उगवतीचे रंग
' माणूस ' भेटतो तेव्हा..
परवाच्या दिवशी मला स्वप्नात एक माणूस भेटला. काय ? विश्वास नाही बसत ? अहो, खरंच सांगतोय ! मी त्याला म्हटलं सुद्धा की तू कोण आहेस ? म्हणाला, " नाही ओळखलंस ना मला ? अरे, मी माणूस आहे माणूस ! " मी जरा हसलोच. म्हटलं जरा वेडाच दिसतो. मग त्याला म्हटलं, " अच्छा, तू माणूस आहेस होय ? मला वाटलं की अजून कोणी वेगळा प्राणी ! "तो जरा हसला आणि म्हणाला, " माणूसच आहे मी. चक्क माणूस. नीट बघ माझ्याकडे. "
मी हसलो. म्हणालो, " त्यात काय बघायचं ? अरे, भल्या माणसा, चार माणसांसारखाच माणूस तू ! वेगळं काय आहे तुझ्यात ? दोन हात, दोन पाय, डोकं, डोळे .. सगळं सगळं तर माणसासारखंच तर आहे. आणि मी पण तुझ्यासारखा माणूसच आहे ना ! " तो पुन्हा हसला. म्हणाला, " तू आणि माणूस ? तोंड बघा नुसतं ! "
आता माझी तर पूर्ण खात्रीच झाली की याचं जरा फिरलेलंच दिसतं. पण आता काही इलाज नाही. गाठ पडलीच आहे तर बोलावंच लागणार. मी म्हटलं, " अरे असं काय बोलतोस ? काय कमी आहे माझ्यात ? मी पण तुझ्यासारखा माणूसच आहे. हां, आता तुझ्या चेहऱ्यावरील तेज जरा जास्त आहे एवढंच. " तो पुन्हा हसून म्हणाला, " अरे, नुसते दोन हात पाय, डोकं वगैरे असलं तरी माणूस होत नाही. तो प्राणी फक्त दिसतो माणसासारखा. पण तुला सांगू का ? तसा दिसणारा हा माणूस धड माणूसही नाही आणि धड प्राणीही ! "
मला कळेना की याला नेमकं काय म्हणायचं आहे ! त्याला म्हटलं, " हे बघ गड्या, असं भलतंसलत काही बोलू नकोस. तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही. अरे दोस्ता, माणूस म्हणजे बुद्धिमान, प्रगत प्राणी. बघ आम्ही केवढी प्रगती केली ! खूप नवनवीन शोध लावले. चंद्रावर, मंगळावर जाऊन पोहोचलो. आता आमची बहुतेक सगळी कामे यंत्राने होतात. यंत्रमानव आमच्या दिमतीला आहे. माणूस असून असून असा वेगळा काय असणार आहे ?"
त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होते. मला म्हणाला, " हे सगळं असलं म्हणजे काही माणूस होत नाही. "
आता मात्र माझा संयम सुटू लागला होता. मी त्याला म्हटलं, " हे पहा, मानव घर बांधून त्यात राहतो. हे माझं घर बघ. किती सुंदर आहे ! सगळ्या अत्याधुनिक सुखसोयी त्यात आहेत ! घरातील सुंदर फर्निचर आताच बनवून घेतलं. छानपैकी भारीतला रंग दिलाय. माझ्याकडे एक फोर व्हीलर, दोन टू व्हीलर आहेत. घरात बायको आहे, मुलं आहेत. छानपैकी पुस्तकं आहेत. आम्ही विद्यापीठातून चांगली पदवी प्राप्त केली आहे. ' माणूस ' म्हणवून घेण्यासाठी अजून काय हवं ?"
तो पुन्हा हसला. त्याच्या हसण्याने माझ्या काळजात कुठे तरी जखम झाल्यासारखी वाटली. शिकलेल्यानीच तर केली सारी गडबड. मूल्ये शाळेत, विद्यापीठात कुठे शिकवली जातात ? सगळे घोटाळे, भ्रष्टाचार शिकलेल्यांनीच तर केलेत ना ! पर्यावरणाचा नाश करणारा शिकलेलाच, इतरांच्या वाट्याचं आपण गिळंकृत करणारे शिकलेलेच, आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे शिकलेलेच, ढोंगीपणा, दांभिकता सगळं सगळं कोण करतं ? शिकलेल्यांचे अजून किती पराक्रम सांगू ?"
आता माझ्यापाशी उत्तर नव्हतं. शांत बसण्याशिवाय आता पर्याय नव्हता. तो पुढे म्हणाला, " मित्रा, एवढं शिकला आहेस असं म्हणतो तर खान्देशमधील कवयित्री बहिणाबाईंचं नाव ऐकलं असशील ना ?"
मी म्हणालो, " हो माहिती आहे, बहिणाबाईच काय पण सगळे मोठमोठे कवी, लेखक मला माहिती आहेत. कुसुमाग्रज, बोरकर, तांबे, पाडगावकर, शांता शेळके, अत्रे, पु ल देशपांडे.. किती नावं सांगू ? "
तो म्हणाला, " राहू दे ही यादी. अरे त्या बहिणाबाई एक दिवसही शाळेत गेल्या नाहीत. पण त्या काय म्हणाल्या माहिती आहे ?"
" काय म्हणाल्या बाबा त्या ?"
" अरे त्या म्हणाल्या, ' माणसा माणसा कधी होशील माणूस ?' तुम्ही ' माणूस ' असता तर त्यांना कशाला असं म्हणावं लागलं असतं ? " त्या कधीही शाळेत गेल्या नव्हत्या म्हणून त्यांना हे कळलं बरं का !
मी म्हटलं, " अरे, ती कविता आहे. सगळी माणसं कुठं वाईट असतात ? आम्ही माणसंच आहोत. आम्ही काय वाईट केलंय ? "
तो पुन्हा थोडंसं कुत्सित हसला. म्हणाला, " काय वाईट केलंय ? काय चांगलं केलंय हे विचार ? त्या बहिणाबाई एकदा छापखान्यात गेल्या होत्या. त्यांनी पाहिलं की तिथे कोरा कागद मशीनमध्ये टाकला की त्याच्यावर काहीतरी छापून येत होतं. त्या मशीनमधील उलट अक्षरांची आणि त्याची भेट अक्षरशः काही क्षणांचीच ना ! तरी पण तेवढया अक्षरांच्या संगतीनं तो कागद शहाणा झाला असं त्या म्हणतात.
माणसापरी माणूस
राहतो रे येडजाना
अरे होतो छापीसनी
कोरा कागद शहाणा.
पुढे त्या म्हणतात
जेवा इमान सचोटी
पापामधी रे बुडले
तेव्हा याच माणसानं
किल्ली कुलूप घडले.
ही तुमची प्रगती ? बहिणाबाई शाळेत न जाता एवढं सांगू शकल्या.आणि तुम्ही एवढं शिकून.."
सुरुवातीला स्वतःला शहाणा समजणारा मी आता वरमलो होतो. माझा स्वर खाली आला होता. मी थक्क झालो. माझ्या ‘माणूस’ असण्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.
तेव्हा ' तो ' शांतपणे म्हणाला,"माणूस असण्याची लक्षणं फक्त बाह्य नसतात.
माणूस म्हणजे–
• कृतज्ञता
तुम्हाला हा निसर्ग, ही धरती, धान्य पिकवणारे, उन्हातानात कष्ट करणारे शेतकरी भरभरून देत असतात. देशाचे रक्षण करणारे सैनिक सीमेवर प्राणपणने लढत असतात. तुम्ही करता कधी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त ? शिकवता कधी तुमच्या मुलांना अशी कृतज्ञता व्यक्त करायला ? पैसे फेकले की एखादी वस्तू विकत मिळते एवढेच त्यांना माहिती आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतीचे पावसाने अपार नुकसान झालेले असते. कधी मुलांना घेऊन अशी शेतं दाखवायला गेलात ?
• संयम
संयमानं व्यक्त व्हायला शिकता आणि शिकवता का कधी आपल्या मुलांना ? एखादी वस्तू नाही मिळाली किंवा ती उशिराने मिळणार असेल तरी संयम राखला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा आनंद सुद्धा संयमाने घ्यायला शिकलं पाहिजे हे संस्कार आपल्या मुलांवर कधी करणार ?
• दुसऱ्यासाठी थांबणं
जेवण्यापूर्वी, चांगल्या गोष्टी करण्यापूर्वी कधी थांबावसं वाटलं इतरांसाठी ? सगळ्यांना मिळाल्यावर मी घेईन ही भावना होते का मनात निर्माण ?
• दुसऱ्यासाठी मदतीचा हात पुढे करणं
तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला नशिबाने सगळं मिळालं आहे परंतु असे काही दुर्दैवी जीव आहेत की ज्यांच्या नशिबात बऱ्याच गोष्टी नसतात. मला जे मिळालं आहे त्यात त्यांचाही वाटा आहे असं वाटतं का कधी ? त्यांना देण्यासाठी आपला हात पुढे करावा असं वाटतं का ?
• मनमोकळं हसणं
हसणं हे माणूस असण्याचं एक विशेष लक्षण आहे. मनमोकळं हसलात कधी ? तुमचं हसणं सुद्धा कृत्रिम आणि मोजून मापून !
• आपल्या स्वार्थाच्या पलिकडे पाहणं
आपला स्वार्थ तर प्राण्यांना सुद्धा कळतो. पण तुम्ही त्यापलिकडे जाऊन सर्वांच्या कल्याणाचा विचार कधी करता का ? उपनिषदातील सर्वेपि सुखिन: संतू हा मंत्र नुसताच म्हणायचा नाही तर आचरणात आणायचा आहे.
• चुका स्वीकारणं आणि माफी मागणं.
आपल्या चुकांचा मनमोकळेपणे स्वीकार करणे आणि त्याबद्दल क्षमा याचना करणे. त्यासाठी धैर्य लागतं. हे करता कधी ?
• समाजातील प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणीमात्रात एकच परमेश्वर भरून राहिला आहे याचा प्रत्यय घेणं आणि त्याप्रमाणे वागणं.
• ज्येष्ठांचा आदर - सन्मान करणं
यातील किती गोष्टी तुम्ही करता रे ? कशासाठी ' माणूस ' म्हणायचं तुम्हाला ?
मी काहीच बोललो नाही.
' तो ' निघून गेला.
पण त्याच्या शेवटच्या शब्दांनी माझं जग ढवळून काढलं होतं. मला अंतर्मुख केलं होतं.
‘माणसा माणसा, कधी होशील माणूस?’
मी उत्तर शोधतो आहे...
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
५/६/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा