उगवतीचे रंग
शब्दांची गुंतवणूक
शब्दांची गुंतवणूक ? आश्चर्य वाटले ना ! गुंतवणूक पैशाची होते, सोन्याची होते किंवा शेती, घर, जमीन यासारख्या मालमत्तेची होते पण शब्दांची गुंतवणूक कशी शक्य आहे ? तर संत तुकाराम महाराज म्हणतात
आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥१॥ शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका ||२|| तुका म्हणे पहा शब्दचि हा देव | शब्दचि गौरव पूजा करु ॥३॥
शब्द इतके मौल्यवान आहेत की शब्दांनाच ते रत्न म्हणून संबोधतात. जेव्हा समाजाला काही सांगण्याची वेळ येईल, त्यावेळी त्याच शब्दांचा शस्त्र म्हणून आम्ही वापर करू. शब्दच आमचे जीवन आहेत आणि हेच शब्दरूपी धन आम्ही लोकांना वाटू. शब्द हेच परमेश्वर आहेत असे सुंदर विचार या अभंगात तुकाराम महाराज व्यक्त करतात.
२३ एप्रिलला आपण जागतिक पुस्तक दिन साजरा करतो. तर शब्दात म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या पुस्तकात आपण ही गुंतवणूक करतो का ? हा प्रश्न या निमित्ताने मनात आला. पुस्तकांमध्ये मोठे विचारधन दडलेले आहे. परवा सहज ' चिकन सूप फॉर द सोल ' हे पुस्तक वाचत होतो. त्यात एक सुंदर कथा वाचायला मिळाली.
एक समाजशास्त्राचे प्राध्यापक असतात. ते आपल्या विद्यार्थ्यांना एका झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांचा सर्वे करायला सांगतात. त्या झोपडपट्टीत साधारणपणे २०० मुले राहत असतात. ही कॉलेजमधील मुले जाऊन त्या भागाचा सर्व्हे करतात. त्या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या भेटी घेतात आणि आपला अहवाल सादर करतात. त्यांच्यापैकी बहुतेक विद्यार्थी असे लिहितात की ही झोपडपट्टीतील मुले सुधारण्याची फारशी शक्यता नाही. आपल्या आयुष्यात ते फार पुढे जाऊ शकणार नाहीत किंवा प्रगती करू शकणार नाहीत. प्रत्येक जण आपल्या अहवालात अशाच प्रकारचे नकारार्थी मत मांडत असतो.
पुढे आणखी २५ वर्षानंतर त्या महाविद्यालयात दुसरे प्राध्यापक येतात. ते आपल्या विद्यार्थ्यांना २५ वर्षांपूर्वी आधीच्या विद्यार्थ्यांनी ज्या मुलांचा सर्व्हे केला होता, त्यांची काय परिस्थिती आहे किंवा आता ते काय करीत आहेत हे पाहून यायला सांगतात. आता त्या २०० मुलांपैकी साधारण वीस मुले तेथे नसतात. काही मुले काही कारणाने बाहेर गेलेली असतात, कोणाचा मृत्यू झालेला असतो. उरलेल्या १८० विद्यार्थ्यांपैकी बरेच विद्यार्थी मात्र चांगले शिकतात. काही पदवी परीक्षेपर्यंत पोहोचतात तर काही डॉक्टर वकील इंजिनियर होतात, काही चांगल्या अधिकार पदावर काम करताना आढळून येतात. हे सगळे पाहून त्या प्राध्यापक महोदयांना मोठे आश्चर्य वाटते. जी मुले आयुष्यात काही करू शकणार नाहीत किंवा त्यांच्यापैकी बरेचसे जण गुंड किंवा गुन्हेगार होतील असे वाटत असताना ही आश्चर्यकारक सुधारणा कशी काय झाली याचे नवल त्यांना वाटते.
ते त्याबद्दल अधिक चौकशी करतात तेव्हा त्यांना असे आढळून येते की त्या मुलांना शिकवणाऱ्या एका शिक्षिकेचे मोठे योगदान याबाबतीत आहे आणि त्या शिक्षिका अजूनही जिवंत आहेत. ते त्या शिक्षिकेला भेटण्यासाठी जातात आणि हा आश्चर्यकारक बदल तुम्ही कसा घडवून आणला असे त्यांना विचारतात. तेव्हा ती शिक्षिका फार सुंदर उत्तर देते. ती म्हणते, " मी मुलांना फक्त प्रेम दिले मग मुले आपोआप शिकत गेली. "
म्हटलं तर ही गोष्ट तशी साधीच आहे पण खूप काही सांगून जाणारी आहे. ही गोष्ट मला त्या पुस्तकात वाचायला मिळाली आणि त्या गोष्टीने एक नवीन दृष्टिकोन मला दिला. अशा सुंदर गोष्टी, सुंदर विचार आणि सुंदर दृष्टिकोन केवळ पुस्तकं आणि पुस्तकच देऊ शकतात !
शब्द हे पाण्यासारखे प्रवाही असतात – वाहत राहिले, तर जीवन देतात. पण आज आपल्या समाजात ही जीवनदायी गंगा कोरडी पडत चालली आहे याची खंत वाटते.
"काही शब्द मनात पाझरतात... आणि कधी कधी, संपूर्ण आयुष्याचं सारच त्या पाझरातून वाहतं. कारण त्या अनुभवातून आलेल्या असतात एखादी नदी जशी आपल्या काठावरील प्रदेशाला समृद्ध करीत जाते तसेच ते अनुभवाच्या पाझरातून आलेले शब्द वाचणाऱ्याचे जीवन समृद्ध करण्यासाठी सक्षम असतात.
वाचन, ही एकेकाळी घराघरातली संस्कृती होती – जणू चहा पिण्यासारखीच एक अनिवार सवय. पण आता, केवळ परीक्षा डोळ्यांसमोर ठेऊन पुस्तकं उघडली जातात. मनानं वाचणं, त्यातून मनुष्य होणं, हे कुठेतरी मागे पडलंय.
एक काळ होता, जेव्हा शाळेच्या सुट्टीत ग्रंथालयात रांगा लागायच्या. 'किर्लोस्कर', 'सत्यकथा', 'मेनका', 'जाणिवा' हे अंक म्हणजे केवळ मासिके नव्हती तर ती काळाचा आरसा होती. अमृत, सत्यकथा, किशोर, साधना यासारख्या मासिकांवर मुले आणि वाचक तुटून पडत असत. अलीकडच्या काळात ' छात्र प्रबोधन ' सारख्या मासिकाने देखील ही उणीव बऱ्याच प्रमाणामध्ये भरून काढण्याचा प्रयत्न केला. आता मनशक्ती सारखी मासिके देखील चांगल्या गोष्टी आणि चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पण हे सगळे प्रयत्न कुठेतरी कमी पडत आहेत असे वाटते. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आज वाचन ही एक ‘गुंतवणूक’ वाटत नाही – ती एक ‘झपाट्याने पार पाडायची गोष्ट’ झाली आहे.
पुस्तकं ही केवळ माहिती देत नाहीत – ती आत्म्याशी संवाद साधतात. प्रत्येक वाचकाला कधी ना कधी एखादं पुस्तक सापडतं, जे त्याचं जीवन घडवतं. ते पुस्तक एका वळणावर त्याला थांबवतं – विचार करायला लावणारं, अंतर्मुख करणारं.
स्टीफन हॉकिंग यांना वैज्ञानिक जगाच्या गाभ्यात पोहोचवणारं बळ, हे शालेय वयात वाचलेल्या पुस्तकांतून मिळालं. अण्णा हजारे यांच्या मनात नैराश्यामुळे, आत्महत्येचे विचार आले होते परंतु स्वामी विवेकानंदांचे पुस्तक वाचल्यानंतर त्यांचे नैराश्य दूर झाले आणि त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडून आला.
मलाला युसुफजाई, जी वयाच्या तेराव्या वर्षी बंदुकीच्या गोळीला सामोरी गेली, तिच्या संघर्षात जो आत्मविश्वास होता – तो तिच्या वाचनातून आलेला होता. ती म्हणते, “A book, a pen, a child, and a teacher can change the world.” पुस्तकांमुळे जीवन बदलण्याची अशी खूप उदाहरणे आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुस्तकांनीच घडवले तर वाचनाच्या ध्यासातून डॉ कलाम एक प्रख्यात शास्त्रज्ञ झाले आणि राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले.
एकदा एका वृद्ध गृहस्थांनी गावातील प्राथमिक शाळेला भेट दिली. त्यांनी पाहिले की वर्गात केवळ ५ पुस्तकं आहेत. त्यांनी तेथील शिक्षकांना विचारले, "ह्या पुस्तकांतून ही मुलं काय शिकणार?"
शिक्षकांनी अतिशय छान उत्तर दिले, "ही मुलं फक्त पुस्तकं वाचत नाहीत, ती पुस्तकं जगतात."
त्या मुलांमध्ये एक रमेश असतो – जो दर संध्याकाळी दिवा लावून "शिवाजी महाराज" वाचतो. काही वर्षांनी तोच रमेश UPSC उत्तीर्ण होतो. कारण त्याचं स्वप्न पुस्तकांनी जागवलेलं असतं. सेवेचा आणि समाजाला पुढे नेण्याचा वसा तो घेतो.
शहरात वाचन कमी झालं असं वाटतंय पण अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ही क्रांती रुजते आहे असे अनेक उदाहरणांवरून दिसते...
गडचिरोली जिल्ह्यातील एका गावात ‘ चला पुस्तक घेऊन जाऊ या ’ नावाचा उपक्रम सुरू आहे – सायकलवरून पोहोचणारी फिरती लायब्ररी!
साताऱ्याच्या एका गावात महिला स्वतः ग्रंथालय चालवतात – कारण त्यांना समजलंय की ‘साक्षरता’ म्हणजे केवळ अक्षर ओळख नाही, ती जीवनशिक्षा आहे.
सध्या किंडल, ऑडिओबुक्स, पॉडकास्ट्स यांचं आगमन झालंय. काही मंडळी म्हणतात की यामुळे मूळ वाचन नष्ट होतंय. पण तसं म्हणता येणार नाही. कारण वाचन कुठून होतंय हे महत्त्वाचं नाही, कसं होतंय ते महत्त्वाचं आहे. जर एखादा तरुण मोबाईलवर पुलंची कथा ऐकत असेल, शिवाजीराव भोसले, प्रा राम शेवाळकर, अविनाश धर्माधिकारी किंवा अजून कोणी महान वक्ते वा लेखक यांची भाषणे ऐकत असेल तर त्या रूपाने वाचन संस्कृती अजूनही जिवंत आहे असे म्हणता येईल. फक्त माध्यम बदलले आहे.
आज प्रत्येक वाचकावर एक जबाबदारी आहे ... हा वसा आणखी पुढे नेण्याची... अजून कुणाला तरी वाचक बनवण्याची.
आईने मुलाला गोष्ट सांगणं, मित्राने मित्राला एखादं पुस्तक भेट देणं, शिक्षकाने वर्गात एखादं वाक्य वाचून विचारायला लावणं, विविध प्रसंगी पुस्तके भेट म्हणून देणे... ही छोटी पावलं मोठ्या क्रांतीचे बीज ठरू शकतात.
आमच्या चाळीसगाव येथील शेठ नारायण बंकट वाचनालयात आम्ही दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत मुलांसाठी वाचनाचा उपक्रम घेतो. त्यासाठी त्यांना जवळपास साडेसहा हजार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्यांनी फक्त वाचनालयात यायचे आणि ही पुस्तके वाचायची. त्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. एका वहीत त्यांनी आपण कोणती पुस्तके वाचली, त्यातील आपल्याला काय आवडले हे लिहून ठेवायचे त्या वह्या देखील आम्ही तपासणार आहोत आणि या उपक्रमात भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र दिले जाईल. त्याचप्रमाणे अत्यंत कमी शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना वाचनालयाचे सभासदही होता येते. या काळात त्यांच्यासाठी आम्ही मार्गदर्शनही करतो. वाचन संस्कृती त्यांनी जोपासावी आणि पुढे न्यावी यासाठी हे प्रयत्न असतात.
पुलं म्हणतात, " पुस्तकं ही शब्दांची मंदिरे असतात तिथं गेलं की मनाची प्रार्थना सुरू होते. "
तर जिम रॉन हा लेखक म्हणतो, "Reading is essential for those who seek to rise above the ordinary."
"मी जे काही आहे, ते वाचनामुळे आहे." असे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले आहेत.
पुस्तकाचं शेवटचं पान आपण वाचतो, आणि तरीही आपण तिथंच थांबत नाही. तिथून सुरुवात होते ती त्या पुस्तकाच्या कथेतील, विचारातील किंवा संदेशातील मर्म आपल्या मनामध्ये रुजायला.
वाचन हे ‘स्वतःला पुन्हा पुन्हा शोधण्याचं’ एक नितांतसुंदर साधन आहे.
आणि म्हणूनच...
आज एखादं पुस्तक खरेदी करा – " शब्दांची गुंतवणूक करा " आणि संत तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे ही शब्दांची रत्ने, शब्दांचे धन आपल्या घरी आणा आणि आपल्या मुलांना आणि समाजाला ते भरभरून वाटा.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२६/४/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा