उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 56मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥
तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या फळावर तुझा अधिकार नाही. म्हणून तू कर्मफळाची इच्छा करू नकोस.
हा कर्मयोगाचा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी निष्काम कर्म करून आचरणात आणला.
८० वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले होते. वयाची पंच्याहत्तरी उलटली तरी त्यांच्या लेखनात खंड पडला नव्हता. तुकाराम महाराज म्हणतात तसा त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस म्हणजे ' नित्य नवा दिस जागृतीचा ' होता. नजरेत लहान मुलाचे कुतूहल होते आणि अंतरात नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा ! नियतीने त्यांच्या पदरात जे दान टाकले ते त्यांनी आयुष्यभर इतरांना भरभरून वाटले. इतरांना सतत आनंद देत राहणारी त्यांची ओंजळ कधीच रीती झाली नाही.
आपल्या लेखनाच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात लिहिलेली अनेक नाटके त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात पुन्हा सुधारून नव्याने लिहिली. असे करणारा साहित्यिक अभावानेच आढळेल. केवळ चार-पाच तासांची निद्रा घेऊन ते ताजेतवाने होत असत आणि त्यांच्या लेखणीला पुन्हा बहर येत असे. कधी कधी सलग १८/१८ तास देखील ते लेखन करीत असत. असे म्हणतात की त्यांनी केलेल्या या परिश्रमांमुळे त्यांच्या अखेरच्या दिवसात त्यांना मूर्च्छाही येत असे. पण थांबून राहणे जणू त्यांच्या स्वभावातच नव्हते.
त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचे वर्णन करताना आपल्या वंगचित्रे या पुस्तकात पु लं देशपांडे म्हणतात, " त्यांच्या प्रतिभेची उंची आणि व्याप्ती बंगाली भाषेशी परिचय झाल्याखेरीज लक्षात येत नाही. शिवाय त्यांचे ते भव्य आणि सुंदर दर्शन, गायन - नृत्य- नाटक यांच्याशी असलेले साहचर्य यामुळे या माणसाच्या आयुष्यात त्याला विपरीत परिस्थितीशी झगडावे लागले असेल, बंडे करावी लागली असती याची कल्पनाही पुष्कळांना येत नाही. परकीय आणि स्वकीय दोघांच्याही विरोधाला तोंड देत त्यांनी मार्ग काढला आहे. "
आपल्या लहानपणापासून सुरू झालेली त्यांची शब्द आणि साहित्याची आराधना आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत अविरत सुरू होती. १९३७ ते १९४१ या आपल्या आयुष्यातील अखेरच्या वर्षांमध्ये सुद्धा त्यांची प्रतिभा चिरतरुण आणि नवनिर्मिती करणारी होती. या काळात देखील त्यांची दहा ते अकरा पुस्तके प्रसिद्ध झाली.
१९१२ ते १९३४ पर्यंत त्यांनी आपल्या कार्याच्या प्रसारासाठी अविरत प्रवास केला १९३४ मध्ये दिलेली श्रीलंकेला भेट हा त्यांचा शेवटचा भारताबाहेरील प्रवास होता. प्रवासाची आवड असली तरी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यानंतर ते प्रवासाला जाऊ शकले नाहीत. १९३८ नंतर त्यांना विश्रांती घ्यावीशी वाटू लागली. त्यासाठी त्यांनी एक निसर्गरम्य ठिकाण निवडले. पश्चिम बंगालमध्ये कालिपांग हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथून जवळच मंगपू या छोट्या गावात मैत्रेयी सेन या या नावाची गुरुदेवांच्या मित्राची मुलगी राहत होती. मैत्रेयी ही एक विदुषी आणि उत्तम लेखिका होती. गुरुदेवांच्या साहित्याचा तिचा अभ्यास होता. तिच्याकडेच ते राहिले. तिने त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली. त्यांच्या सहवासात आल्यामुळे त्यांच्या सहवासातील त्यांच्या सुंदर आठवणींचे पुस्तक ' टागोर बाय फायर साईड ' हे तिने लिहिले. हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकाबद्दल बोलताना कविवर्य बा भ बोरकर असे म्हणतात " रवींद्रनाथांबद्दल अक्षरशः असंख्य पुस्तके आहेत. पण मला रवींद्रनाथांवरील फक्त एक आणि एकच पुस्तक वाचायचे आहे असे मला कोणी म्हटले तर मी निशंकपणे या पुस्तकाची शिफारस करीन. "
गुरुदेवांच्या शेवटच्या दिवसांबद्दल बोलायचे झाल्यास, ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप कठीण होते. त्यांना वारंवार वेदना होत आणि प्रकृती खालावत गेली. १९४० नंतर तर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. १९४१ मध्ये त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली. परंतु, त्यातूनही फारसा आराम मिळाला नाही. ७ ऑगस्ट १९४१ रोजी, वयाच्या ८०व्या वर्षी, कोलकाता येथील जोरासांको वाड्यातील त्यांच्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुदेवांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात केलेले लेखन त्यांच्या आयुष्याचा गाभा सांगणारे होते. त्यांनी त्यांच्या शेवटच्या कवितांमध्ये मृत्यू आणि मानवी अस्तित्व यावर चिंतन केले. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी काही ओळी लिहिल्या होत्या, त्या अशा आहेत...
"तिमिरबिंदू पडिला लोचनी, दिनकर रे ! न देखिल तुहू मज.
आमार जन्म संपिल तिमिर माजी। "
( तिमिरबिंदू म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आता अंधार दाटून आला आहे. हे दिनकरा, ( सूर्यदेवा )आता तूही मला पाहू शकत नाहीस. म्हणजेच माझ्या नेत्रांना तुझा प्रकाश दिसू शकत नाही. आता या तिमिरातच माझा अंत व्हायचा )
या ओळी त्यांच्या मनातील एकाकीपणा स्पष्ट करतात. त्यातून त्यांचा अंतिम सत्याचा स्वीकार दिसून येतो.
पु ल देशपांडे आपल्या ' वंगचित्रे ' या पुस्तकात लोकमान्य टिळक आणि गुरुदेवांबद्दल बोलताना म्हणतात," या राजकारणाची जबाबदारी घेतली नसती तर मी गणिताच्या अभ्यासात रंगलो असतो असे म्हणणारे टिळक आणि मी अनेक गोष्टीत रस घेतो, अनेक कार्यात भाग घ्यावा लागतो पण मी खरा म्हणजे फक्त कवी असे म्हणणारे टागोर, या दोघांनाही जीवनातले श्रेयस आणि श्रेयस कळले होते आणि त्याचा त्यांनी काय सुंदर तोल साधला ! "
गुरुदेवांची कविता आणि त्यांचे जीवन एकरूप झाले होते. देण्याचे अपार सामर्थ्य असलेली त्यांची कविता होती. परमेश्वराचे आपल्याशी असलेले नाते त्यांना उमजले होते आपली भूमिका त्यांना कळली होती आणि तशाच पद्धतीने ते जीवन जगले होते. कुणीतरी त्यांना एकदा विचारलं, " मृत्यू तुमचं दार ठोठावेल तेव्हा त्याला काय द्याल ? "
गुरुदेवांनी त्याला फार सुंदर उत्तर दिले" ते म्हणाले माझ्या आयुष्याने भरलेला परिपूर्ण घट त्याच्या समोर ठेवीन. त्या याचकाला मी रिक्त हस्ताने कधीच पाठवणार नाही. हेमंतातील धूसर पहाट, वसंताच्या शांत रात्री, माझ्या गजबजलेल्या जीवनातले सोनेरी दिवस, लाभलेले सारे यश, साऱ्या जीवनातील मधू त्याच्यासमोर ठेवीन. आयुष्याच्या संध्याकाळी येणाऱ्या त्या याचकाला रिक्त हस्ताने कधीच पाठवणार नाही. "
असे वाटते की तो कोणीतरी याचक म्हणजे आपणच आहोत आणि या सगळ्या गोष्टी गुरुदेव आपल्यासाठीच मागे ठेवून गेले आहेत.
आपल्या एका कवितेत ते म्हणाले होते
जाबार आगे एई कथाटी बोलते चायि जा देखेछी जा पेयेछी तार आर तुलना नाई.
"...जाण्यापूर्वी एकच गोष्ट सांगून जातो इथे जे मी पाहिले, जे मला लाभले त्याची तुलना नाही.
कविवर्य बा भ बोरकर यांच्या ' देखणे ते चेहरे ' या कवितेतील ओळी आठवतात.
देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके, शुभ्र पाऱ्यासारखे
देखणा देहान्त तो, जो सागरी सूर्यास्तसा
अग्निचा पेरुनि जातो, रात्रगर्भी वारसा.
गुरुदेव शरीराने जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य आणि साहित्य यांच्या माध्यमातून ते चिरंजीव आहेत आणि राहतील. त्यांचे आपल्यावरील हे ऋण कधीही फिटणारे नाही. मात्र या हातानी जे घेतले, ते जसे जमेल तसे परतही करायला हवे. आदरणीय गुरुदेवांना मनोमन प्रणाम !
************************
संदर्भ ग्रंथ
१. रवींद्रनाथ : तीन व्याख्याने / पु ल देशपांडे
२. वंगचित्रे : पु ल देशपांडे
३. मुक्काम शांतिनिकेतन : पु ल देशपांडे
४. रवींद्रनाथ टागोर युगनिर्माता विश्वमानव : डॉ नरेंद्र जाधव
५.शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ : आशा साठे
६. जनमनातील जन- गण- मन : मिलिंद प्रभाकर सबनीस
७. सफरनामा निवडक कलाकारांचा : पल्लवी पंडित
८. रवींद्रनाथ टागोरांची पत्रे : विलास गीते
९. रवींद्रनाथ टागोरांच्या अप्रतिम कथा : अनुवाद मेधा मराठे
१०. पोस्टमास्तर आणि इतर कथा : अनुवाद मृणालिनी गडकरी
११. तष्ट नीड : अनुवाद नीलिमा भावे
१२.एकविंशति : अनुवादक मामा वरेरकर
१३. रवींद्रनाथ टागोर : हिरण्यमय बॅनर्जी : अनुवाद मृणालिनी केळकर
१४. ठाकुरबाडी ( हिंदी ) : अनिमेष मुखर्जी
याशिवाय आंतरजालावरून उपलब्ध झालेली माहिती.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३/४/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा