मुख्य सामग्रीवर वगळा

बहारो फुल बरसाओ

 उगवतीचे रंग 

बहारो फुल बरसाओ...

१९६६ मध्ये आलेल्या ' सुरज ' या चित्रपटातील ' बहारो फुल बरसाओ, मेरा महबूब आया है...' या गीताची खुमारी काय वर्णन करावी ! गीतातील नायक त्याची प्रेमिका आल्यानंतर निसर्गातील विविध घटकांना तिच्यासाठी जे आवाहन करतो ते खरोखरच रम्य आणि काव्यात्मक आहे. मग निसर्गाने तिच्यावर फुलांची बरसात करावी, फुलांनी तिच्या हातामध्ये मेहंदीचा लाल रंग लावावा वगैरे वगैरे...! मो रफी यांनी आपल्या अजरामर आणि जादुई आवाजाने हे गाणे जिवंत केले आहे. 

पण गेल्या ५०- ६० वर्षांपासून कोणत्याही लग्नात गेलो की लग्न लागण्यापूर्वी नवरदेवाची वरात आली की हमखास हे गाणे लागतेच लागते. किंबहुना असे म्हणावे लागेल की कोणतेच लग्न हे गीत सुरू झाल्याशिवाय लागत नाही आणि लागणे शक्य नाही. मला प्रश्न असा पडतो की समजा हे गाणे निर्माण झाले नसते तर लग्न लावणाऱ्यांची किती पंचाईत झाली असती ! ऐन वेळी त्यांनी काय केले असते ? नवरदेवाचे आगमन झाले हे कसे सुचित केले असते ? मोठा प्रश्न आहे...! 

अगदी माझ्या लग्नाच्या आधीपासून ते आजपर्यंत प्रत्येक लग्नात मी हे गाणे ऐकत आलो आहे. ' मेरा मेहबूब आया है...' आणि तेव्हापासून हा ' महबूब ' जो येत राहिला तो आजपर्यंत येतोच आहे आणि पुढेही येतच राहील...आणि त्या गीताशिवाय लग्न लागले  तर नवरदेव, नवरी आणि उपस्थित सगळ्यांना काहीतरी राहून गेले आहे असे वाटून चुकल्या चुकल्यासारखे वाटेल. एक वेळ हुंडा किंवा रुखवतात कमी असली तरी चालेल असे पण हे गाणे लावलेच पाहिजे अशी मागणी मग वराकडील लोकांनी केली असती.

 अशा आणीबाणीच्या परिस्थितीत वधूकडील लोकांना मग त्याची खास व्यवस्था करावी लागली असती. साऊंड सिस्टिमवाल्यांचे आणि बँडवाल्यांचे तर फावलेच असते. हे गाणे लावण्याचे वेगळे पैसे त्यांनी मागितले असते. असो, पण तो प्रश्न सहज सुटला आणि लग्नामध्ये हे गीत लावणे बंधनकारक झाले. पुढे काही वर्षांनी तर असे होण्याची शक्यता आहे की सरकार असा कायदा करेल की प्रत्येक लग्नामध्ये हे गीत लावणे बंधनकारक आहे. हे गीत लावल्याशिवाय कोणतेही लग्न लागणार नाही आणि या गीताशिवाय ते लग्न लागले तर ते वैध धरले जाणार नाही आणि अशा विवाहाची नोंदणी केली जाणार नाही. मंगल कार्यालयांमध्ये अलीकडे जे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, त्यांचे फुटेज प्रत्येक लग्नानंतर चेक केले जाईल आणि हे गाणे लग्न लागण्यापूर्वी खरोखरच लावले गेले आहे का याची खात्री करून घेतली जाईल.

काल मी एका दुपारच्या लग्नाला गेलो होतो. लग्नाची वेळ १२:३० ची होती पण लग्न लागले ते दुपारी दोन वाजता. ऊन असो की आणखी काही, आम्ही नाचणारच असा दृढनिश्चय करून आलेल्या मंडळींमुळे लग्नाचा मुहूर्त नेहमीच टळून जात असतो. या मंडळींच्या सहनशीलतेचे, धैर्याचे कौतुक करावे तेवढे कमी ! अत्यंत विपरीत वातावरणातही ते नाचायला तयार असतात. जीवनाची सकारात्मकता त्यांच्याकडून शिकावी !

 तेव्हा कालचे ते लग्न लागण्यापूर्वीचे ते प्रसिद्ध ' बहारो फुल बरसाओ ' गीत ऐकून आणि लग्न लावून आम्ही परततो तर काय ? त्या रस्त्यावर आणखी दोन-तीन मंगल कार्यालये होती. तिथूनही सगळीकडे ' बहारो फुल बरसाओ ' चालू होते. भर दुपारच्या उन्हात अशी बहार आलेली आणि फुलांची बरसात ( ? ) सुरू होती. घामाच्या बरसातीत मात्र लोक चिंब भिजत होते. नवरदेवाची वरात सुद्धा भर उन्हात घोड्यावरून निघते. आधीच ऊन भयंकर. त्यात कमालीची गर्मी, हवेच्या झुळूकीचेही नाव नाही. नवरदेवाचे कपडे नवीन. त्याच्यावर आणखी कोट, सूट, बूट.  मग काय विचारता ? तो घामात चिंब भिजतो. त्यामुळे त्या गाण्यात असा बदल करावासा वाटतो ' मेरा महबूब आया है और पसीने में डूब आया है...'

पूर्वी वधुपरीक्षेच्या वेळी वधूने चहा पोहे आणून दिले की तिला विचारले जाई, " बाळ, तुला गाता येते का ? जरा गाऊन दाखव. " मग अशावेळी ती मुलगी लाजत का होईना, तिला येत नसले तरी चार ओळी गुणगुणून दाखवायची. मग अशावेळी ' ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले...' किंवा ' जीवनात ही घडी अशीच राहू दे ' ही गाणी हमखास गायली जायची. 

जेवणाची पहिली पंगत बसली की हमखास एखाद्या व्यक्तीला श्लोक म्हणण्याचा आग्रह व्हायचा आणि मग ' शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे...' हा श्लोक हमखास म्हटला जायचा. तोपर्यंत बराच वेळ झाल्यामुळे उपस्थितांना भुका लागलेल्या असायच्या. त्यामुळे तो श्लोक केव्हा संपतो आणि जेवण म्हणजे ' उदरभरण नोहे...' हे माहिती असले तरी केव्हा आपण आपले ' उदरभरण ' करतो असे होऊन जात असे.

तर आता लग्न लागून गेलं आहे, सगळ्यांची जेवणं आणि आवराआवर झाली आहे आणि आता वधू सासरी जाण्यासाठी निघाली आहे. अशावेळी ' बाबुल की दुवाये लेती जा...' हे गाणं हमखास लागतं आणि त्या वधूबरोबरच इतरांचे डोळेही हमखास ओलावतातच. किंवा कधी कधी या गाण्याऐवजी ' दाटून कंठ येतो ओठात येई गाणे, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने...' हे भावविभोर करणार गाणं लागतं आणि खरोखरच वधूपित्याचा कंठ दाटून येतो. बऱ्याच वर्षांपूर्वी ' गंगा यमुना डोळ्यात उभ्या का...'  हे गाणं ऐकू येई आणि उपस्थितांच्या डोळ्यांना धारा लागत.

सुधीर फडके यांनी गायिलेलं ' देहाची तिजोरी..'  हे गाणं किंवा सुमन कल्याणपुर यांचं ' केशवा माधवा..' हे गाणं सुरुवातीला मला फार आवडायचं. तसं अजूनही आवडतंच. पण म्हणतात ना एखाद्या चांगल्या गोष्टीचा देखील अतिरेक झाला तर ती आवडेनाशी होते. तसेच काहीसे या गाण्यांच्या बाबतीत झाले. रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड या ठिकाणी भीक मागणाऱ्या लोकांना या गाण्यांनी फार मदत केली. या गीतांची निर्मिती झाली नसती तर या लोकांची किती पंचाईत झाली असती याची कल्पनाच करवत नाही. त्यांनी कुठले गाणे म्हटले असते हा मोठा प्रश्न पडतो. वाजवण्यासाठी हातात केवळ दोन दगडाचे किंवा फरशीचे तुकडे घेऊन ' देहाची तिजोरी ' किंवा ' केशवा माधवा ' सतत कानावर पडू लागले. त्या गाण्यांची मूळ चाल बदलून, वेगवेगळ्या चालीत, वेगवेगळ्या ढंगात, वेगवेगळ्या शैलीत ही गाणी ऐकू येऊ लागली. ' केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा...' हा नामातला गोडवा वेगवेगळ्या चालींमुळे हरवून गेला. 

ही गाणी ऐकू येऊ लागली की नकळत लोकांचा हात खिशाकडे जाऊ लागला. या गीतांच्या गायकांनी आणि संगीतकारांनी आपल्या गीतांची चाल लोकांनी अनधिकृतपणे बदलली म्हणून न्यायालयात केसेस दाखल केल्याचे ऐकण्यात आले. परंतु न्यायालयाने एकदा त्यांनी गीत सादर केल्यानंतर पुढे लोकांनी ते कोणत्याही चालीत म्हटले तरी त्यांच्यावर काही कारवाई करता येणार नाही, लोकांना त्यांच्या पद्धतीने ते गाण्याचा अधिकार आहे असे सांगितले. त्यामुळे बिचाऱ्यांना स्वस्थ बसावे लागले. 

 लग्नात जसे ' बहारो फुल बरसाओ ' हे गाणे लावणे बंधनकारक तसेच रेल्वेगाडीत, स्टेशनवर किंवा एसटी स्टँडवर भीक मागताना ' देहाची तिजोरी, केशवा माधवा...' ही गाणी बंधनकारक झाली. त्याशिवाय लोक पैसे देत नाहीत हेही त्यांच्या लक्षात आले आणि भीक कशी मागावी यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्याची गरज उरली नाही एवढी सोय या गीतांनी केली ! यापुढे तर सरकारी नियमानुसार ही गाणी म्हटल्याशिवाय भीक मागता येणार नाही असाही कायदा करण्याचा विचार सरकार करते आहे असे कळते. जुन्या पिढीतील काही भिक्षेकर्‍यांनी ' गरीबो की सुनो...' या गीताचा आग्रह धरला परंतु नव्या पिढीतील भिक्षेकर्‍यांनी हे गीत गाण्यास नकार दिला. स्वतःला गरीब म्हणणे त्यांना अप्रतिष्ठेचे वाटते. काही मंडळी तर आता रुपयाचे नाणे घेताना सुद्धा नाक मुरडतात. 

तात्पर्य, जोपर्यंत या गीतांची जागा घेणारी नवीन गीते निर्माण होत नाहीत तोपर्यंत लोकांनी या गीतांचा आनंद घ्यावा असे आवाहन सरकारने केले असल्याचे कळते.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

११/५/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...