उगवतीचे रंग
' मानवी ' मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम
श्रीराम हा माझ्या आवडीचा आणि श्रद्धेचा विषय. टीव्ही वर जेव्हा जेव्हा ' रामायण ' किंवा ' श्रीमद रामायण ' यासारखे धारावाहिक बघायला मिळाले तर मी ते आधी पाहिले असले तरी पुन्हा पुन्हा पाहतो. कारण रामकथेची गोडी अवीट आहे. ' समस्तांमधे कथा गोड या राघवाची ' असे समर्थ रामदास म्हणतात ते उगीच नाही. परवाही असाच रामायण धारावाहिकाचा एक भाग पाहत होतो. त्यात शबरीची भेट, रामाशी हनुमानाची होणारी प्रथम भेट, सुग्रीवाशी होणारी भेट हे सगळे प्रसंग पाहिले. श्रीराम आणि हनुमान यांची भेट तर अत्यंत हृद्य अशी आहे. याप्रसंगी प्रेमभावनेने डोळे नकळत ओलावतात. रामाचे हनुमानाशी बोलणे, सुग्रीवाशी बोलणे मोठे मधुर आहे. कसं बोलावं, बोलताना इतरांचा मान कसा राखावा याचं ते उत्तम उदारहरण आहे.
खरं तर राम अयोध्येचा राजपुत्र. दशरथासारख्या महान सम्राटाचा ज्येष्ठ पुत्र. पण त्याच्या वागण्याबोलण्यात हा अहंकार कुठेच दिसत नाही. वनात राहणाऱ्या आदिवासी शबरीशी सुद्धा तो किती आदराने आणि प्रेमाने बोलतो ! तिला माता म्हणून हाक मारतो. सगळंच अनुकरणीय. हे सगळं पाहताना माझ्या मनात सहजच असा प्रश्न आला की राम हा तर विष्णूचा अवतार. श्रीविष्णूचा मानवी अंश. म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरच श्रीरामांच्या रूपात धरतीवर अवतीर्ण झाला होता. मग अशा या परमेश्वरस्वरूप असलेल्या व्यक्तीला आपल्या जीवनात घडणाऱ्या पुढील घटनांचे ज्ञान असेल का ?
या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यासाठी मी कोणी अधिकारी व्यक्ती अजिबात नाही, विद्वान, पंडित नाही. श्रीरामांच्या चरित्राचा अभ्यास करणारा एक सामान्यातील सामान्य अभ्यासक. पण विचार करताना माझ्या तर्कबुद्धीने जे उत्तर मला दिलं ते ' नाही ' असं आहे. म्हणजेच आपल्या जीवनात घडणाऱ्या भावी घटनांचे ज्ञान श्रीरामांना असणे शक्य नाही. कारण त्यांनी ' मानव ' म्हणून अवतार घेतला आहे. जेव्हा एखादी परमेश्वरी शक्ती मानवी रूपात अवतीर्ण होते, तेव्हा मानवी जीवनाच्या सर्व मर्यादा तिलाही लागू होतात. नियतीने आखून दिलेला जीवनमार्ग त्यांना पूर्ण करावा लागतो. त्यात येणारी संकटे, सुखदुःख या साऱ्या गोष्टीतून धैर्याने वाट काढावी लागते. असे करताना ते संकटांनी खचून जात नाहीत. आघातांनी कोलमडून पडत नाहीत. म्हणूनच ते कसं जगावं याचा आदर्श घालून देत असतात.
श्रीराम विष्णूंचा अंश आहे, परमेश्वरी अवतार आहे म्हणून जर त्यांना आपल्या आयुष्यात घडणाऱ्या पुढील घटनांचे ज्ञान आहे असे क्षणभर गृहीत धरले तर... ? कदाचित रामायणात जे घडले आहे ते घडलेच नसते ! आजच्या भाषेत सांगायचे तर एवढे ' रामायण ' कशाला घडले असते ? आणि श्रीरामांना भविष्यकालीन घटनांचे ज्ञान आहे असे क्षणभर गृहीत धरले तर न्यायाने लक्ष्मण आणि सीतेलाही ते असायला हवे कारण ते सुद्धा दैवी अवतार अवतार आहेत, दैवी शक्तीचा अंश आहेत आणि मानवी रूपाने या धरेवर अवतीर्ण झाले आहेत. पण अशी शक्यता गृहीत धरली तर...? पुढील प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. किंवा पुढील घटना घडल्याच नसत्या.
रावणाचा मामा मारीच हा सुवर्णमृगाचं रूप घेऊन आला आहे, त्याच्यामागे जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही. गेलो तर आपल्या माघारी रावण साधुवेशाने येऊन आपल्या प्रिय पत्नीला पळवून नेईल या सर्व गोष्टी ज्ञात असत्या तर असा कोणता पती आहे की जो आपल्या पत्नीला संकटात टाकून निघून जाईल ? ज्याचे सीतेवर अपरंपार प्रेम होते आणि सीतेशिवाय दुसऱ्या कोणत्या स्त्रीची कल्पनाही ज्याने कधी मनात आणली नाही असा श्रीरामांसारखा आदर्श पती स्वप्नातही असे करणे शक्य नाही. पण श्रीराम आता मानवी अवतारात होते. मानवी देहाच्या सर्व मर्यादा आणि वैशिष्ट्ये त्यांना पूर्णपणे लागू होतात. म्हणूनच भविष्यात होणाऱ्या घटनांची पूर्वसूचना किंवा ज्ञान त्यांना नाही, असण्याची शक्यता वाटत नाही. नाहीतर मग मानवी रूपात अवतार घेण्याचा उपयोग झाला नसता.
लक्ष्मणालाही भविष्यातील घटनांचे ज्ञान असते तर सीतेला कुटीत एकटे सोडून तो कदापिही गेला नसता. त्याला मग लक्ष्मणरेषा आखण्याची गरजच पडली नसती. तो स्वतःच तिचे संरक्षण करण्यास समर्थ होता. सीतेलाही पुढील घटनांचे ज्ञान असते तर.. ? रावण आपल्याला बळजबरीने पळवून नेईल हे तिला कळले असते तर ? तिने आश्रमाबाहेर पाऊलही ठेवले नसते. किंबहुना राम आणि लक्ष्मणाला बाहेर जाऊ दिलेच नसते. रावणाची सगळीच योजना अयशस्वी ठरली असती. पण या गोष्टी घडायच्याच होत्या. राम, लक्ष्मण, सीता ही सगळी मंडळी मानवी देहात होती. त्यांना या सगळ्या प्रसंगांना सामान्य माणसांसारखे तोंड देणे ही नियती होती. पण अशा प्रसंगात ते ज्याप्रकारे वागले, त्यातून त्यांनी आदर्श घालून दिला.
राम आणि कृष्ण दोघेही श्रीविष्णूचेच अवतार. पण त्या दोघांनाही मानवी शरीरात असताना मानवाच्या मर्यादांचे पालन करावे लागले. त्याचमुळे चमत्कारांना त्यांच्या चरित्रात स्थान नाही. पण मानवी मर्यादेत राहून पुरुषोत्तम होता येते, आपला प्रवास मानवाकडून देवत्वाकडे होऊ शकतो हेच त्यांनी आपल्या वागणुकीतून सिद्ध केले. हाच त्यांचा सर्वात मोठा चमत्कार आहे ! त्यांच्या रूपाने ' देव झाला माणूस आणि माणूस घडला देवासारखा ' असेच म्हणावे लागेल. दिव्यत्वाचा प्रकाश त्यांच्या ठायी विद्यमान होता. सामान्य माणसांपेक्षा वेगळ्या अशा क्षमता त्यांच्या ठायी होत्या पण त्यांनी त्याचे प्रदर्शन केले नाही. आपल्या क्षमतांचा मर्यादित आणि आवश्यक तेवढाच वापर केला हेच त्यांचं मोठेपण ! त्यांनी जो मर्यादांचा आदर्श घालून दिला तो कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी. श्रीरामांच्या हातात धनुष्यबाण आणि श्रीकृष्णांच्या हातात सुदर्शन प्रसंगानुरूप दिसले असले तरी या दोघांच्याही हृदयात आपल्या कुटुंबाबद्दल, समाजाबद्दल, देशाबद्दल अपरंपार प्रेम होते. सर्वांचे कल्याण व्हावे हा त्यांचा उदात्त हेतू होता. ' लंका सोन्याची असली तरी मला नको. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी ' असे म्हणणारे श्रीराम म्हणूनच आपला आदर्श आहेत. अनेक राज्यांचा स्वामी होण्याची सहज क्षमता बाळगून असलेला श्रीकृष्ण कोणतेही राज्य स्वतःकडे ठेवून घेत नाही. रामप्रमाणेच योग्य त्या व्यक्तींना गादीवर बसवतो. म्हणून तोही आपला आदर्श आहे.
आपण देवांची पूजा करतो. पण राम आणि कृष्ण हे फक्त देव नाहीत, ते मार्ग आहेत. त्यांनी दाखवलेला जीवनमार्ग हा नुसता आदर्शांचा संग्रह नाही, तर संघर्षात, द्वंद्वात, वेदनेत घडलेलं एक मानवी साधनेचं उदाहरण आहे. म्हणूनच ते केवळ पूजेचा विषय नसून अनुकरणाचे आदर्श आहेत. आजच्या भाषेत सांगायचे तर आपले ' रोल मॉडेल ' आहेत. पण आपण त्यादृष्टीने त्यांच्याकडे बघतो का हा खरा प्रश्न आहे.
श्रीरामांकडे आपण जेव्हा मनुष्य म्हणून पाहतो तेव्हा त्यांचं जीवन पाहताना असं वाटतं – हाही आपल्यासारखा माणूसच आहे, पण थोडा अधिक सहनशील, थोडा अधिक संयमी, थोडा अधिक सात्त्विक. त्यांनाही राग येतो, दुःख जाणवतं, अपमान बोचतो, प्रेमामधला विरह त्यांना सैरभैर करतो – पण तरीही ते मोडत नाहीत. ते भांबावत नाहीत. त्या परिस्थितीला धैर्याने आणि संयमाने तोंड देतात.
आपल्याला वनवासात जावे लागणार आहे हे कळल्यावर क्षणभर त्यांच्या चेहरा विषादयुक्त होतो. पण ते रागाने आरडाओरड वा आक्रस्ताळेपणा करीत नाहीत. त्या विपरीत परिस्थितीही मनावर नियंत्रण मिळवतात.
त्यांनी महापराक्रमी, बलाढ्य अशा रावणावर विजय मिळवला यापेक्षाही आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी आपल्या भावनांवर विजय मिळवणे – हीच खरी रामायणातील शौर्यकथा आहे असे यानिमित्ताने म्हणावेसे वाटते. म्हणूनच मानवी देहातील तेज म्हणजे श्रीराम !श्रीरामांनी कुठेही स्वैराचार वा अविचार केला नाही. मर्यादांचा खरा अर्थ श्रीरामांनी आपल्याला शिकवला आहे. मर्यादा पाळणे म्हणजे दुबळेपणा नव्हे. आजच्या काळात, जिथे संयम हा कमकुवतपणा समजला जातो आणि आत्मसंयम हा अडसर मानला जातो, तिथे श्रीरामांनी घालून दिलेला मर्यादा पुरुषोत्तमाच्या आदर्शाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. श्रीरामांनी रावणाचा पराभव केला, युद्ध जिंकले म्हणून केवळ ते मोठे ठरत नाहीत तर त्यांचा स्वतःवरील विजय, आत्मसंयम किंवा आत्मनियंत्रणांमुळे ते महान ठरतात असे मला वाटते.
ते एक आदर्श मित्र झाले. जातीपातीच्या मर्यादा ओलांडून त्यांनी सर्वांना आपले मित्र म्हणून हृदयाशी धरले. त्यांना कधीच अंतर दिले नाही. त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टीचे ते उदाहरण आहे. आदर्श पुत्र, आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श राजा म्हणून घालून दिलेल्या त्यांच्या उदाहरणाचा आणि आदर्शांचा सर्वकाळी एक अनुकरणीय उदाहरण म्हणून विचार करावा असेच ते आहे. ते एक आदर्श शत्रू देखील ठरतात. मरणानंतर वैर संपते म्हणून रावणाचा विधिपूर्वक अंत्यसंस्कार करण्यास त्यांनी बिभीषणाला सांगितले. रावणाच्या मृत्यूपूर्वी लक्ष्मणाला त्याचा उपदेश घेण्यासाठी पाठवले.
श्रीरामांना देव म्हणून मानणं सहज आहे. पण त्यांच्यासारखं माणूस होणं – ही खरी साधना आहे.
कारण ते आदर्श आहेत – जे उंच आकाशात नाहीत, तर आपल्या प्रत्येक कृतीत उतरवता येतील असे.
त्यांचं जीवन सांगतं – की संकटं तर येतीलच, पण संयम हरवू नका. कोणत्याही परिस्थितीत आपलं कर्तव्य, आपला धर्म सोडू नका.
ते सांगतात – की भावना असाव्यात, पण त्यावर विवेकाचं वर्चस्व असावं. आयुष्यात अनेक मोहाचे, लोभाचे क्षण येतील, पण तुम्ही विचलित होऊ नका. आपला ध्येयतारा सदैव डोळ्यासमोर असेल तर माणूस विचलित होत नाही. तो कर्तव्यपथावर वाटचाल करीत राहतो.
विमोह त्यागून कर्मफलाचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था .
हीच शिकवण आपल्याला राम आणि कृष्णाचं जीवन देतं.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
६/५/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा