मुख्य सामग्रीवर वगळा

प्रामाणिकपणाचे मूल्य

उगवतीचे रंग  

प्रामाणिकपणाचे मूल्य 

आपण स्वतःशी प्रामाणिक असलो आणि दृष्टी खुली ठेवली तर आपण नकळत अनेक गोष्टी शिकत जातो. माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो याचा अनुभव पदोपदी येतो. जीवनातील अनेक अनुभव आपल्याला शहाणे करून जाण्यासाठीच आलेले असतात. या अनुभवाच्या शाळेतून जो शिकतो, तो समृद्ध होत जातो. त्या अनुभवातून प्राप्त झालेल्या मूल्यांची जोपासना मग आयुष्यभरासाठी करणे म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणे. 

मी शिक्षक म्हणून नुकताच लागलो होतो, त्या वर्षीचा एक प्रसंग ! मी शिक्षक  म्हणून नेमणूक होण्यासाठी आवश्यक असलेली बी एडची परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो होतो. पण शिक्षक म्हणून माझ्यातील मूर्ती अजून घडायची होती. एखाद्या डॉक्टरकडे वैद्यकीय व्यवसायाची पदवी असली तरी जोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण त्याच्या हाताखालून जात नाहीत तोपर्यंत तो अनुभवसंपन्न आणि निष्णात होत नाही. शिक्षकाचेही तसेच असते. अनुभवातूनच तो घडत जातो. 

माझ्या नेमणुकीला काही महिने झाले असतील. तोच शाळेतील एक महत्वाची परीक्षा सुरु झाली. या परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घ्यायची होती. माझ्याकडे एका वर्गाची इंग्रजी विषयाची तोंडी परीक्षा घेण्याचे काम दिले गेले होते. परीक्षा सुरु झाली. वर्गात जेवढी मुले उपस्थित होती, त्यांची तोंडी परीक्षा संपवून मी शाळेच्या ऑफिसमध्ये आलो. तोंडी परीक्षेची यादी पर्यवेक्षकांकडे सुपूर्द केली आणि शिक्षक दालनात जाऊन बसलो. तोपर्यंत काही शिक्षक मंडळी देखील आपापले काम संपवून तेथे आली होती. मी ज्या वर्गाची परीक्षा घेऊन आलो होतो, त्या वर्गाला शिकवणारे एक शिक्षक माझ्या शेजारीच बसले होते. त्यांनी विचारले, ' सर, झाली का परीक्षा ? किती मुले हजर होती ? ' मी त्यांना म्हटले की सर जेवढी मुले हजर होती, त्यांची परीक्षा घेतली. ते म्हणाले, ' मग गैरहजर विद्यार्थ्यांचे काय केले ? ' मी म्हटलं, ' सर, त्यांना गैरहजर दाखवले आहे. ' 

ते म्हणाले, ' तुम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान करताय. तोंडी परीक्षेचे गुण त्यांना पास होण्यासाठी मदत करतात. मुले नाही आली तरी आपण त्यांना काहीतरी गुण देऊन टाकायचे. ' एक ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षकच असे सांगत असल्याने मला त्यांचे म्हणणे बरोबर असेल असे वाटले. मग मी पुन्हा त्या पर्यवेक्षकांकडे जाऊन ती यादी मागून घेतली आणि गैरहजर मुलांना गुण देऊन मोकळा झालो. पण मला ज्या शिक्षकांनी हा सल्ला दिला होता, त्यापेक्षाही पर्यवेक्षक पदावर एक ज्येष्ठ आणि प्रामाणिक व्यक्ती बसली होती. काहीतरी गडबड झाली आहे असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मला विचारले की तुम्ही पुन्हा यादी का मागून घेतलीत ? मी त्यांना मग एका शिक्षकांनी मला गैरहजर विद्यार्थ्यांना गुण द्यायला सांगितले असे सांगितले. 

पर्यवेक्षक म्हणाले, ' तुम्ही नवीन आहात. असे करू नका. जे विद्यार्थी गैरहजर आहेत, त्यांना गैरहजरच दाखवा. उद्या काही कारणाने तो विद्यार्थी पुन्हा परीक्षा द्यायला आला किंवा त्याचे पालक आले तर तुम्ही काय सांगाल ? तो अनुपस्थित असताना तुम्ही गुण दिले तर काहीही होऊ शकते. समजा, तो मुलगा आजारी असला आणि परीक्षेला येऊच शकला नाही तर ? तुम्ही तर त्याला उपस्थित दाखवलं आहे. अशाने तुम्ही अडचणीत याल. ' 

त्यांच्या या बोलण्याने माझे डोळे उघडले. मला माझ्या चुकीची जाणीव झाली. मी त्यांचे म्हणणे मग आयुष्यभर लक्षात ठेवले. त्या ज्येष्ठ शिक्षकांनी जे काही सांगितले ते योग्य वाटले तरी त्यामागे त्यांचा काही वेगळा उद्देश असू शकतो. पण पर्यवेक्षकांनी जे काही सांगितले ते त्यापेक्षाही योग्य होते. योग्य आणि अयोग्य काय याची निवड आपल्याला करता आली पाहिजे याची तीव्र जाणीव मला त्यावेळी झाली. मुख्य म्हणजे आपण स्वतःशी प्रामाणिक असले पाहिजे ही गोष्ट लक्षात आली. प्रामाणिक असणे आणि स्वतःशी प्रामाणिक असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. व पु काळे यांनी त्यांच्या एका पुस्तकात एका शिक्षकाचे उदाहरण दिले आहे. ते शिक्षक विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्र शिकवत होते. ते शिकवत असताना त्यांनी ' स्वच्छता ' हे मूल्य आपल्या विद्यार्थ्यांना शिकवले. अतिशय तळमळीने आणि मनापासून शिकवणारे ते शिक्षक होते. पुढे जेव्हा परीक्षा आली, तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या मधल्या वेळेत शाळेच्या आवारातच आपण खाल्लेल्या पदार्थांचे कागद, रॅपर्स इ. टाकून दिले. त्या शिक्षकांनी हे पाहिले. ' स्वच्छतेचे ' मूल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केले नाही हे पाहून त्यांना वाईट वाटले. त्यांनी त्या विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्राच्या परीक्षेत नापास केले. पालकांनी तक्रार केली की आमच्या मुलांनी बरोबर उत्तरे लिहिली तरी सरांनी त्यांना नापास केले आहे. मग शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना बोलावून याचा जाब विचारला. तेव्हा ते म्हणाले, ' नुसते पेपरमध्ये बरोबर उत्तर लिहून उपयोग नाही. त्या मुलांनी नागरिकशास्त्रातील तत्वे, मूल्ये आत्मसात केली नाहीत. प्रत्यक्ष व्यवहारात ते ती पाळत नाहीत. ' मुख्याध्यापकांनी त्यांना त्या मुलांना उत्तीर्ण करण्यास सांगितले पण त्या शिक्षकांनी ते नाकारले. परिणामी त्यांना आपली नोकरी गमवावी लागली. त्यांना आपल्या प्रामाणिकपणाची आणि सत्यनिष्ठेची किंमत मोजावी लागली होती. स्वतःशी असलेल्या प्रामाणिकपणाची प्रसंगी किंमत मोजण्याची तयारी असावी लागते. 

 व्यवहारात आपण सोयीस्कर प्रामाणिकपणा पाळणारे अनेक जण पाहतो. पण या सोयीस्कर ' प्रामाणिक ' वागणाऱ्या व्यक्तींमुळे प्रामाणिकपणाचे मूल्य आपला आत्मा हरवून बसते. 

एक श्रीमंत माणूस होता. तो खूप आजारी पडला. आता आपण या आजारातून वाचत नाही याची जाणीव त्याला झाली. त्याने परमेश्वराला प्रार्थना केली की मी या आजारातून बरा झालो तर माझा हा आलिशान बंगला विकून त्याच्या विक्रीतून येणारा पैसा दानधर्मासाठी खर्च करीन. ईश्वर कृपेने तो त्याच्या आजारातून खडखडीत बरा झाला. मग त्याला आपला नवस आठवला. आता पंचाईत झाली. मग त्याने एक युक्ती केली. वर्तमानपत्रात घर विक्रीची जाहिरात दिली. त्यात त्याने लिहिले, ' घराची किंमत फक्त दहा रुपये. पण त्यासोबतच आपला एक कुत्रा आहे. त्याची किंमत दहा लाख रुपये. जो हा कुत्रा विकत घेईल, त्यालाच घर दिले जाईल. ' एका माणसाने मग त्याच्याकडून दहा लाखाला कुत्रा खरेदी केला आणि दहा रुपयात घर घेतले. आता या माणसाने दहा रुपये दानधर्मात वाटले आणि दहा लाख रुपये खिशात घालून दुसरे घर घेतले. या प्रामाणिकपणाला काय म्हणावं ? तो प्रामाणिकपणा नव्हताच. त्यातील आत्मा हरवला होता. 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची एक गोष्ट आहे. ते वकील म्हणून काम करीत असताना एक धनाढ्य व्यक्ती त्यांच्याकडे आली. न्यायालयात आपली बाजू लिंकन यांनी मांडावी अशी विनंती त्यांनी केली. लिंकन यांनी त्या व्यक्तीची बाजू ऐकून घेतली. ते म्हणाले, ' तुमची केस कायदेशीर विचार करता, खूपच बळकट आहे. पण तुमच्या केसची नैतिक बाजू मात्र अत्यंत कमकुवत आहे. मी तुमची केस लढू शकत नाही. कारण न्यायालयात युक्तिवाद करताना माझे मन मला हजारदा सांगेल की लिंकन तू खोटारडा आहेस. आणि मी ते करू इच्छित नाही. ' लिंकन यांचे हे उदाहरण खूप काही सांगून जाते. त्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१९/५/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...