मुख्य सामग्रीवर वगळा

आजी-आजोबा : वटवृक्षाची सावली

उगवतीचे रंग 

आजी-आजोबा : वटवृक्षाची सावली 

सुमारे ६०-६२ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी त्यावेळी एका छोट्याशा खेड्यात राहत होतो. वय असेल ७/८ वर्षांचे. एकदा आई कुठल्यातरी कारणाने मामांकडे गेली होती. वडील, आजी आणि मी असे तिघेच घरी असायचो. त्यातही वडिलांच्या मागे शेतीची कामे, तसेच ते गावाचे पोलीस पाटील असल्याने तालुक्याच्या गावी त्यांना  जावे लागत असे. मग काय माझी आणि आजीची गट्टी असायची. आजीच्या हातच्या स्वयंपाकाला फार छान चव होती. उपासाच्या दिवशी ती जी फोडणीची वरई करायची तिची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. आजी फारशी शिकलेली नव्हती पण तिला लिहावाचायाला येत होते. ती कुठल्याही शाळा कॉलेजात गेली नव्हती पण जीवनाच्या विद्यापीठाची डॉक्टरेट तिच्याकडे होती. कुठलीही गोष्ट कशी समजावून सांगायची याचे कौशल्य तिच्याजवळ होते. संस्काराचे विद्यापीठ होती आजी. 

मी मित्रांमध्ये खेळून यायचो, जवळपासच्या शेतात जाऊन हुंदडायचो, उन्हात फिरल्याने, खेळल्याने प्रचंड तहान लागायची. धावत घरात आलो की माठाजवळ जायचो आणि पाणी प्यायचो. पण आजी मला थांबवायची. अरे थांब, तसाच माठाजवळ जाऊ नकोस. कुठून कुठून भटकून आला आहेस. आधी हात पाय धू, मग पाणी पी. त्यावेळी इतकी तहान लागलेली असायची की हात पाय धुण्यापुरता देखील धीर नसायचा. मग आजीचा राग यायचा. मी म्हणायचो, " काय गं आजी, नेहमी असं करतेस ! बघ ना, माझे हातपाय स्वच्छ आहेत. त्यांना कुठे घाण लागलीय का ? " आजी म्हणायची, " बाळा, घाण अशी दिसत नाही पण जीवजंतू हातापायावर असतात. म्हणून हातपाय धुतल्याशिवाय घरातल्या कोणत्याच वस्तूला शिवू नये. " त्यावेळी वाटायचं आजीला काही कळत नाही. उगीच हे शिवाशिवीचं भूत आपल्या डोक्यात घालते. पण मोठं झाल्यावर कळलं की जे मला कळलं नव्हतं ते आजीला कळलं होतं. आजी भलेही शाळा कॉलेजात गेली नसेल पण स्वच्छतेचा संस्कार तिने माझ्या मनावर जो केला, तो चिरंतन होता. कोरोनाच्या काळात तर आजीची शिकवण सारखी आठवायची. किती खरं होतं तिचं सांगणं ! आज थोडंफार काही झालं की आपण लगेच डॉक्टरांकडे जातो. पण त्या काळात खेड्यापाड्यात डॉक्टरच नव्हते. खूप काही गंभीर आजार झाला तर तालुक्याच्या गावी जावे लागे. पण आजीजवळ बहुधा सगळ्या छोट्या मोठया आजारांवर उपचार असत. तिच्या बटव्यात अशा दुर्मिळ गोष्टी हटकून असायच्याच. कोणी बाहेरच्या माणसाने जरी तिला सल्ला विचारला तरी आपल्या बटव्यातून ती औषधी वनस्पती काढून द्यायची आणि कसे घायचे ते सांगायची. त्या माणसाचा आजार हमखास बरा व्हायचाच ! दृष्ट लागणे या प्रकाराला भलेही कोणी अंधश्रद्धा म्हणो, पण मला बरे नसले की ते आजीला कळायचे. मग ती माझी दृष्ट काढायची. 

आचार्य अत्रेंची ( केशवकुमार ) एक कविता आहे. ' आजीचे घड्याळ. ' त्यानुसारच माझी आजी वागायची. न दिसणारे, आवाज न करणारे घड्याळ निसर्गानेच तिला बहाल केले होते. सगळ्या गोष्टी इतक्या वेळच्या वेळी असत की तिला घड्याळाची गरजच नसे. महिना, दिवस, तिथी या गोष्टी तिच्या अगदी बरोबर लक्षात असत. त्यासाठी तिला ' कालनिर्णय ' किंवा पंचांग पाहावे लागत नसे. सण, उत्सव यासारख्या दिवशी तर उत्साह काही वेगळाच असायचा. अशी ही माझी आजी. आजही माझ्या स्मृतीत जिवंत आहे. आजोबा तर मला आठवत नाहीत कारण ते खूप पूर्वीच वारले होते. पण त्यांच्या पश्चात आजीने सगळ्या संसाराचा डोलारा सांभाळला, मुलांना घडवले, मोठे केले. अशा या आजीचा सहवास काही वर्षे का होईना पण मला लाभला हे माझे केवढे भाग्य !  

“ घरात आजी-आजोबा असतील तर ते घर जिवंत असतं ” – हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो आणि ते अगदी खरं आहे. ते घराच्या असतात कडेला असलेल्या वटवृक्षासारखे – सावली देणारे, आसरा देणारे आणि घराला मुळांशी जोडून ठेवणारे. आजी आजोबा असतील तर घर कसं भरलेलं वाटतं !

आजी-आजोबांचं आणि नातवंडांचं नातं विलक्षण असतं. आईवडिलांच्या शिस्तीमधून मुलं “कसं करावं” शिकतात, तर आजी-आजोबांच्या मांडीवर बसून “का करावं” हे शिकतात. आजीच्या गोष्टींमध्ये संस्कारांचा गोडवा असतो, तर आजोबांच्या अनुभवांतून जगण्याचं शहाणपण.

लहानपणीच्या आठवणी आठवल्या की मन ओलावतं – आजीने सांगितलेल्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीच्या शेवटी मिळणारा संस्कारांचा अनमोल धडा. सकाळी उठल्यावर ' कराग्रे वसते लक्ष्मी ...' हा तिने शिकवलेला श्लोक आजही आठवतो.  आजी आजोबांसाठी नातवंडं म्हणजे दुधावरची साय – मऊ, गोड, डोळ्याचं पारणं फेडणारी. त्यांच्या दुडदुडू चालण्यातून, पहिल्यांदा उच्चारलेल्या शब्दांतून, छोट्या हसण्यातून आजी-आजोबांना जणू टॉनिक मिळतं. जीवन जगण्याचा उत्साह मिळतो. आणि नातवंडांना मिळतो मायेचा ओलावा, प्रेमाचा उबदार स्पर्श, थरथरत्या हातांची प्रेमळ मिठी !

परंतु आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हे नातं विरळ होत चाललंय. घरं मोठी आहेत पण अनेक घरात आजी-आजोबांची खोली रिकामी दिसते. घरं रीती आणि वृद्धाश्रम फुललेले !  खरं तर त्यांची जागा घराच्या मध्यवर्ती असावी – त्यांच्या पावलांनी घर जिवंत होतं, त्यांच्या नजरेतून पिढ्या शिकतात, त्यांच्या आशीर्वादाने भविष्य उजळतं.

दुर्दैवाने आज आजी आजोबा दिवस साजरा करण्याची वेळ आली  आहे. खरं तर रोज त्यांचाच दिवस असायला हवा. पण हरकत नाही या निमित्ताने का होईना पण या  नात्याला नव्याने उजाळा देऊ या. त्यांच्या पायांवर डोकं ठेवून आशीर्वाद घेऊ या, त्यांना हसवण्याचा [प्रयत्न करू या. त्या थरथरत्या हातांना आधार देऊ या. त्यांना सांगू या 

“तुम्ही आहात म्हणून आमचं घर हे घर आहे, आणि आम्हाला तुमचं हसणं रोज पाहायचं आहे.”

आज प्रत्येकाने एक छोटं पाऊल उचलूया.

आजी आजोबा घरात असतील तर त्यांच्यासोबत वेळ घालवूया, त्यांची गोष्ट ऐकूया.

दूर असतील तर फोन करून त्यांचा आवाज ऐकूया.

त्यांच्या पावलांवर प्रेमाचा शिडकावा करूया – कारण तेच आहेत जे आपल्याला भूतकाळाशी जोडतात आणि आपल्या भविष्याला आशीर्वाद देतात. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१२/९/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...