उगवतीचे रंग
अंधारापलीकडील प्रकाश – हेलन केलर यांची प्रेरणादायी गाथा
“दृष्टी नसणं वाईट आहेच, पण दृष्टी असूनही ध्येय नसणं अधिक वाईट आहे.”
हे वाक्य आहे त्या स्त्रीचं जिनं आयुष्यभर अंधारात राहतही, इतरांच्या आयुष्यात प्रकाश पेरला. तिचं नाव हेलन केलर.
तिचं जीवन म्हणजे अपार संघर्षाची गाथा आहे. जीवनात अशक्य असं काही नाही. तुमच्याकडे जर जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छा असेल, काही तरी भव्य दिव्य करून दाखवण्याची जिद्द असेल, तर होय, तुम्हाला अशक्य असं काहीच नाही. हे आपल्या वागण्यातून सिद्ध करणारी महान विदुषी, वक्ता, लेखक आणि समाजसेविका हेलन केलर हिची ही अत्यंत प्रेरणादायी कहाणी तिच्या जन्मदिनानिमित्त आपल्यासमोर ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
पूर्वी मी आठवी नववीला इंग्रजी शिकवत असताना, कुठल्या तरी वर्गाच्या पाठ्यपुस्तकात हा पाठ इंग्रजीत दिलेला होता. तेव्हापासून या महान विदुषीने माझ्या मनात आदराचे स्थान पटकावले होते. तिची अफाट जिद्द मला स्तिमित करून गेली होती. ' अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला...' या कुसुमाग्रजांच्या ' कोलंबसाचे गर्वगीत ' या कवितेतील मला आठवत होत्या.
कधी कधी मनात एक विचार येतो—आपल्याला दिसतं, ऐकू येतं, बोलता येतं… पण तरीही आपण आयुष्याकडे हताशपणे बघत राहतो. आणि अशा वेळी कुणीतरी समोर उभं राहतं… ज्यांचं जीवन आपल्याला सांगून जातं—"काहीच असणं गरजेचं नाही, फक्त इच्छा असणं पुरेसं आहे."
असंच एक नाव म्हणजे हेलन केलर.
गंधहीन, स्वरहीन, पण जिवंत स्पंदनांनी भरलेलं आयुष्य
हेलनचा जन्म २७ जून १८८० साली अमेरिकेत झाला. लहानगी होती तेव्हा अगदी उत्साही, तरतरीत आणि चुणचुणीत दिसणारी. पण एका तापानं तिचं आयुष्य अचानक अंधारात लोटलं. कुठल्यातरी मेंदूज्वराच्या आजाराची ती शिकार झाली. आणि नंतर तिच्या भोवतालचं प्रकाशमान असलेलं जग तिच्यासाठी घनदाट अंधाराची काळोखी रात्र बनलं. तेव्हा ती फक्त १९ महिन्यांची होती. तेव्हा तिला ना दिसायचं, ना ऐकायचं, ना बोलता यायचं. घरातल्या मांजराचं गोंजारणं, आईच्या कुशीतल्या थोपटण्याचा स्पर्श—हेच तिचं जग बनून गेलं.
लहानग्या हेलनच्या वागण्यात चिडचिड, अस्वस्थता दिसू लागली. आई-वडिलांना ती का रागावते, हे समजत नव्हतं. तेव्हा तिच्या आयुष्यात आली अॅनी सुलिव्हन – एक तरुण, धैर्यशील शिक्षिका. त्यांनी हेलनच्या हातावर "W-A-T-E-R" असं लिहिलं आणि दुसऱ्या हातात पाण्याचा प्रवाह जाणवत होता. या एका क्षणात हेलनच्या डोळ्यांत (किंवा म्हणू या – मनात) प्रकाश पसरला. त्या दिवसात तिनं तब्बल ३० शब्द शिकले!
अॅनी सुलिव्हन यांनी केवळ अक्षरेच शिकवली नाहीत, तर हेलनच्या आत्मविश्वासाला पंख दिले. तिच्या बोटांनी ती वाचू लागली, ओठांवरील हालचाली हाताने समजून शब्द तयार करू लागली. आज आपण कल्पना करू शकतो का – एखादी मुलगी जी ना ऐकू शकते, ना पाहू शकते, ना बोलू शकते, ती बोलू लागते, लिहू लागते, जग बदलू लागते ?
पुढच्या काही महिन्यांत तिच्या डोळ्यांऐवजी तिच्या बोटांनी वाचायला सुरुवात केली. ती अंध, मूक, बहिरी होती पण बुद्धिहीन नव्हती. तिच्या शिकण्याचा वेग उत्तम होता. तिच्याजवळ दृष्टी नसली तरी भावी आयुष्याचं स्वप्न होतं. तिचं आत्मचरित्र वाचलं की, आपण परिस्थितीसमोर किती खचून जातो किंवा तिच्यापासून घाबरून किती दूर पळतो याची जाणीव होते.
हेलनच्या जागी दुसरी एखादी मुलगी असती तर ? जरा कल्पना करून पहा. ती खचली असती, कोलमडली असती. पण हेलन अशासाठी जन्मालाच आलेली नव्हती. तिचे जग अंधाराच्या गर्तेत बुडालं होतं हे खरं... पण ही मुलगी तशी तिथे थांबणारी नव्हती. तिचे डोळे जातात खरे; पण तिच्या आतले डोळे जागृत होतात. खरं तर तिच्याकडे काय असतं?असते तीव्र स्पर्श संवेदना! त्या जोरावरच आपल्या आईवडिलांच्या, मिस फुलर, अॅन सॅलिव्हन यांच्या साहाय्याने ती शब्दांचा शोध घेते. या शोधात तिला सापडतात तिचे स्वत:चे शब्द, तिची वाट...त्यामुळे हे चरित्र प्रेरणादायी ठरते. जीवनाला टाळता येत नाही हे हेलनला पक्के ठाऊक होते. मग आयुष्याला सामोरे जायचेच आहे तर सर्जकतेने व न थकता का जाऊ नये, असा विचार तिने केला. त्यातूनच तिला तिच्या जीवनाचा मार्ग सापडला.
याचा अर्थ असा नव्हे की, तिच्यासाठी अपंगत्व स्वीकारणे खूप सोपे होते. सुरुवातीला तिला फार त्रास झाला; पण तिला कळले की, आपल्या स्पर्श संवेदना तीव्र आहेत. नुसत्या हवेच्या वासावरून ती पाऊस किंवा वादळ येईल, असे भाकीत करू शकायची. याचा वापर करून ती अनेक गोष्टी शिकली. ओठांवर हात ठेवून त्यांची होणारी हालचाल, गळ्याच्या स्नायूंची होणारी हालचाल यांना स्पर्शाच्या साहाय्याने जाणून घेऊन त्याद्वारे शब्दसृष्टीत प्रवेश करणारी ही एकमेवाद्वितीय मुलगी होती. ती शिकत गेली. तिचा उत्साह वाढत गेला. आपण कल्पना करू शकतो की आपल्यासारख्या चांगली दृष्टी असणाऱ्या व्यक्तींना देखील शिक्षणात आणि जीवनात किती अडचणींचा आणि अडथळ्यांचा सामना करावा लागतो. हेलनचं कसं झालं असेल ? सोपं असेल का तिच्यासाठी हे सगळं शिकणं ? पण ' प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे ' ही म्हण तिने सार्थ करून दाखवली.
तिला परिपूर्णतेचा ध्यास होता. त्यासाठी तिने मनापासून प्रयत्न केले. ती म्हणते, ‘आपण स्वत:च्या अपेक्षा वाढवल्या की, त्या पूर्ण करण्याची वृत्ती आपोआप आपल्यात निर्माण होते.’
हेलनने शिक्षणाची वाट Radcliffe College (Harvard University) मध्ये गाठली – ही पदवी मिळवणारी पहिली अंध-मूकबधिर महिला ठरली. तिचं आत्मचरित्र The Story of My Life आजही प्रेरणादायी ठरतं.
ती म्हणते—"आपण स्वत:च्या अपेक्षा वाढवल्या की त्या पूर्ण करण्याची वृत्ती आपोआप निर्माण होते." हे तिच्या संपूर्ण जीवनाला लागू पडतं. तिच्या आत्मचरित्रात ती केवळ स्वतःच्या यशाची कहाणी सांगत नाही, तर ती जगण्याची नवी भाषा शिकवते—स्पर्शांची, प्रयत्नांची आणि सकारात्मकतेची.
हेलन केलर केवळ स्वतःपुरती मर्यादित राहिली नाही. तिनं अपंगांच्या, महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढा दिला. ती Socialist Party of America मध्ये सहभागी झाली, ACLU या संस्थेची संस्थापक सदस्य होती. जगभर ४० पेक्षा अधिक देशांत प्रवास करत तिनं अंध व अपंगांच्या सक्षमीकरणासाठी काम केलं. तिच्या या प्रवासात एकदा भारतात सुद्धा ती येऊन गेली.
हेलनने अनेक प्रभावी भाषणं दिली. त्यापैकी काही आजही ऐकताना अंगावर शहारे आणतात:
"Strike Against War" (1916):
"शस्त्रांनी शांतता येत नाही, ती येते माणसाच्या मनातून."
युद्धविरोधी विचार मांडणाऱ्या या भाषणात तिनं शांततेचा खरा अर्थ सांगितला.
Lions Club Address (1925):
“Alone we can do so little; together we can do so much.”
सहकार्याचे सामर्थ्य या एका वाक्यात तिनं मांडलं.
Optimism (1903):
"Though the world is full of suffering, it is also full of the overcoming of it."
दुःख हे अपरिहार्य आहे, पण त्यावर मात करता येते—हा तिचा जीवनसिद्ध अनुभव होता.
हेलन केलर आपल्याला काय सांगते?
ती आपल्याला शिकवते—
शरीराला मर्यादा असतात, पण मनाला नाही.
जगण्याची भाषा शब्दांनी नव्हे, तर कृतीने लिहिली जाते.
प्रत्येक अंधारात स्पर्शांचा उजेड दडलेला असतो.
आपण बोलतो, पाहतो, ऐकतो—तरीही थांबतो. पण हेलन? ती मात्र अंधारातूनही पुढे चालत राहिली. कारण तिला माहिती होतं—“ध्येय नसेल तर दृष्टी असूनही माणूस अंध असतो.”
तिला अनेक देशांच्या राष्ट्रपतींनी गौरवलं, जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची तिची मैत्री होती. या प्रसिद्ध व्यक्ती तिच्याशी मैत्री असणं म्हणजे आपला सन्मान मानत. १९६४ मध्ये अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान Presidential Medal of Freedom तिला मिळाला. १९६८ मध्ये तिचं निधन झालं, पण तिचं जीवन आजही प्रेरणेचं शिखर आहे.
ही कहाणी केवळ तिची नाही, आपलीही आहे
हेलन केलरचं जीवन केवळ अपंगत्वावर मात करणं नाही, तर ते संपूर्ण मानवजातीसाठी उमेद आणि आशेचा संदेश आहे. आपल्याला वाटतं, “हे शक्य नाही,” पण तिचं उत्तर असतं—“शक्य आहे, जर इच्छा असेल तर!”
( माहितीचा स्रोत: आंतरजाल )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२७/६/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा