उगवतीचे रंग
गार्निशिंग जीवनाचं...
स्वयंपाकघरात एक गोडशी धावपळ सुरू होती. सौ. कुठलातरी छान पदार्थ बनवत होती. त्या पदार्थाचा मंद सुवास संपूर्ण घरभर पसरला होता. तिचा स्वयंपाक पूर्ण झाला आणि समोर आली ती एक सुंदर सजवलेली डिश. त्या पदार्थाचा मी कधी आस्वाद घेतो असे मला झाले.
खरंतर प्रत्येक घरामध्ये अशी एखादी गृहिणी आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी खास पदार्थ नेहमीच तयार करत असते. त्याच वेळेस ती गृहिणी एका शांत, ठाम दृष्टीने शेवटी दिसणाऱ्या थाळीकडे पाहत असते. कारण आपल्या माणसांसमोर तो पदार्थ सादर करताना तो शेवटी कसा दिसावा याचे चित्र तिच्या मनात असते. चव, पोत, रंग आणि सुगंध यांच्या चौकटीत एक सुंदर दृश्य ती मनातल्या मनात रंगवत असते. एखादा खास पदार्थ तयार करताना ती केवळ कृती करत नाही – ती एक स्वप्न घडवत असते. शेवटचा तो कोथिंबिरीचा साज, डाळीवरचा तुपाचा चमचमता थेंब, ताटात केलेली सुबक मांडणी – ही तिच्या दृष्टिकोनाची साक्ष असते.
तिच्या डोळ्यांसमोर शेवट असतो – एक परिपूर्ण थाळी ! अशी ही सुंदर थाळी सजवून समोर ठेवणं म्हणजे गार्निशिंग. ( गार्निशिंग म्हणजे एखाद्या पदार्थाला (मुख्यतः अन्नाला) अधिक आकर्षक आणि चवदार बनवण्यासाठी त्यावर केलेली सजावट. )
"Every beautiful dish begins with a vision of its end – so does every meaningful life."
आणि ते पाहताना वाटतं, की ही कृती – "शेवट डोळ्यासमोर ठेवणं" – केवळ स्वयंपाकापुरती मर्यादित नाही. ती संपूर्ण जीवनाचं सार सांगते.
ताटात वाढलेली पोळी, भाजी, वरण-भात याच्या जोडीला जर कोथिंबिरीची चटणी, एखादी पापडाची चंचल आकृती, किंवा गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये लपवलेली कोशिंबीर दिसली, तर काय होतं ? त्या जेवणाला एक साज चढतो. आपुलकीची झाक येते. ती थाळी डोळ्यांत भरते आणि मनही भरते. आणि म्हणूनच मी म्हणतो, गार्निशिंग केवळ अन्नाचं नसतं, ते आयुष्याचंही असतं ! सजवलेपणाचं मोल हे अंतःकरणातून येतं. सजावट म्हणजे केवळ बाह्य प्रदर्शन नव्हे. ते आपल्या अंतःकरणातली भावना, आपुलकी, आणि समर्पणाचं दर्शन असतं. सौंदर्य केवळ दाखवण्यासाठी नसावं, तर 'देण्यासाठी' असावं.
स्वयंपाकगृहातील एखादी गृहिणी केवळ पोट भरण्यापुरतं नव्हे, तर मन तृप्त करण्याचंही कार्य करते. जेवणाचं गार्निशिंग हे तिचं प्रेम, काळजी, आणि सौंदर्यदृष्टी याचं प्रतिक असतं. आणि आयुष्यातसुद्धा, आपल्या कृतींना, नात्यांना, विचारांना जर सजावटीचा, कलात्मकतेचा, आत्मिकतेचा स्पर्श असेल, तर ती जीवन-थाळी मनोहारी होते.
थाळीतील सजावट सुसंगत दिसण्यासाठी काही जागा मोकळी ठेवावी लागते. प्रत्येक गोष्ट थाळीत टाकली, तर ते जेवण खचाखच भरलेलं वाटतं. पण जर योग्य गोष्टींची निवड केली, अनावश्यक गोष्टी टाळल्या, तर सौंदर्य खुलतं. आयुष्यातही तसंच. आपल्या आयुष्यातही शांततेचे क्षण, विरामचिन्हं, यांना जागा द्यावी लागते. Too much is clutter; simplicity is elegance. जीवनात सगळं मिळवण्याच्या नादात आपण काही महत्त्वाचं हरवून बसतो. Less is more हे तत्त्व इथेही लागू होतं.
आपलं जीवनही एका मोठ्या जेवणासारखंच असतं, नाही का ? बालपण म्हणजे तयारी – साहित्य जमा करणं, काही अनावश्यक गोष्टी बाजूला करणं. तारुण्य म्हणजे तयारीची धावपळ – गॅसवर ठेवलेली आशेची भांडी, प्रेमाचे तळण, काही चूका देखील...हे थोडंसं जळणं आणि पुन्हा प्रयत्न करणं. तर प्रौढत्व म्हणजे अनुभवाची समतोल चव – नोकरी, संसार, जबाबदाऱ्या, आनंददायक यश, मधूनच येणारे अपयशाचे खारट थेंब. या सगळ्यातून जमा होणारे अनुभवाचे मौल्यवान मोती ! थाळी समोर आली की काही क्षणात गार्निश संपतं, पण तो क्षण लक्षात राहतो. तसंच, जीवनातले छोट्या आनंदाचे क्षण टिकवणं, आठवणीत साठवणं ही खरी समृद्धी आहे.
पण या सर्वाच्या पलीकडे असतो तो जीवनाचा शेवटचा टप्पा – वृद्धत्व. जणू जीवनाच्या थाळीवरचं गार्निशिंग !
कोण म्हणतो वृद्धत्व म्हणजे झिजणं, खंगणं ? वृद्धत्व म्हणजे कुरूपता ? पिकलेलं जाळीदार पानही सुंदर दिसतं ! फक्त आपल्या दृष्टीवर ते अवलंबून असतं. वृद्धत्व म्हणजे खरं तर समाधानाचं गंधर्वभोजन असतं ! वयाच्या सायंकाळी जर मन:शांती असेल, कर्तृत्वाच्या आठवणी, प्रेमाची सोबत आणि आरोग्याची साथ असेल, तर तो शेवट म्हणजे एक सुंदर कलाकृतीपेक्षा कमी नाही.
वृद्धत्व म्हणजे केवळ केस पांढरे होणं नव्हे, तर अंतरात्मा निर्मळ होणं आहे. त्या क्षणी आपण जेव्हा स्वतःकडे पाहू, तेव्हा असं वाटलं पाहिजे – "हो, आयुष्य सुंदर केलं." पु ल देशपांडे म्हणतात, "माणसाच्या आयुष्यातली खरी श्रीमंती ही त्याने उपभोगलेल्या आनंदात असते; आणि ती श्रीमंती त्याच्या चेहऱ्यावर उतरत जाते." ती अशावेळी त्याच्या चेहऱ्यावर दिसते.
"गार्निशिंग केवळ अन्नाचं नसतं, ते आयुष्याचंही असतं!"
'Start with the end in mind' – हे फक्त व्यवस्थापनशास्त्रातलं तत्त्वज्ञान नाही, तर आयुष्य जगण्याची शैली आहे. आपण रोज जे करत आहोत, त्याचा शेवट काय असेल ? आपली वृत्ती, सवयी, विचार हे आपल्याला कुठे घेऊन जात आहेत?
प्रख्यात लेखक रॉबिन शर्मा म्हणतात, "Live your life in such a way, that your final chapter looks like a celebration, not a conclusion."
जसं ती गृहिणी शेवटच्या थेंबातही सौंदर्य शोधते, तसंच आपणही आपल्या आयुष्याच्या शेवटात आनंदाचा, कृतार्थतेचा आणि सौंदर्याचा गंध ठेवायला हवा.
म्हणूनच, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण विचार केला पाहिजे – "हा दिवस मला कसा संपवायचा आहे ?"
मला माझं तारुण्य नुसतंच धावपळीत घालवायचं आहे का?
माझं प्रौढत्व केवळ जबाबदाऱ्यांमध्ये गढून राहणार आहे का?
की या सगळ्याच्या पलीकडे, एका शांत सुंदर शेवटाकडे मला जायचं आहे ?
पुलं म्हणतात "माझ्या जीवनाच्या शेवटी जर मी एकाच गोष्टीबद्दल खात्रीपूर्वक सांगू शकलो, तर ती ही – की मी मनसोक्त जगलो तर त्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. "
आज ती गृहिणी शांतपणे थाळी सजवते आहे. डिशमधील पदार्थांची लज्जत आणि सौंदर्य वाढवते आहे. थोडीशी कोथिंबीर, एखादा वाफाळलेला पदार्थ, आणि एका छोट्या वाटीत गोड काहीतरी. तिला माहीत आहे की, जेवण संपल्यानंतरही आठवण राहणार आहे – चव, गंध, रंग अन तिच्या प्रेमाची !
आपलंही जीवन असंच का नसावं ?
"The secret of a fulfilled old age is to live each stage of life as artfully as plating a perfect meal."
जेव्हा अंत जवळ येईल, तेव्हा म्हणावंसं वाटावं – "हो, आयुष्य ही एक सुंदर थाळी होती – चविष्ट, पौष्टिक, प्रेमळ आणि मनापासून सजवलेली."
म्हणूनच शेवटी जीवनगंधाची एक प्रार्थना...
देवा,
माझं आयुष्य तुझ्या हाती असो –
जसं एखाद्या कुशल गृहिणीच्या हाती असतं थाळीचं सौंदर्य...
जिथे प्रत्येक क्षणाला चव असो,
प्रत्येक टप्प्याला रंग असो,
आणि शेवटाला समाधानाचा सुवास!
माझ्या आयुष्याच्या शेवटी
मी तुझ्याकडे हेच मागतो –
की जसं मी मनापासून जगलो,
तसंच मी मनापासून विसावलो…जीवनाचा आनंद घेतला. अशा या जीवनाचा शेवटही असो सुंदर –
" जसा थाळीवरचा शेवटचा कोथिंबिरीचा साज."
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२४/६/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा