मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग 

तेजोनिधी लोहगोल...  

' तेजोनिधी लोहगोल ' हे पं वसंतराव देशपांडे यांनी गायिलेलं नाट्यगीत अतिशय सुंदर आहे. सूर्यदेवाची महती या गीतात फार सुंदर सांगितली आहे. ' कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती ' , अमृतकण परी होऊन अणुरेणू उजळिती, दाहक परी संजीवक यासारखी सुंदर शब्दरचना या गीताचे सौंदर्य वाढवते.

रोज सकाळी उठलो की सूर्यनारायणाचे आवर्जून दर्शन घेतो. एखाद्या दिवशी ' नभ मेघांनी आक्रमिलें ' असेल तर दर्शन होत नाही. अशा वेळी मग काहीतरी राहून गेल्याची हुरहूर लागते. सकाळी सूर्याचे दर्शन घेणारे, त्याला अर्घ्य वाहणारे, नमस्कार करणारे असंख्य. मीही त्यातलाच एक. असं म्हणतात की लोक उगवत्या सूर्यालाच वंदन करतात. म्हणजे ज्याची परिस्थिती उत्तम आहे, ज्याच्याजवळ वाढते वैभव, सुखसमृद्धी आहे, अशांना महत्व देणं ही तर जगाची रीत ! पण मला मावळत्या दिनकराचे दर्शन जेव्हा जेव्हा होते, तेव्हा तेव्हा मी तेवढ्याच भक्तिभावाने त्याला वंदन करतो. मावळता दिनकर तर आपले जीवन सार्थकी लावून अस्ताला जात असतो. त्याची ही दोन्हीही रूपं मला सारखीच वंदनीय. उगवतीचे रंग आणि मावळतीचे रंग दोन्हीही मनमोहक. दोन्ही वेळची शोभा अप्रतिमच ! 

सकाळच्या वेळी माझ्या घराच्या अंगणात आलो की पूर्व दिशेचा कॅनव्हास गुलाबी रंगांच्या वेगवेगळ्या छटांनी उजळलेला दिसतो. रोजची सकाळ नवी, रोजचे रंग नवे, रोजचे चित्र नवे. ' ये कौन चित्रकार हैं .. ' असा प्रश्न पडावा. अशी सुंदर रंगात सजलेली पूर्व दिशा नारायणाच्या स्वागताला आतुर होऊन उभी असते. धवल अशा सप्त अश्वांनी सुशोभित असलेल्या सोनेरी रथातून सूर्यदेवांचे आगमन होते. धरती उजळून निघते. चराचराला जीवन मिळते. अशा वेळी नारायणाचे मनमोहक रूप डोळ्यात साठवून घ्यावे. त्याला प्रार्थना करावी. ' आदित्यस्य नमस्कारा ये कुर्वन्ति दिने दिने... ' किंवा ' ध्येयसदा सवितृमंडल मध्यवर्ती ..' यासारखे श्लोक म्हणून त्याला वंदन करावं. काही सेकंद त्याच्याकडे पाहिलं की ती प्रतिमा, ते तेज अंतर्यामी ठसतं. मग अगदी डोळे बंद केले तरी डोळ्यासमोर ते तेज, तो तेजोनिधी आपोआप उभा राहतो. 

प्रत्यक्ष परमेश्वराला तर आपण कधी पाहिलं नाही. ज्यांना त्याचं दर्शन घडलं ते भाग्यवान ! पण आपल्याला दररोज पूर्व क्षितिजावर दर्शन देणारा सूर्य हे त्या परमेश्वराचंच तेजस्वी रूप ! त्याच्या दर्शनातून मला परमेश्वराच्याच दर्शनाची अनुभूती होत्ते. मी त्याला प्रार्थना करतो की तुझ्या या तेजातला अगदी किंचित अंश जरी मला दिलास, तरी माझं क्षुद्र जीवन उजळून निघेल. मनातलं दैन्य, मालिन्य सगळं सगळं निघून जाईल. अंधाराचे जाळे फिटेल आणि आकाश मोकळे होईल आणि बाहेर आहे तसा प्रकाश अंतर्यामीही प्रकटेल. 

अशावेळी माझ्या मनात असा विचार येतो की सूर्यतेजाचा किंचित अंश जरी मिळाला तरी आपलं जीवन उजळून निघेल हे तर खरंच ! पण जो प्रत्यक्ष सूर्यपुत्र होता, तो केवढा तेजस्वी असेल ! केवढं भाग्य त्याचं की असा चराचराला प्रकाशमान करणारा पिता त्याला लाभला ! पण कर्णाच्या जीवनाचा संपूर्ण विचार केला तर एवढं तेजस्वी, पराक्रमी असलेलं हे व्यक्तिमत्व शेवटी एक शोकांतिका ठरली. का बरं झालं असेल असं ? खरं तर याचं उत्तर आपल्या सर्वांना माहित आहे. अभिमान, अहंकार आणि आंधळी निष्ठा या दोन गोष्टींनी त्याचा घात केला. त्यातूनच अनेक चुका त्याच्या हातून घडत गेल्या. 

आपल्याला सुतपुत्र म्हणून हिणवले जाते, त्यातून आपल्याला अपमानित केले जाते म्हणून त्याने त्याला साथ देणाऱ्या दुर्योधनाची बाजू घेतली. इथेच त्याच्या जीवनाची दिशा चुकली. दिशा चुकणे, मार्ग चुकणे, हातून चूक होणे हे माणूस असल्याचे लक्षण !  पण दिशा चुकल्याची कधीतरी जाणीव व्हायला हवी, अशी जाणीव झाल्यावर ती दिशा, तो मार्ग बदलता यायला हवा आणि तो बदलण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी हवे. चुकणे हा मनुष्य स्वभाव आहे पण ती चूक दुरुस्त करून पुढे जाणे हे माणसाच्या प्रगतीचे लक्षण आहे. कर्णाला हे जमले नाही. तो अन्यायी लोकांचीच साथ देत राहिला. त्यातूनच अनेक चुका पुढे त्याच्या हातून घडत गेल्या. द्रौपदीची भर दरबारात विटंबना होत असताना तिला ' वेश्या ' म्हणून अपमानित करण्यापर्यंत त्याची मजल जाते. खरंतर या प्रसंगी त्याने आपला विवेक शाबूत ठेवला असता आणि घडणाऱ्या घटनेला विरोध केला असता, तर तो महानायक ठरता ! भगवान परशुरामांना फसवून म्हणजे त्यांच्याशी खोटे बोलून त्यांच्याकडून ग्रहण केलेली विद्या, निःशस्त्र असलेल्या अभिमन्यूच्या वधात त्याचा असलेला सहभाग या सगळ्या गोष्टींनी त्याचं अध:पतन होत गेलं. त्याच्या शोकांतिकेचं बीजारोपण या घटनांनी होत गेलं. 

सत्य, न्याय्य, चांगल्या गोष्टी सुरुवातीला कटू वाटल्या तरी अंतिमतः त्या हितकारक असतात. वाईट गोष्टी या वाईटच असतात. क्षणभर त्यांचा मोह पडून त्या आकर्षक वाटल्या तरी अंतिमतः त्या घात करतात. याचे उदाहरण म्हणजे कर्णाची व्यक्तिरेखा. मग तो प्रत्यक्ष सूर्यपुत्र जरी असला तरी त्याला ' जसे कर्म तसे फळ ' ही उक्ती लागू होते. ' पेरावे ते उगवते.' त्याचे तेजस्वी, पराक्रमी जीवन त्यामुळे काळवंडून जाते. 

असा हा ' तेजोनिधी लोहगोल ' तुमचे आमचे जीवन प्रकाशमान करो, जीवनातील दैन्य, दुःख, दारिद्र्य, मालिन्य अवघे नष्ट होवो आणि ' विश्व स्वधर्मसूर्ये पाहो. ' ही कामना करू या.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१७/५/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...