उगवतीचे रंग
एक अजरामर कव्वाली : निगाहें मिलाने को जी चाहता है...
' राज की बात हैं ...' अशी सुरुवात करत आपल्या काळजात रुतून बसणारी ही कव्वाली. प्रेमाच्या तरल, रेशमी, हळुवार भावनांचा स्पर्श वाऱ्याच्या एखाद्या मंद झुळकेसारखा आपल्या हृदयाला स्पर्श करून जातो. ' जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा ...' त्यासारखा हा वारा अवखळ नाही. कपाळावरील बटांना हलकेच स्पर्श करून आपल्या प्रेमाचा गंध घेऊन येणारा हा अनिल ! १९६३ मध्ये आलेल्या ' दिल ही तो हैं ' या चित्रपटातील ही अजरामर कव्वाली. आशा भोसलेंचा लडिवाळ, खट्याळ आणि काहीसा बंडखोर स्वर !त्यातली गोडी अवर्णनीय ! पडद्यावर सादर करणारी अभिनेत्री नूतन. नैसर्गिक सौंदर्य आणि तेवढाच नैसर्गिक अभिनय. म्हणूनच ' नित्यनूतन '. आशाताईंच्या स्वरातली मधाळ गोडी आणि नूतनचं सादरीकरण याचं मिश्रण इतकं एकजीव झालंय की मस्त घट्ट बासुंदीच तयार झाली. वाटी उचलावी आणि सरळ तोंडाला लावावी.
साहिर लुधियानवी यांच्या जादुई शब्दांना सुरांचा साज चढवला आहे संगीतकार रोशन यांनी. इतकं सुंदर संगीत आणि चाल दिली आहे की गाणं खरोखरीच ' रोशन ' झालं आहे. रोशन स्वभावाने साधेसरळ आणि कमालीचे भिडस्त होते. आपल्या गाण्यांचे पैसे देखील मागायला त्यांना संकोच वाटत असे. पण दैवी प्रतिभा लाभलेला हा जातिवंत संगीतकार. शंकर जयकिशन, मदन मोहन यांच्या तोडीचा हा संगीतकार. पण दुर्दैवाने त्यांना म्हणावी तेवढी प्रसिद्धी आणि पैसा लाभला नाही. त्यांच्या वाटयाला काहीशी उपेक्षाच आली. पण त्यांनी ज्या ज्या गाण्यांना स्पर्श केला, त्याचं सोनंच केलं. हे गाणं म्हणजे त्यातीलच एक सुवर्णालंकार !
आधी सुरुवातीचा तो गोड आलाप आणि मग आशाताईंनी ' राज की बात हैं , महफिल में कहें या न कहें हे शब्द उच्चारले की जणू गुलकंदी विड्याचं पान तोंडात ठेवावं आणि पुढे ते पान अधिकाधिक रंगत जावं आणि त्याची गोडी अधिक वाढावी, तशी ही कव्वाली उत्तरोत्तर रंगत जाते हेच संगीतकार आणि गायिकेचं कसब आहे.
"दिल-ओ-जान लुटाने को जी चाहता है"
येथे प्रेमाचा पराकाष्ठेचा भाव आहे. केवळ भावना नाही, तर आपले सर्वस्व अर्पण करण्याची तयारी. प्रेम म्हणजे सौदा नव्हे, तर सर्वस्वाचा समर्पण आहे, हे साहिर यांनी फारच हळुवारतेने मांडले आहे. संवादिनीचे सूर, तबल्याचा ठेका, बासरी यासारखी मोजकीच वाद्ये आणि त्याजोडीला आशाताईंनी साधलेली लय यांचे एक अजब रसायन तयार होते आणि आपण गाण्यात सुरुवातीपासूनच हरवून जातो. हात आणि पाय संगीतावर कोणी न सांगता ठेका धरतात. मान आपोपाप डोलू लागते. हीच या गाण्याची जादू आहे. शास्त्रीय संगीतातील लोकप्रिय कल्याण अर्थात यमन रागात हे गीत आपल्यापुढे सादर होतं. संध्याकाळी किंवा रात्रीच्या पहिल्या प्रहरात हा राग गायिला जातो. हा राग म्हणजे संवेदनशीलतेचं, कोमल प्रेमाचं आणि अध्यात्मिक शुद्धतेच एक सुंदर संगीतमय रूप आहे. हा राग आपल्या मनात एखादा संथ पण झुळझुळू वाहणारा झरा किंवा रात्रीच्या कोवळ्या गार वाऱ्याच्या स्पर्शाची अनुभूती देतो.
' निगाहे मिलाने को जी चाहता हैं...' ही ओळ म्हणजे या गीताचा आत्मा. प्रेमाची पहिली पायरी.किती नाजूक आणि तरल भावना ! कुणाबद्दल मनात पहिल्यांदा प्रेम उत्पन्न झालं की ' त्याच्याशी ' कधी नजरभेट होईल यासाठी जीव आसुसलेला असतो. ' तो ' भेटला की नजरानजर व्हावी ही मनातील सुप्त इच्छा. आणि एकदा अशी समोरासमोर भेट झाली की मग ' निगाहें ' तर मिळणारच. तेथून नजर हटायलाच तयार होत नाही. आणि मग या गीताच्या पुढच्या कडव्यांमध्ये ' त्याच्या ' भेटीची गोडी, खुमारी, लज्जत यांची जी काही बहार येते ती लाजवाब ! हे गाणं पडद्यावर पाहताना रसिकाची अवस्था देखील अशीच होते. त्याचीही ' निगाह ' दृश्यावरून हटत नाही.
पुढचं कडवं तर मास्टरपीस म्हणावं असं. या ओळीत शायर म्हणतो
वो तोहमत जिसे इश्क कहती हैं दुनिया
वो तोहमत उठाने को जी चाहता हैं...
खरंच लोक प्रेमाला काय काय म्हणतात ! आळ असेल, दोषारोप असेल, कुभांड असेल किंवा अगदी अपराध असू दे वा जोखीम. हे सगळे म्हणजे तोहमत आणि ही तोहमत म्हणजेच जर इश्क असेल तर ती आम्हाला मंजूर आहे ! ' उखळात दिले शीर काय आता ' घाव एक पडो की दोन. सोसण्याची तयारी आहे.
या प्रेमातली गोडी काय वर्णावी ! अहो, रागावण्या-रुसण्यात सुद्धा गोडी आहे. कारण रागावून बसलं की ' तो ' ज्या पद्धतीने मनवतो किंवा समजावतो ना, ती सुद्धा लाजवाब आहे.
किसी के मनाने में लज्जत वॊ पायी
के फिर रुठ जाने को जी चाहता हैं ...
म्हणून तर ' त्याने ' समजूत घालावी आणि आपण पुन्हा पुन्हा रुसून बसावं. त्यातली गोडी अनुभवल्याशिवाय थोडीच कळणार !
' त्याच्या नुसत्या चेहऱ्याचं दर्शन झालं तरी मनात एक अनोखी प्रेमाची जी कातर भावना निर्माण होते ना, ती शब्दात वर्णन करणे अशक्यच...! शायर म्हणतो
वो जलवा जो ओझल हैं, वो सामने भी
वो जलवा चुराने को जी चाहता हैं ...
त्याचं देखणं रूप ( जलवा ) इतकं मोहवणारं आहे की ते अस्पष्ट ( ओझल ) असलं तरी, चोरून हृदयात साठवून ठेवावं. तो समोरच आहे. पण त्याच्या रूपाचं, सौंदर्याचं पुरेसं आकलन करायला मी असमर्थ आहे. म्हणून ' त्याला ' चोरून, त्याच्याही नकळत हृदयात साठवून ठेवावं. जलवा, ओझल यासारखे जे मूळचे हिंदी किंवा उर्दू शब्द आहेत, त्यांची गोडी लाजवाब ! ते त्याच भाषेत तसेच समजून घ्यावे.
जिस घड़ी मेरी निगाहों को तेरी दीद हुई वो घड़ी मेरे लिए ऐश की तमहीद हुई जब कभी मैंने तेरा चाँद सा चेहरा देखा ईद हो या के ना हो, मेरे लिए ईद हुई
ज्या क्षणी माझ्या नजरेला तुझं दर्शन झालं ना, तेव्हापासून माझ्या आनंदाच्या पर्वाला सुरवात झाली. तुझा चंद्रवदन असणारा चेहरा पाहिला आणि जणू मला ईदच्या चंद्राचं दर्शन झालं. तुझ्या चेहऱ्याचं दर्शन म्हणजेच माझ्यासाठी ईद ! किती समर्पण भाव आणि एकरूपता !
मुलाक़ात का कोई पैगाम दीजे के छुप-छुप के आने को जी चाहता है और आके न जाने को जी चाहता है निगाहें मिलाने को जी चाहता है
आता ' त्याच्या ' शिवाय राहणे तिला अशक्यच ! जणू ' मम हृदयी दर्या उसळला प्रीतीचा ! ' हा प्रेमभावनांचा सागर उफाळून आला आहे. त्याच्या भेटीला उघडउघड जाणे तर लोकलाजेस्तव शक्य नाही. मग त्यानेच काहीतरी कारण सांगावं किंवा इशारा द्यावा ( पैगाम ) . त्याच्या एका इशाऱ्यावर ती धावून जायला तयार आहे. या गझलेची अधिक माहिती किंवा अर्थ सांगण्यापेक्षा ती ऐकून तिचा आनंद घ्यावा हे अधिक चांगले.
या कव्वालीत आशाताई केवळ गात नाहीत, त्या जणू एका लाजऱ्या प्रेमिकेच्या अंतःकरणातल्या भावना जिवंत करतात. त्यांच्या आवाजात एक नाजूक कंप आहे — जसा मनात कुणाची चाहूल लागल्यावर नकळत श्वास थोडा विस्कळीत होतो. त्यांच्या प्रत्येक स्वरात, उच्चारात, एक गहिरं प्रेम आहे, पण त्यात एक 'न सांगता येण्यासारखी' हळुवार झाकही आहे. इथे प्रेमाचं थेट प्रदर्शन नाही. ते जणू तरल नाजूक धुक्याच्या पडद्यासारखं आहे — दिसतं, पण हाताने पकडता येत नाही. प्रत्येक शेर जणू प्रेमाच्या वेगवेगळ्या छटांचे तरल फुल आहे — कुठे आसक्तीचे, कुठे समर्पणाचे, कुठे विरहाच्या गोड दुःखाचे. इथे मनातील प्रणयभावना सरळसरळ न येता त्या अवगुंठित स्वरूपात येतात, त्या सूचक आहेत. म्हणूनच त्यांचे सौंदर्य अधिक वाढले आहे.
कवीने गझलेत वापरलेला विरोधाभास मजा आणतो. म्हणजे बघा, इश्क म्हणजे तोहमत आहे, पण तरीही ' वो तोहमत उठाने को जी चाहता हैं .. फिर रुठ जाने को जी चाहता हैं... आके न जाने को जी चाहता हैं .. एका प्रेमिकेच्या मनात उठणाऱ्या नाजूक भावना चित्रित करणे तसे अवघडच ! पण साहिर यांनी हे आव्हान सहज पेलले आहे. आणि त्यांच्या शब्दाचे सोने केले आहे संगीतकार रोशन आणि आशाताईंनी. इसलिये बार बार ये गाना सुननेको ' जी चाहता हैं ...! '
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२८/४/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा