उगवतीचे रंग
सुखी जीवनासाठी नवीन एबीसीडीई - भाग दोन
A to E पर्यंतची मुळाक्षरे सुखी जीवनासाठीच्या कोणत्या गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात हे आपण मागील पहिल्या भागात पाहिले. तो लेख वाचल्यानंतर अनेक वाचकांनी इच्छा व्यक्त केली की ही एबीसीडी ...म्हणजेचA टू Z पर्यंतची वर्णमाला पूर्ण करावी. त्यातूनच हा आजचा लेख. या वर्णमालेतील पुढील अक्षरे कोणत्या मौल्यवान गोष्टी आपल्याला सांगतात हे जाणून घेऊया.
F – Friends (मित्र) आणि Faith (श्रद्धा)
आपल्या जीवनात सत्ता आणि संपत्ती यापेक्षाही अधिक महत्त्व मित्रांचे असते ज्याला खरे मित्र लाभले तो खरोखर भाग्यवान ! मन:स्वास्थ्य टिकवण्यासाठी खरे, सच्चे मित्र हे मानसिक टॉनिकसारखे असतात. संवाद, आधार आणि प्रसन्नता यांचं मूळ मैत्रीत दडलेलं असतं.
तसंच F हे अक्षर Faith म्हणजे श्रद्धा या एका अत्यंत महत्त्वाच्या जीवनमूल्याचे देखील प्रतिनिधित्व करते. स्वतःवर, जीवनावर आणि एका सकारात्मक शक्तीवर असलेली श्रद्धा मनाला आधार देते, जीवन जगण्याची ऊर्जा देते.
G – Gratitude (कृतज्ञता) आणि Goals (ध्येय)
दररोज कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे मानसिक स्वच्छताच. कृतज्ञता मनाला डिटॉक्स ( शुद्ध )करण्याचं काम करते. त्यामुळे आपल्याला जीवन जगण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींची आणि गोष्टींची मदत होत असते त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणे आपले कर्तव्य असते.
तसेच जीवनात कोणतं तरी ध्येय ( Goal ) असलं पाहिजे. त्यामुळे आपल्या मार्ग भरकटत नाही. आपण गोंधळात हरवत नाही. ‘ध्येय’ म्हणजेच जीवनाला दिशा. ध्येयहीन जीवन म्हणजे दिशाहीन किंवा निरर्थक जीवन जगणे.
H– Habits (सवयी) आणि Humor (हास्यविनोद)
दैनंदिन सवयीच आपलं आरोग्य घडवतात – उठण्यापासून झोपेपर्यंत. लहानपणापासूनच चांगल्या सवयी जोपासणं अतिशय महत्त्वाचं.आणि हास्य? ते तर मनाचं औषध! खरं तर ते अनेक आजारांवरील विनामूल्य असलेले औषध आहे. मन:स्वास्थ्यासाठी रोज खळखळून हसणं ही खरी योगसाधना.
I – Inspiration (प्रेरणा) आणि Inner Peace (आंतरिक शांती)
जीवनात प्रेरणा मिळणं ही उर्जा आहे. जीवनात कुठलेही काम करायचे असेल किंवा यशस्वी व्हायचे असेल तर प्रेरणा ( inspiration ) ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर आंतरिक शांती टिकवणं ही शक्ती. सुखी, शांत आणि निरामय जीवनासाठी आंतरिक शांती अतिशय महत्त्वाची आहे. प्रेरणा आणि आंतरिक शांती या दोन्हींचा संगम आरोग्याच्या वाटचालीस बळ देतो.
J – Joy (आनंद) आणि Journaling (दैनंदिनी लेखन)
आनंदी राहणं ही वृत्ती आहे. ही फुलांकडूनही शिकता येते आणि मुलांकडूनही शिकता येते. गुलाब काट्यावर फुलतो परंतु कोणतेही दुःख त्याचे फुलण्यात आपल्याला दिसत नाही. लहान मुले एखादी गोष्ट हवी असेल किंवा त्यांना बरे नसेल तर तेवढ्यापुरते रडतात परंतु लगेच ते दुःख विसरून हसायला लागतात. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटते.आनंदाची जाणीव ठेवणं म्हणजेच आयुष्याशी आपला संबंध जिवंत ठेवणं.
दिवसातले अनुभव, भावना, निरीक्षणं लिहून ठेवणं – यामुळे आत्मचिंतनाचं सुंदर साधन मिळतं.
K – Kindness (दयाळूपणा) आणि Knowledge (ज्ञान)
दया आणि करुणा ही सहृदय व्यक्तीच्या स्वभावाची लक्षणे आहेत. क्षमा हे वीराचे भूषण आहे असे आपण म्हणतो.
तर knowledge म्हणजे ज्ञान हे जीवनातील सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट आहे.
L – Laughter (हास्य), Love (प्रेम) आणि Leisure (फुरसतीचे क्षण)
हे तीनही घटक मनाला तरतरीत ठेवतात. प्रेम आणि हसू म्हणजे मनासाठी अमृत. तर निवांत क्षण म्हणजे मनाला स्वतःशी जोडणारा सेतू.
M – Mental Health (मानसिक आरोग्य), Music (संगीत) आणि Money (अर्थनीती)
मनाचं आरोग्य राखणं आजच्या काळात अत्यावश्यक. संगीत हे मनाचं टॉनिक. आणि पैसा – तो साधन आहे, साध्य नव्हे, हे लक्षात ठेवलं तरच ‘मन:शांती’ टिकते.
N – Nutrition (पोषण) आणि Nature (निसर्ग)
चांगलं अन्न म्हणजे उत्तम आरोग्याचं पायाभूत साधन. तर निसर्गाशी असलेली जवळीक – ती म्हणजे मनाचं विश्रांतीस्थळ.
O – Optimism (आशावाद) आणि Oxygen (प्राणवायू)
आशावाद म्हणजेच अंतर्मनाचा उजेड. आणि शुद्ध हवा, मोकळं श्वसन – याचं आरोग्याशी थेट नातं आहे. ध्यान, प्राणायाम यामुळे शुद्ध प्राणवायू मिळतो.
P – Positive Thinking (सकारात्मक विचार), Practice (सराव) आणि Persistence (सातत्य)
सकारात्मक विचार मानवी जीवनाला एक वेगळी दिशा आणि शक्ती देतात परिस्थिती कोणतीही असो निराश व्हायचे नाही हे सकारात्मक विचार आपल्याला शिकवतात. सकारात्मकता, नियमित सराव, आणि सातत्य ही आरोग्य टिकवण्यासाठीची त्रिसूत्री आहे.
Q – Quietude (शांतता)
स्वतःशी संवाद साधण्यासाठी, मनाच्या खोल पातळीवर पोहोचण्यासाठी, शांतता आवश्यक आहे. रोजच्या धावपळीतून थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढा हा स्वसंवाद आपल्याला मानसिक शक्ती देईल.
R – Rest (विश्रांती), Reading (वाचन) आणि Reflection (मनन)
काम जसं गरजेचं, तशी विश्रांतीही. चांगलं वाचन मनाला समृद्ध करतं, आणि मननातून जीवन अधिक स्पष्ट होतं.
S– Sleep (झोप), Social Service (समाजसेवा), Self-discipline (स्वशिस्त)
झोप हीच खरी पुनर्निर्मिती. शरीराची झालेली झीज झोपेमुळे भरून निघते. समाजासाठी काही करणं ( social service ) ही आरोग्याची एक प्रेरक भावना. शिवाय समाजाचे आपण देणे लागतोच ते या माध्यमातून काही अंशी तरी परत करता येतो. आणि स्वयंशिस्तीशिवाय आयुष्यात प्रगती होत नाही.
T– Time Management (वेळेचं नियोजन)
ज्याला वेळेचं नियोजन करता आलं, तो आयुष्यात यशस्वी नक्कीच होतो. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे तणावापासून संरक्षण सुद्धा.
U – Understanding (समज), Unity (एकात्मता)
समजूतदारपणा म्हणजे संबंध टिकवण्याची गुरुकिल्ली. व्यक्तीचे आणि समाजाचे आरोग्य टिकून राहण्यासाठी आणि सुखी जीवनासाठी युनिटी म्हणजेच एकात्मता आवश्यक आहे. आरोग्य केवळ शरीराचं नसून सामाजिक व कौटुंबिक संबंधांचे आरोग्यही तितकंच महत्त्वाचं. ती एकात्मता जोपासता यायला हवी.
V– Vaccination (लसीकरण), Values (मूल्यं)
लस म्हणजे शरीराचं संरक्षण. ती विविध आजारांपासून आणि साथीच्या रोगांपासून शरीराला संरक्षण देते. तसंच जीवनमूल्यं म्हणजे मनाचं आणि जगण्याचं बळ. दोन्ही आपल्याला सुरक्षित करतात.
W– Water (पाणी), Walking (चालणं)
पिण्याचे शुद्ध पाणी, दररोज पायी चालणं हे आरोग्याचे मूलमंत्र आहेत.
X– eXamination/ X-ray (स्वतःचं निरीक्षण, वैद्यकीय तपासणी)
नियमित आरोग्यतपासणी म्हणजे आजार होण्याआधीच त्याला थांबवणं. आत्मनिरीक्षण हेही एक प्रकारचं "मनाचं एक्स-रे" आहे.
Y – Yoga (योग) आणि Yes to Life!
योग हा मन, शरीर आणि आत्म्याचा संगम. आणि ‘हो’ म्हणणं – आयुष्याच्या प्रत्येक सुंदर संधीला स्वीकारणं – याचं आरोग्याशी नातं आहेच.
Z – Zen (शांत, सजग जीवनपद्धती)
झेन म्हणजे साक्षीभाव. सजगतेनं, शांतपणे, सजगपणे जीवन जगणं – यापेक्षा सुंदर आरोग्यसंस्कृती नाही.
A ते Z ही केवळ वर्णमाला नाही, तर आरोग्याचं एक प्रेरणादायी गीत आहे. प्रत्येक अक्षर एक आठवण करून देतं – की आरोग्य ही केवळ शरीराची गोष्ट नसून, ती मन, विचार, नाती, पर्यावरण, संयम आणि आनंद यांचा सुंदर संगम आहे.
ही सुखी जीवनासाठीची नवीन एबीसीडी आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
७/६/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा