उदरभरण नोहे …
आपल्याकडे जेवताना म्हणायचा एक श्लोक आहे.
"वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे । सहज हवन होते नाम घेता फुकाचे ॥
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥
जेवण करणे म्हणजे केवळ पोट भरणे नव्हे. त्याला यज्ञकर्माची सुंदर उपमा दिली आहे. ते पूर्णब्रह्म आहे. वदनी ' कवळ ' म्हणजे घास घेताना श्रीहरीचे नाव घेऊन जेवायला सुरुवात करावी वगैरे वगैरे. आता तर काळाच्या ओघात आम्ही हा श्लोकच विसरलो आहोत बुवा ! अहो, कसले यज्ञकर्म अन कसले काय घेऊन बसलात ! आम्ही पडलो पोटार्थी ! आम्हाला हे यज्ञकर्म वगैरे असलं काही अजिबात मानवत नाही. ताकाला जायचं अन भांडं कशाला लपवायचं ? त्यामुळे आम्ही सरळ जेवायलाच जातो. उदरभरणासाठी. यज्ञकर्म वगैरे ज्याला वाटेल त्याने ते खुशाल करत बसावं. आम्हाला हॉटेलातलं जेवण अतिप्रिय ! म्हणजे काय तर तसं घरी जमतच नाही बघा. घरी कांदाभजी केली, मिसळ केली किंवा आणखी ढोकळे की काय म्हणतात ते केले तरी त्याला हॉटेलसारखी चव थोडीच येणार ? घरी भाजी कोणतीही बनवा. ती होणार अगदी सपक, मिळमिळीत. त्यामुळे आठवड्यातून एक दोन वेळा तरी आम्ही हॉटेलमध्ये जाऊन मस्त चमचमीत मिसळ,वडा वगैरे चापतो. जेवायला गेलो तर दोन तीन चमचमीत भाज्या मागवतो. त्याशिवाय मनच भरत नाही बघा. म्हणजे आमच्यासाठी घर की मुर्गी दाल बराबर. हां, सुरुवातीलाच सांगितलेले बरे की आम्ही आहोत पक्के शाकाहारी. त्यामुळे वरील म्हणीचा शब्दशः अर्थ अजिबात घेऊ नका.
तर हॉटेलात जायचे फायदे किती ते सांगतो. गाडी पार्किंगचा प्रश्न येत नाही. सिक्युरिटीचा माणूस आमच्याकडून गाडीची चावी घेऊन स्वतः गाडी पार्किंगला घेऊन जाणार. हॉटेलात गेलो की काउंटरवरचा मॅनेजर आमचं हसून स्वागत करणार. " या साहेब " तोंडभरून म्हणणार. वेटरही आता ओळखीचा झालाय. आम्हाला पाहिल्याबरोबर एअर इंडियाच्या महाराजासारखं झुकून अदबीनं स्वागत करणार. घरी असलं वातावरण कुठं मिळणार ! टेबलावर जेवणाचं ठेवलंय. वाढून घ्या. हवं तर गरम करून घ्या. फ्रिजमधून अमुक अमुक लागलं तर घ्या ! तुमचं जेवण झालं की सगळं झाकून ठेवा. किती सूचना ऐकाव्या लागतात. हॉटेलमध्ये ही भानगडच नाही. तिथे आपल्या सूचना ! आणि ऐकणारे वेटर.
गेल्याबरोबर बिसलरीची बाटली आणून ठेवणार. सांगावं नाही लागत. लगेच मेनूकार्ड येतं. आज स्पेशल काय आहे असं विचारलं की अक्षरशः वेगवेगळ्या नावांचा पाऊस पडतो. पनीर मेथी, पालक पनीर, आलू पनीर, पनीर टिक्का ... वा वा काय सांगावं. ऐकल्यावर असं वाटतं की आपण आलो ते हॉटेल म्हणजे पनीरची राजधानीच आहे. इतकं विपुल पनीर ! अधूनमधून बातम्या येत असतात की बरचसं पनीर बनावट असतं. एवढं दूध आणि एवढ्या पनीरचं उत्पादन आपल्या देशात होतंच नाही मुळी ! आणि ते अनालॉग पनीर की काय म्हणतात ते स्वस्त मिळतं. घातक पदार्थांपासून बनवलेलं असतं. आरोग्यालाही घातकच ! त्यात ट्रान्स फॅट्स वगैरे असतात म्हणे. आपल्याला काय पनीर मिळाल्याशी मतलब ! असं चापून हाणतो की काही विचारू नका. अस्सल खवैय्ये खाताना कधी विचार करीत नाहीत. ते मधे काहीतरी आलं होतं बघा. वड्यात इतक्या कॅलरीज, सामोस्यात इतक्या... आरोग्याला हानिकारक वगैरे. अस्सल खवैय्ये असल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. खाताना विचार करायचा नाही आणि हॉस्पिटलमध्ये जाताना विचार करायचा नाही. काय विचार करायचा तो घरचे बघून घेतील.
तर असो. काही लोकांची मला फार गंमत वाटते. ते हॉटेलमध्ये गेले ना की त्यांना घरच्यासारखं जेवण हवं असतं. अरे बाबा, गेलासच कशाला मग हॉटेलमध्ये ? दुसऱ्या काही मंडळींची तऱ्हा याच्या नेमकी उलट. त्यांना घरी हॉटेलसारखं जेवण हवं असतं. आता घरी ते कसं मिळणार ? मग संघर्ष अटळ ! आम्हाला संघर्ष अजिबात आवडत नाही. त्यामुळे आम्ही आपले घरी कंटाळा आला की अधूनमधून हॉटेलची वाट धरतो. ' पाऊले चालती पंढरीची वाट...' ऐवजी हॉटेलची वाट आमची पावलं चालतात.
परवा एक डॉक्टर मित्र भेटला. म्हणाला, ' आम्ही बाहेरचं काही खात नाही. पण परवा एका मित्राच्या आग्रहाने एका प्रसिद्ध हॉटेलमधली पावभाजी घरी नेली. तर त्या पावभाजीत कृत्रिम रंग टाकलेला आढळला. मग काय म्हणे मोलकरणीला देऊन टाकली. ' आता तो मित्र डॉ होता म्हणून त्याने ती पावभाजी खाणे टाळले. पण बाकीचे कितीतरी लोक तिथे मिटक्या मारीत ती खातात.( नंतर ते डॉक्टरकडे जात असतील हा भाग वेगळा. ) आता आमच्या गावात तर असा एक भागच आहे. त्याला आपण खाऊ गल्ली म्हणू हवं तर ! तिथे भेळेच्या गाड्या, पाणीपुरीच्या गाड्या, पावभाजी, वडे, पाव वडे आदी चटकदार पदार्थांची रेलचेल असते. संध्याकाळच्या वेळी या भागात प्रचंड गर्दी असते. शनिवार रविवार तर नंबर लावावे लागतात. असं म्हणतात की हॉटेलमधील पदार्थाना तेल चांगल्या दर्जाचे वापरलेले नसते. त्याच त्याच तेलात पदार्थ तळले जातात. त्यामुळे त्या तेलात आरोग्यासाठी घातक पदार्थ निर्माण होतात. ते पदार्थ पचायला जड होतात. हॉटेलमधल्या पदार्थांमध्ये भरपूर तेल, मसाले आणि प्रिझर्व्हेटिव्हज यांचा वापर केलेला असतो. असे पदार्थ वारंवार खाल्ल्याने वजन वाढते, हृदयविकार, मधुमेहासारख्या घातक आजारांना निमंत्रण मिळते. शिवाय हॉटेलमधले जेवण आर्थिक दृष्ट्या महाग असल्याने ते खिशाला परवडत नाही हा भाग वेगळाच. पण जाऊ द्या. जातीचे खवय्ये असला विचार करीत नाहीत. जो होगा वो देखा जायेगा.
आजकाल आम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा तरी बाहेर जेवायला जातोच. परवा आम्ही एक लेख वाचला होता. म्हणे अमेरिकेत पूर्वी सगळे कसे घरी जेवत होते पण बाहेर जेवणाची फॅशन आली आणि लोक घरी स्वयंपाकच करेनासे झाले. घरातलं स्वयंपाकघर आणि डायनींग हॉल म्हणजे कुटुंबियांना एकत्र बांधून ठेवणारं ठिकाण ! गॅस विझला, चूल थंड झाली. कुटुंबाला जोडून ठेवणारा धागा सैल झाला. आम्ही जेवायला बाहेर जायला लागलो. नाहीच जमले जायला तर घरी पार्सल मागवायला लागलो. पूर्वी एकत्र जेवणं व्हायची. जेवताना गप्पा व्हायच्या. एकमेकांची सुखदुःख समजून घेतली जायची. कुटुंबातले काही प्रश्न जेवणाच्या टेबलावर सुटायचे. दिवसभर वेगवेगळ्या कारणाने विखुरलेले कुटुंबातले सदस्य जेवणाच्या निमित्ताने एका जागी यायचे, भेटायचे, हास्यविनोद व्हायचे. हॉटेलात आम्ही सहकुटुंब जेवायला गेलो तरी मनाने कुठे एकत्र असतो ? प्रत्येक जण मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेला असतो. कोणाचे इतरत्र लक्ष असते. तसेच कोरडे जातो आम्ही आणि कोरडे येतो. मायेचा ओलावा असलेले प्रेमाचे दोन शब्द एकमेकांशी क्वचितच बोलले जातात.
आजकाल छोटी होत जाणारी कुटुंबे, घरातील नोकरी करणारे सदस्य यामुळे दररोज घरी स्वयंपाक करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही हे समजण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे वाढदिवस, छोटी पार्टी, समारंभ यासारख्या गोष्टींचे आयोजन करणे हॉटेलमध्ये सोयीचे होते हे देखील समजण्यासारखे आहे. परंतु घरी स्वयंपाक करणे आणि हॉटेलमध्ये जाणे या गोष्टींमध्ये सुरेख असं समन्वय साधणे शक्य आहे. आवश्यक प्रसंगी हॉटेलमध्ये जायला हरकत नाही परंतु इतर वेळी मात्र आवर्जून घरचेच जेवण घ्यायला हवे याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.
असे म्हणतात की १९७१ मध्ये अमेरिकेत ७१% असलेली पारंपरिक कुटुंबे आज केवळ २० % वर आली आहेत. मग उरलेली माणसे गेली कुठे ? ' कहाँ गये वो लोग ?' उत्तर फार विदारक आहे. बरीचशी मंडळी वृद्धाश्रमात आहेत. कोणी भाड्याच्या घरात एकट्याने जीवन कंठत आहेत. १५% स्त्रिया एकट्या राहतात, १२% पुरुष कुटुंबात असूनही एकाकी आहेत, ४१% मुले विवाहाबाहेर जन्माला येतात, आणि घटस्फोट दर पहिल्या लग्नात ५०%, दुसऱ्यात ६७% तर तिसऱ्यात तब्बल ७४% इतका आहे. हे सगळे हॉटेलात जाण्यामुळे झाले आहे असे माझे म्हणणे नाही. पण या सगळ्यांना जोडून ठेवणारा कुटुंब नावाचा जो घटक होता तो हरवला आहे. तो हरवण्यात कुठेतरी आमचं स्वयंपाकघर हरवलं आहे, त्याचाही वाटा आहे. भारतात अजून इतकी विदारक परिस्थिती नाही. पण निश्चितच ही कुठेतरी आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. जेवणाला आम्ही जेव्हा ' नुसते उदरभरण ' न समजता यज्ञकर्म समजू तेव्हा आरोग्याचेही प्रश्न आपोआप सुटतील.
Ⓒ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
६/९/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा