादायी नव्हता. त्या स्टॉलवर एक वृद्ध जोडपे आले. त्यांनी बराच वेळ तेथील पुस्तके चाळली. मग म्हणाले," अहो, हल्ली मराठी पुस्तके कोणी वाचत नाहीत. " म्हणजे त्यांनी एखादे पुस्तक तर घेतले नाहीत परंतु अशा प्रकारचे उद्गार काढून मराठी माणसांचा आणि त्या प्रकाशकाचा एक प्रकारे अपमानच केला. एका बाजूला आपण मराठी वाचवली पाहिजे, जगवली पाहिजे असे म्हणतो. मराठी अभिजात भाषा आहे म्हणून तिचा अभिमान बाळगतो आणि दुसऱ्या बाजूला हे असे विपरीत वागणे...?
त्या उलट बंगालमधील माणसे. बंगालमधील माणसांच्या घराघरात रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चॅटर्जी, शरदचंद्र आदी तेथील प्रख्यात साहित्यिकांची पुस्तके हटकून आढळतील. मराठी माणूस मात्र याबाबतीत खूप मागे आहे असे म्हणावे लागेल.
काही दिवसांपूर्वी मात्र एक आशादायक गोष्ट घडली. आमच्या शाळेतील एक ज्येष्ठ शिक्षक वृद्धापकाळमुळे वारले. त्यांना स्वतःला आणि त्यांच्या मुलाला वाचनाची खूप आवड. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ जमलेल्या लोकांना आपण पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृती जोपासावी असे वाटले आणि त्याने त्यांच्या उत्तरकार्याच्या दिवशी जमलेल्या लोकांना माझी पुस्तके भेट म्हणून वाटली. हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम त्याने केला.
या लेखाचे शीर्षक मी ' कागज के फूल ' असे दिले आहे. खरंतर कागदी फुलांना सुगंध नसतो. परंतु माझ्या दृष्टीने पुस्तके म्हणजे कागदाची सुंदर फुले. त्यांना रंग, रूप, सुगंध सगळे काही आहे. पुस्तक हातात घेतल्याचा आनंद म्हणजे एखाद्या नाजूक फुलाचा सुगंध घेतल्यासारखा असतो.
जेव्हा मी स्वतःचे पुस्तक पहिल्यांदा हातात घेतले तेव्हा मला वाटले – जणू हे कागदाचे फूल उमलले आहे आणि माझ्या परिश्रमांचा गंध पसरवत आहे. त्या पानापानांत माझ्या डोळ्यांचे स्वप्ने होती, जागरणाच्या रात्री होत्या, आणि स्वप्नांचे रंग होते.
आजही आठवतो तो क्षण – माझ्या गावातल्या एका वाचकाच्या घरी मी गेलो होतो आणि माझेच पुस्तक त्यांच्या कपाटात ठेवलेले पाहिले. जणू त्या घरात माझ्या शब्दांचे फूल उमलले होते. लेखकासाठी याहून मोठा आनंद काय असू शकतो? पण या आनंदासोबत काही हळवे क्षणही आले. जेव्हा काही वाचकांनी म्हटले," आम्हाला पुस्तके नकोत. आम्हाला नुसते लेख पाठवत जा."
हे ऐकताना मनाला चटका बसला. आपण हॉटेलमध्ये सहज हजार-दोन हजार रुपये खर्च करतो, एका कॉफीसाठी दोनशे रुपये देतो, मोबाईल रिचार्जवर शेकडो रुपये घालवतो, पण पुस्तकासाठी दोनशे-पाचशे रुपये खर्च करताना मात्र विचार करतो. माझी पुस्तके कोणी घेतली किंवा न घेतली म्हणून मला वाईट वाटत नाही. परंतु एक प्रकारे वाचन संस्कृतीलाच आपण अशा रीतीने नाकारतो आहोत म्हणून वाईट वाटते. शिवाय जी व्यक्ती आपल्याला लेखनाद्वारे आनंद देते, नवीन विचार देते अशा व्यक्तीसाठी दोन पाचशे रुपये खर्च करायला आपण इतका विचार का करतो ?
कोणत्याही लेखकाला हे पैसे केवळ मोबदला म्हणून नको असतात, तर ते त्याच्या परिश्रमांचे आणि भावविश्वाचे मानपत्र असते. पुस्तक प्रकाशित झाले की अभिनंदनाचे मेसेज येतात – "छान!" "शुभेच्छा! अभिनंदन ! " पण " मला हे पुस्तक हवे आहे " असे म्हणणारा वाचक विरळाच.
पुस्तक प्रकाशन समारंभाला येणारे अनेक जण फक्त भाषण ऐकून, चहापाणी करून निघून जातात. कागदाचे हे फूल तेव्हा एकाकी आणि उदासवाणे वाटते.
पण मला वाटते –
हे फूल म्हणजे काही उत्तम आणि दर्जेदार पुस्तके सर्वांच्या घरात असावीत. मग ती माझीच नव्हे तर इतर कोणत्याही मान्यवर लेखकांची असली तरी चालतील.
पुस्तक म्हणजे केवळ विचारांचा संच नाही, तर एक अमूल्य ठेवा आहे.
आपल्या मुलांना, नातवंडांना दाखवण्याजोगा वारसा आहे.
जसे आपण घरात शोभेच्या वस्तू ठेवतो, तशा या विचारांच्या फुलांनी घर सजले पाहिजे.
संध्याकाळच्या चहासोबत हे पुस्तक हातात घेऊन वाचले पाहिजे.
कुटुंबात त्यावर चर्चा झाली पाहिजे.
कारण विचारांवर केलेला खर्च हा सर्वांत सुंदर आणि टिकाऊ गुंतवणूक आहे.
आणखी एक गोष्ट –
पुस्तके ही वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा कोणत्याही विशेष दिवसासाठी देण्यास सर्वोत्तम भेट आहेत.
फुले दुसऱ्या दिवशी कोमेजतात, गिफ्ट रॅपर फाडून फेकला जातो, पण पुस्तकाचे आयुष्य दीर्घ असते. ते वारंवार उलगडले जाते, पुन्हा पुन्हा वाचले जाते आणि घरातल्या प्रत्येकाला नवा विचार देऊन जाते. अशा भेटीमुळे तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या नात्यात एक नवा बौद्धिक सुगंध पसरतो.
वाचनसंस्कृती वाचवायची असेल, तर पुस्तकासाठी केलेला खर्च हा सवय आणि जबाबदारी दोन्ही झाला पाहिजे. कारण पुस्तक विकत घेणे म्हणजे फक्त लेखकाचा सन्मान नाही, तर आपल्या मनात विचारांचे फूल उमलवणे आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१४/९/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा