उगवतीचे रंग
मोल
श्रीमद भागवताच्या दशम स्कंधात आणि श्रीकृष्ण धारावाहिक मध्ये एक सुंदर कथा येते. गावभर फळांचा टोपली घेऊन फिरणारी एक म्हातारी. डोक्यावर उन्हाचा तडाखा, अंगावर श्रमांचा थकवा, पण ओठांवर परमेश्वराचे नाम. तिच्याजवळ ताजी आणि गोड फळे असतात ते संपूर्ण गाव फिरते आणि जी जी व्यक्ती समोर दिसते त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळील फळे घेण्याचा आग्रह करते परंतु दुर्दैव असे की कोणीच तिच्या जवळील फळे घेत नाही. तरीही परमेश्वरावरील तिचा विश्वास ढळत नाही — " ही परमेश्वराचीच इच्छा असावी. कधीतरी तो माझं ओझं हलकं करेल."
फिरता फिरता अखेर तिचे पाऊल अखेर कृष्णाच्या वाड्यासमोर थांबतं. तिथे फळ घ्या फळ म्हणून दोन-तीन वेळा आवाज देऊन ती विश्रांतीसाठी खाली बसते. योजना जणू ईश्वराचीच असावी. विश्रांती तिथेच मिळणार आणि श्रमही तेथेच हरण होणार.
तिचा आवाज ऐकून निरागस गोड असा छोटा कृष्ण घरातून बाहेर येतो. ती कृष्णाला पाहून आनंदते. " बेटा, ताजी गोड फळं आहेत. घे ना. "
कृष्ण म्हणतो, " ती सगळीच फळं मला दे. "
म्हातारी आनंदली. म्हणाली, " हो हो देईन बाळा, पण मोल द्यावं लागेल."
कृष्ण निरागसपणे विचारतो, " मोल म्हणजे काय ?"
ती समजावून सांगते —
"लल्ला, आपण जेव्हा कोणाकडून काही घेतो, तेव्हा त्याच्या बदल्यात काही तरी देतो, त्यालाच मोल म्हणतात."
कृष्णाचं बोलणं मोठं गोड आणि मन मोहून घेणारं आहे. तो तिला म्हणतो, "माझी आई तर मला रोज दही, दूध, लोणी देते. मला हवं ते सगळं सगळं देते. पण माझ्याकडून कधी काही घेत नाही. मग ती मोल का मागत नाही ? गोपी सुद्धा मला दही दूध लोणी देतात माझ्यावर खूप प्रेम करतात पण त्या माझ्याकडून काही घेत नाहीत. "
त्या बालसुलभ प्रश्नानं म्हातारी विचारात पडते. हा प्रश्न आपल्यालाही विचारमग्न करतो. आणि सत्य उलगडतं. ' खरं मोल प्रेमाच्या नात्यांत असतं, पैशांत नव्हे. प्रेमाचं मोल किंवा किंमत केली जाऊ शकत नाही.'
पण तरीही तिला काहीतरी द्यायचं म्हणून बालसुलभ भावनेतून कृष्ण म्हणतो, "मी तुला मिठी मारली, तुला आई म्हटलं, तर चालेल का ?"
म्हातारी थबकते. तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं.
"मी खालच्या जातीची बाळा, माझं एवढं भाग्य कुठे ?" पण कृष्ण तिच्या जवळ जातो. त्याच्या कोमल हातांची मिठी तिच्या गळ्याभोवती पडते. यापेक्षा दुसरं मोठं भाग्य कोणतं ? तो तिला आपल्या निरागस स्पर्शाने आईचा मान देतो. म्हातारीचे सगळे श्रम हरण होतात. तिला जणू स्वर्ग मिळाल्याचा भास होतो.
या कथेत पुढे असेही म्हटले आहे की कृष्ण तिला देण्यासाठी घरातून धान्य घेऊन येतो. परंतु आणता आणता बरेचसे त्याच्या हातून सांडते. परंतु जे काही थोडे त्याच्या हातात उरलेलं असतं ते तो त्या म्हातारीला देतो. आणि म्हातारी जेव्हा घरी जाते तेव्हा त्या धान्याच्या मोजक्या दाण्यांचे रूपांतर दुर्मिळ रत्न आणि हिरे माणकांमध्ये झालेले असतं.
हा प्रसंग आपल्याला जणू सांगतो — देवाजवळ जातीपातीचे बंधन नसते. उच्च नीच, लहानथोर असे कुठलंही बंधन नसतं.
जातीपातीच्या भिंती तर आपणच उभ्या केल्या आहेत. मानवाने उभ्या केलेल्या या भिंती परमेश्वरापुढे निरर्थक आहेत. त्याला फक्त भोळा भाव, भक्ती प्रिय आहे.
म्हणूनच त्या म्हातारीची भक्ती, तिचा विश्वास फळाला आला.
गावाने तिला नाकारले पण परमेश्वराने स्वतः तिच्या टोपलीतील फळे स्वीकारली. तिला आईचा मान दिला. तिचे जीवन कृतार्थ झाले.
हीच खरी भक्तीची कमाई.
परमेश्वरापुढे केवळ श्रद्धेचे मोल असते. सोने नाणे, पैसे अडका, उच्च नीच यासारख्या गोष्टी त्याच्यापुढे व्यर्थ ठरतात.
गोपिकाही कृष्णाकडून काहीच घेत नव्हत्या. उलट त्या त्याला दही, दूध, लोणी देत होत्या. त्यांच्याजवळ समर्पण भाव होता.
त्यांच्या भक्तीत "देणं" होतं, "घेणं" नव्हतं.
यातच खऱ्या मोलाची व्याख्या दिसते. आपण सर्वसामान्य माणसं ! आपल्याला घेणं माहिती असतं परंतु देणं फार कमी !
आजच्या दिवसात खरं निरपेक्ष प्रेम दुर्मिळ होत चाललं आहे. आज आपण प्रत्येक नातं, प्रत्येक कृती पैशात मोजतो.
आईच्या मायेचं मोल काय?
मित्राच्या आधाराचं मोल काय?
देशासाठी लढणाऱ्या सैनिकाच्या प्राणांचं मोल करता येईल ?
प्रेमाचा, करुणेचा, सन्मानाचा दर लावता येईल का?
कृष्णाच्या या छोट्याशा प्रसंगातून आपल्याला जाणवतं —
खरं मोल हे भावनेचं, भक्तीचं, नि:स्वार्थ देणगीचं असतं.
देवासाठी आणि जीवनासाठीही.
मोल म्हणजे — पैशाने विकत घेता न येणारी ती आत्मीयता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा