उगवतीचे रंग
पावसाची शाळा
सात जूनला भरली पावसाची शाळा,
शाळेसाठी भला मोठा आभाळाचा फळा!
ढगांच्या गडगडाची वाजली घंटा,
वीज चमकून म्हणाली, “सारे वर्गात बसा आता!”
जमले आता लहान थोर सारे
गार गार वारा गाऊ लागला गाणे
काळा कोट घालून गुरुजी तिथे आले
वर्गावर्गात जाऊन मुलांना शिकवू लागले.
शिकवताना बरसतात पावसाचे थेंब
पावसाच्या धारात विद्यार्थी चिंब.
पावसाच्या या शाळेला नाही नियमित वेळ,
इतर वेळी खेळत असतो ऊन-सावलीचा खेळ!
विजांचे संगीत आणि जलधारांचे शब्द
शिकताना भान विसरून सारे झाले स्तब्ध.
जमिनीवर चालेल मयूर नर्तन छान
फुलवुनी पिसारा घेतो मस्त तान.
वेलीचे रंगीत क्रेयॉन्स, झाडांची वही,
थेंबांची ही अक्षरं, कोणीच विसरले नाही!
इंद्रधनूचे रंग असतात पाठातील धडा,
पानाफुलात वाजतो पावसाचा सडा
ही पावसाची शाळा नाही चुकवत कोणी
उघड्या मनाने येतात निसर्ग आणि प्राणी.
थोडं चिंब व्हावं, थोडं डुंबावं या शब्दांमध्ये,
पावसाची शाळा उघडते मनाच्या दारामध्ये.
जोवर असतो पावसाळा तोवर भरते पावसाची शाळा
आगळ्या या शाळेमध्ये मनसोक्त बागडा, नाचा खेळा.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
८/६/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया कविता नावासहित अग्रेषित करावी )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा