उगवतीचे रंग
ओल्या मातीला आकार देताना...
लता मंगेशकर यांच्या लहानपणीचा एक प्रसंग आहे. लता ही मंगेशकर भावंडांमध्ये मोठी होती. त्यावेळी त्यांची परिस्थिती चांगली होती आणि मास्टर दिनानाथ हयात होते. एकदा त्यांच्या घरातील साबण संपला. त्यांच्या घरातील नोकर समोरच्या दुकानात साबण आणण्यासाठी गेला. परंतु त्याच्या हातात त्यावेळी जे दोन पैशांचे नाणे होते ते नाणे खोटे आहे, असे म्हणून दुकानदाराने साबण देण्यास नकार दिला. जेव्हा छोट्या लताला ही गोष्ट कळली तेव्हा तिला अतिशय राग आला आणि तो दुकानदार साबण कसा देत नाही ते मी पाहते असे म्हणून तिने त्या नोकराकडून ते नाणे घेतले. त्या दुकानदाराकडे जाऊन त्याच्या गल्ल्यात ते भिरकावले आणि मी मास्टर दीनानाथ यांची मुलगी आहे. मला साबण हवा आहे असे सांगितले. आता त्या दुकानदाराची पंचाईत झाली. त्याला गल्ल्यातून खोटे नाणे शोधता येईना. शिवाय मास्टर दिनानाथांची मुलगी खोटं कशाला बोलेल असे त्याल वाटले. त्याने साबण दिला आणि तो साबण घेऊन लता आनंदाने घरी आली. जेव्हा मास्टर दिनानाथांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना अतिशय वाईट वाटले. त्यांनी तिला जवळ बोलावले आणि म्हटले," त्या दोन पैशांच्या नाण्यासाठी तू खोटं बोललीस ! जा असाच्या असा हा साबण त्या दुकानदाराला परत करून ये आणि त्याला माझी चूक झाली आहे हे सांग. आणि साबण घेण्यासाठी हे दुसरे पैसे घेऊन जा." त्यावेळी लताला बाबांच्या सांगण्याचा राग आला परंतु त्यांच्यासमोर बोलण्याची तिची हिंमत नव्हती. ती गेली आणि दुकानदाराला खरे काय ते सांगितले. तिच्या कोवळ्या मनावर त्यावेळी खोटे बोलणे चुकीचे आहे आणि आपल्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही हा संस्कार मास्टर दिनानाथांनी केला. असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात घडले. " आपल्या मनाला जी गोष्ट योग्य वाटते तीच कर. जी गोष्ट अयोग्य आहे असे आपले मन सांगते, ती कधीही करू नकोस. " असे संस्कार मास्टर दिनानाथांनी मंगेशकर भावंडांवर केले आणि हे संस्कार पुढे कायम टिकले. अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनाला त्यांच्या आई-वडिलांनी लहानपणीच असे संस्कार करूनच आकार दिला आहे.
लहान मुलांना नेहमी ओल्या मातीच्या गोळ्याची उपमा दिली जाते. मातीचा गोळा ओला असताना त्याला हवा तसा आकार देता येतो. पण एकदा का त्यातील ओलावा संपला की त्यातील लवचिकता आणि आकार घेण्याची क्षमता नष्ट होते. त्यानंतरही आकार देण्याचा प्रयत्न केला तर त्याचे तुकडे पडतात. ज्या आई-वडिलांना, पालकांना आणि गुरुजनांना यातील मर्म कळले त्यांना मुलांना कसे घडवायचे हा प्रश्न पडत नाही.
आज मानसशास्त्रामध्ये बालमानसशास्त्राचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. जीन पियोगेट, लेव व्योगोत्स्की, ॲलिसन गोपनिक, रॉस थॉम्पसन इ शास्त्रज्ञांनी बालमानसशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांना मार्गदर्शन मिळत आहे.
परंतु तरीदेखील आजच्या काळात मुलांना घडवणे पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक झाले आहे. याची अनेक कारणे आहेत. पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होऊन विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आहे. घरामध्ये लहान मुलांकडे आवर्जून लक्ष देणारे कोणी उरले नाही. आई-वडील कामावर जाणारे असल्यामुळे त्यांना मुलांकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. मुलांच्या शाळा आणि शिकवण्या या ठिकाणी जे संस्कार होतील त्यावरच त्यांना अवलंबून राहावे लागते. विभक्त कुटुंबांमध्ये हल्ली आजी आजोबांना स्थान राहिले नाही. बऱ्याच पाठ्यपुस्तकात आणि लहान मुलांचे पुस्तकात कुटुंब म्हणजे फक्त आई-वडील आणि मुले अशा प्रकारची चित्रे आणि पाठ दिलेले असतात म्हणजे ही गोष्ट जणू काही शासनमान्य झाली असे खेदाने म्हणावे लागेल. पण शासन किंवा पाठ्यपुस्तके ते सांगत नसेल तर ते सांगणे आई-वडिलांचे काम आहे. पूर्वी तर एकत्र कुटुंबात काका, काकी चुलत भावंड अशी अनेक माणसे असत. त्यासोबतच मुलांच्या हातात मोबाईल, टीव्हीचा रिमोट यासारखी साधने आली आहेत. जेव्हा पालकांना वेळ नसतो तेव्हा मुले त्यांना आवडतील असेच कार्यक्रम टीव्हीवर पाहतात. मोबाईलवर हवे ते गेम्स खेळतात किंवा नको त्या साइटस् पाहतात. आपली मुले कोणत्या मित्रांच्या संगतीत खेळतात हे देखील पालकांना माहिती नसते.
अपघाताने एखादा प्रसंग घडतो आणि मुलांमध्ये निर्माण होणारे दुर्गुण आई-वडिलांच्या लक्षात यायला लागतात. अशा वेळी आपला मुलगा खोटं बोलतो आहे हे त्यांना कळतं. कधीकधी मुलं आक्रमक होतात आणि उलट उत्तर देतात. मोठ्या व्यक्तींची उद्धटपणे वागतात. कधी कधी अपशब्दांचा वापर करतात, घरातील वस्तूंची आदळआपट करून नुकसान करतात. हे सगळे पाहिल्यानंतर आई-वडिलांना सहाजिकच धक्का बसतो. त्यांच्या मनात प्रश्न येतो की आपण तर यांना असे काही शिकवले नाही, मग हे असे का करतात ? तर याचे उत्तर घरामध्ये त्यांच्याकडे लक्ष देणारे कोणी राहिलेले नाही. त्यांना केवळ हव्या त्या वस्तू आणि त्यांच्या गरजा वेळोवेळी भागवल्या म्हणजे त्यांच्यावर संस्कार होत नाहीत. त्यांना वेळ देण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज सर्वात जास्त महत्त्वाची असते.
संस्कार म्हणजे उपदेश नव्हे, सवय आहे. संस्कार म्हणजे धडपडताना दिला गेलेला हात, निसर्गात रुजवलेलं मूल्य, प्रेमाने दाखवलेली दिशा. संस्कार हे सांगण्यापेक्षा 'जगून दाखवण्याचे' असतात. संस्कारांसोबतच आई-वडिलांनी मुलांना द्यायचं असतं एक संवेदनशील मन. घर म्हणजे एक चालतंबोलतं पुस्तक असतं. घरातील मुले काही न बोलता हे पुस्तक मुकाट्याने वाचत असतात आणि त्याचे अनुकरणही करत असतात. जेव्हा वडिलांना मिळालेले बक्षीस किंवा पगार ते त्यांच्या आईच्या हातात ठेवून तिला नमस्कार करतात तेव्हा पुढची पिढीही हे पाहत असते. मग मुलांना जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा त्यांना सांगावे लागत नाही तू पुरस्कार ते आई वडिलांच्या हातात ठेवून त्यांना आपोआपच नमस्कार करतात. काही सुशिक्षित आणि बालमानसशास्त्राची जाण असणारे पालक आपल्या या दृष्टीने मुलांसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करतात.
मोबाईल आणि टीव्हीवर नको ते कार्यक्रम पाहून मुलांच्या विध्वंसक वृत्तीत वाढ होत जाते. बाहेर आपल्या मित्रांमध्ये खेळताना त्यांनी दिलेल्या शिव्या किंवा वापरलेले अपशब्द मुले सहज आत्मसात करतात आणि आपल्या बोलण्यात त्यांचा वापर करू लागतात. पालकांशी किंवा शिक्षकांशी उद्धट वर्तन करतात. खोटं बोलणं, आक्रस्ताळेपणा करणं यासारख्या गोष्टी ते करतात. या सगळ्या प्रसंगी पालकांनी मुलांना समजून घेणे आवश्यक असते.
बहुतांश वेळी विश्वासात घेऊन, समजावून सांगून ( आणि क्वचित प्रसंगी रागावून ) अशा गोष्टी चुकीच्या कशा आहेत हे मुलांना पटवून दिले पाहिजे. खोटं बोलल्याने किंवा मोठ्या व्यक्तींची उद्धटपणे वर्तन केल्यामुळे त्यांच्या मनातील तुमच्या प्रतिमेला कसा तडा जातो ते त्यांना समजावून सांगितले पाहिजे. आपले म्हणणे योग्य शब्दात सांगणे, संयम, शांतता आणि सहनशीलतेचे महत्व उदाहरणासहित पटवून देणे या गोष्टी अशावेळी महत्त्वाच्या ठरतात. सकारात्मक आणि चांगल्या वागण्याचे फायदे त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजेत. रामायण - महाभारतातल्या गोष्टी आपल्या मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शक ठरू शकतात. पूर्वीच्या अनेक पिढ्या त्यावरच घडल्या आहेत. त्या संस्कारक्षम गोष्टी आहेत. त्यावर धार्मिक म्हणून शिक्का मारून त्या बाजूला ठेवता येणार नाहीत. त्याचप्रमाणे थोरांची चरित्रे त्यांच्यापुढे ठेवताना या थोर व्यक्तींनी आपल्या आयुष्यात कशाप्रकारे अडचणींना आणि अपयशाला तोंड दिले हे त्यांना आवर्जून सांगितले पाहिजे. इतिहासातील थोरांचे योगदान, देशभक्तांनी देशासाठी केलेल्या समर्पण लहानपणी त्यांना आलेल्या अडचणी यांची उदाहरणे मुलांना सांगता येतील असे सुंदर व्हिडिओ किंवा धारावाहिक त्यांना दाखवता येतील किंवा त्यांना आवर्जून तेच पाहायला लावले पाहिजे.
वाईट संगतीचे दुष्परिणाम त्यांना युक्तीयुक्तीने समजावून त्यापासून दूर राहिले पाहिजे हे त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे. मुले शाळेत जातात त्याचप्रमाणे इतर मुलांबरोबर ती खेळत असतात त्यामुळे मुलांबरोबर जाणे किंवा मिक्स होणे हे टाळता येण्यासारखे नाही. अशा परिस्थितीत मुलांच्या मित्र-मैत्रिणींचाही परिचय पालकांनी करून घ्यावा. त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे देखील उपयुक्त ठरू शकते.
मुलांमधील हिंसक आणि आक्रमक प्रवृत्ती कमी होण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना त्यांच्या उपयोगी पडू शकेल. दररोज संध्याकाळी किंवा एखाद्या नियमित वेळी पालकांनी स्वतः मुलांसोबत बसून प्रार्थना करावी, चांगल्या विचारांचे उच्चारण आणि चिंतन करावे. यातून त्यांची आक्रमक वृत्ती कमी होण्यासाठी मदत होऊ शकेल. आपली चूक मान्य करणे, झालेल्या चुकीबद्दल क्षमा याचना करणे ही मोठी गोष्ट आहे हे त्यांना शिकवावे.
मुलांची प्रवृत्ती चौकशी असते. त्यांना अनेक प्रश्न पडत असतात. साहजिकच या प्रश्नांची उत्तरे ते आपल्या आई-वडिलांकडून शोधत असतात. परंतु बऱ्याच वेळेला त्यांच्या शंकांचे समाधान न झाल्याने ते अन्य मार्ग शोधतात. असे मार्ग प्रसंगी घातक ठरू शकतात म्हणून आई-वडिलांनी मुलांची जिज्ञासा न मारता त्यांच्या परीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचे कुतूहल शमवले पाहिजे.
मुलांमध्ये वाचण्याची आवड जोपासण्यासाठी आई-वडिलांनी देखील त्यांच्यासमोर स्वतः वाचन करणे, त्यासाठी पुस्तक घेऊन बसणे आवश्यक आहे. केवळ सांगून त्यांच्यामध्ये वाचण्याची आवड निर्माण होणार नाही. आपण स्वतः टीव्ही किंवा मोबाईल पहात बसायचा आणि मुलांना वाचायला सांगितले तर ते अजिबात ऐकणार नाहीत कारण मुले अनुकरण करतात, ते पाहतात आणि त्याप्रमाणे वागतात. बालभारतीच्या पुस्तकातील गोष्टी, चंपक, नंदन किंवा अक्कड बक्कड यासारखी पुस्तके मुलांच्या भावनिक विकासाला आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतील. आपल्या मुलांना अशी पुस्तके जरूर उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याचप्रमाणे मुलांमधील चांगल्या गोष्टी जसे की त्यांची गाण्याची आवड, खेळ, चित्रकला यासारख्या गोष्टींना आवर्जून प्रोत्साहन द्यावे. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे, चांगल्या गोष्टीचे कौतुक करावे. तू हे करू शकतोस असा विश्वास त्यांना दिला पाहिजे.
मुलांना शिकवताना शब्दांनी नाही तर कृतीने शिकवणे जास्त परिणामकारक ठरते. एकत्र जेवण घेणे, एकत्र प्रार्थना करणे, नमस्कार याची सवय लावणे या गोष्टी पालक स्वतः करत असतील तर मुले त्या सवयी आपोआप उचलतात.
संस्कार 'दंडाने' नाही, तर 'स्नेहाने' रुजतात हे आपण पालक म्हणून लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रार्थना, गोष्टी, गाणी ही संस्कारांची बीजं आहेत. मुलांवर प्रेम करणं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणं – याहून मोठा संस्कार नाही.
मुलांना घडवणे म्हणजे शिल्पकाराने एखादी मूर्ती घडवण्यासारखे आहे. शिल्पकार नको असलेला मूर्तीतील भाग काढून टाकतो आणि मगच सुंदर मूर्ती तयार होते. या लेखामध्ये मी सांगितलेली थिअरी समजायला सोपी आणि चांगली वाटते, परंतु आचरणात आणण्यासाठी ती तेवढीच कठीण आहे याची मला जाणीव आहे. प्रत्यक्षामध्ये मुलांना घडवताना अनेक अडचणी येतात, परंतु मुलांना घडवणे ही क्रिया एखादे बटण दाबून जसा विजेचा दिवा लागतो तशी लगेच होणारी नाही. त्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करत राहावे लागतात. ती एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. ती न कंटाळता सातत्याने करत राहावी लागते तरच यश मिळू शकते. म्हणूनच असे म्हटले जाते की आई वडील होणे सोपे आहे परंतु चांगले पालक होणे मात्र कठीण !
शेवटी मुलांना काय द्यायचे मोबाईल की वेळ, शब्दांच्या माध्यमातून सांगायचे की कृतीच्या माध्यमातून ? हे आपणच ठरवायचे आहे. आज तुमच्या माझ्यासमोर प्रश्न आहे की या ओल्या मातीला आपण कोणता आकार देतो आहोत ?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२१/६/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा