उगवतीचे रंग
जे सत्य सुंदर सर्वथा...
' प्रकाश बाबा आमटे 'या चित्रपटातील हे गाणं मला फार आवडतं. ही एक प्रकारची परमेश्वराला प्रार्थना आहे की जे सत्य आणि सुंदर आहे, त्याचा आजन्म ध्यास मला लागू दे. पण खरंच आम्ही असा सत्याचा ध्यास घेतो का ? आम्ही आम्हाला सोयीस्कर असेल तेवढेच सत्य स्वीकारतो आणि इतर सत्य आणि वास्तव गोष्टींकडे दुर्लक्ष किंवा डोळेझाक करतो. खरं वाटत नाही ना ? पण हे अगदी खरं आहे ! उदाहरण दिलं की आपल्या लक्षात येईल. बऱ्याच वेळा बघा आपण टीव्ही पाहत असतो आणि त्या वेळेला आपल्याला सुखद किंवा आपल्याला हव्या तशा बातम्या आपल्याला पाहायच्या असतात. हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करणाऱ्या स्त्रिया आपल्याला दिसतात. मग आपण चॅनल बदलतो. आपल्याकडे मात्र नळाचे पाणी वाया जात असते आंघोळीसाठी, गाडी धुण्यासाठी आपण मनसोक्त पाणी वापरत असतो. भांडी आणि कपडे धुण्यासाठी तर सतत नळ सोडलेला असतो. किती पाणी वाया जाते त्याचा हिशोब नसतो. पण जेव्हा हंडाभर पाण्यासाठी दूरवर राहणाऱ्या आमच्या भगिनी काट्याकुट्यात, चिखलात, उन्हात वणवण भटकतात तेव्हा आम्हाला ते बघवत नाही आणि आम्ही टीव्हीचे चॅनल बदलतो. जे सत्य आहे, ते स्वीकारण्याची आमची तयारी नसते.
प्रवास करत असताना कुठेतरी रस्त्यावर अपघातग्रस्त होऊन कोणीतरी पडलेला दिसतो. अशावेळी आम्ही मदतीसाठी पुढे न होता आमच्या कॅमेऱ्यातून व्हिडिओ शूट करण्यात मग्न होतो किंवा मग त्या माणसाकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे पसंत करतो. कशाला थांबायचे तिथे ? उद्या कळेलच ना वर्तमानपत्रातून की कोण आहे ती व्यक्ती ? दिवसेंदिवस आम्ही अधिकाधिक कोरडे, रूक्ष आणि भावनाशून्य होत चाललेलो आहोत.
जिथे आमच्या बोलण्याची, लिहिण्याची किंवा प्रतिक्रिया देण्याची अपेक्षा असते, तिथे आम्ही सोयीस्कर मूक राहणे पसंत करतो. कारण काय ? तर नको उगीचच कोणाच्या लक्षात आले, आपण कोणाच्या समोर आलो तर काय होईल ? आपल्याला लोक काय म्हणतील.. ही भीती ! मग कुणा विवाहितेवर अन्याय - अत्याचार झालेला असो की एखाद्या चिमुकलीवर ! आम्ही सोयीस्कररित्या ठरवतो की त्यात सहभागी व्हायचे की नाही ? दुर्घटनेत बळी पडलेल्या व्यक्तीची जात पाहून ठरवले जाते की मोर्चे काढायचे की नाही, एखादे आंदोलन करायचे की नाही वगैरे... आमचा सत्याचा हा स्वीकार असा सोयीस्कर असतो. समाजसुधारकांचे आणि संतांचे कार्य देखील जातीची फुटपट्टी लावून आम्ही मोजतो.
रात्री जेवण करीत असताना आम्ही आम्हाला आवडत असणारा सिनेमा किंवा धारावाहिक दाखवणारे चॅनल लावतो. त्यावेळी आम्हाला आनंदात जेवायचे असते. कुठलाही व्यत्यय त्यात नको असतो. उगीचच नको त्या बातम्या पाहून त्यात मिठाचा खडा कशाला ? इतरत्र अस्वस्थता असते, महागाईमुळे सर्वसामान्य होरपळत असतात, भुकेलेल्यांच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला असतो, अशावेळी आम्ही त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून देवादिकांच्या आरत्या ओवाळण्यात धन्यता मानतो. त्यामुळे आमच्या मनाला शांती मिळते. अशा वेळी स्वामी विवेकानंदांचे एक वाक्य मला आठवते. जेव्हा माझ्या देशातील एखादा कुत्रा सुद्धा उपाशी आहे, तोपर्यंत कोणाला धर्माचा उपदेश करण्याचा मला अधिकार नाही. पण असे सांगणारे स्वामी विवेकानंद आम्हाला नको असतात. म्हणून म्हटलं ना आम्हाला सोयीस्कर सत्य स्वीकारायचं असतं. असे सत्यवादी आहोत आम्ही !
राजकीय पक्षात असणाऱ्या नेत्यांना आपल्या पक्षातील चुकीची ध्येयधोरणे, आपल्या पक्षातील लोकांची चुकीची वक्तव्ये कधीही दिसत नाहीत. इतरांवर टीका करण्यात मात्र ते आघाडीवर असतात. इथेही आम्ही सत्याकडे डोळे झाक करतो आणि सोयीस्कर तेवढेच स्वीकारतो ! जनतेलाही सोयीस्कर सत्य स्वीकारायला भाग पाडतो. पाकिस्तानसारखी काही राष्ट्रं आपल्या नागरिकांना सत्यापासून मुद्दामच दूर ठेवतात. धर्मांधतेच्या आणि युद्धखोरीच्या धुंदीत लोकांना अडकवलं जातं. रोजच्या जीवनातील उपासमार, अनेक मूलभूत सुविधा नाहीत, प्यायला शुद्ध पाणी नाही, शिक्षण आणि आरोग्याची वानवा आहे — हे सारे वास्तव दडपून टाकलं जातं. युद्धाचे ढोल पिटले जातात, आणि हेच सत्य असल्याचा आभास निर्माण केला जातो. अशा वेळी सामान्य जनतेला खरे काय आणि खोटे काय याचा विचार करण्याची संधीच मिळत नाही. यालाच म्हणतात सोयीस्कर सत्याचा स्वीकार — जो यंत्रणांनी जनतेवर लादलेला असतो.
बाहेर पावसाचा टप टप आवाज सुरू असतो. अशावेळी कुठेतरी परिस्थितीने हताश झालेल्या कोणाच्यातरी आसवांचा देखील टप टप आवाज सुरू असतो. पण आपल्याला ऐकू येतो तो फक्त पावसाचा आवाज. दिसतो तो बाहेर पडणारा पाऊस ! नेत्रातून कोसळणारा पाऊस आपल्याला कधी दिसतच नाही किंवा आपल्याला तो बघायचाच नसतो. असे फार थोडे लोक असतात की ज्यांच्या घशाखाली घास उतरत नाही. ' सैनिकहो तुमच्यासाठी ' या गीतामध्ये आशा भोसले म्हणतात
भारतीय नागरिकांचा
घास रोज अडतो ओठी,
सैनिकहो तुमच्यासाठी.
ज्यांना इतरांचे दुःख दिसते, वेदना जाणवतात, त्यांच्या काळजात आईची माया असते. कोणाचातरी आवंढा त्यांच्या गळ्यात दाटून आलेला असतो. अशावेळी त्यांना अन्न गोड लागत नाही. असे लोक रस्त्यावर उतरतात, भुकेलेल्याला दोन घास देतात, तहानलेल्यांना पाणी देतात, थंडीने गारठणाऱ्या अशक्त शरीरावर मायेचे उबदार पांघरूण घालतात. असे हात परमेश्वराचेच हात असतात. बा भ बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे ' देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे...' असे ते हात असतात...! असे देखणे हात आम्हाला होता येईल का ?
कवी अरुण कमल यांची मूळ हिंदीत असलेली एक अनुवादित कविता या ठिकाणी द्यावीशी वाटते. खूपच हृदयस्पर्शी आहे.
लोककथा
एके काळची गोष्ट आहे
कुणा एका गावात शेतकऱ्याच्या घरी
दरोडा पडला रात्री तिसऱ्या प्रहरी .
आणि त्याचा थोरला मुलगा...
दोन महिन्यांपूर्वीच त्याची पत्नी नांदायला आली होती
वळईच्या चौकटीत कोसळला निपचित
वाचवताना दागिने.
सकाळ झाली
झाली प्रेत उचलायची वेळ
तर शेतकरी पुढे झाला
त्याचा धाकटा मुलगा
आणि म्हातारा बाप.
तरीही एक खांदा कमीच पडत होता.
पण गावातला एकही माणूस आला नाही.
सगळ्यांना वाटलं दरोडेखोरांना बरं वाटणार नाही.
तेव्हा तिघांनी उचललं प्रेत आणि मुलाला बापाने अग्नी दिला.
गोष्ट गेली रानात
विचार करा मनात.
एक खांदा कमी पडतो आहे पण खांदा द्यायला जायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. आम्ही कोणाची मदत करतो आहोत ? त्या शेतकऱ्याची की दरोडेखोरांची ? सत्य आम्हाला समजलेलं नाही की आम्हाला समजूनच घ्यायचं नाही ?
म्हणून तर त्या दयाघनाला प्रार्थना करायची
तू बुद्धी दे, तू तेज दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे...
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२६/५/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा