मुख्य सामग्रीवर वगळा

नव्वदितही वसंत फुललेलाच !

 उगवतीचे रंग 

नव्वदितही ' वसंत ' फुललेलाच !

वसंत ऋतु वर्षातून एकदाच येतो आणि सर्वांना आनंद, हर्ष, उल्हास प्रदान करतो. परंतु आज मी अशा एका व्यक्तिमत्त्वाचा परिचय आपल्याला करून देणार आहे की जी व्यक्ती नव्वदित असतानाही तरुणांनाही लाजवेल अशा प्रकारचे काम करते आहे. या वसंताचा बहर अजूनही ओसरला नाही. होय, हे खरे आहे. या व्यक्तीचे नाव आहे वसंतराव चंद्रात्रे. चाळीसगाव आणि परिसरातील लोक त्यांना ' योगाचार्य ' म्हणून ओळखतात. 

वामन मूर्ती, योग आणि व्यायामाने कसलेले प्रमाणबद्ध शरीर, चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे विलसणारे तेज, सदैव प्रसन्न आणि हसतमुख असे असलेले हे व्यक्तिमत्व समोरच्या व्यक्तीला आकर्षित करून घेते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडल्याशिवाय राहत नाही. लोक प्रेमाने आणि आदराने त्यांना बाबा म्हणतात. त्यांना भेटणारी व्यक्ती आदराने वाकून त्यांना नमस्कार केल्याशिवाय राहत नाही आणि नमस्कार करणाऱ्यांच्या पाठीवर बाबांची कौतुकाची आणि आशीर्वादाची थाप पडल्याशिवाय राहत नाही. अनुभवाचा आणि आठवणींचा मोठा खजिना त्यांच्याजवळ असल्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारणे ही एक पर्वणी असते. सर्व लहान थोरांमध्ये आपले वय विसरून बाबा मिसळतात.

बाबांचा जन्म ३० मे १९३४ चा. स्वातंत्र्यपूर्व काळातला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेले बाबा मोठ्या कष्टाने शिक्षण घेऊन सिविल इंजिनियर झाले. सुरुवातीला पुणे येथील पानशेत प्रकल्पावर ते सेक्शन ऑफिसर म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांनी अन्य कंपनीतही मॅनेजर पदावर कार्य केले. परंतु नोकरीत त्यांचे मन रमत नसल्यामुळे त्यांनी लवकरच राजीनामा देऊन स्वतंत्र व्यवसाय करणे पसंत केले. चाळीसगाव सारख्या छोट्या शहरात येऊन त्यांनी नीति इलेक्ट्रिक या नावाचे एक दुकान सुरू केले. नावाप्रमाणेच नीतीने आणि सचोटीने व्यवहार करून ही फर्म त्यांनी नावारूपाला आणली. आज त्यांची मुले त्यांचा हा व्यवसाय पुढे चालवत असले तरी आजही बाबा तिथे बसून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत असतात.

बाबांनी अनेक राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आजही त्यांचे हे कार्य सुरूच आहे पूर्वीचा जनसंघ ते आजचा भाजप असा त्यांचा प्रवास झाला या प्रवासादरम्यान अनेक पदांवरही त्यांनी काम केले आणि आपल्या कार्यशैलीचा एक वेगळा ठसा उमटवला. चाळीसगाव येथील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी या संस्थेत त्यांनी सचिव पदासह अनेक पदे भूषवली. चाळीसगावच्या शेठ ना. बं. वाचनालयाचे ते अनेक वर्षे अध्यक्षही होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर ते बिनविरोध सिनेट सदस्य म्हणूनही कार्यरत होते. 

या त्यांच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक प्रवासात आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनात अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आली परंतु त्यांना यशस्वीपणे त्यांनी तोंड दिले. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही सोसावा लागला. परंतु बाबा कधीही निराश झाले नाहीत किंवा खचले नाहीत आणि नीति, सदाचाराने वागणे कधीही सोडले नाही. 

 सगळे करीत असताना या जोडीला त्यांनी आणखी एक वेगळे आणि उल्लेखनीय कार्य चार तपाहूनही अधिक काळ सुरू ठेवले आणि ते कार्य म्हणजे योगप्रसाराचे ! जेव्हा योगाचा प्रसार आणि प्रचार फारसा झालेला नव्हता अशा काळात चाळीसगाव सारख्या एका छोट्या ठिकाणी त्यांनी योगासनांच्या वर्गांना सुरुवात केली आणि आज जवळपास ४८ वर्षे झाली तरी योगप्रसाराचे त्यांचे हे कार्य सुरूच आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे कार्य विनामूल्य आणि निरपेक्षपणे सुरू आहे. त्यांच्या या सगळ्या वाटचालीत आणि योगप्रसाराच्या कार्यात त्यांच्या सौभाग्यवती सौ मीनाक्षी काकूंची खंबीर साथ त्यांना लाभली आहे. या लक्ष्मीनारायणाच्या जोडीने योगाचे धडे देऊन अनेक साधकांना निरामय आरोग्य प्रदान केले, अनेक योगसाधक घडवले. बाबांचे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आजही देशात आणि परदेशात योगसाधना सुरू ठेवत आहेत. एवढेच नव्हे तर इतरांनाही मार्गदर्शन करीत आहेत. मला स्वतःलाही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला आहे. माझ्या मुलीने देखील योगाचे धडे त्यांच्याकडून घेतले. 

केवळ योगासने आणि प्राणायामच नव्हे तर यम,नियम आदी अष्टांग योगाचे जो पालन करतो, त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे बाबा ! चाळीसगाव शहर किंवा परिसरात कोणताही कार्यक्रम असो बाबांना त्या ठिकाणी सन्मानाने आमंत्रित केले जाते. बऱ्याच कार्यक्रमांचे ते प्रमुख अतिथी असतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आजही ते स्वतः गाडी चालवून त्या ठिकाणी पोहोचतात. त्यांची स्मरणशक्ती उत्तम आहे वयानुसार थोडेसे कमी ऐकू येणे एवढी एक गोष्ट सोडली तर बाबा आजही तरुणांचे प्रेरणास्थान आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.  

आपल्या योग प्रसाराच्या कार्याचा वारसा आपल्या मागेही सुरूच राहावा ही त्यांची तीव्र इच्छा ! या इच्छेतूनच चाळीसगाव मध्ये योगासाठी स्वतंत्र इमारत असावी हे त्यांचे स्वप्न होते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबांनी दिवस-रात्र एक करून आणि योगप्रेमींनी दिलेल्या देणगीत स्वतःची भर घालून योगभवनाची निर्मिती केली आणि आज त्या ठिकाणी ते योगाचे वर्ग घेत आहेत.

अनेक वर्तमानपत्रातून वेळोवेळी त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे अनुभवातून आलेले लेख, कविता आणि शैक्षणिक कार्य यावर आधारित त्यांची आठ ते दहा पुस्तके आजपर्यंत प्रकाशित झाली आहेत.

अशा या बाबांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. त्यांच्या मोफत योग प्रसाराच्या वर्गाची विश्वविक्रम म्हणून नोंद घेण्यात आली आहे. परंतु खरा पुरस्कार म्हणजे लोकांच्या त्यांनी हृदयात मिळवलेले स्थान. चाळीसगावचे ते भूषण आहेत. अशा या बाबांना परमेश्वर दीर्घायुष्य प्रदान करो हीच योग दिवसाच्या निमित्ताने प्रार्थना !

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२०/६/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...