मुख्य सामग्रीवर वगळा

तिरंग्याखालील सावल्या

उगवतीचे रंग 

तिरंग्याखालील सावल्या

१५ ऑगस्ट १९४७. भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस...! — त्या दिवशी लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा केवळ झेंडा नव्हता; तो लाखो बलिदानांचे उत्तर, स्वप्नांचे प्रतीक होता. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशभक्तांनी तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठड्या जवळ केल्या, फासावर हसत हसत गेले, आणि आपल्या कुटुंबाचा, सुखाचा, आयुष्याचा होम केला. आज ७८ वर्षे पूर्ण करून स्वातंत्र्याच्या ७९व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत.

आपल्यापैकी बहुतेक जणांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला आहे. ब्रिटिशांची जुलमी सत्ता संपली होती, आणि आपण स्वातंत्र्याच्या श्वासात जन्मलो. परंतु स्वातंत्र्याचा खरा अर्थ — केवळ परकीय सत्तेतून मुक्त होणे नाही. स्वातंत्र्य म्हणजे नव्या विचारांची दिशा, जबाबदारीची जाणीव, आणि विधायक जीवनपद्धती. आज, ही जबाबदारीची जाणीव मात्र कुठेतरी हरवत चालली आहे. भ्रष्टाचार, जातीय भांडणं, प्रदूषण, महागाई, बेरोजगारी — हे सारे प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभे आहेत.

आपला तिरंगा — आपल्या स्वातंत्र्याचा, बलिदानांचा आणि अभिमानाचे जिवंत प्रतीक. तो उंचावर फडकताना आपल्या मनात उत्साह, अभिमान दाटून येतो. आपल्या मनात तो प्रेरणा जागवतो. पण या उंचावलेल्या तिरंग्याच्या खाली, आपल्या तरुणाईच्या भवितव्यावर काही सावल्या गडद होत चालल्या आहेत. त्या अदृश्य शत्रूंच्या रूपाने तरुण पिढीच्या स्वप्नांवर आक्रमण करत आहेत. त्या सावल्या आहेत ताणतणाव, नैराश्य, डिजिटल व्यसन, आणि गळेकापू स्पर्धा यासारख्या भयंकर. जर या सावल्या वाढत गेल्या, तर तिरंग्याखालील तेज आणि स्वातंत्र्य दोन्ही दुर्बल होण्याचा धोका आहे. म्हणूनच आज, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, आपल्याला या नव्या शत्रूंना ओळखून त्यांच्याशी सामना करणे आवश्यक आहे. हे शत्रू बाहेरचे नाहीत; ते आपल्या समाजात, शिक्षणपद्धतीत, आणि जीवनशैलीत लपलेले आहेत. प्रचंड स्पर्धा, त्यातून निर्माण होणारा ताणतणाव, पालकांच्या अपेक्षांचे ओझे, आणि मानसिक गोंधळ — या सगळ्यामुळे आजचा तरुण हतबल होत आहे. काही जण नैराश्यात बुडत आहेत, तर काही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत.

एका अहवालानुसार भारतात दर ५२ मिनिटांनी एक विद्यार्थी आत्महत्या करतो. म्हणजेच, दिवसाच्या प्रत्येक तासात, देशाच्या एखाद्या कोपऱ्यात एक पालक आपलं लेकरू गमावतो. स्पर्धा परीक्षा, आयआयटी, इंजिनिअरिंग, वैद्यकीय अभ्यास — या क्षेत्रांतील आर्थिक, मानसिक दबाव इतका वाढला आहे की अनेक जण त्याला तोंड देऊ शकत नाहीत. यासोबतच, मोबाईलचं व्यसन, व्हिडिओ गेम्स, वेब सिरीज, आणि सोशल मीडियाची आक्रमणं तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर घाला घालत आहेत.

अर्थात, संपूर्ण चित्र निराशाजनक नाही. आजही अनेक तरुण आपापल्या क्षेत्रात चमकत आहेत, समाजाला दिशा देत आहेत, आणि देशाचं नाव उज्वल करत आहेत. पण जे मागे पडत आहेत, किंवा ताणाखाली दबले आहेत, त्यांच्यासाठी मदतीचा, धीराचा आश्वासक हात पुढे करणे ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे.

यासाठी सुरुवात शिक्षण आणि संस्कारांपासूनच करावी लागेल. शिक्षण हे केवळ माहितीचा भडीमार न राहता, सुसंस्कारित आणि मानसिकदृष्ट्या सक्षम माणूस घडवणारे असावे. माहितीचे ओझे कमी करून, मानसिक बळ, सकारात्मक विचारसरणी, आणि कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी वाढवणारा शिक्षणाचा दृष्टिकोन आवश्यक आहे.

अब्राहम लिंकन यांनी आपल्या मुलाच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे — “त्याला जिंकायलाही शिका आणि हरायलाही.” हे शब्द फक्त एका मुलासाठी नाहीत, तर संपूर्ण पिढीसाठी मार्गदर्शक आहेत.

स्वातंत्र्याचे नवे शत्रू ओळखून, त्यांच्याशी लढणं — हीच आजच्या काळातील खरी देशभक्ती आहे. तिरंगा फडकत राहावा, आणि त्याखालील सावल्या नाहीशा व्हाव्यात — हीच आपल्या सगळ्यांची जबाबदारी.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१४/८/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...