उगवतीचे रंग
शब्द खेळांचे सांगती अर्थ आयुष्याचा...!
बुद्धिबळ म्हणजे डावपेचांचं युद्ध. केवळ बुद्धीचं नव्हे, तर मनाच्या स्थैर्याचंही आव्हान. नुकत्याच झालेल्या जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख हिने जगज्जेतेपद पटकावून हे सिद्ध केलं. विशेष म्हणजे, तिच्या समोर होती कोनेरू हम्पी — तिच्यापेक्षा दुप्पट वय असलेली एक दिग्गज खेळाडू, जागतिक अनुभव असलेली बुद्धिबळपटू. ती तर वयाच्या १५ व्या वर्षीच ग्रँडमास्टर ठरली होती. शिवाय आधी ग्रँडमास्टर मिळवलेल्या हरिका आणि आर वैशाली या बुद्धिबळपटू देखील ग्रँडमास्टर किताब पटकावलेल्या. अशा प्रसंगी अनेक नवोदित खेळाडूंना दबाव झेपत नाही. पण दिव्यानं मात्र पूर्ण शांतपणे, एकेक चाल अत्यंत तटस्थतेने आणि विचारपूर्वक खेळली.
तिच्या प्रत्येक डावात दिसत होतं ते तिचं डोकं शांत ठेवणं आणि परिस्थिती समजून घेऊन, तिचा आदर करत पुढचं पाऊल उचलणं. गेल्या वर्षी बुद्धिबळात जगज्जेतेपद मिळवणारा गुकेश दोमाराजू हा देखील असाच एक नवोदित गुणी खेळाडू. त्याचं वय फक्त १८ वर्षे होतं. या सगळ्या तरुण आणि नवोदित खेळाडूंमध्ये आढळतो तो मनाचा निर्धार, परिस्थितीचं कोणतंही दडपण येऊ न देता खेळण्याची वृत्ती, अपार जिद्द आणि मेहनत ! हे खेळाडू आपल्याला जीवन जगताना उपयोगी पडेल असा महत्वाचा संदेश खेळता खेळता सांगून जातो. खेळ म्हणजे केवळ बुद्धिबळाच्या पटावरील नसतो, क्रिकेटच्या मैदानावरील नसतो, जीवनात देखील नियतीने असा पट मांडलेला असतो, पीच असते आणि त्यावर तुम्हाला खेळावेच लागते. गुकेश किंवा दिव्या यांनी अत्यंत कमी वयात त्यांच्या अंगी असलेल्या ज्या परिपक्वतेचे दर्शन घडवले आहे, तिचा उपयोग आपल्याला आपल्या जीवनातही करून घेता येऊ शकतो.
तुमचा निर्धार पक्का असेल आणि डोळ्यासमोर ध्येयाचा अढळ ध्रुवतारा असेल तर लक्ष्य गाठणे अशक्य नाही हेच या युवा खेळाडूंनी आपल्या खेळातून सिद्ध केले आहे. मग तुमच्या समोर असलेला प्रतिस्पर्धी किती बलाढ्य आहे हे गौण ठरते. या स्पर्धेतील विजयानंतर दिव्याने जी प्रतिक्रिया दिली ती विचारात घेण्यासारखी आहे. ती म्हणाली, " इतरांचे ऐकू नका. केवळ आपल्या पालकांचे ऐका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं लक्ष्य उच्च ठेवा आणि ते गाठण्याचा प्रयत्न करा. " दिव्याच्या लोभस व्यक्तिमत्वाची विनाकारण चर्चा करून इतरत्र लक्ष वळवणाऱ्या युवा खेळाडूंना तिने स्पष्ट शब्दात सुनावले आहे. " महिला बुद्धिबळपटूंच्या खेळाची चर्चा करावी. ' दिसण्या 'ची करू नये. तिच्या खेळाबरोबरच तिच्या या शब्दांनी उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी मला विराट कोहलीच्या शब्दांची आठवण होते. भारताने विराटच्या नेतृत्वाखाली जिंकलेला २०२४ चा वर्ल्ड कप अजूनही सर्वांच्या स्मरणात ताजा आहे. प्रसंग अत्यंत आणीबाणीचा होता. भारत यावेळी पराजयाच्या वाटेवर होता. दक्षिण आफ्रिका जिंकण्याच्या निर्णायक स्थितीत होती. पण शेवटच्या पाच षटकात विजयाचा घास भारतीय संघाने त्यांच्या तोंडून काढून घेतला. त्या वेळची भारतीय खेळाडूंची मनःस्थिती आणि विराट कोहलीने व्यक्त केलेली प्रतिक्रिया आपल्याला खूप काही सांगून जाणारी आहे. त्या ऐतिहासिक क्षणी विराट कोहलीने जेव्हा यशाचं रहस्य विचारल्यावर “Put your head down and respect the situation” असं सांगितलं, तेव्हा त्या एका वाक्यानं संपूर्ण जीवनाचं सार व्यक्त झालं आहे असं मला वाटतं. आपलं डोकं शांत ठेवा आणि समोर असलेल्या परिस्थितीचा आदर करा.
"डोकं खाली ठेवणं" म्हणजे अहंकार बाजूला ठेवणं, भावनांचं वादळ आवरणं आपलं मन स्थिर ठेवणं. विचलित न होणं.
"परिस्थितीचा आदर करणं" म्हणजे विपरीत परिथतीतही मन शांत ठेवून त्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणे. आणि संकटासमोर झुकून नाही, तर समजून उभं राहणं. अशा वेळी परिस्थिती समजून घेणं, उपलब्ध पर्याय तपासणं, स्वतःच्या ताकदीचं आणि मर्यादांचं भान ठेवणं आणि मग कृती करणंया गोष्टी महत्वाच्या ठरतात. हा प्रवास – शांततेतून सजगतेकडे नेणारा असतो.
भारतीय क्रिकेटमध्ये असे विराट सारखे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांनी फक्त खेळ नाही, तर आयुष्याचं तत्त्वज्ञानही शिकवलं. त्यांचं जीवन, त्यांचे विचार हे विराटच्या वाक्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. संयम आणि सातत्याचं प्रतीक असलेला राहुल द्रविड म्हणतो, "You don't play for the crowd; you play for the country."
द्रविडने कधीही आवाज न करता, शांतपणे आपलं काम केलं. 'The Wall' या टोपणनावाला सार्थ ठरवत, त्याने प्रत्येक बॉलला आदरानं सामोरं जात संयम टिकवला. त्याचं फलंदाजीतील स्थैर्य हेच “Put your head down...” या विचाराचं उदाहरण ठरतं.
१९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये कोणी भारताला गांभीर्यानं घेत नव्हतं. पण कपिल देवने परिस्थिती समजून घेत, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवत इतिहास घडवला. त्याचं धैर्य आणि मनोबल हे आपल्याला शिकवतं की संघर्षाच्या क्षणी डोकं शांत ठेवणं म्हणजे पराभव स्वीकारणं नव्हे – ते यशाची पूर्वतयारी असते. कपिल देव आपल्याला सांगतात "Positive thinking is not expecting the best to happen every time, but accepting that whatever happens is for the best." प्रत्येक वेळी आपल्याला अपेक्षित असेच घडेल असं नाही. पण आपले ध्येय साध्य करण्यासाठी जे काही घडेल त्याचा स्वीकार करून आपल्याला पुढे जायचे असते.
तंत्रशुद्ध खेळणे, आत्मनियंत्रण आणि धैर्य किंवा संयम या गुणांसाठी ज्यांचा गौरव केला जातो, अशा गावस्कर यांनी फास्ट बॉलर्ससमोरही तंत्र आणि संयम यांच्या आधारावर फलंदाजी केली. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी डोकं शांत ठेवून प्रत्येक चेंडूला सामोरं जाणं हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं. ते म्हणतात, "To be successful, you need to be at peace with yourself."
सुनील गावस्कर यांनी गायिलेलं
' या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला ?
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला...' हे गाणं प्रसिद्ध आहे. जीवनाच्या मैदानावर फलंदाजी करत असताना समोरून संकटाची भेदक गोलंदाजी तुमच्यावर मारा करत असते .अशावेळी सावध राहायचे असते कोणतीही संधी हुकू द्यायची नसते. जो हुकला, तो संपला. चातुर्याने आपली खेळी करायची असते असाच संदेश गावस्कर या गीतातून आपल्याला देतात.
तर ज्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते अशा सचिन तेंडुलकरचे खेळासंबंधीचे विचार अत्यंत मननीय आहेत. तो म्हणतो...
- "माझ्यासाठी, क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तर ती माझी 'पूजा' आहे."
- "प्रत्येक खेळाडूने आपल्या देशासाठी आणि आपल्यासाठी सर्वोत्तम देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे."
- "अपयश आले तरी खचून न जाता, त्यातून शिकून पुढे जायला पाहिजे."
- "कठोर परिश्रम आणि समर्पण यांमुळे यश निश्चित मिळते."
- "तुम्ही जे काही करता, त्यात १००% द्या."
आपण शांततेनं विचार केला तर आपल्याला असं आढळून या सगळ्या खेळाडूंनी या सगळ्या प्रतिक्रिया खेळाच्या संदर्भात व्यक्त केलेल्या असल्या तरी आपल्या जीवनात देखील त्या अत्यंत उपयोगी आणि मार्गदर्शक आहेत. खेळातील हे नियम जीवनात देखील लागू होतात. जीवनाच्या क्रीडांगणावर अनेक आव्हानांना सामोरे जाताना अनुभवी आणि यशस्वी खेळाडूंचे हे शब्द आपल्याला ' मंत्र ' म्हणून उपयोगी पडतील.
अनेक महान व्यक्तींनी संकटांच्या प्रसंगी आपले डोके शांत ठेवून कार्य केले आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांना सुद्धा कालयवनासारख्या महाबलाढ्य शत्रूसमोर माघार घ्यावी लागली होती. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरगंजेबासारख्या बलाढ्य शत्रूचे आव्हान होते. काही प्रसंगी त्यांना दोन पावले मागे यावे लागले, प्रसंगी तह करावा लागला, पराक्रमाने हाती आलेले किल्ले सोडावे लागले. पण आपल्याला आढळेल की त्यांनी अशाही परिस्थितीत आपले डोके शांत ठेवले आणि आपले ध्येय दृष्टीआड होऊ दिले नाही. समोर आलेल्या परिस्थतीचा स्वीकार करून पुढील नियोजन केले. लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसल्या, तुरुंगवास सोसला पण खचले नाहीत. डॉ आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांची उदाहरणे आपल्याला हेच सांगतात.
"तणाव टाळा" असं सांगणं सोपं आहे. पण "तणावाला समजून घेणं आणि त्याचं रूपांतर प्रेरणेत करणं" हे कष्टसाध्य आहे — आणि तेच यशाच्या वाटेचं खऱ्या अर्थानं दार उघडतं. आणि ही गोष्ट प्रयत्नाने जमू शकते. परीक्षा जसजशा जवळ येतात, तसतशी अनेक विद्यार्थ्यांची मनःशांती ढळते. विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचं दडपण येतं. अभ्यास भरपूर असतो, वेळ मर्यादित. अशा वेळी गोंधळून न जाता शांत डोक्यानं अभ्यासक्रम समजून घेणं, आपल्या उपलब्ध वेळेचं योग्य नियोजन करणं, आणि रोज थोडं थोडं करून अभ्यास करणं — हेच यशाचं खरं सूत्र आहे.
आपल्या कुटुंबात अनेक वेळा मतभेदाचे प्रसंग येतात. कामाच्या ठिकाणी किंवा आपले मित्र आणि सहकारी यांच्याशी देखील संघर्षाचे प्रसंग निर्माण होतात. भावनांचा उद्रेक होतो. पण अशा वेळी तात्काळ प्रतिक्रिया देण्यापेक्षा थोडं थांबणं, समोरच्या व्यक्तीची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करणं, आणि संवादाचे दरवाजे खुले ठेवणं या गोष्टींमुळे नातेसंबंध पुन्हा सुरळीत होऊ शकतात. "तिथेच तर 'परिस्थितीचा आदर' येतो. आणि शांत डोकं नात्यांची वीण घट्ट करतं."
ध्यान, योग आणि अध्यात्म हे सुद्धा आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करीत असतात की वर्तमानात जगा, समोर आलेली परिस्थिती स्वीकारा, भावनांचं निरीक्षण करा.
दिव्या देशमुखच्या डावांतून, विराट कोहलीच्या विचारांतून, आणि द्रविड, गावस्कर, कपिल यांच्या उक्ती आणि कृतीतून एक गोष्ट आपल्याला उमजते —
"यश हे कौशल्य, नियोजन, आणि विपरीत परिस्थितीतही आपलं डोकं शांत ठेवणं या त्रिसूत्रीच्या पायावर उभं असतं."
हा मंत्र आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उपयोगी पडणारा आहे.
कधी डाव आपल्या विरोधात जाईल, कधी मैदान आपलं होईल — पण मन जर शांत असेल, तर कुठलीही परिस्थिती आपल्याला हरवू शकत नाही.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१/८/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा