मुख्य सामग्रीवर वगळा

इस शहरमें हर शख़्स परेशान सा क्यूँ हैं...

उगवतीचे रंग 

इस शहरमें हर शख़्स परेशान सा क्यूँ हैं... 

१९७८ मध्ये आलेल्या ' गमन ' या चित्रपटातील ही नितांतसुंदर गझल. कुंवर अखलाक मुहम्मद खान उर्फ ' शहरयार ' या टोपणनावाने काव्यलेखन करणाऱ्या कवीची ही गझल. तिच्यात जेवढा ' दर्द ', अस्वस्थता आणि आजच्या दाहक वास्तवाची जाणीव कवी करून देतो, तेवढ्याच परिणामकारकपणे सुरेश वाडकर यांनी ती गायली आहे. ती ऐकल्यावर तिचे सूर थेट हृदयापर्यंत पोहोचतात. ऐकणाऱ्याला अस्वस्थ करण्याची ताकद या शब्दांमध्ये आहे. १९७८ मध्ये जरी हा चित्रपट आला असला तरी, या गाण्यातील वास्तव, दाहकता आजही कायम आहे, किंबहुना ती दिवसेंदिवस वाढतेच आहे. 

नोकरीच्या शोधार्थ एक तरुण मुंबईत येतो. त्याला काम मिळतं. तो टॅक्सी चालवतो. तसं जीवन सुरु आहे. खायची प्यायची ददात नाही. पण मनातून कुठेतरी अस्वस्थ आहे. तो स्थलांतरित आहे. त्याच्या वेदना आणि संवेदना या गीतातून प्रकट होतात. पण खरंच या त्याच्यापुरत्याच मर्यादित राहतात का ? त्याच्याशी आमची कुठेतरी जवळीक आहे, म्हणून तर त्या थेट आपल्या हृदयाला हात घालतात. म्हणूनच तर कवी म्हणत नसेल ना "  इस शहरमें हर शख़्स परेशान सा क्यूँ हैं..? प्रत्येकच माणूस काळजीत आहे, चिंतीत आहे. असं काहीतरी आहे की जे त्याला नीट व्यक्त करता येत नाही पण त्याच्या हृदयाची ती व्यथा आहे. हा चित्रपट १९७८ चा. त्यात त्यावेळच्या मुंबई शहराचं दर्शन घडवलं आहे. पण तेव्हाची मुंबईची असलेली ही अवस्था आज जवळपास सर्वच नगरांची आणि महानगरांची झाली आहे. रस्ते होताहेत, जगण्यासाठीच्या असलेल्या भौतिक सोयीसुविधा वाढताहेत. पैसाही तसा बऱ्यापैकी मिळतो आहे. पण खरंच माणूस सुखी समाधानी आहे का ? माणसाला जगण्यासाठी एवढ्या साऱ्या गोष्टी मिळाल्या म्हणजे झाले का ? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. बहुतेक आमची जगण्याची दिशा कुठेतरी चुकत असावी म्हणून अशी ही स्थिती तुमच्याआमच्या वाट्याला येत असावी. 

या गीतातील एकेक ओळी पहा. शायर म्हणतो, 

सीने में जलन आंखों में तूफ़ान सा क्यों है

इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यों है

दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढ़े

पत्थर की तरह बे-हिस ओ बे-जान सा क्यों है

तन्हाई की ये कौन सी मंज़िल है रफ़ीक़ो

ता-हद्द-ए-नज़र एक बयाबान सा क्यों है

हम ने तो कोई बात निकाली नहीं ग़म की

वो ज़ूद-पशेमान पशेमान सा क्यों है

क्या कोई नई बात नज़र आती है हम में

आईना हमें देख के हैरान सा क्यों है

याचं मी केलेलं स्वैर रूपांतर असं आहे 

हृदयात दाह आणि डोळ्यांमध्ये वादळ आहे. या शहरातील प्रत्येक व्यक्ती अशी चिंतीत का आहे ? हृदय तर आहे पण धडकत नाही. काहीतरी निमित्त त्यासाठी शोधावं लागत. अगदी पाषाणासारखं झालंय ते ! मित्रांनो, ही कोणत्या प्रकारची नीरव शांतता, कोणती दिशा आहे ? पाहावं तिकडे जणू रखरखीत वाळवंटच पसरलेलं दिसतं. मी तर माझ्या दुःखाबद्दल काहीच बोललो नाही तरीही प्रत्येक माणूस असा हैराण झालेला का दिसतो ? माझ्यात काही बदल झालेला दिसतो आहे ? आरसा सुद्धा ओळख दाखवायला तयार नाही ? मी बहुतेक मलाच म्हणजे ' स्व ' ला विसरलो. माझं अस्तित्वच जणू हरवलं आहे. असा या गझलेचा मतितार्थ ! 

या शहरात नुसती गर्दीच नाही तर गर्दीचा समुद्र आहे. पण तरीही या गर्दीत माणूस एकटा आहे. या शहरानं त्याला खूप काही दिलं आहे हे खरं पण खूप काही हिरावूनही घेतलं आहे. प्रश्न आहे ' हरवले ते गवसेल का ? '

नुकताच एक लेख माझ्या वाचनात आला. अमेरिकेत एकटेपणा कसा वाढत चालला आहे असं काहीसं सांगणारा हा लेख. फेब्रुवारी महिन्याच्या हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये ' Friendship Recession ' म्हणजे मैत्रीतील मंदी या नावाने हा लेख आहे. प्रौढांमध्ये एकही जवळचा मित्र नाही असं सांगणाऱ्यांचं प्रमाण वाढतं आहे असं एका अमेरिकन सर्व्हेमध्ये दिसून आलंय. स्टॅनफर्ड विद्यापीठाने तर म्हणे Design for Healthy Friendship या नावाचा एक अभ्यासक्रमच विद्यार्थ्यांसाठी सुरु केलाय. या सगळ्याचं एक कारण आहे. माणूस स्वतःमध्येच अधिकाधिक गुंतत चाललाय. त्यामुळे एकटेपण कायम वस्तीला आहे. 

मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही की ही समस्या केवळ अमेरिकेची नाही. ती भारतातही आहे आणि जगातही. सामाजिक एकटेपणाची ही जी वाढती जाणीव जगभरच्या लोकांना होते आहे, ती धोक्याची घंटा आहे. अनेक शारीरिक आणि मानसिक विकारांना आमंत्रण देणारी आहे. माणूस कुटुंबात असूनही एकटा असतो. संवाद हरवत चालला आहे. रेल्वेत, बसमध्ये, विमानात जो तो आपापल्या मोबाईलमध्ये गर्क असलेला दिसतो. शेजारील व्यक्ती कोण आहे याबाबत कोणाला काहीच घेणेदेणे नसते. सोशल मीडियावर शेकडो मित्र असणारे आम्ही जवळच्या घनिष्ठ मित्रांपासून दूर चाललो आहोत. प्रत्यक्ष मैत्रीच्या ऐवजी आभासी मैत्री वाढते आहे. The Top Five Regrets of the Dying या प्रसिद्ध पुस्तकात ब्रॉनी वेअर या लेखिका म्हणतात, " I  wish I had stayed in touch with my friends. " 

संवाद वाढवणं, नाती जपणं, आपल्या आवडत्या छंदासाठी वेळ देणं, आपल्या आवडत्या माणसांसाठी वेळ देणं, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं, योग प्राणायाम, ध्यानासाठी वेळ देणं, संगीत, गाणी ऐकणं अशा विविध गोष्टींनी हे एकटेपण नक्कीच कमी करता येईल. मुलांनाही त्या दृष्टीनं संस्कार द्यायला हवे. मिर्झा गालिबच्या सुंदर शेराने या लेखाचा समारोप करू या 

दोस्तो के साथ जी लेने का 

मौका दे ऐ खुदा 

तेरे साथ तो 

मरने के बाद भी रह लेंगे 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१७/४/२०२५

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...