उगवतीचे रंग
उद्याच्या आशेचे प्रसन्न चेहरे
काही दिवसांपूर्वी मी इस शहरमें हर शख़्स परेशान सा क्यूँ हैं या नावाचा लेख लिहिला होता हे आपल्याला आठवत असेलच. ते एका प्रसिद्ध आणि सुंदर अशा गजलेचे रसग्रहण होते असे म्हणता येईल. पण सुंदर गझल हा एक भाग सोडला तर ते पूर्णपणे खरं नाही. प्रत्यक्षात पाहिलं तर आपल्याला असंही म्हणावं लागेल की
“हर तरफ़ उदासी है मगर,
किसी कोने में कोई ख़ुशबू बाक़ी है अभी...”
इस शहर में कुछ लोग अब भी मुस्कुराते हैं –
हो, हे अगदी खरं आहे…
आणि हीच या काळया ढगाची रुपेरी किनार आहे. त्या प्रसिद्ध गजलेतील शब्द आहेत
“इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है..?
शहराच्या गर्दीत, आवाजात, आणि झगमगाटात हरवलेले चेहरे…
पण त्या सगळ्यांच्या मध्ये,
अजून काही चेहरे आहेत — जे अजूनही हसतात.
काही लोक अजूनही रस्त्यावरच्या झाडांना पाणी घालतात,
काही अजूनही अनोळखी माणसांना ‘नमस्कार’ करतात,
काही अजूनही पुस्तकांच्या शेवटच्या पानात आशा शोधतात.
कसलीही शंका न घेता मदतीचा हात देणारे.
ही बघा काही उदाहरणे...
एका गर्दीच्या रस्त्यावर स्कूटर घसरते,
अनेक जण केवळ बघतात, कोणी आपल्या कॅमेऱ्यातून फोटो काढण्यात व्यस्त आहे. पण एक जण उभा राहतो.
मदतीसाठी.
पडलेल्यांना सावरतो. त्यांना दवाखान्यात नेण्यासाठीची व्यवस्था करतो.
शहरात अजूनही असे लोक आहेत,
जे दुसऱ्याला हात देताना ' मला वेळ नाही ' हे विसरतात. अडलेल्यांना हात देण्यासाठी त्यांच्याकडे असतोच तेवढा वेळ... किंबहुना आपल्या व्यस्त दिनक्रमातून ते तेवढा वेळ इतरांसाठी देतात. कोणतीही खळखळ न करता...
उन्हाळ्याच्या दिवसात समोरच्या टेकडीवरील झाडे जेव्हा उष्णतेने करपून जायला सुरुवात होते तेव्हा हेच हात दूरवरून पाणी आणून त्या वृक्षांना जीवन देतात. एकदा ही झाडे जगवली की पावसाळ्यात ते फुलून येतात हिरवीगार होतात आणि त्या वृक्षांकडे पाहून ही माणसे देखील फुलून येतात, हिरवीगार होतात, आनंदी होतात. अगदी त्या वृक्षांसारखी...!
एका कॉलनीत एक गृहिणी, रोज सकाळी स्वतः झाडू घेऊन रस्त्यावर उतरते. तिथे लक्ष्मीचा हात फिरतो तिच्या रूपाने.
तिची कुणी तारीफ करत नाही,
पण तिच्या जागेवर सकाळ थोडी उजळते. तीच सकाळ तिचं आयुष्यही उजळते. आपल्या सभोवती असणाऱ्या अस्वच्छतेचा घाणीच्या अंधाराचा आपल्या परीने नायनाट करून स्वच्छतेचा प्रकाश उजळणारे कितीतरी हात आपल्या अवतीभवती आपल्याला दिसतात..
कोण म्हणतं की स्वच्छता ही फक्त सरकारी गोष्ट आहे?
जय वेळी प्रत्येकाच्या हातात फक्त मोबाईल असतो आणि जो तो त्यात मान घालून खाली पाहत असतो अशावेळी
लोकल ट्रेनमध्ये एक मुलगी शांततेने एखादं पुस्तक वाचताना दिसते.हळूच एखादी ओळ वाचून स्वतःशी हसते. ती पुलं वाचत असेल किंवा वपु किंवा गुलजारांची रसीली शायरी..
तीच उद्याची आशा असते.
कोण म्हणतं की शहरात भावना मरतात ? इस शहर में कुछ जिंदादिल इंसान अभी भी जिंदा है...
रस्त्यावर सकाळच्या वेळी इडली चटणी विकणारी आजी...
ती फारसं काही कमवत नाही,
पण जेव्हा एखादं लहान मूल ‘आई भूक लागलीये’ असं म्हणतं,
ती एक गरम इडली चटणी त्याच्या हातात ठेवते —
पैसे ? मूल विचारतंही नाही, ती सांगतही नाही. दिले तर घेते पण त्या मुलाच्या खाण्यात तिला जास्त आनंद असतो.
कधी काळी हरवलेले, आयुष्यात वाट चुकलेले, इतरांचं तसं होऊ नये म्हणून स्वतःच्या खर्चाने इतरांना वाट दाखवतात. त्यासाठी त्यांचा वेळ, पैसा, श्रम खर्ची घालतात...
स्वतः अनाथ असून अनाथ मुलांसाठी वस्तीगृह चालवतोय संतोष गर्जे...
स्वतः अंध असूनही अंध विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांच्यासाठी वस्तीगृह चालवतात राहुल देशमुख...
स्वतः अपंग असून इतर अपंगांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करते मीनाक्षीताई निकम...
एक तरुण, जो कधी काळी नैराश्याच्या गर्तेत जीवन जगत होता...
तो आज दुसऱ्यांसाठी मेंटल हेल्थ सपोर्ट ग्रुप चालवतो.
तो म्हणतो, “मी तळ पाहिलाय. आता दुसऱ्यांना वर कसं यायचं ते शिकवायचं आहे.”
माहिती आहे का या साऱ्यांमधलं साम्य काय आहे?
हे सगळे लोक... “आशा” आहेत.
हे शहर कदाचित बदलणार नाही, पण त्या बदलाच्या शक्यतेला जिवंत ठेवणारी आशा ते आहेत.
हे लोक प्रेक्षणीय नाहीत – पण प्रेरणादायी आहेत.
त्यांच्याकडील ऊर्जा, आशा आणि सकारात्मकता इतरांना देण्यासाठी ते तयार आहेत... फक्त घेणाऱ्या हातांची कमी आहे.
हो,
या शहरात झगमगाट आहे, धावपळ आहे, ताण आहे...
पण
या शहरात अजूनही खूप सारे लोक आहेत, जे शांतपणे, हळुवारपणे,
एक छोटंसं जग उभं करत आहेत —
कुठल्याही आरडाओरडीशिवाय. त्यांना त्याची जाहिरात करायची नाही. त्यांना प्रसिद्धी नको आहे. त्यांना कोणी चांगलं म्हटलं नाही तरी ते त्यांचं काम करत राहतात. त्यांना कुठलीही मोबदल्याची अपेक्षा नाही. पण चेहरे बघा हसतमुख आहेत, प्रसन्न आहेत...
कधी रस्त्यावरून जाता - येताना
असं एखादं साधं हसरं व्यक्तिमत्व दिसलं
तर थांबा —
त्यांच्याकडे बघा. ते सांगतील तुम्हाला...
बाबांनो, सगळंच काही अजून संपलेलं नाही...
उद्या भविष्याची सोनेरी पहाट उगवणार आहे हे ते तुम्हाला सांगतील.
आणि हो, असं अजिबात समजू नका की...
इस शहरमें हर शख़्स परेशान सा क्यूँ हैं...
कारण -
" इस शहर में कुछ लोग अब भी मुस्कुराते हैं…किसी कोने मे खुशबू अब भी बाकी है उसी की ये महक है...! "
तुमच्या अवतीभवती असे लोक तुम्हाला दिसतात का ? तुम्हाला आवडेल का असं इतरांसाठीची ' आशा ' व्हायला ?
कदाचित त्यातले एक तुम्हीही असाल. किंवा तसं व्हावंसं तुम्हाला नक्की वाटेल.. हो ना ?
फक्त तुम्ही ' त्या ' दृष्टीने बघा.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२९/४/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा