मुख्य सामग्रीवर वगळा

अस्वस्थ आत्मे

उगवतीचे रंग

अस्वस्थ आत्मे...

सध्या कोणालाच थांबायला वेळ नसतो आणि कोणीच अजिबात धीर धरायला तयार नसतो याची अनेक उदाहरणे मला अनुभवाला आली आणि येतात. तुम्हालाही ती तशी येत असतील. माझ्या घरासमोर काही छोटी शाळेत जाणारी मुले राहतात. सकाळी त्यांना शाळेत नेण्यासाठी ज्या रिक्षा आणि बस येतात त्या लांबूनच हॉर्न वाजवत येतात. त्या गाड्यांचे हॉर्न एवढे मोठे आणि कर्कश आहेत की लांबूनच ते ऐकू येतात. तरी एकदा वाजवून ते थांबत नाहीत. ते त्या मुलाच्या घराजवळ आले की तो मुलगा येईपर्यंत पुन्हा पुन्हा हॉर्न वाजवत राहतात. एक दूधवालाही त्याच प्रकारातला. तोही लांबूनच हॉर्न वाजवत येतो. आपण घरातून भांडे घेऊन येईपर्यंत त्याला दम निघत नाही. पुन्हा पुन्हा तो हॉर्न वाजवत राहतो. 

एके दिवशी समोरचा एक मुलगा माझ्याकडे माझ्या झाडाचे लिंबू मागायला आला. मुलगा छोटा होता. ९- १० वर्षांचा असेल. तो आला त्यावेळी माझ्या घराचे दार बंद होते आणि मी वॉशरूमला गेलो होतो. घरी दुसरे कोणीच नव्हते. तेवढ्या दोन मिनिटात मी दार उघडेपर्यंत त्याने तीन ते चार वेळा सलग बेल वाजवली. बाहेर कोण आले आहे आणि एवढे अर्जंट कोणाचे काय काम आहे हे समजायला काही मार्ग नव्हता. त्यामुळे बाहेर आल्यावर मी त्या मुलाला जरा रागावलोच. त्याला म्हणालो, " बाळा, जरा थांबायचं ना. आतमधून येण्यासाठी काही वेळ लागतो. " 

या आणि अशा अस्वस्थ आत्म्यांमुळे रस्त्यावर चालणे सुद्धा अवघड झाले आहे. आपण पायी चालत असू की वाहनावर. पाठीमागून येणाऱ्यांना अजिबात धीर नसतो. पुढच्या माणसाने आपल्याला लगेच जाण्यासाठी साईड द्यावी असे त्यांना वाटत असते आणि अस्वस्थ होऊन जोरजोरात ते हॉर्न वाजवत असतात. या तरुण मुले आघाडीवर आहेत त्यांच्या गाड्यांना त्यांनी मोठे आणि कर्कश हॉर्न बसवले आहे आणि थांबण्याची अजिबात तयारी नसते. एवढी घाई करून त्यांना कुठे जायचे असते कोणास ठाऊक ? कोणी जर त्यांना काही बोलले तर लागलीच हाणामारीवर येतात. 

एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे लगेच पाहिजे. थोडीशीही थांबायची तयारी नसते. लहान मुले मोबाईल द्यावा म्हणून हट्ट करतात. त्यांना थोडा वेळ थांबायला सांगितले तर धीर नसतो. अशी खूप उदाहरणे आपल्या अवतीभवती असतात. याबाबतीत केवळ लहान मुलांना दोष दिला पाहिजे असे नाही. बऱ्याच वेळा मोठ्या माणसांनाही अलीकडे धीर नसतो किंवा थांबायची तयारी नसते. आपले काम लगेच झाले पाहिजे असे त्यांना वाटते. पूर्वीची माणसं म्हणायची, " जरा दमानं घे." दमानं म्हणजे हळू. दमानं यात दम हा शब्द आहे. दम म्हणजे श्वास. जरा थांबा, श्वास घ्या. पण श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही, एवढी घाई असते. बऱ्याच सिग्नल्सच्या चौकात ' थांबा, पहा आणि पुढे जा 'असे लिहिलेले असते. त्याचा अर्थ हाच असतो की आपण जागरूकतेने आजूबाजूला पहावे आणि मगच पुढे जावे. पण तसे होत नाही आणि म्हणूनच अपघातांना निमंत्रण मिळते. आणि ज्या चौकात पोलीस नियंत्रणासाठी नसतात तेथील नागरिकांचे हाल तर काही विचारूच नका ! जणू काही कोण पुढे जातो याची शर्यत लागलेली. 

चोरी, दरोडे घालणारी माणसे किंवा खून करणारी माणसे, स्त्रियांवर अत्याचार करणारी माणसे यांनी त्या क्षणाला थांबून जर एक दोन मिनिट विचार केला तर त्यांच्या हातून घडणाऱ्या आणि आयुष्यभर पश्चाताप देणाऱ्या घटना टळू शकतात. क्षुल्लक कारणांवरून निराश होऊन कोणी आत्महत्येला प्रवृत्त होते. त्यांचे प्रश्न गंभीर नसतात असे मला म्हणायचे नाही. आत्महत्या करण्यामागे तसेच काहीतरी कारण असू शकते पण तरीही अशा वेळी थोडे थांबून विचार केला तर...? तो क्षण निघून गेला तर अशा घटना टळू शकतात. कोणीतरी कोणावर प्रचंड संतापतो आणि त्या रागाच्या भरात त्याच्याकडून नको ती कृती घडते. या क्षणी थोडं थांबून विचार केला तर...?

मागे एका पुस्तकात मी एक गोष्ट किंवा खरोखर घडलेला तो प्रसंग असावा, वाचला होता. दोन जिवलग मित्र असतात. खेडेगावातच त्यांचे प्राथमिक शिक्षण होते. त्यांच्यापैकी एक मित्र फारसा शिकू शकत नाही. तो शेती करतो आणि त्याची परिस्थिती गरिबीचीच राहते. दुसरा मित्र मात्र शहरात जाऊन उच्च शिक्षण घेतो आणि आपल्या हुशारीच्या जोरावर अधिकारी होतो. पुढे एक वेळ अशी येते की तो मुख्यमंत्र्यांचा पीए होतो. ही गोष्ट जेव्हा त्या खेड्यात राहणाऱ्या मित्राला कळते, तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि तो त्याला भेटण्यासाठी मुंबईला त्याच्या कार्यालयात जातो.

त्या मुख्यमंत्र्यांच्या पीएला भेटण्यासाठी अनेक लोक आलेले असतात. भेटण्यासाठी आलेल्या त्या लोकांना बाहेरच्या दालनामध्ये थांबवून ठेवले जाते. आणि एक एक करून मध्ये बोलावले जाते. हा सुद्धा तेथील सेवकामार्फत एक चिठ्ठी पाठवतो. त्याला असे वाटते की आपले नाव पाहून तो मित्र लगेच भेटायला बोलवेल. परंतु तो सेवक निरोप आणतो की साहेबांनी तुम्हाला थांबायला सांगितले आहे. त्यांचे काम झाल्यानंतर ते तुम्हाला भेटणार आहेत.  हा मित्र थोडा निराश होतो तेथील बरेच लोक आतमध्ये जाऊन त्याच्या मित्राला भेटून येतात. त्याच्यानंतर आलेले लोक सुद्धा आत मध्ये जाऊन त्याला भेटून येतात. आता हा खूपच चिडतो. त्याला वाटते की आपल्या मित्राला त्याच्या पदाचा गर्व झाला आहे, म्हणून तो आपल्याला विसरला किंवा आपल्याकडे दुर्लक्ष करतो आहे. असा विचार करून तो परत जाण्यासाठी निघणार तेवढ्यात त्याला निरोप येतो आणि आत बोलावले जाते.

आत गेल्याबरोबर त्याच्या मित्राला खूप आनंद होतो आणि तो अतिशय प्रेमाने त्याला मिठी मारतो आणि म्हणतो," मित्रा, मला तुझ्याशी निवांत बोलायचे होते म्हणून सगळे गेल्यावर मी तुला बोलावले. आता आपण जेवायला जाऊया. इतका वेळ आपल्या मित्रावर नाराज असलेला हा मित्र मग आनंदी होतो. त्याला वाटते उगीचच आपण गैरसमज करून जाण्याची घाई करत होतो. मग तो मित्र त्याच्या मुलाची चौकशी करतो. त्याला जेव्हा कळते की आपल्या खेड्यातील या मित्राचा मुलगा उत्तम शिक्षण घेऊन इंजिनियर झाला आहे परंतु त्याला अद्याप नोकरी नाही. तेव्हा तो आपल्या ओळखीच्या एका ठिकाणी फोन करतो आणि आपल्या मित्राला म्हणतो उद्या तू अमुक अमुक ठिकाणी तुझ्या मुलाला पाठवून दे त्याच्या नोकरीचे काम होईल. 

आता तर त्या मित्राच्या डोळ्यातून अश्रूंनी दाटी केलेली असते. तो म्हणतो की मी तुझ्याबद्दल गैरसमज करून निघून जाणार होतो. परंतु तू किती मोठ्या मनाचा आहेस हे मला आता समजले. तो मित्र न थांबता गैरसमज करून निघून गेला असता तर...?

साईबाबांनी लोकांना दोनच शब्दात उपदेश केला. ते दोन मोलाचे शब्द म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. हे दोन शब्द किंवा दोन मूल्ये जीवनात खूप महत्त्वाची आहेत. सबुरी म्हणजे थांबणे. थोडं थांबून वाट पाहणे. हिंदीतही सब्रका फल मीठा होता है... असे आपण म्हणतो.म्हणून थोडं थांबण्याची सवय लावायला हवी. प्रत्येक वेळी थांबले पाहिजे असेही नाही. पण जीवनातील अनेक प्रसंग आपल्या संयमाची परीक्षा घेत असतात. या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे तर शांत राहायला, मनावर ताबा ठेवायला शिकले पाहिजे. अस्वस्थ होता कामा नये. मुलांना सुद्धा लहानपणापासून ही शिकवण दिली पाहिजे. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२८/४/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...