मुख्य सामग्रीवर वगळा

अनोखे अंदमान - भाग सहा

 उगवतीचे रंग 

 अनोखे अंदमान – भाग ६

 जंगलाच्या छायेत – बारटांग बेट

दिनांक २५/२/२०२५. अंदमान मधील ठिकाणे पाहण्याचा आजचा हा शेवटचा टप्पा. या दिवशी आम्हाला सकाळी चार वाजताच उठून तयार राहायला सांगितले होते त्याप्रमाणे आम्ही आवरून तयार झालो. आमचा पुढचा प्रवास आता बसने होणार होता. साधारणपणे दोन तासांचा हा प्रवास होता. आम्ही निघालो तेव्हा अंधार होता परंतु लवकरच उजाडले. अंदमानमध्ये तसा सूर्योदय लवकर होतो. आणि आम्हाला लक्षात आले की आमची गाडी पोर्ट ब्लेअर शहर सोडून जंगलाच्या दिशेने धावत आहे. आजूबाजूला गर्द झाडी होती. रस्ता चांगला परंतु लहान होता आणि एवढ्या जंगलाच्या अंतर्भागातही वाहनांची येजा सुरू होती. 

सकाळी लवकर जंगलातील मार्गाने (Jarawa Reserve Forest) जाण्याचा अनुभव काही वेगळाच. विशेष शासकीय परवानगी, वेळेचं काटेकोर पालन आणि त्या रस्त्यावरची शिस्त – हे सर्व पाळत आम्ही हळूहळू आदिवासी भागातून पुढे जात होती. गाडीची आणि गाडीतील प्रवाशांची कागदपत्रे तपासून मगच वाहने पुढे जाऊ दिली जात होती. त्या ठिकाणी वाहनांची प्रचंड रांग होती पण कोणीही गडबड करीत नव्हते. उगीचच गाड्यांचे हॉर्न वाजवीत नव्हते. आम्हाला बराच वेळ थांबून आमचा नंबर येईपर्यंत वाट पाहावी लागली. 

आम्हाला आजूबाजूला जे हिरवेगार घनघाट असे जंगल दिसत होते, त्या जंगलाच्या अंतर्भागात जारवा आदिवासींची वस्ती आहे असे सांगितले गेले. हे आदिवासी अजूनही आपल्या पूर्वीच्याच आदिम अवस्थेत जगत आहेत. कोणत्याही प्रकारच्या सुधारणा किंवा विकास त्यांना मंजूर नाही. कोणा परकीय व्यक्तीचा आपल्या मुलुखात झालेला प्रवेशही त्यांना  चालत नाही. सरकार आणि तेथील स्थानिक प्रशासन सुद्धा या आदिवासींच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीने जीवन जगू द्यावे अशा प्रकारची भावना आढळते. आणि अर्थातच त्यांच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी ती गोष्ट योग्यच आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी किंवा व्हिडिओ शूटिंग करायचे नाही अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या होत्या.

इथे आम्ही जे दाट जंगल पाहत होतो, त्यामध्ये खूप उंच उंच वाढणारे गगनचुंबी वृक्ष आम्हाला आढळले. सूर्याचा प्रकाशही त्या जंगलामध्ये जमिनीपर्यंत क्वचितच पोहोचत असावा इतके ते दाट होते. हा प्रवास करताना वाहनात बसूनही त्या दाट जंगलाची, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पसरणाऱ्या हिरव्या चादरीची, आणि मधूनच दिसणाऱ्या आदिवासी झलकांची एक अलिखित कहाणी आपल्या मनात उमटत राहते. ते आदिवासी इथे कशाप्रकारे राहत असतील याची कल्पना आपण मनाने करत असतो. आमच्या सोबत असलेला प्रेम नावाचा स्थानिक गाईड आम्हाला येथील आजूबाजूच्या परिसराची माहिती देत होता.

रस्त्याने असलेला हा दोन तासांचा प्रवास त्या रम्य वातावरणात कधी संपतो ते कळत नाही. आता आमचा पुढील प्रवास बोटीने होणार होता. पोर्ट ब्लेअरच्या गजबजाटातून आपण बाहेर पडलो की अंदमानचे एक वेगळेच रूप समोर येते– शांत, रांगडे आणि गूढतेने भरलेले. हे निसर्गाचे आगळे वेगळे रूप एकाच वेळी आपल्याला आश्चर्यचकितही करते आणि प्रसन्नतेचा अनुभवही देते. आम्ही आता बारटांग बेटांवर पोहोचलो होतो. बारटांग बेट म्हणजे निसर्गाचं एक अनोखं नाट्यगृह, जिथं झाडांनी आच्छादलेल्या सावलीतून जाणाऱ्या वाटा, दलदलीचा सुगंध, आदिवासी संस्कृतीची छटा आणि जमिनीच्या गर्भातून उगम पावलेल्या गुहांची कहाणी या सगळ्या गोष्टींचे आपण साक्षीदार होतो.

बारटांगला पोहचल्यानंतर निसर्गाची खरी जादू सुरू होते – एक बांधलेला घाट, त्यावर उभ्या असलेल्या विविध होड्या, आणि समोर दिसणाऱ्या दलदलीच्या विस्तीर्ण पाण्याचे दृश्य. Limestone Caves पर्यंत जाण्याचा प्रवास हा फक्त नयनरम्य नसून, तो एक लयबद्ध अनुभव आहे. कधी छोट्या लाटांच्या नादात, तर कधी एका अरुंद नाल्यातून होडी पुढे जाते. सभोवतालचा शांत गूढपणा इतका खोल असतो, की मन नकळत अंतर्मुख होतं. येथे आणखी एक नयनरम्य असे दृश्य पाहायला मिळते. ते म्हणजे खारफुटीच्या जंगलाचे. त्यालाच mangrove असेही म्हणतात. ही झाडे एकमेकांच्या जवळ अगदी एकमेकात घुसून वाढली आहेत. त्यांची मुळे जमिनीवर एकत्र झालेली आपल्याला दिसतात. ही मुळे एवढी दाट आहेत की त्यांच्यात एखादा मनुष्य किंवा प्राणी अडकला तर त्याची सुटका होणे कठीण. परंतु असे सांगितले जाते की सुनामीच्या काळात याच जंगलांनी सुनामीचे आघात सोसल्यामुळे अंदमानचा इतर भाग सुरक्षित राहिला. पर्यावरणाचे रक्षण करणारे हे जंगल आहे.

थोडा वेळ होडीतून प्रवास केल्यानंतर सुरू होते ती एक जंगलात जाणारी पायवाट. झाडांमधून प्रकाशाच्या मनमोहक रेषा उमटलेल्या दिसतात. येथील हिरवळीच्या भागातून आपण एक ते दीड किलोमीटर चालत असतो. विविध प्रकारच्या पक्षी आणि प्राण्यांनी हे जंगल समृद्ध आहे. इथे थोडा वेळ जंगल भ्रमंती केल्यानंतर आपण पोहोचतो ते चुनखडीच्या गुहांमध्ये अर्थातच Limestone Caves – थंड, अंधाऱ्या, निसर्गाने लाखो वर्षांत रचलेल्या.  यांची रचना म्हणजे जणू वेळेचा ठसा. एका पांढऱ्याशुभ्र, चंदेरी छायेत लपलेली ही गुहा आपल्याला निसर्गाच्या कलाकुसरीचं मौनातलं प्रदर्शन दाखवते. वेगवेगळ्या आकाराच्या या गुहा पाहणं म्हणजे एक अनोखी मेजवानी ठरते. निसर्गाचा हा चमत्कार आहे ! आपण जो आकार आपल्या मनाशी कल्पू, तो आकार आपल्याला गुहांमध्ये दृश्यमान होतो. बऱ्याचशा गुहांमध्ये अंधार आहे तर काही ठिकाणी वरून सूर्यप्रकाश आत येताना दिसतो. या गुहांमध्ये जाण्या येण्यासाठीचा रस्ता अतिशय अरुंद तर काही ठिकाणी निसरडा झालेला आहे. त्यामुळे चालताना काळजी घ्यावी लागते. आम्ही गेलो तेव्हा पर्यटकांची त्या ठिकाणी अतिशय गर्दी होती आणि आम्हाला काळजीपूर्वक पावले टाकावी लागत होती. इथे अंधार मात्र लवकर पडतो. त्यामुळे इथून वेळेतच बाहेर पडणे महत्त्वाचे असते.

आपल्याला जर वेळ असेल आणि हवामान योग्य असेल, तर येथून जवळ असणारा Mud Volcano बघायला जाता येतं – जमिनीखालून वर येणारा गरम चिखल, सतत हालचाल करणारा, पण सौम्य – तो पाहणं म्हणजे पृथ्वीच्या जिवंतपणाचा अनुभव घेणं.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२१/४/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...