उगवतीचे रंग
चोरी... एक प्रतिष्ठित व्यवसाय
सहज आपले ते नायगावकर आठवले. विनोदी कवितावाले. सध्या चोरीला फार प्रतिष्ठा झाली आहे. म्हणजे उघड उघड नाही पण ' चोरी चोरी. ' नायगावकरांनी यावर खास कविता केली असती आणि त्यांच्या खास शैलीत वाचूनही दाखवली असती. " चोरी म्हणजे काय सांगायचं ? लोक उगीचच नावं ठेवतात. पण जे बोलत नाहीत, करून दाखवतात ते सुखाने जगतात. किती उदाहरणं सांगायची ? " मग त्यांनी अनेक प्रतिष्ठितांचे दाखले उदाहरणासहित दिले असते. पण आपण अजूनही अडाणीच राहिलो. साहित्यिकांनी एवढे सांगूनही आपण काही लक्षात घ्यायलाच तयार नाही. आपले ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. त्यांनी तर ' चोरांचे संमेलन ' या नावाचा लेखच लिहिला होता. बरं एवढेच नव्हे तर आमच्याकडील शिक्षणतज्ज्ञांनी तो पाठ्यपुस्तकात अंतर्भूत करून केवढी दूरदृष्टी दाखवली होती ! पण छे ! लक्षात कोण घेतो !
एक वाक्य कुठेतरी वाचनात आलं होतं. ' ज्याचं मन स्वच्छ, त्याची चोरी पवित्र !' कोणाचं आहे माहिती नाही. लगेच याला चोरी म्हणू नका. आता नाही माहिती त्याला काय करणार ? हल्ली ना खरं सांगायची पण सोय राहिली नाही. तर असो. पण हे वाक्य वाचल्यावर आमचा ' कान्हा ' आठवला. गोकुळात दह्या दुधाची चोरी करणारा. पण ज्यांना दूध दही मिळत नव्हते, त्यांना ते हक्काने देणारा ! म्हणून तर त्याची चोरी पवित्र ठरली नसेल ना !
त्याच्यावर तर किती गाणी. 'दह्या दुधाची करतो चोरी, नंदाचा हरी...' गोकुळचा चोर श्रीहरी..' वगैरे वगैरे. जाणकारांना अधिक गाणी आठवतील. तेव्हा या सगळ्यात मोठ्या चोराचा आदर्श आमच्या हिंदी चित्रपटसृष्टीने ठेवला. नुसताच ठेवला नाही तर कलात्मकरीत्या त्यात विविध रंग भरून आमच्यासमोर ठेवला. आमच्या चित्रपटांची नावे तर पहा नमुन्यादाखल. चोरी चोरी, ज्वेल थीफ, अलीबाबा और चालीस चोर, चोर मचाये शोर, चोरोंकी बारात, चुपके चुपके, दो चोर, हेराफेरी, गोलमाल, चोरी मेरा काम, धूम वगैरे वगैरे.. या सगळ्या चित्रपटातील चोर आदर्श बरं का ! त्यांची चोरी पवित्रच ! उद्देश चांगला ना ! आता ' शोले ' चित्रपटाचंच उदाहरण घ्या ना. जय आणि वीरू. दोघंही अट्टल चोर. पण एका ' गब्बरला ' पकडल्यामुळे त्यांना केवढी प्रतिष्ठा प्राप्त झाली. आणि चित्रपटात पोलीस अधिकारी असलेल्या ' ठाकूरसाब ' ची दूरदृष्टी केवढी ! तो यांचा वापर करून घेतो. ' लोहे को लोहा काटता हैं ' हे त्याचं तत्वज्ञान प्रत्यक्षात केवढा व्यवहार्य !
हिंदी चित्रपटातला चोर तर अतिशय स्मार्ट, हुशार आणि सर्वगुणसंपन्न असतो. देखणा तर असतोच. त्याची चोरी ही त्याची खास स्टाईल बनते. तो अनेक वाद्ये लीलया वाजवू शकतो. गाता तर त्याला उत्तम येत असतेच. मारामारी करता येते. वाईट चोरांची गॅंग चित्रपटात असेल तर त्याचा समावेश सज्जन चोरामध्ये होतो. म्हणजे एका सामान्य चोरांकडून सज्जन चोराकडे, आदर्श चोराकडे होणारा हा त्याचा प्रवास ! खरोखरच केवढी ही प्रगती !
हिंदी चित्रपटात ' चोरी ' च्या गाण्यांना तर मुळीच तोटा नाही. चुरा लिया हैं तुमने जो दिलको, मैं एक चोर तू मेरी रानी, चोरी चोरी कोई आये, गोलमाल हैं भाई सब गोलमाल हैं , चुपके से दिल दे दे, चुरा के दिल मेरा... इ. इ. एवढे सगळे चोरीचे आदर्श हिंदी चित्रपटांनी आणि त्यांच्या गाण्यांनी आमच्यासमोर ठेवले. त्यातील गाण्यांची आणि संगीताची चोरी हा तर वेगळा भाग ! कुणी एखादं गाणं दाक्षिणात्य गाण्याची चाल चोरून बनवलं तर चक्क पाश्चात्य धून आणि चाली चोरल्या. पण त्याशिवाय गाणी आणि चित्रपट उत्कृष्ट बनतच नाहीत हे काय वेगळं सांगायला हवं का ? बऱ्याच चित्रपटांच्या कथा सुद्धा अशाच !
चित्रपटवाल्यानाच कशाला दोष द्यायचा ? आमचे साहित्यिक काही कमी आहेत का ? कुठून कुठून चांगलं मिळालं की आणतात ना आमच्यासाठी ! कोणी कविता चोर, कोणी कथा चोर..! माझ्याच एका कवितेचा एक छान व्हिडीओ एका समाजमाध्यमात प्रतिष्ठित असणाऱ्या एका तरुणीनं बनवला आणि वर कवी कोण आहेत हे माहित पण कविता आवडली म्हणून पाठवत आहे असे म्हटले. माझ्या ओरिजिनल व्हिडीओपेक्षा या व्हिडिओला जास्त लाईक मिळाले. आता काळच बदलला ना महाराजा ! तेव्हा तुम्ही आम्ही यातून काही शिकलो नाही तर आपण मागेच राहू. जिथून कुठून जे जे चांगले मिळेल ते घेतलं पाहिजे ! आणि हो, चांगल्या कामाची लाज बाळगू नये. आणि एक महत्वाची सूचना. हल्ली तर AI च्या नावावर कोणतीही चोरी खपून जाते. तेव्हा फारशी काळजी करण्याची गरज नाही.
पण बऱ्याच लोकांनी हल्ली अशा चांगल्या गोष्टी आत्मसात करायला सुरुवात केली आहे ही त्यातल्या त्यात आनंदाची बाब ! कार्पोरेट क्षेत्रात तर मी एखादी नवीन कल्पना माझ्या मित्राजवळ सांगितली, तर दुसऱ्या दिवशी ती माझ्या बॉसला माहिती होते. त्याचे क्रेडिट त्याला मिळते. माझ्या कपाटातील स्टेशनरी दुसरीकडे सापडते. ती अर्थात त्यांनी ऑफिसच्या कामासाठीच घेतलेली असते ! एकदा मी एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेलो होतो. एका विभागातून एक टी शर्ट घेतला. त्या विभागातील टी शर्ट्सची किंमत ३९९/- रू होती. पण काउंटरवर गेलो तर मला चक्क ६९९/- रू सांगितली. मी त्यांना म्हटले की अहो, तिथे तर ३९९/- लिहिली आहे. तेव्हा मी तेव्हढेच पैसे देणार ! तो माणूस म्हणाला आमच्याकडे तर याची किंमत ६९९/- दाखवत आहेत. शेवटी वाद मॅनेजर पर्यंत गेला. मॅनेजर म्हणाला,' हा शर्ट तुम्ही कुठून घेतला ? ' मी त्यांना तो विभाग दाखवला. मग तो मॅनेजर म्हणाला, ' तुमची चूक नाही. कोणीतरी ६९९/- रू किमतीचा हा शर्ट तिथे चुकून ठेवला. तुम्ही असं करा ३९९/- रू च द्या. ' मग मी आनंदाने तो शर्ट घेऊन आलो. ही घटना मी माझ्या एका मित्राला सांगितली. तो म्हणाला, ' छानच कल्पना आहे. मी सुद्धा पुढच्या वेळी त्या मॉलमध्ये गेलो की एखादी महागडी वस्तू दुसऱ्या कप्प्यात उचलून ठेवीन आणि मग तो मॅनेजर मलाही कमी किमतीत ती वस्तू देईल. ' अशा माझ्या या हुशार मित्राचे मला खूप कौतुक वाटले. एका मुलीने रेडिमेड कपड्यांच्या दुकानातून तीन ड्रेस खरेदी केले. पण दुकानदाराने नजरचुकीने दोन ड्रेसचेच बील लावले. ती पोरगी जाम खुश ! म्हणाली, ' यात माझी थोडी चूक आहे. त्या दुकानदाराची ही चूक. त्या चुकीने माझा फायदा होत असेल तर मी कशाला लक्षात आणून देऊ ? ' किती हुशार झालेत आपल्याकडील मुलं मुली ! आपण उगीचच त्यांना काही कळत नाही म्हणून नावं ठेवतो.
पोटासाठी चोरी करणाऱ्या एखाद्या सामान्य चोराला रट्टे दिले जातात. पोलीस पकडून तुरुंगात टाकतात. पण आपल्या विभागात दहा वीस कोटीची शासकीय योजना मंजूर करून आणणाऱ्या आणि टेंडर काढून त्यातील टक्केवारी घेणाऱ्याला समाज केवढी प्रतिष्ठा देतो ! व्यासपीठावर ' सन्माननीय अमुक अमुक साहेबांनी ही योजना मंजूर करून आणली. समाजासाठी त्यांनी केवढे मोठे काम केले आहे, दूरदृष्टी असलेले नेते आहेत...' यासारख्या शब्दात त्यांचा गौरव केला जातो. हीच ती सामाजिक व्यवस्था की जिथे चोरी नाही तर चोर महत्वाचा असतो.
तेव्हा या सगळ्या गोष्टींवर सर्वंकष विचार आपल्या समाजधुरीणांनी, शिक्षण तज्ज्ञांनी, पालकांनी करणे गरजेचे आहे. घरातून होणारे संस्कार, शालेय पाठ्यपुस्तकातील पाठ यातून या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत कशा पोहोचतील याची काळजी घेतली पाहिजे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२३/५/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा