उगवतीचे रंग
विज्ञानमहर्षीच्या पाऊलखुणा
काही माणसांची आयुष्यात प्रत्यक्ष भेट झालेली नसली किंवा त्यांच्याशी काही बोलणे झालेले नसले तरी त्यांच्याबद्दल कायम ओढ, प्रेम आणि आदर वाटत राहतो. अशा व्यक्तींमध्ये डॉ जयंत नारळीकर यांची गणना करता येईल. आयुष्यभर विज्ञानाचा प्रसार, विज्ञानाची सेवा आणि विज्ञानाचा सर्वसामान्यांसाठी वापर कसा करता येईल याचा अहोरात्र विचार करणारा हा नंदादीप नुकताच मालवला. ( २० मे २०२५ )
डॉ नारळीकर म्हटले की मला १९७९- ८० मधील पुणे विद्यापीठातील काळ आठवतो. तेव्हा मी पुणे विद्यापीठात एम ए इंग्रजीसाठी प्रवेश घेतला होता. पुणे विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या माझ्या मामांकडे मी तेव्हा राहत होतो. आम्ही दोघेही न चुकता सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जात असू. विद्यापीठाचे वातावरण मोठे रम्य होते. असेच सकाळी एकदा फिरायला निघालो असताना मामा मला म्हणाले, " दादा, ते बघ डॉ जयंत नारळीकर ! " मी चपापलो. डॉ जयंत नारळीकरांचे नाव मी बरीच वर्षे आधीपासून ऐकून होतो. एवढा मोठा शास्त्रज्ञ आपल्याला पायी फिरताना असा समोर दिसेल असे कधी वाटले नव्हते. आणि पाहिले तर पांढराशुभ्र शर्ट आणि पायजमा या विषयात ते फिरायला निघालेले होते. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांशी हसतमुखाने संवाद साधत होते. चाळीसगाव सारख्या ग्रामीण भागातून आल्यामुळे थोडेसे पद, पैसा, प्रतिष्ठा असणाऱ्या अनेकांना मी त्यांच्या ज्ञानाचे, श्रीमंतीचे, अहंकाराचे प्रदर्शन करताना पाहिले होते. डॉ जयंत नारळीकर यांना पाहिल्यानंतर खरी मोठी माणसे किती साधी आणि विनम्र असतात त्याचा प्रत्यय मला लगेच आला. थोड्याशा पाण्याने खळखळाट करणारी नदी आणि शांत, धीरगंभीर असणारा, आपली मर्यादा न सोडणारा अथांग सागर याचा प्रत्यय ही दोन उदाहरणे पाहून मला लक्षात आला.
त्यांच्या साधेपणाचा प्रत्यय देणारी आणखी एक घटना मी प्रत्यक्ष पाहिली. पुणे विद्यापीठातच एका कर्मचाऱ्याच्या मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ होता. त्याप्रसंगी ते आले होते. स्वरूची भोजनासाठी असलेल्या रांगेमध्ये ते स्वतः उभे होते. एवढा मोठा आंतरराष्ट्रीय किर्तीचा हा शास्त्रज्ञ सर्वसामान्यांप्रमाणेच रांगेत उभे राहून भोजन घेत होता हे पाहून मी अक्षरशः भारावून गेलो. माझ्यासमोरच एक दोन लोकांनी त्यांना आम्ही आपल्याला जेवणाचे ताट आणून देतो, सर आपण बसा अशी विनंती केली. परंतु त्यांनी रांगेत उभे राहणेच पसंत केले. माझ्या मनात खंत राहिली ती त्यांच्याशी बोलण्याची संधी न मिळाल्याची. माझ्यावरही त्यांच्याशी कसे बोलावे याचे नकळत दडपण होते.
कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ ला त्यांचा जन्म झाला. ज्ञानाचा वारसा त्यांना आई-वडिलांकडून लाभला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ आणि रँग्लर होते. ते बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. आई सुमती नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. याच विद्वत्तेचा वारसा डॉ नारळीकर यांनी पुढे चालवला आणि तेही रँग्लर झाले. आपल्या वडिलांपेक्षा मोठी कामगिरी त्यांनी करून दाखवली. या महाराष्ट्राच्या सुपुत्राला अनेक पदव्यांनी सन्मानित करण्यात आले. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार इ. त्यांच्या कामाची दखल घेत युनेस्कोने त्यांना जगातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांची व्याख्याने ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे. एकदा तर त्यांच्या दिल्लीतील एका व्याख्यानाला खुद्द इंदिरा गांधींना जागा न मिळाल्याने विंगेत बसावे लागले होते.
सुरुवातीला त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम केले. पुढे त्यांनी पुणे विद्यापीठात ' आयुका ' ची उभारणी केली. पुढे काही कारणाने मी जेव्हा जेव्हा पुणे विद्यापीठात जायचो, त्यावेळी आयुकाची इमारत पाहून भारावून जात होतो. ठरवले तर एखादी व्यक्ती आयुष्यात किती मोठे कार्य करू शकते त्याचे प्रतीक म्हणजे आयुका ! विज्ञानाविषयी कुतूहल असणाऱ्यांना, संशोधन करू इच्छिणाऱ्यांना या संस्थेची दारे नेहमीच खुली होती. ' आयुकाची ' जडणघडण म्हणजे भारतीय खगोलशास्त्रातील नव्या पर्वाच्या संशोधनाची सुरुवात होती.
काही व्यक्तिमत्त्वांना परमेश्वरच एकत्र आणतो. त्यांचे ऋणानुबंध निर्माण होतात आणि त्यातून पुढे समाजोपयोगी कार्य घडते असे आढळून येते. अशीच भेट या विज्ञानमहर्षीची पुलं देशपांडे नावाच्या साहित्य महर्षीशी झाली. जयंतराव - मंगलाताई आणि पुलं आणि सुनीताबाई यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. त्यांच्या विज्ञानप्रसाराच्या आणि आयुकाच्या कार्याने भारावून जाऊन पुलंनी मोठी देणगी त्यांच्या कार्यासाठी दिली. त्या देणगीतूनच तेथील ' पुलस्त्य ' ही इमारत उभे राहिली आहे. ' पुलस्त्य ' हा पुलं च्या नावाचा समावेश असलेला सप्तर्षी तारकासमूहातील तारा.
केंब्रिजमध्ये शिक्षणासाठी गेलेले जयंतराव आपल्या बुद्धिमत्तेच्या तेजाने ताऱ्यासारखे तळपत होते. तेथील अनेक सन्मानाची पदे त्यांना चालून आली. पैसा, प्रतिष्ठा आणि कीर्ती या तिन्ही गोष्टी हातात हात घालून चालत आल्या. परंतु हे सगळे नाकारून त्यांनी आपल्या मायदेशाची हाक ऐकली आणि भारतात कार्य करण्यासाठी ते परत आले. त्यांचा मूळ पिंड वैज्ञानिकाचा असला तरी ते साचेबद्ध वैज्ञानिक नव्हते. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्याप्रमाणेच मुलांमध्ये, समाजामध्ये मिसळणारा आणि त्यात आनंद मानणारा हा शास्त्रज्ञ होता. विज्ञानकथांची सुरुवात करणारा एक आदर्श लेखक होता. सोप्या भाषेत विज्ञान लेखन करून मुलांचे आकाशाशी त्यांनी नाते जडवले. अंधश्रद्धा आणि फलज्योतिषाला त्यांनी जो विरोध केला, तो वैज्ञानिक कसोट्यांवर आधारित होता.
त्यांच्याबद्दल अनेक लेख वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत आणि होतीलही. तरीही या लेखाचे प्रयोजन का असा प्रश्न वाचकांना पडू शकेल. आयुष्यभर त्यांनी विज्ञानाचा जो प्रसार केला आणि आपले आयुष्य त्यासाठी समर्पित केले आणि त्याच्या पाऊलखुणा त्यांनी ज्या मागे ठेवल्या त्याचे थोडेसे का होईना परंतु अनुसरण करता यावे आणि हा वारसा पुढे चालावा म्हणून हा प्रपंच ! त्यांनी आयुष्यभर दिलेल्या शिकवणुकीचा हा थोडक्यात गोषवारा...
* विज्ञान आणि गणित निदान पहिल्या काही इयत्तासाठी मातृभाषेतून शिकवायला पाहिजे.
* एखाद्या विषयात परीक्षेत केवळ गुण चांगले मिळाले आहेत म्हणून तो विषय समजला आहे असे होत नाही. परीक्षेतील गुणांपेक्षा तो विषय समजून घेण्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे.
* उत्कृष्टतेचा मार्ग खडतर असतो, पण तो सोडू नये.
* उत्कृष्टता राबवायला कणखरपणा लागतो. केंब्रिज विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी आपला ८०० वा वाढदिवस साजरा केला. या दीर्घ काळात हे विद्यापीठ अग्रस्थान का टिकवून आहे ? कारण या विद्यापीठात प्रवेशाचे निकष अवघड आहेत. अधिक गुणवत्ता असल्याशिवाय येथे प्रवेश मिळत नाही. लोकशाहीत सर्वांना सारखी संधी द्यावी पण विशेष गुणवत्ता असलेल्यांना अधिक शिकायची विशेष सोय उपलब्ध झाली पाहिजे हे केंब्रिजचे उदाहरण सांगून जाते.
* आजही आपल्याकडे उत्कृष्ट आणि विद्वान गुरु थोडे का होईना पण आहेत. उत्कृष्टतेची कदर करण्याइतकी जाण समाजात आहे ही जमेची गोष्ट. अशा विद्वानांपैकी एखादा गुरु म्हणून लाभणे हे विद्यार्थ्यांचे भाग्य म्हटले पाहिजे. आज अशा गुरुजनांची आठवण ठेवा कारण स्नातक पदवीच्या रूपाने गुणवत्ता मिळवतो त्यामागे गुरुजनांची पुण्याई असते.
* उत्कृष्टतच्या मार्गाने जाणाऱ्यांची समाजाने कदर करावी, त्यांना मागे खेचू नये.
* माणसाने कधीच कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नये.
* वेळ ही गोष्ट सर्वात मौल्यवान आहे. तिचा सदुपयोग करावा. ( ८०- ९० च्या दशकात विमानांना उशीर व्हायचा. जयंतराव प्रवासात असतील तर अशा वेळेचा सदुपयोग करीत. अशावेळी त्यांनी विमानतळावर बसून खगोलशास्त्रांच्या पुस्तकाचे लेखन केले आहे. )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२३/५/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा