उगवतीचे रंग
अनोखे अंदमान - भाग २
सेल्युलर जेलला भेट
अंदमान आणि निकोबार बेटांचा विचार करताच डोळ्यांपुढे उभं राहतं ते निळ्याशार समुद्राचं, उबदार वाऱ्याचं आणि हिरव्यागार निसर्गाचं सुंदर चित्र. पण या स्वर्गासारख्या बेटांमध्ये एक अशी वास्तू आहे, जी फक्त सौंदर्य नव्हे, तर इतिहासाची जिवंत आठवण म्हणून उभी आहे – सेल्युलर जेल, जी पोर्ट ब्लेअरमध्ये स्थित आहे.
ही माझी पहिली अंदमान भेट होती आणि सेल्युलर जेलला भेट देणं हा त्या प्रवासाचा अविभाज्य भाग होता. २१ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता सेल्युलर जेलला भेट देण्यासाठी आम्ही एका छोट्या बसमधून निघालो. आता आम्ही सर्व २९ जण बरोबर होतो. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर वातावरण आल्हाददायक होतं. समुद्राच्या लाटा शांतपणे किनाऱ्यावर आदळत होत्या आणि वाहणारा उबदार वारा काहीतरी वेगळं अनुभवायला मिळणार याची जणू जाणीव करून देत होता.
पोर्ट ब्लेअरच्या रस्त्यांवरून आमची बस सेल्युलर जेलच्या दिशेने जसजशी पुढे जात होती, तसतशी मनात एक वेगळीच थरारक भावना दाटून येत होती. ज्या अंदमानबद्दल आणि सेल्युलर जेल बद्दल आपण लहानपणापासून ऐकत आणि वाचत आलो, ते ठिकाण आता प्रत्यक्ष बघायला मिळणार होतं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम केला त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही वास्तू बघण्याचा योग आता आला होता. लवकरच आम्ही सेल्युलर जेल जवळ पोहोचलो. लांबूनच एक दुमजली प्रशस्त इमारत आमचे लक्ष वेधून घेत होती. तिच्याजवळ पोहोचल्यानंतर सेल्युलर जेल हा बोर्ड आम्हाला दिसला. एक जुनी पण भव्य अशी वास्तू आमच्या नजरेसमोर होती. ती पाहिल्याबरोबर तीव्रतेने जाणीव झाली की याच पुरातन वास्तूमध्ये देशभक्ती, समर्पण यांची शिकवण देणारा इतिहास दडलेला आहे.
मुख्य प्रवेशद्वारात पाऊल ठेवताच समोर दिसलं ते एक प्रशस्त प्रांगण, ज्याच्या मधोमध उभा होता राष्ट्रीय ध्वज आणि त्याच्यासमोर एक स्मृतिस्तंभ. तिथे उभं राहताच मन अभिमानाने भरून आलं. बाजूलाच एक संग्रहालय आहे, जिथे स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो, पत्रव्यवहार, वापरलेली वस्तू, आणि त्या काळातील दस्तऐवज पाहायला मिळतात. प्रत्येक वस्तू एक कथा सांगत होती. इथे गेल्यावर आम्ही सगळेच स्वतःला जणू विसरलो. वर्तमानकाळ जणू स्तब्ध झाला आणि स्वातंत्र्यवीरांचा धगधगता इतिहास जिवंत झाला.
थोडं पुढे जाताच आपल्याला दिसतो तो सेल्युलर जेलचा मुख्य भाग. ह्या वास्तूची रचना अत्यंत विचारपूर्वक केली आहे. फार परिश्रम न घेता आणि फारसे मनुष्यबळ न वापरता कैद्यांवर लक्ष ठेवता यावे आणि त्यांना येथून पळून जाण्याची कोणतीही संधी मिळू नये अशा प्रकारची ही रचना आहे. त्याचबरोबर कैद्यांचे मानसिक धैर्य खच्ची व्हावे अशा प्रकारची ही रचना आहे. मध्ये शिरल्याबरोबर काही अंतरावर एक पुरातन पिंपळवृक्ष आपल्याला दिसतो हा पिंपळ वृक्ष तेथील सगळ्या घटनांचा साक्षीदार आहे असे म्हटले जाते देशभक्तांनी सोसलेल्या यातना, त्यांचा केलेला छळ या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार हा पिंपळ वृक्ष आहे. आम्ही त्याला मनोमन नमस्कार केला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या खोलीत ठेवले होते ती पाहण्याची आमची उत्सुकता होती. त्यामुळे आम्ही आधी तिकडेच निघालो. तिसऱ्या मजल्यावर शेवटची खोली खोली क्रमांक १२३ ही त्यांची होती. ही खोली म्हणजे देशभक्तांच्या दृष्टीने तीर्थस्थानच. सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर ही या कोठडीबद्दल लिहिताना म्हणतात
यह तीर्थ महातीर्थों का है
मत कहो इसे काला पानी
तुम सुनो यहा की धरती के
कण कणसे गाथा बलिदानी.
सेल्युलर जेलच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर या ओळी आपल्याला वाचायला मिळतात.
सगळ्या कोठडींना एकच दरवाजा आहे. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या कोठडीत ठेवले होते तिला मात्र दोन दरवाजे आहेत. फक्त १३× ७ फुटांची ही कोठडी. या कोठडीबद्दल पु ल देशपांडे यांनी काढलेले उद्गार फार सुंदर आहेत. ते म्हणतात, " ज्या वेळेला एखाद्या खोलीमध्ये प्रत्यक्ष तेज वस्तीला येतं त्यावेळेला त्या कोठडीचा गाभारा होतो. आपण आता जिथे आत गेलो तो असाच एक गाभारा झालेला आहे. तिथे एक मूर्तिमंत तेज वावरत होतं. ' तेजस्विनावधितमस्तु ' असं आपण नुसतं म्हणत असतो. म्हटलेलं विसरून जात असतो. पण खऱ्या अर्थानं ज्याचं काया, वाचा, मन सगळंच तेजस्वी ओजस्वी होतं अशा भारतीय इतिहासातील व्यक्ती शोधायची झाली तर प्रथम आपल्याला आधुनिक काळामध्ये वीर सावरकरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
प्रत्येक क्षण हा जीवन उजळण्यासाठी आहे हे दाखवून देणारं त्यांचं उभं आयुष्य होतं."
या कोठडीला हवा आणि प्रकाश येण्यासाठी फक्त एकच खिडकी आहे आणि तीही अशा उंचीवर की तिथपर्यंत पोहोचून बाहेरच काहीही पाहता येणार नाही. अशा या अगदी छोट्याशा जागेत स्वातंत्र्यवीरांनी आणि इतर क्रांतिकारकांनी कसे दिवस काढले असतील याचा नुसता विचार जरी केला तरी अंगावर काटा उभा राहतो.
याच खिडकीखाली सावरकरांचा फोटो लावलेला आहे आम्ही साश्रू नयनांनी त्यांना वंदन केले. आम्ही गेलो त्या दिवशी खूप गर्दी होती. लोक वंदे मातरम, स्वातंत्र्यवीर सावरकर की जय अशा घोषणा देत होते. ( क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
९/४/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा