मुख्य सामग्रीवर वगळा

( सहन )शीलं परमं भूषणम्

 उगवतीचे रंग 

( सहन )शीलं परमं भूषणम् – सहनशीलतेतून तेज निर्माण करणारे जीवनमूल्य

परवा सहज मनशक्ती मासिकाचा जून महिन्याचा (२०२५ ) अंक चाळत होतो. त्यात जीवनगीता या नावाचे एक सदर आहे. त्यात श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारतातील युद्धाच्या वेळेस एक फार सुंदर उपदेश केला. श्रीकृष्ण म्हणतो, " अर्जुना, तू सहन करायला शिक. आयुष्यात तुला देह मिळाला आहे. या देहासकट काही दुःख भोगायला शिक. शील हे सगळ्यात उत्तम असतं. पण सगळ्यात मोठं शील म्हणजे सहनशील होणं. मला दुःख झालं, त्रास झाला, तरी, सगळे लोक असेच वागतात, असं म्हणू नको. हे तुझ्या कर्माचं फळ आहे. शांत रीतीनं, भव्य रीतीनं तुला देहाचं सोनं करायचं असेल, तर सहन करायला शिक. " 

हे वाचून मी आश्चर्यचकित झालो. सगळ्यात मोठं शील म्हणजे सहनशीलता असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. इंग्रजीत शील या शब्दाला ' character ' असा शब्द आहे. आपण मराठीत तो ' चारित्र्य ' या अर्थीही वापरतो. ' चारित्र्य ' ही संज्ञा तशी खूप व्यापक आहे. अनेक गोष्टींचा अंतर्भाव त्यात होतो. सचोटी, प्रामाणिकपणा, पारदर्शक व्यवहार आणि नातेसंबंध, निष्ठा आदी अनेक गोष्टी त्यात येतात. पण जेव्हा श्रीकृष्ण पार्थाला सांगतो की सगळ्यात मोठं शील म्हणजे सहनशील असणं, तेव्हा त्यात खूप काही अर्थ असला पाहिजे असं मला वाटायला लागलं. मग गीतेत या संदर्भातील एक श्लोक सापडला. 

श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात –

 "मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः।

आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत॥" ( अध्याय २, श्लोक १४ )

हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता (अर्जुना ), ते तू सहन कर. हीच तितिक्षा, हीच शीलता, हीच खऱ्या अर्थाने जीवन विजयाची पहिली पायरी आहे.

"शील म्हणजेच खरे भूषण." – हा विचार आपल्या भारतीय संस्कृतीचा मर्म आहे. त्यात माणूस किती विद्वान आहे, श्रीमंत आहे, कीर्तिवान आहे – हे महत्त्वाचं नाही; तर तो शीलवान आहे का? संयमी आहे का? सहनशील आहे का? – हे अधिक महत्त्वाचं. 

शील म्हणजे काय? शील म्हणजे केवळ शालीन वागणं नव्हे, तर –अंत:करणात स्थिर मूल्यांची निष्ठा, परिस्थिती विपरीत असतानाही मनाचं संतुलन टिकवणं, अपमान, अन्याय, वेदना यांना विवेकाने आणि संयमाने सामोरं जाणं. शीलवान माणूस बाह्य सौंदर्याने नव्हे, तर अंतर्यामीच्या सौंदर्याने ओळखला जातो. शील म्हणजेच चरित्र, आचार, संयम आणि सहनशीलता यांचं सुंदर संमीलन. “शीलं परमं भूषणम्” हे केवळ एक संस्कृत वाक्य नव्हे, तर जगण्याची दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे. 

आजच्या धावपळीच्या, प्रतिक्रिया-प्रधान काळात "सहन करणं" ही गोष्ट दुर्बळपणाचं लक्षण मानली जाते. पण सहन करणारा दुबळा नसतो, तो अधिक सशक्त असतो. कारण त्याच्या मनात आत्मविश्वास असतो, आणि आचरणात संयम. पण आजच्या काळात सहनशीलता नावाचं हे तेजस्वी शीलच लुप्त होत चाललं आहे. तरुण पिढीजवळ सहनशीलता तर नावालाही उरलेली नाही. जरा काही मनाविरुद्ध घडले की लागलीच संताप, राग, द्वेष, चिड किंवा आत्महत्या ठरलेली.

मग ज्यांनी आपल्या आयुष्यात सहनशीलतेचं परमोच्च दर्शन घडवलं अशी उदाहरणं मला आठवायला लागली. या सहनशीलतेच्या जोरावरच ते आपल्या आयुष्यात मोठी कामगिरी करून दाखवू शकले. सहनशीलता म्हणजे दुर्बलता नव्हे. आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याचं ते एक जीवनमूल्य आहे असं मला वाटत. मला संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण आठवलं. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताई या भावंडांचं संपूर्ण जीवन म्हणजे सहनशीलतेचा अखंड प्रवास ! ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी विठ्ठलपंतांनी संन्यास स्वीकारल्यानंतर गुरुआज्ञेवरून गृहस्थाश्रम स्वीकारला. पण समाजाने या निरागस, निष्पाप भावंडाना त्यांचा काही एक दोष नसताना वाळीत टाकलं. त्यांचा अपरिमित छळ केला. पण तरीही समाजाप्रती त्यांच्या मनात प्रेम आणि करुणाच होती. ज्ञानेश्वरांनी तर अखिल विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले. ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचं हे सहनशील असणं हे त्यांच्या ज्ञानाइतकंच तेजस्वी होतं. 

मर्यादा पुरषोत्तम श्रीराम तर सहनशीलतेचा आदर्श ! ते केवळ वीरपुरुष नव्हते तर शीलाचं साक्षात मूर्तिमंत रूप होते.  कैकेयीच्या वचनामुळे १४ वर्षांचा वनवास पत्करताना त्यांनी कोणताही रोष व्यक्त केला नाही. पित्याच्या वचनाचा सन्मान करत ते हसतमुखाने अरण्यात गेले. सीतेवर समाजाने शंका घेतल्यावर, राजधर्म जपण्यासाठी त्यांनी वैयक्तिक दुःख गिळून सीतेला वनवासात पाठवलं. हा त्याग त्यांच्या शीलतेचा परमोच्च बिंदू ठरतो.

विभीषण रावणाचा भाऊ असूनही जेव्हा शरण येतो, तेव्हा राम म्हणतात – "शरणागताचा मी त्याग करणार नाही." ही त्यांच्या सहनशीलतेतील करुणा आणि नीतिनिष्ठा दर्शवणारी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन हे तर शीलाचं आदर्श उदाहरण. त्याग, संयम आणि सहनशीलता यांचं दर्शन त्यांनी आपल्या जीवनात घडवलं. अहिल्याबाई होळकर यांचं जीवनही यापेक्षा वेगळं नाही. 

ही तर भूतकाळातील उदाहरणं झाली पण अलीकडच्या काळात अनेक समाजसुधारकांना, देशभक्तांना प्रचंड छळाला सामोरे जावं लागलं आहे. स्वातंत्र्यासाठी म. गांधींनी प्रत्यक्ष न लढता इंग्रजांच्या धोरणांना विरोध करून त्यांचा छळ सहन केला. सत्याग्रहाचे त्यांचे अस्त्र म्हणजे सर्वोच्च सहनशीलतेचे उदाहरण. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरु, वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे महान देशभक्त इंग्रजांच्या छळाला धैर्याने सामोरे गेले. साने गुरुजींनी समाजाचा छळ, उपेक्षा, अपमान  सहन केला पण ' श्यामची आई ' सारखा करुणेची वर्षा करणारा अमृतग्रंथ जगाला दिला. म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांना तर समाजाच्या केवढ्या रोषाला सामोरे जावे लागले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाट्याला सुद्धा प्रचंड उपेक्षा आणि अपमान आला. पण ते विष त्यांनी धैर्याने पचवले. महर्षी कर्वे यांच्यासारख्या विधवांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारकाला समाजाने केवढा त्रास दिला. पण त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. अशी खूप उदाहरणे आहेत. लोकनिंदेचे, टीकेचे जहर या सगळ्यांनी पचवले पण समाजाला अमृतच दिले. म्हणूनच ही माणसे आभाळाएवढी उंच झाली, महान झाली. 

सर्वे गुणा: कांचनमाश्रयंते. ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडेच सगळे गुण आहेत असे आज मानले जाते. पैसा हेच शील झाले आहे. असे असले तरीही शील – आजच्याही काळासाठी अपरिहार्य आहे. आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि असहिष्णू वातावरणात आपल्याला श्रीरामांची मर्यादा, गांधीजींचा संयम, अहिल्याबाईंचा धीर, ज्ञानेश्वरांची विनयशीलता आणि तुकारामांची श्रद्धा पुन्हा शिकण्याची गरज आहे. शील हे बाह्य वर्तन नाही – ते अंत:करणातील प्रकाश , तेज आहे. शीलं परमं भूषणम् – म्हणजे जिथे व्यक्तिमत्त्व सौंदर्याचं मोजमाप फक्त ज्ञान, संपत्ती, किंवा सामर्थ्याने नव्हे तर त्याच्या संयम, सहनशीलता आणि शुद्ध आचरणाने केलं जातं.

शेवटी एक छोटी प्रार्थना:

 " हे जीवन! दे संयम असा,

संकटांतही न डगमगता

शील राखू, सहन करू,

तूच आहेस अंतिम दिशा  !"

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
१७/६/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
















































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...