मुख्य सामग्रीवर वगळा

कबूतर जा जा जा...

उगवतीचे रंग

कबूतर जा जा जा...

सर्वोच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई केल्याचं वृत्त आणि त्यावरून चाललेला वाद, त्याला दिलेला धार्मिक रंग आणि त्यावरून चालणारं राजकारण आपण सगळ्यांनी वर्तमानपत्रातून वाचलं असेल आणि टीव्हीवर बातम्यातून पाहिलं असेल. खरंच एखाद्या गोष्टीचं राजकारण करून किती विचका करतो आपण ! मुंबईच काय पण जवळपास सगळ्याच शहरातून कबुतर नावाच्या पक्ष्यानं ज्याला कपोत, पारवा वगैरे सारखी आकर्षक नावं दिली गेली, त्यानं नाकी नऊ आणलेत. जिकडे पाहावं तिकडे कबुतरं दृष्टीस पडतात. ' समुंदर समुंदर यहांसे वहांतक...' असं एक गाणं आहे. त्या चालीवर ' कबुतर कबुतर यहांसे वहांतक...' असं गमतीनं म्हणावसं वाटतं. एकीकडे कबुतरांचा त्रास होतो म्हणून दारे, खिडक्या, गॅलरीला जाळ्या बसवायच्या आणि दुसरीकडे त्यांना खाद्य द्यायचा पण हट्ट धरायचा अशा तऱ्हेची दुटप्पी भूमिका आपणच घेऊ शकतो.

रस्त्यावरून चालताना एखाद्या चौकात शेकडो कबुतरं दाण्याच्या शोधात पंख फडफडवत एकदम उडाली की वाटतं जणू निळ्या आकाशात पांढऱ्या-राखाडी ढगांचा जल्लोष उठला आहे. डोळ्यांना सुखावणारा तो देखावा, पण आरोग्याच्या दृष्टीने मात्र गंभीर संकटाचा इशारा देणारा आहे. निसर्गाने या पक्ष्यांना उडण्यासाठी पंख दिले, आपलं अन्न स्वतः शोधण्याची प्रेरणा आणि शक्ती दिली आहे. जगण्यासाठी स्वातंत्र्य दिलं आहे. पण आपणच त्यांना आयतं अन्न पाणी देऊन परावलंबी बनवतो आहोत. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन आपण हा एक मोठाच अपराध करतो असंच म्हणावसं वाटतं. 

कधी काळी आपल्या पूर्वजांनी कबुतरं पाळली ती संदेशवाहक म्हणून. युद्धात, संकटात ते धावून यायचे. आज मोबाईलच्या युगात त्यांची गरज नाही, शहरातल्या कबूतरखान्यांत आणि विविध चौकात कबुतरं मोफत मिळणाऱ्या अन्नावर जगतात. परिणामी त्यांची संख्या अनियंत्रित वाढली आणि त्यांच्यामागे आजारांची सावली पसरली. कबुतरांच्या पिसांमधून आणि विष्ठेतून सूक्ष्म जीवाणू हवेत तरंगतात. दिसायला निरागस असलेले हे पक्षी फुफ्फुसांवर आक्रमण करणारे अनेक आजार माणसापर्यंत पोहोचवतात. दमा, अलर्जी, डोळ्यांचे विकार वाढतात. आपण ज्यांना शांतीचं प्रतीक मानतो, तीच कबुतरं नकळत अस्वस्थतेचं कारण ठरतात. आज त्यामुळेच कबुतर जा जा जा असं म्हणण्याची वेळ आली आहे. 

इमारतींच्या गॅलऱ्या, टेरेस, पाईपलाईन यांसारख्या जागांवर कबूतर-पारव्यांची घरटी आणि त्यांची विष्ठा साचत असल्याने दुर्मिळ, पण जीवघेणे फुफ्फुसाचे आजार वाढीस लागले आहेत. या आजारांमध्ये छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, खोकला, ताप असे लक्षणे दिसून येतात आणि उपचारांअभावी हा त्रास गंभीर स्वरूप धारण करू शकतो. केवळ वृद्ध, लहान मुले किंवा अ‍ॅलर्जिक व्यक्तींनाच नव्हे तर मधुमेह, कर्करोग, एड्स यांसारख्या रोगांनी पीडितांसाठीही हे आजार प्राणघातक ठरू शकतात. श्वसनरोग तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, कबूतर-पारव्यांच्या सान्निध्यात राहणाऱ्यांमध्ये अशा आजारांचा धोका ४० टक्क्यांनी वाढतो. असे असूनही अनेक ठिकाणी लोक श्रद्धेने, सवयीने किंवा करुणेने कबुतरांना अन्न घालताना दिसतात. अनेक ठिकाणी तर कबूतरखाने उभारले गेले आहेत. दादर कबूतरखाना बंद करण्याच्या निर्णयावरून विरोध झाला. यासाठी काहींनी आंदोलनही केले. सध्या भटक्या किंवा बेवारस कुत्र्यांचा विषय पण असाच ऐरणीवर आला आहे. अनेक लहान मुलांना किंवा वृद्ध माणसांना या कुत्र्यांनी जखमी केले आहे. त्यांच्या हल्ल्यामुळे काही मुले, लोक मृत्यूमुखी देखील पडले आहेत. तरी देखील काही प्राणीप्रेमींना या भटक्या कुत्र्यांचा कळवळा येतो आणि त्यांना ते अन्नपाणी देतात. पण आरोग्याचा विषय असताना भावनिक दृष्टिकोनाला कितपत प्राधान्य द्यावे, याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
  

माणसाला पाळीव प्राण्यांविना राहवत नाही. एकटे राहणाऱ्या माणसांना कुत्रा, मांजर, पोपट यांच्यासारखे प्राणी सोबत करतात. त्यांचे सखे सोबती बनतात. ही माणसाच्या जीवनातील पोकळी भरून काढतात. त्यांना जीव लावतात पण त्याचबरोबर हे प्राणी आपल्यासोबत आजारांचा धोका घेऊन येतात. कुत्र्यांपासून रेबीज, मांजरांपासून टॉक्सोप्लाझ्मोसिस, सशांपासून रिंगवर्म, तर पक्ष्यांपासून फुफ्फुसांना बाधणारे आजार होऊ शकतात. माया ठेवणं चुकीचं नाही, पण ती जबाबदारीशिवाय धोकादायक ठरते. आपण पाळलेला प्राणी लसीकरणाशिवाय, स्वच्छतेशिवाय राहिला तर त्याची माया एका संकटाची सुरुवात बनते. त्याची सुरुवात आपल्यापासून होऊ शकते. 


अनेकांना कबुतरांना दाणे टाकणं ही पुण्याई वाटते. चौकातल्या कबूतरखान्याभोवती गर्दी करून लोक दाणे टाकतात आणि समाधान मानतात की आपण ‘धर्मकार्य’ केलं. पण प्रत्यक्षात आपण त्यांना स्वावलंबनापेक्षा परावलंबनाची सवय लावतो. जंगलातला पक्षी स्वतः अन्न शोधतो, भूतदया करता करता ही महत्वाची गोष्ट आपण विसरून गेलो आहोत. 

आपला धर्म सांगतो प्राणिमात्रांवर प्रेम करा, पण विज्ञान सांगतं – त्या प्रेमात जबाबदारी सुद्धा असली पाहिजे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय हा धार्मिकतेवर गदा आणणारा नसून, नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करणारा आहे असं मला वाटतं कारण सर्वात महत्वाचं आहे ते आपलं आरोग्य. या प्राणिमात्रांवर माया करण्याच्या आपल्या वृत्तीला एक नवीन विधायक वळण आपल्याला देता येईल. त्याचा आपण कधी विचार केला आहे का ? मोकळे चौक, मोकळी मैदाने पक्ष्यांना दाणे टिपताना पाहण्यापेक्षा ती हिरवीगार झालेली पाहणं कोणाला आवडणार नाही ? जंगल तोड करण्याऐवजी जंगलं हिरवीगार करणं, जंगल लागवडीचं दिवसेंदिवस आक्रसत चाललेलं क्षेत्र वाढवणं कोणाला आवडणार नाही ? मग पक्ष्यांना त्यांचं खाद्य जंगलात मिळेल. त्यांचा मधुर किलबिलाट ऐकायला मिळेल. त्यांचं सहजीवन अनुभवायला मिळेल. चिमण्या, कावळे, पोपट, मैना सर्वच पक्षी आनंदी होतील. वाघ, हरणं, माकड, गवे यासारखे प्राणी मानवी वस्तीत येणारच नाहीत. तेव्हा कबुतरांचा कळवळा येणारांनी झाडं लावण्याचा वसा घ्यावा. आणि केवळ कबुतरच नाहीत तर सर्वच पक्ष्यांना त्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून द्यावा. 

न्यायालयाचा निर्णय म्हणजे एखाद्या आरशात आपलं खरं रूप पाहिल्यासारखं आहे. आरोग्याच्या रक्षणासाठी तो अपरिहार्य आहे. श्रद्धा आणि माया या भावना टिकल्या पाहिजेत, पण त्या विज्ञानाच्या प्रकाशात आणि जबाबदारीच्या छायेत. कबुतरांच्या उडीतलं सौंदर्य आपल्याला पाहायचंच आहे, पण त्यामागे लपलेली आजारांची काळी छायाही नजरेआड करून चालणार नाही. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
१८/८/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...