मुख्य सामग्रीवर वगळा

ट्युलिप्स आणि रानफुले

 उगवतीचे रंग

ट्युलिप्स आणि रानफुले  

परवा टीव्ही पाहत असताना सिलसिला या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित केलेलं ' देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए ' हे गाणं लागलं होतं. त्यातील नयनरम्य ट्युलिप्सचा फुलांनी लक्ष वेधून घेतलं. यश चोप्रा निर्मित या चित्रपटाचं चित्रीकरण नेदरलॅंड्स मध्ये झालं आहे. पूर्वी तो चित्रपट पाहिला तेव्हा असं वाटलं होतं की अशी सुंदर फुलं आणि बागा केवळ परदेशातच आहेत. पण नंतर जेव्हा काश्मीरला जाण्याचा योग आला, तेव्हा  श्रीनगरमधील दल सरोवराजवळील इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप्स गार्डन पाहण्याचे भाग्य लाभले. ट्युलिप्सची फुलं त्यांच्या तेजस्वी रंगछटा आणि नाजूक पाकळ्यांनी आपल्याला आकर्षित करतात. या देखण्या बागा आणि फुले पाहण्यासाठी दरवर्षी मार्च, एप्रिलच्या महिन्यात इथे गर्दी करतात. खरंतर ट्युलिप्स बागा ही पूर्वी फक्त युरोपची मक्तेदारी होती. पण भारताने त्याच्या वैविध्यपूर्ण हवामान आणि भौतिक समृद्धी याच्या जोरावर भारतातही या बागा यशस्वीरीत्या फुलवल्या आहेत. या बागा म्हणजे केवळ आकर्षक फुलांचे मळे नाहीत, तर ते निसर्ग, संस्कृती आणि पर्यटनाचे उत्सव साजरे करणारे जिवंत कॅनव्हास आहेत असे म्हणावे लागेल. 

मी ट्युलिप्सही पाहिली आहेत आणि रानफुलेही. तुम्हीही पाहिली असणारच. पण सिलसिला चित्रपटातील या सुंदर ट्युलिप्सचा बागा पाहताना काही विचार मनात आले. तेच आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. रंगीबेरंगी लालभडक तर कधी पिवळी तर कधी हिरवी मनमोहक अशी ट्युलिप्स आपले लक्ष वेधून घेतात. त्यांचा दिमाग, तोरा काही औरच असतो. ट्युलिप्सच्या बागांतून मनाने का होईना फिरताना वाटतं – आयुष्य किती  सुंदर आहे !  सुगंधाने भरलेलं, रंगांनी नटलेलं. इथं सगळं काही आकर्षक आहे – झगमगती स्वप्नं, भौतिक समृद्धी, आणि सुखद अनुभव. 

पण त्याच वेळी कुठेतरी रानात एखादं रानफुलं नक्कीच उमललेलं असतं – नजरेआड, पण निसर्गाशी एकरूप. त्याचं शांत पण लाजरंबुजरं सौंदर्य ! आरडाओरड करत नाही, कुठलाही दिमाख मिरवत नाही, मिजास किंवा तोरा नाही. आडवाटेला रानात कुठेतरी त्याचं फुलणं हेच मोठं अप्रूप असतं. त्याची शांतता काहीतरी सांगून जाते. त्याचं फुलणं नीट पाहिलं तर जीवनाचं तत्वज्ञान सांगून जातं.

ट्युलिप्स आणि रानफुलं ही दोन्ही प्रतिकं आहेत.

दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ट्युलिप्स म्हणजे बाह्य सौंदर्य,  तर रानफुलं म्हणजे अंतर्मनाचा प्रवास. ट्युलिप्स लक्ष वेधून घेतात तर रानफुलं मन ! ट्युलिप्सकडे पाहताना नजर बाहेर जाणारी तर रानफुले पाहताना आतमध्ये डोकावणारी. रानफुलं म्हणजे अंतर्मनात उमलणारी शांतता !

तात्कालिक सुखाचं, सौंदर्याचं प्रतीक म्हणजे ट्युलिप्सची आकर्षक फुलं. 

ट्युलिप्सच्या बागा म्हणजे आयुष्यातली ‘स्थिरता’ – उत्तम नोकरी, सुंदर घर किंवा बंगला, नोकर चाकर, आलिशान गाडी, ऐश्वर्य, चैन आणि आराम आणि सहज उपलब्ध होणारं हक्काचं समाधान. ह्या बागा सुखद वाटतात, आकर्षक असतात. पण त्या इतक्या परिपूर्ण वाटतात की आपल्याला स्वतःला शोधण्याची गरजच वाटत नाही. आपण हरवून जातो त्यात. स्वतःला विसरून जातो. 

आपल्याला वाटतं आपण सुखी आहोत –बस , यापेक्षा स्वर्ग वेगळा तो काय असेल ? पण तो आनंद बाहेरून आलेला असतो. तो थोडा परकाच वाटतो.या बागांमध्ये फिरताना आपण जणू स्वप्नांच्या रंगांत न्हालेलो असतो. चारही बाजूंनी रंग सुगंध आणि समृद्धी !

इथं सगळं उठावदार आहे, पण आतलं काही तरी गहिरं हरवतंय.

हे जीवन सुंदर आहे, पण कधी कधी बेगडीही वाटतं.

कारण इथं फक्त पाहणं आहे — जाणणं नाही.

मला मात्र रानफुलं प्रतीक वाटतात  – साधेपणा, संघर्ष, आणि आत्मसुख यांची. 

रानफुलांना गंध नसतो. त्यांचं रंगसंगतीही ट्युलिप्सइतकी उठावदार नसते. पण रानफुलं जेव्हा एखाद्या दगडावर, किंवा वाऱ्याच्या जोरावर उभी राहतात – तेव्हा त्यांचं अस्तित्वच प्रेरणा ठरतं. विपरीत परिस्थितीलाही टक्कर देण्याची क्षमता ते राखून असतात. कारण विपरीत परिस्थितीतच ती फुललेली असतात. कोणी त्यांना पाणी घालत नाही. त्यांना खत देत नाही, त्यांची देखभाल करत नाही. मला इथे आठवते  ती मंगेश पाडगावकर यांची एक सुंदर कविता. ' मी फुल तृणातील इवले...' 

पाडगावकर खरोखरच एक सिद्धहस्त कवी. जीवनावर प्रेम करायला शिकवणारे, निसर्गावर प्रेम करायला शिकवणारे. त्यांच्या विविध कविता आपलं जीवन अन भावविश्व समृद्ध करतात. एक नवीन दृष्टिकोन देतात. थोड्याशा संकटांनी खचून जाणाऱ्या, निराश होणाऱ्यांना ' या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ' म्हणत जगण्याचा अर्थ अन महत्व ते समजावून सांगतात. तर ' श्रावणात घननीळा बरसला ' सारख्या कवितेतून निसर्गाकडे पाहण्याचा, त्याचं सौंदर्य टिपण्याचा एक सुंदर दृष्टिकोन बहाल करतात. ' मी फुल तृणातील इवले' ही कविता तर कसं जगावं हे समजावून सांगते असं मला वाटतं. जे काही आपल्याजवळ आहे, त्याचा अभिमान बाळगावा, स्वत्व, स्वाभिमान कधीही विकू नये. समोरची व्यक्ती, शक्ती कितीही बलाढ्य असली तरीही ! 

' मी फुल तृणातील इवले ' या कवितेत ते फुलंच जणू आपल्याशी बोलतं आहे, आपलं मनोगत व्यक्त करतं आहे. त्याचं म्हणणं जरी सूर्याला उद्देशून असलं तरी ते आपल्यासाठीही आहेच.  ते म्हणतं 

जरी तुझीया सामर्थ्याने

ढळतील दिशाही दाही

मी फूल तृणातील इवले

उमलणार तरीही नाही.

जगाला प्रकाश आणि जीवन देणारा सूर्य. केवढा तेजस्वी आणि केवढा सामर्थ्यवान ! त्याच्या पराक्रमाने जणू दशदिशा उजळून निघतात. पण त्याचा प्रकाश, त्याचा अंगार, उष्णता माझ्यासारख्या छोट्या, नाजूक गवतफुलाला सोसवणारा नाही. त्यामुळे चराचराला जीवन देणाऱ्या हे भास्करा, तुझ्या तेजाने मी उमलणार नाही. ते फुल पुढे त्याला म्हणते आहे 

शक्तीने तुझीया दिपुनी

तुज करतील सारे मुजरे

पण सांग कसे उमलावे

ओठातील गाणे हसरे?

पुढे तेच रानफुलं म्हणते - 

रे तुझीया सामर्थ्याने

मी कसे मला विसरावे?

अन रंगांचे गंधांचे

मी गीत कसे गुंफावे ?

मला मान्य आहे की तू अत्यंत सामर्थ्यवान आहेस, शक्तिशाली आहेस, तेजस्वी आहेस पण मला सांग की तुझ्या शक्तीपुढे, सामर्थ्यापुढे मी स्वतःला विसरून जाऊ का ? मी जरी तुझ्यापुढे क्षुद्र असलो तरी माझे स्वत्व मला कसे विसरता येईल ? मला परमेश्वराने, निसर्गाने जी काही शक्ती, सामर्थ्य अन वैशिष्ट्य दिले आहे त्याला मी दृष्टीआड कसे करू ? मी जर तुझ्या शक्तीपुढे नतमस्तक होऊन स्वतःला विसरलो तर निसर्गानं मला बहाल केलेलं रंग अन गंधांचं गीत मी कसं गाऊ शकेन रे ? ही तर माझीच माझ्याशी प्रतारणा होईल ना ! 

ही कविता खूप काही सांगून जाते. मला वाटतं गवतफुल हे प्रातिनिधिक आहे. आपल्या सर्वसामान्यांच्या भावना ते व्यक्त करतं. त्याचबरोबर नकळत आपल्याला शिकवणही देतं. कोणाच्या मोठेपणापुढे दबून जाऊन उगाचच नतमस्तक होऊ नका, आपलं स्वत्व, स्वाभिमान कोणत्याही परिस्थितीत गहाण ठेवू नका. लहान मुलांमध्ये लहान होऊन मिसळावे लागते. एखादी व्यक्ती कितीही मोठी असली, कोणत्याही अधिकारपदावर असली तरी जोपर्यंत ती स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवून त्या बालकांत सहभागी होत नाही, तोपर्यंत मुलं सुद्धा त्यांच्यात खेळणार नाही. आपण मंदिरात जाताना जशी पादत्राणं बाहेर काढून ठेवतो, तसाच आपला मोठेपणाही बाहेर काढून ठेवता यायला हवा, नम्र होता यायला हवे. तुकाराम महाराज म्हणतात, ' नम्र झाला भूतां, तेणें कोंडिले अनंता. ' 

स्वतःचा शोध घेणारा माणूस म्हणजे रानफुलच आहे – थोडा अनाकर्षक, थोडा वेगळा, पण खरा. तो माणूस जीवनाच्या प्रश्नांची उत्तरे झगमगाटात शोधत नाही – तो प्रश्नांची मजा घेतो, जीवनाचा आनंद घेतो आणि पडलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वतः निर्माण करतो.

असं समजू नका की ट्युलिप्सची बाग नकोच किंवा ती चुकीची आहे आणि रानफुलं श्रेष्ठ आहेत. दोन्ही मार्ग योग्य आहेत, दोन्हीही वेगवेगळे पर्याय आहेत– फक्त त्यांच्या दिशा आणि अनुभव वेगळे ! दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ' श्रेयस ' आणि ' प्रेयस ' मधला हा फरक आहे. प्रेयस गोष्टी आकर्षक असतात, सुख देणाऱ्या असतात परंतु अंतिम हिताच्या त्या असतीलच असे नाही तर श्रेयस गोष्टींचा मार्ग बऱ्याच वेळा खडतर असतो. परंतु अंतिम हित मात्र त्यातून नक्कीच जोपासले जाते. तो प्रगतीच्या उन्नतीचा आणि मुक्तीचा मार्ग असतो. आपण श्रेयस निवडायचे की प्रेयस याची अंतिम निवड आपलीच ! 

ट्युलिप्स आपल्याला दिलासा देतात. मन रिझवतात पण कधीतरी, जेव्हा आपण शांत एकटं बसतो, तेव्हा एक आवाज आतून हळूच ऐकू येतो –

"ही सुंदर बाग आहे खरी, पण मी कोण आहे ? माझं अंतिम ध्येय हेच आहे का ?"

त्याच प्रश्नाच्या शोधात आपण त्या रानात शिरतो – काट्यांतून, दगडांतून, आणि नकळत एक रानफुलं आपल्या आत उमलतं.

ट्युलिप्स आपल्या आयुष्याला सौंदर्य देतात, पण रानफुलं आपल्या आत्म्याला स्पर्श करतात.

आजच्या जगात, जेथे आपल्याकडे खूप काही भौतिक समृद्धी आहे, जिथे आपण हरवून गेलो आहोत – तिथेच आपल्याला स्वतःचं अस्तित्व शोधण्याची आवश्यकता जास्त आहे. अशी खूप उदाहरणं आहेत की ज्यांनी फुललेल्या ट्युलिप्सच्या बागा सोडून रानफुलांची वाट निवडणं श्रेयस्कर ठरवलं . तुकाराम महाराजांना त्यांच्या पिढीचा सावकारीचा व्यवसाय चालवून मजेत आरामात राहणं सहज शक्य होतं परंतु त्यांनी ते नाकारून आत्मशोधाची वाट निवडली. भक्तिमार्ग निवडला आणि अंतिमतः लोकांचेही आपल्या उपदेशाने कल्याण केले. बाबा आमटे आपल्या वकिलीच्या व्यवसायात भरपूर पैसा कमवून आरामात जीवन घालवू शकते असते परंतु त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचा खडतर मार्ग निवडला. तीच रानफुलांची वाट असते.

ज्यांना स्वतःला शोधायचं आहे, त्यांना ट्युलिप्स नव्हे —

रानफुलंच बोलावतात.

एक वाट नेहमीच सरळ आणि सुंदर असते. पण एक सुंदर इंग्रजी वाक्य आहे...

"In the quiet bloom of wildflowers lies the strength to face the storms tulips cannot endure."

दुसरी वाट असते वळणावळणाची, काट्यांनी भरलेली — पण त्या वाटेवरचं गाणं आपलं असतं.

म्हणून या रंगीबेरंगी आयुष्यात एखादं क्षणभर थांबावं,

कुठल्याशा विचाराच्या रानात शिरावं,

आणि एखादं रानफुलं ओळखावं –  बहुधा ते आपणच असतो.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१/५/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...