मुख्य सामग्रीवर वगळा

अनोखे अंदमान - भाग ५

उगवतीचे रंग 

 अनोखे अंदमान – भाग ५

 हॅवलॉक आणि नील आयलंड

दिनांक २३ आणि २४ फेब्रुवारी २०२५ हे आमचे दोन दिवस खऱ्या अर्थाने निळाईच्या कुशीत गेले असं म्हणावं लागेल. अंदमानमधील सर्वच ठिकाणे सुंदर आहेत. पण हॅवलॉक आणि नील बेटांचे सौंदर्य अनुपम. अंदमानच्या प्रवासात एक क्षण असा येतो, जेव्हा आपण नुसते प्रवासी राहत नाही, तर निसर्गाचे एक शांत साक्षीदार होतो. हॅवलॉक आणि नील आयलंड – ही दोन बेटं अशीच एक अनुभूती देतात, जिथे समुद्राचा निळा श्वास, वाळूचे गंधाळलेले शब्द, आणि झाडांची सावली मनाशी संवाद साधते. फेब्रुवारीतही उन्हाचे चटके जाणवतात पण या निसर्गाच्या कुशीत आणि मोकळ्या समुद्रवाऱ्याच्या संगतीने आपण ते सहज सुसह्य करू शकतो. सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या बेटांचे नामकरण आता ' स्वराज द्वीप ' असं करण्यात आलं आहे. 

या हॅवलॉक बेटांवर जाण्यासाठी आम्ही सकाळी पाच वाजताच पोर्ट ब्लेअर सोडले. आता पुढचा प्रवास एका क्रूझमधून होणार होता. सुरुवातीला आमच्या कागदपत्रांची तपासणी होऊन आम्हाला पुढे सोडण्यात आले. आमचा हा अडीच तासांचा प्रवास आम्हाला समुद्रप्रवासाची अतिशय सुंदर अनुभूती देणारा होता. जिकडे पाहावं तिकडे समुद्राचं निळं पाणी. सूर्योदय तर केव्हाच झालेला. सूर्याची सोनेरी किरणं पाण्यावर नाचत होती. दूर अंतरावर हिरवीगार झाडी आणि डोंगर दिसत होते. बोटीवर तर अतिशय उत्साहाचे वातावरण होते. कोणी मनमोहक समुद्राचे दृश्य डोळ्यात साठवून घेत होते तर कोणी आपल्या कॅमेऱ्यात ते बंदिस्त करत होते. अशातच बोटीच्या डेकवर गाणी सुरु झाली. चक्क मराठी आणि हिंदी गीतांवर पर्यटकांनी ठेका धरला. तरुणाई तर यात आघाडीवर होतीच पण बऱ्याच ज्येष्ठांनी सुद्धा आपलं वय विसरून या नृत्यात भाग घेतला. एकूणच ते स्वप्नवत वाटावं असं वातावरण होतं. अडीच तासांच्या या नेत्रसुखद प्रवासानंतर आम्ही हॅवलॉक बेटांवर पोहोचलो. येथे आम्ही दोन बीच पाहणार होतो. राधानगर बीच आणि काला पत्थर बीच. 

 इथला राधानगर बीच म्हणजे एक निळ्या कॅनव्हासवरचा स्वप्नवत भाग. एखाद्या चित्रातील बदलत्या रंगछटांप्रमाणे विविध रंगछटा निसर्ग आपल्यासमोर सादर करतो. गर्द गहिरे निळे पाणी, रुपेरी वाळू, हिरवी वनराई, तिची गर्द सावली या सगळ्याच गोष्टी आपलं मन मोहून टाकतात. राधानगर बीच म्हणजे केवळ निसर्गसौंदर्य नाही. ती आपल्या अंतरात्म्यात खोल साठवून ठेवावी अशी गोष्ट आहे. एक आगळीवेगळी अनुभूती आहे. हा बीच पाहण्यासाठी देशोदेशीचे पर्यटक गर्दी करतात. हा समुद्रकिनारा भारतातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा मानला जातो. इथे सूर्यस्नानाचा आनंद पर्यटक घेतात. शिवाय विविध प्रकारच्या जलक्रीडा करण्यासाठी देखील पर्यटक येतात. इथला सूर्यास्त तर चुकवू नयेच असा. मावळतीची सोनेरी किरणे पाण्याला सोनेरी मुलामा देतात. दिवसभर प्रकाश देऊन सूर्यनारायण अस्ताला जात असतात. त्या मावळत्या दिनकराचे अप्रतिम दर्शन इथे होते. इथली वाळू देखील जादुई आहे. संध्याकाळी सूर्य जसजसा ढळतो, तसतशी त्या वाळूवरची रंगछटा बदलत जाते – केव्हातरी ती पिवळसर-नारंगी होते, तर कधी काळसर जांभळी. समुद्रकिनाऱ्यावर शांत बसून हे सगळं हृदयात साठवून घ्यावं. कोण जाणे पुन्हा कधी बघायला मिळते !

याच बेटावरचा काला पत्थर बीच – जो थोडा शांत, थोडा जास्त अंतर्मुख करणारा आहे. शांततेच्या शोधात असणाऱ्या पर्यटकांसाठी आदर्श असा. याचा किनाऱ्यावर असलेल्या मोठमोठ्या काळ्या खडकांमुळे याला काला पत्थर असे नाव पडले असावे. इथले काळे दगड, फेसाळत्या लाटा आणि नीरव शांतता पाहून असे वाटते की   एखादा साधू तिथं ध्यानस्थ बसला आहे असं गूढ आणि पवित्र वातावरण आहे इथे !

आमचं भाग्य असं की याच सुंदर हॅवलॉक बेटावर आम्हाला मुक्कामाची संधी मिळाली. एका समुद्रकिनारी असलेल्या सुंदर अशा हॉटेलात आमचे वास्तव्य होतं. संध्याकाळी आम्ही समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला. समुद्राच्या लाटांनी समुद्राकाठ ओला झाला होता. वाळू तर अगदी मखमली. अनवाणी पायानी त्या वाळूत चालण्याचा आनंद काही वेगळाच होता. इथे सकाळी तर खूप मजा आली. आमच्यातले बरेच पर्यटक सकाळी लवकर उठून फेरफटका मारायला आले. सूर्यनारायणाचं छान दर्शन होत होतं. भोवतालची हिरवीगार वनराई आणि पक्ष्यांचे मधुर स्वर स्वागताला हजर होते. शहरात आपल्याला अशी सकाळ कधी अनुभवायला मिळते का ? म्हणूनच हे सगळं दृश्य डोळ्यात साठवून घेत होतो. 

नाश्ता करून आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो. आता आमचं पुढचं ठिकाण होतं नील बेटे. पुन्हा दीड तासांचा जलप्रवास करून आम्ही नील बेटांवर पोहोचलो.  आता या बेटांबद्दल काय बोलावं ! त्यांचं नावच ' नील ' बेटे. नावातच सगळं काही आलं. नावाप्रमाणेच सुंदर निळ्या रंगाचा समुद्र आपलं स्वागत करतो. या बेटांचं नवीन नाव आता ' शहीद द्वीप ' असं आहे. ही बेटं हॅवलॉकच्या तुलनेत थोडी अधिक शांत वाटतात. पण निसर्गाचं रंगांचं इंद्रधनुष्य इथेही आपल्याला बघायला मिळतं. खरं म्हणजे अंदमानमधला निसर्ग कुठेही जा, समृद्धच आहे. निसर्गानं भरभरून दिलं आहे इथे. हे एक छोटंसं पण सुंदर बेट आहे. इथं विविध फळं आणि भाज्यांची रेलचेल असते. शाकाहारी व्यक्तींसाठी या ठिकाणी विविध पदार्थांची मेजवानी मिळू शकते. इथे दगडांनी तयार झालेली एक नैसर्गिक कमान आहे. तिला हावडा ब्रीज असेही म्हटले जाते. निसर्गानं स्वतःच घडवलेलं हे एक अद्भुत आणि चमत्कारिक शिल्प आहे. लाटांनी झीज होऊन ही कमान तयार झाली आहे. 

येथील भरतपूर बीचवर पाण्यात डोकावलं, की एक वेगळीच दुनिया उलगडते – रंगीबेरंगी मासे, कोरल्स, आणि पारदर्शक निळं पाणी. SCUBA diving किंवा snorkeling करताना जाणवतं की आपण पृथ्वीच्या पाठीवर नाही, तर जणू एका स्वप्नात आहोत.

येथील स्थानिकांचे जीवन मात्र अतिशय कष्टाचे आहे. त्यांची राहणी आणि जीवनशैली साधी आहे. समुद्राशी आणि तेथील वातावरणाशी त्यांचा रोजचाच संघर्ष असतो. पण त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य मावळत नाही. इथं यायचं ते ही सगळी अनुभूती घेण्यासाठीच. 

पुन्हा बोटीने दीड तासांचा प्रवास करून आम्ही पोर्ट ब्लेअरला आलो. आमचे गाईड आनंद दवे यांनी आम्हाला एक अप्रतिम ठिकाण हॉटेलवर जाताना दाखवले. हे ठिकाण म्हणजे अंदमानमधील फ्लॅग पॉईंट. फ्लॅग पॉईंट (Flag Point) हे पोर्ट ब्लेअरमधील एक ऐतिहासिक ठिकाण आहे, या ठिकाणी  नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १९४३ मध्ये भारतीय ध्वज पहिल्यांदा फडकवला होता. या स्थळाला तिरंगा पार्क किंवा फ्लॅग पॉईंट म्हणूनही ओळखले जाते. येथे 150 मीटर उंच ध्वज खांब आहे, ज्यावर भारतीय तिरंगा ध्वज अभिमानाने फडफडतो. हे ठिकाण राष्ट्रीय एकतेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे.  या ठिकाणी आम्ही सर्वांनी राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रध्वजाला प्रणाम केला. आणि हे सगळे  हृदयात साठवून आम्ही हॉटेलवर परत आलो. एकंदरीत आमचे दोन दिवस सार्थकी लागले होते. या स्मृती चिरंतन राहणार होत्या.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१९/४/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...