उगवतीचे रंग
सुखी जीवनासाठी नवी एबीसीडीई..
शाळेत असताना आपला आणि इंग्रजी मुळाक्षरांचा परिचय होतो. आपण शिकतो – A for Apple, B for Ball... पण मोठं झाल्यावर आयुष्य आपल्याला नवे धडे शिकवतं – आरोग्य टिकवण्यासाठी आणि मनःशांती राखण्यासाठी ‘नवी एबीसीडीई’ शिकणं आवश्यक होतं. आजच्या धकाधकीच्या काळात हीच एबीसीडीई नव्या अर्थानं समजून घेऊ या. ही एबीसीडीई मी सांगत नसून प्रसिद्ध डॉ. ह वि सरदेसाई यांनी ती त्यांच्या एका लेखातून एकदा सांगितली होती. त्यातच माझ्या परीने थोडीशी भर घालून आपल्यासमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.
A – Anxiety टाळा
"चिंता आणि चिता यात फक्त एका अनुस्वाराचा फरक असतो – अति चिंता चितेकडे घेऊन जाते." हे वाक्य फक्त केवळ लिहिण्यासाठी किंवा बोलण्यासाठी सुंदर आहे म्हणून नाही, तर ते जीवनातील वास्तवाचे निदर्शक आहे. सततची चिंता माणसाला पोखरत जाते. आपल्या लक्षात येत नाही पण ती हळूहळू व्यक्तीचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य झिजवत नेते. जीवनातील उत्तम कामगिरीसाठी थोडी चिंता, थोडा ताण आवश्यकच असतो. एखादी परीक्षा, कामाची डेडलाइन, नात्यातील ताण – या गोष्टींनी थोडा काळ बेचैनी येणं स्वाभाविक आहे. पण त्याचं ओझं हृदयावर सतत बाळगणं, यामुळे रक्तदाब, झोपेच्या तक्रारी, चिडचिड, थकवा सुरू होतो.
एक उदाहरण म्हणून आपण एका तरुण आयटी प्रोफेशनलची कल्पना करू या. तो उत्तम कमावतो, पण ‘परफॉर्मन्स रेटिंग’च्या ताणात, प्रमोशनच्या धास्तीने रात्री झोप येत नाही. मग तब्येतीच्या तक्रारी वर डोकं काढायला सुरुवात करतात. हळूहळू अॅसिडिटी, डोकेदुखी, कोलेस्टेरॉल वाढू लागतं... चिंता हे एक दिसणारं नाही, पण झिरपत जाणारं विष आहे. म्हणूनच – मन मोकळं ठेवा, दिवसातून काही वेळ स्वतःसाठी ठेवा, आणि ‘काय शक्य आहे’ यावर लक्ष केंद्रित करा.
B – Bottle पासून दूर रहा
आजकाल दारूला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. पूर्वी एकत्र येण्यासाठी चहा किंवा जेवण या गोष्टी पुरेशा होत्या. पण आज मात्र उच्चभ्रू समाजात, कार्पोरेट जगतात मदिरापान हा पार्टीचा अविभाज्य भाग झाला आहे. दारूचे ग्लास अनेकदा संवाद कमी करतात, आणि भिंती उंचावतात. ‘फक्त स्ट्रेस मिटवायला’ म्हणून सुरू झालेली सवय अनेकदा व्यसनात बदलते. कुटुंबातील संवाद तुटतात, अपघात होतात, आरोग्य हळूहळू ढासळतं. सुरुवातीला हौस किंवा चेंज म्हणून घेतलेला ' एकच प्याला ' आयुष्याची बरबादी करायला पुरेसा ठरतो.
C – Cigarette नाहीच
"सिगारेट ओढणं म्हणजे हळूहळू आत्महत्येची तयारी करणं."
सिगारेट सुरू करणाऱ्यांना अनेक कारणं असतात – दोस्तांचा दबाव, ट्राय करायचं म्हणून, किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी. पण यातून निर्माण होणारं व्यसन हे शरीराच्या प्रत्येक पेशीवर आघात करतं. फुफ्फुसं, हृदय, घशा, तोंड – प्रत्येक ठिकाणी त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात.आज अनेक युवक ट्रेंडी वाटण्यासाठी किंवा "cool" दिसण्यासाठी सिगारेटकडे वळतात. मुले आणि माणसांबरोबरच मुली आणि स्त्रिया देखील धूम्रपान करताना आढळून येतात. सिगारेट ओढणाऱ्याला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच पण त्याच्या आजूबाजूला लोकांना देखील त्याचा त्रास होतो. ते पॅसिव्ह स्मोकर बनतात. सिगारेट म्हणजे कर्करोगासारख्या भयानक रोगांना आमंत्रणच !
D – Diet म्हणजे आपलं खाणं सांभाळा
आजच्या ‘फास्ट फूड’च्या युगात आरोग्य ‘स्लो डाऊन’ होतंय. डाएट म्हणजे उपवास नव्हे, तर सजगता. पिझ्झा, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स रोजचं झालं, की पचनसंस्था, रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल यावर परिणाम होतो. ताटात रंगीत चिप्स असतात,दिसायला आकर्षक पण पोषणमूल्य हरवलेल्या. आपल्या रोजच्या जेवणात विविध रंगांच्या ताज्या भाज्या, फळं असावीत. ती आरोग्यदायी असतात. आपल्या पूर्वजांची ही साधी सोपी शिकवण आपण विसरलो आणि जंक फूड, फास्ट फूड आपल्याला आवडायला लागलं. ते एखादे वेळी चवबदल म्हणून ठीक आहे. पण त्याच्या अतिसेवनाने दुष्परिणाम आता शालेय विद्यार्थ्यांवरही जाणवू लागले आहे. त्यामुळे लहान वयातच लठ्ठपणा, मधुमेहासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तज्ज्ञांनी वारंवार इशारे देऊनही याकडे दुर्लक्ष केले जाते.
E – Exercise अनिवार्य
शरीर ही निसर्गानं किंवा विधात्यानं आपल्याला दिलेली एक अनमोल देणगी आहे.उत्तम आरोग्य कोणत्याही दवाखान्यात वा मेडिकल स्टोअर्सवर विकत मिळत नाही. शरीर हे एखाद्या यंत्रासारखं आहे. एखादं यंत्र वापरलं नाही तर गंजतं. आपल्या शरीराचंही तसंच आहे. रोजची ३० मिनिटांची चाल, साधी योगासने आणि प्राणायाम, एखादा आवडता खेळ – यामुळे फक्त वजनच नाही, तर मनही हलकं राहतं. एखादी गृहिणी जर सकाळी घरात कामं करतानाही लयीत आनंदाने काम करत असेल, तर तोही एक व्यायामच ! आजकाल टीव्हीसमोर तासनतास बसून राहणं, मोबाईलमध्ये वेळ घालवणं यासारख्या गोष्टींमुळे व्यायामाकडे दुर्लक्ष होते. चालण्यासाठी साधी नैसर्गिक गोष्ट देखील आपण विसरून गेलो आहोत. आपल्याला ती व्यायाम म्हणून सांगावी लागते. आजच्या ऑफिस कल्चरमध्ये आठ तास खुर्चीत बसणं सामान्य झालंय. मग पाठदुखी, मानदुखी, आणि डोळ्यांवर परिणाम – हे होणं साहजिकच. व्यायाम म्हणजे फक्त ‘सिक्स पॅक’साठी नाही, तो तुमच्या उत्तम आरोग्यासाठी, आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे. ' Healthy mind in healthy body. '
ही ‘नवी एबीसीडीई’ म्हणजे आरोग्याची मुळाक्षरे आहेत. अर्थात यात मी काही नवीन सांगितले आहे असे नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेतच पण तरीही काही चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. मित्रांनो, या छोट्याशा पद्धतीने आयुष्याकडे पाहिलं, तर आपल्याला आपलं आयुष्य आनंदाने जगता येईल.
याशिवाय आणखी दोन गोष्टी. एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडली तर निराश होऊ नका. ' सो व्हॉट ? ' असा प्रश्न स्वतःलाच विचारा. एखादी नको असलेली गोष्ट घडली म्हणून काय झालं ? ' होतंय असं, चालतंय ..' म्हणून नव्यानं सुरुवात करता येते. दुसरी गोष्ट म्हणजे सतत कार्यरत राहणे. जी माणसं सतत कार्यरत असतात, त्यांचं आरोग्य शेवटपर्यंत चांगलं राहतं. अशा अनेक कार्यरत राहणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला आपल्या अवतीभवती डोळे उघडून पाहिलं तर सहज नजरेस पडतील. तेव्हा आनंददायी आणि आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा !
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३१/५/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा