मुख्य सामग्रीवर वगळा

कहीं ये वो तो नहीं...

 उगवतीचे रंग 

 कहीं ये वो तो नहीं...

काही दिवसांपूर्वी संगीतकार मदन मोहन यांचा जन्मदिन होता. त्यादिवशी त्यांची आणि लतादीदींची खूप गाणी मनसोक्त ऐकली. एक गाणं मात्र मनात खोल रुतून बसलं... एखादं सुंदर मनमोहक कारंजं असतं ना.. ! त्याच्या तळाशी पाणी असतं पण ते पाणी आतून वर येतं आणि सुंदर आकार आणि सुंदर नर्तन करतं. मनाला प्रसन्नता देतं.  त्याच्याकडे कितीही वेळ पाहिलं तरी मन भरत नाही. तसेच या गाण्याचे शब्द हृदयाच्या गाभाऱ्यातून उत्स्फूर्तपणे वर येत होते. एखादा अनाहत नाद जसा आतून फुलून वर यावा तसेच या गाण्याचे शब्द राहून राहून सारखे मनात घोळत होते. गाणं मनात रेकॉर्ड झालं होतं आणि प्रतिध्वनी जाणिवेच्या पातळीपर्यंत पोहोचून धडक देत होता. या कारंजाला वेगळ्या संगीताची गरज नव्हती.

गाण्याची सुरुवात किती हळुवार केली आहे लतादीदींनी...! जरासी आहट होती है... हे हळुवार शब्द येतात आणि मग आपण त्या गाण्यात गुंततच जातो. कैफी आजमी हे सुंदर या गीताचे कवी. आपल्या प्रियकराची वाट पाहणाऱ्या प्रेयसीच्या अंतर्मनात प्रवेश करून तिच्या अमूर्त भावनांना शब्दात बांधणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. पण ते अवघड काम कवीने सहज केले आहे. जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो तेव्हा आपली मनस्थिती किती नाजूक, हळुवार आणि संवेदनशील होते. मन वेडं  होतं.  प्रत्येक आवाजाला ( जरासी आहट  ) असं वाटतं की तोच तर आला नाही ना ? कहीं ये वो तो नहीं ...?

या गीतात दोनच  कडवी आहेत पण प्रत्येक कडवं अप्रतिम ! प्रत्येक कडव्यातलं सौंदर्य आणि गोडी वेगळी !  पहिल्या कडव्यात कवी म्हणतो...

छुप के सीने में कोई जैसे सदा देता है

शाम से पहले दिया दिल का जला देता है

है उसी की ये सदा, है उसी की ये अदा

कहीं ये वो तो नहीं..."

तो दुसरीकडे कुठे नाही, हृदयातच लपलेला आहे. तिथूनच म्हणजे अंतर्मनातून त्याचा आवाज येतो आहे. संध्याकाळ झाली की दिवेलागण होते पण याची किमया तर एवढी की संध्याकाळ होण्यापूर्वीच हृदयातील दीप त्याच्यामुळे प्रज्वलित होतो. हृदयातील अंधार दूर होतो. त्याचाच हा आवाज, त्याच्याच हालचालींची ही परिचित चाहूल...! मनाला, हृदयाला प्रकाशमान करणारी अशी ही प्रिय व्यक्ती !

दुसऱ्या कडव्यात कवी म्हणतो...

शक्ल फिरती है निगाहों में वोही प्यारी सी

मेरी नस-नस में मचलने लगी चिंगारी सी

छू गई जिस्म मेरा किसके दामन की हवा

कहीं ये वो तो नहीं..."

आता ती अंतर्बाह्य त्याच्या रंगात रंगून गेली आहे. तिच्या नजरेमध्ये आता फक्त ' तो ' आहे त्याची प्यारी, प्रिय छबी आहे. त्याशिवाय तिला दुसरं काहीच दिसत नाही. शरीराच्या रोमारोमात तो भिनलेला आहे. तो येण्याची चाहूल आता केवळ बाह्य राहिली नाही, ती चाहूल आतून येते आहे. तिचा रोम रोम पुलकित झाला आहे. म्हणून ती म्हणते मेरी नस नस मे मचलने लगी चिंगारी सी... त्याच्या येण्याचा संदेश घेऊन येणारा वारा माझ्या अंगाला जणू स्पर्शून गेला आहे...! इतक्या सुंदर, हळुवार आणि तरल भावना घेऊन हे गीत आपल्या हृदयाचा ठाव घेतं. कैफी आजमी यांचे अर्थवाही शब्द, मदन मोहन यांचं कर्णमधुर आणि नादावणारं संगीत आणि लतादीदींचा स्वर्गीय आवाज यांचा त्रिवेणी संगम इथे आपल्याला अनुभवायला मिळतो. 

अशाच प्रकारची विरहणीची उत्कट प्रेमाची भावना अनेक अभंग आणि भक्तिगीतांतून आपल्याला पाहायला मिळते. संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात असे अभंग किंवा विराण्या येतात. मीराबाईंचे अनेक अभंग असे आहेत. अवचिता परिमळु झुळकला अळुमाळू किंवा पैल तो गे काऊ कोकताहे... या सारख्या रचनांतून ज्ञानेश्वर माऊली प्रेम आणि भक्तीचा आदर्श आपल्यासमोर ठेवतात. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे तत्वज्ञान मराठीत आणले.  पण ते कधीही कोरडे तत्वज्ञान सांगत नाहीत. त्यांचे तत्वज्ञान भक्तिरसाने आणि प्रेमरसाने ओथंबलेले आहे. आत्मरूपाचा साक्षात्कार झाल्याची अनुभूती त्यातून प्रकट होते. 

' कहीं ये वो तो नहीं ' यासारखे भास इथेही होतात. पण इथे या गीतांमध्ये परमेश्वरप्राप्तीचा विषय असल्याने एका वेगळ्याच उंचीवर ही गीते आपल्याला घेऊन जातात. ' पैल तो गे काऊ कोकताहे..' या अभंगात कावळ्याचे ओरडणे हा शुभ शकुन असून तो त्याच्या येण्याचाच सांगावा घेऊन आला आहे, असे त्या विरहिणीला वाटते. इतकी त्याच्या दर्शनाची ओढ तिला लागली आहे.  अशी उत्कट भक्ती केली तर ' तो ' येणे दूर नाही, अशक्य नाही असा शुभ शकूनच जणू माउली आपल्याला सांगतात. फक्त तो ' काऊ ' पैलतीरावर आहे. त्याच्यापर्यंत पोहोचायचे तर ' ऐलतीर ' सोडावं लागणार आहे असेच जणू माऊली सुचवतात. 

 ' अवचिता परिमळु झुळकला अळुमाळू ' या विरहगीतात देखील ' कहीं ये वो तो नही .. ' सारखी भावना आपल्याला जाणवते. अवचित सुगंध येतो. तो सुगंध ' त्याच्या ' येण्याचाच सांगावा घेऊन येतो. ( मी म्हणे गोपाळु आला गे माये... )इथेही ती अंतर्बाह्य त्याच्या रंगात रंगलेली आहे. हा ' परिमळ ' सुगंधाचा राजा आहे. त्याने अंतर्बाह्य तिला लपेटून घेतले आहे. आत वेगळे आणि बाहेर वेगळे असे काही राहिलेच नाही. तिच्या दृष्टीपुढे केवळ तोच आहे. 

तो सावळा सुंदरू , कासे पीतांबरू 

लावण्ये मनोहरू देखियेला... 

हे अद्वैत आहे, आत्मानंदाचा अनुभव आहे. 

' कहीं ये वो तो नहीं ' मधील आणि या ज्ञानेश्वर माऊलींच्या विराण्यात आणखी एक साम्य मात्र आहे. लतादीदींचा स्वर्गीय आवाज या गीतांना लाभला आहे. तो आपल्याला एका वेगळ्या वातावरणात घेऊन जातो. आषाढी एकादशी जवळ आली आहे. विठ्ठलाच्या भक्तीत सारे तल्लीन झाले आहेत. अशा परिस्थतीत एखाद्या भक्ताला ' कहीं ये वो तो नहीं ...' सारखा भास झाला तर तो किती भाग्यवान ! अशी अनुभूती आपल्या सर्वांना येवो या कामनेसह लेखणीला विराम देतो. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२/७/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 
















..."


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...