उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 57गुरुदेवांचे संस्मरणीय विचार
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आज आपल्यात नसले तरी त्यांनी चिरंतन साहित्यसंपदा मागे ठेवली आहे. आणि त्यातील विचार हे चिरंतन आहेत. संस्मरणीय आहेत. त्यातीलच काही विचारांचा घेतलेला हा मागोवा.
१. ' देखा ' पाहणे अशा शीर्षकाचा त्यांचा एक सुंदर निबंध आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की प्रकाश रोज एकच संदेश घेऊन येत असतो. पाहा ! बस. एकवार न्याहाळून पाहा. प्रकाशाचे येण्याचे प्रयोजन आपण पाहावे. हे अंत:चक्षूंनी वगैरे नव्हे. साध्या निसर्गदत्त डोळ्यांनी. विधात्याने हा जो काही सारा पसारा मांडला आहे, तो काय उधळपट्टी करायची हौस म्हणून नव्हे. रोज इतका प्रकाश ओतला जातो, तो काय केवळ सूर्यमाला तयार झाल्या म्हणूनच का ? हा सारा प्रकाश ओरडत असतो - की ' पाहा '. रोपटे त्या प्रकाशाकडे पाहत असते. पाहता पाहता तो प्रकाश देहात साठवता साठवता एके दिवशी फूल उमलते. ते फूलही पाहू लागते. फळ पाहू लागते. त्याचे बीज जमिनीत जाते. प्रकाशाला भेटायची ओढ त्याला मातीतून वर ओढून आणते. असे हे पाहणे. आकाशातल्या नक्षत्रलीलांपासून मलेरियाच्या डासांपर्यंत टागोरांनी प्रत्येक गोष्ट अशी उत्कंठेने पाहिली. रोपट्याच्या पाहण्यातून फूल यावे तशी त्यांची कविता आली. फुलाबरोबरच रंग यावा तसे उपजतानाच सूर घेऊन आली. "
( वंगचित्रे : पु ल देशपांडे )
२. " ध्येयापासून न ढळता, स्वतःच्या मताला मुरड न घालता, स्वतःला खुजेपणा न आणताही व्यक्तीचा मान ज्या समाजात होतो, त्या समाजाची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. निष्ठा अन् मूल्ये यांना हानी पोहोचू न देता मिळणारा मान हा खरा मान. पक्ष, पंथ किंवा गट लक्षात घेऊन होणारा सन्मान केव्हाही सदोषच असतो. "
( शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ : आशा साठे )
३. "You can’t cross the sea merely by standing and staring at the water."
या वाक्यात गुरुदेव कृतीचे महत्त्व सांगतात. तुम्ही केवळ समुद्राकडे पाहून समुद्र पार करू शकत नाही. त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. जीवनात कोणतेही महान कार्य साध्य करण्यासाठी कृतीची आणि प्रयत्नांची आवश्यकता असते.
४. "Clouds come floating into my life, no longer to carry rain or usher storm, but to add color to my sunset sky."
या वाक्यात जीवनातील संकटांकडे सकारात्मकतेने पाहण्याचा संदेश गुरुदेव आपल्याला देतात. अडचणींचे ढग माझ्या आयुष्यात येतात ते पाऊस किंवा वादळ आणण्यासाठी नव्हे तर माझ्या संध्याकाळच्या आकाशात रंग भरण्यासाठी ! जीवनातील संकटे किंवा अडचणी या आपले जीवन समृद्ध आणि अनुभवाने परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक आहेत असेच ते यातून सांगतात.
५. "The butterfly counts not months but moments, and has time enough."
फुलपाखरू महिन्यांची गणना करत नाही तर क्षणांचा आनंद घेते. त्याच्या जीवनातील क्षण महत्वाचे असतात. असेच आपणही आपल्या जीवनातील क्षणांचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे.
६. . "Let me light my lamp," says the star, "And never debate if it will help to remove the darkness."
एक तारा म्हणतो," मला माझा दिवा पेटवू दे. तो अंधार दूर करेल किंवा नाही याबद्दल वाद नको." म्हणजेच या ठिकाणी गुरुदेव आपल्याला कृतीचे महत्त्व सांगत आहेत. कृतीच्या परिणामांची पर्वा न करता आपण आपल्या परीने चांगले काम करीत राहावे.
७. "Where the mind is without fear and the head is held high..."
गुरुदेव अशा राष्ट्राची कल्पना करतात की ज्या देशात ज्ञान मुक्त असेल, व्यक्ती निर्भय असेल. जेथे जातपात, धर्म इ. भेदांच्या भिंती उभ्या नसतील. अशा देशात हे परमेश्वरा, तू माझ्या राष्ट्राला जाग येऊ दे. ( गुरुदेवांची गीतांजली या संग्रहातील प्रसिद्ध कविता Where the Head is held High...)
८. मनुष्याच्या अंतःकरणात माया आणि प्रेमाचे स्थान हे वंश, जाती, धर्म आणि देश यांच्यापेक्षा मोठे असते. ( ' काबुलीवाला ' या कथेत मांडलेला विचार )
९. शाळा म्हणजे केवळ अभ्यास नव्हे. ती माणूस घडवण्याची जागा असली पाहिजे. निसर्गाशी एकरूप होऊन शिक्षण घडले पाहिजे.
( शिक्षणावरील विचार - शांतिनिकेतन मधील भाषण )
१०. जीवनाचे अंतिम ध्येय हे आनंदात आहे, पण तो आनंद केवळ स्वतःपुरता नको. तो सर्वत्र व्यापणारा हवा. ( त्यांची विश्वकल्याणाचा विचार करणारी भावना यातून प्रकट झाली आहे )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
७/४/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा