उगवतीचे रंग
अनोखे अंदमान : भाग चार
रॉस आयलंड आणि नॉर्थ बे
आमच्या अंदमान ट्रीपचा दुसरा दिवस उजाडला. आमचे गाईड आनंद दवे एकदा मला म्हणाले होते की अंदमान इतकं सुंदर आहे की कितीही वेळा पाहिलं तरी मन भरत नाही. त्याचा प्रत्यय खरोखरच अंदमानमध्ये आला. तेथील निसर्ग सौंदर्य अत्यंत विलोभनीय आहे.
सेल्युलर जेलच्या दर्शनाने भारावलेले आम्ही दुसऱ्या दिवसापासून अंदमानचे निसर्ग सौंदर्य पाहायला सुरुवात करणार होतो. २२ फेब्रुवारी २०२५ हा आमचा अंदमानमधील दुसरा दिवस होता आणि आजच्या दिवशी नॉर्थ बे आणि रॉस आयलँड ही दोन ठिकाणे पाहण्याचे आमचे नियोजन होते. अंदमान मधील सगळेच समुद्रकिनारे सुंदर आहेत. त्यातील नॉर्थ बे या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सचे आयोजन केले जाते. त्या ठिकाणी जाण्याची आणि तेथील वॉटर स्पोर्ट्स मध्ये भाग घेण्याची उत्सुकता आम्हाला होती तेथे ज्यांच्या वतीने या खेळांचे आयोजन केले जाते त्यांचा एक प्रतिनिधी आदल्या दिवशी रात्रीच आमच्या हॉटेलवर आला होता आणि त्याने आम्हाला तिथे कोणकोणते वॉटर स्पोर्ट्स आहेत, त्यात कोण कोण भाग घेऊ शकतो आणि त्याचे दर कसे आहेत अशी सगळी माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही बोटीने रॉस आयलँड आणि नॉर्थ बे पाहण्यासाठी निघालो केवळ १० ते १५ मिनिटांचा जलप्रवास करून आम्ही रॉस आयलँड येथे पोहोचलो.
रॉस थायलंड हा कधीकाळी या ठिकाणी ब्रिटिशांचे अंदमान मधील मुख्यालय होते येथूनच त्यांचा सर्व कारभार चालत होता नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी 30 डिसेंबर 1943 या दिवशी या भूभागावर पाऊल ठेवले आणि ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झालेला भूभाग म्हणून या भागाची घोषणा केली. आता त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले आहे.
रॉस आयलंडवर पाय ठेवल्यावर जणू एक वेगळ्याच जगात आपला प्रवेश झाल्याचा भास होतो. समुद्राचे निळे पाणी आणि सुंदर स्वच्छ समुद्र किनारा मन प्रसन्न करत होता. हलकासा समुद्रवारा आमचे जणू स्वागत करत होता, आणि त्याच्याबरोबर वाहत येणारा इतिहासाचाही सुगंध मनात दरवळायला लागत होता. आम्ही ग्रुप ग्रुपने रिक्षा करून हा नितांत सुंदर भाग पाहण्यासाठी निघालो.
हा बेट कधी काळी ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी ‘ईस्टर्न पॅराडाइज’ मानला जायचा. एकीकडे पोर्ट ब्लेअरमध्ये सेल्युलर जेल उभं राहत होतं – कैद्यांसाठी नरक बनून, आणि दुसरीकडे इथे ब्रिटिश अधिकारी नृत्यप्रेम, पार्टी आणि आरामात दिवस घालवत होते.
तिथल्या क्लब हाऊसच्या भग्न भिंती आजही सांगतात की इथे पियानो वाजायचा, मखमली वस्त्रातील स्त्रियांचे मादक नृत्य येथे कधीकाळी झाले असेल. ऑफिसर्स व्हिस्कीचा आस्वाद घेत, आणि एका बेफाम सत्तेचा उपभोग घेण्यात मग्न असत. आता येथील सगळ्या इमारतींची पडझड झाली आहे. या भिंती आता वेलींनी व्यापलेल्या असल्या तरी, त्यांचे कोपरे अजूनही हा इतिहास मूकपणे सांगतात. एका टेकडीवरून चालत वर गेल्यावर एका जुन्या चर्चची इमारत समोर येते. हे चर्च आता पूर्णपणे उध्वस्त झालेले आहे. सेंट फिलोमेना चर्च — एकेकाळचं भव्य गॉथिक वास्तुशिल्प. आता त्याचं छप्पर गायब आहे, खिडक्यांमध्ये मोकळा आकाश, आणि आत झाडांच्या सावल्या पडल्या आहेत. आता या भग्न इमारतींना निसर्गाने आपल्या कुशीत घेतलं आहे असं वाटतं. त्सुनामीच्या काळात या बेटांचे बरेच नुकसान झालं आणि इमारतींची पडझड झाली. परंतु या बेटाने सुनामीला थोपवून धरल्यामुळे पोर्ट ब्लेअर सारखं महत्त्वाचे ठिकाण सुनामीच्या आक्रमणापासून सुरक्षित राहिलं.
इथल्या उंच टेकडीवरून खाली गेलं की समोरच्या बाजूला सुंदर नीलवर्णाचा समुद्र आपलं मन मोहून टाकतो. या टेकडीवरून खाली समुद्रापर्यंत जाण्यासाठी १२० पायऱ्या आहेत. इथेच खाली शहीदांना समर्पित केलेले एक स्मारक आहे. समुद्राच्या बऱ्याच आतपर्यंत जाण्यासाठी एक पूल बांधला आहे आणि त्याच्या कोपऱ्यावर एक दीपगृह आहे. तिथं उभं राहिलं की आपण जणू त्या सुंदर वातावरणाचा एक भाग होऊन जातो.
येथून परतताना एक आश्चर्य आमच्या दृष्टीला दिसलं. तिथे हरण मुक्तपणे बागडत होती. माणसे जवळ आली तरी त्यांना पाहून ती भीतीने दूर पळत नव्हती आमच्यापैकी काही नेत्यांच्या सोबत उभे राहून फोटोही काढले. येथील अनुराधा राव या येथील मोर, हरणांची काळजी घेण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांना येथे हिरण महिला ( Deer woman ) म्हणूनच ओळखले जाते. त्यांचा जन्म इथलाच. त्यांचे सारे आयुष्य इथेच गेले सुनामी मध्ये मात्र त्यांचे सगळे कुटुंब नष्ट झाले. त्या एकट्याच उरल्या. रॉस बेटावरील प्राण्यांची शिकाऱ्यांकडून अवैध शिकार होऊ लागली आणि येथील प्राणी नष्ट होऊ लागले. त्याचे गांभीर्य अनुराधा यांना लक्षात आले आणि त्यांनी या प्राण्यांना आपले अपत्यवत प्रेम दिले. आज त्यांच्यामुळेच येथील प्राणीसृष्टी जिवंत आहे. येथील प्रत्येक हरणाला त्यांनी नाव दिले आहे. ती हरणे सुद्धा त्यांना ओळखतात. त्यांनी बोलावले की त्यांच्या जवळ येतात, त्यांचे म्हणणे ऐकतात. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मन की बातच्या एका कार्यक्रमात वन्यजीवांच्या संरक्षणार्थ त्यांनी केलेल्या कामाचा गौरव पूर्ण उल्लेख केला होता.
त्या कोणाकडूनही पैसे मागत नाहीत. पण येथे येणारे पर्यटकच त्यांना स्वतःहून मदत करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अनुराधाताईंच्या मनात अपार आदर आहे. परंतु दुर्दैवाने माझी त्यांची भेट होऊ शकली नाही.
रॉस बेटावरील ही मनमोहक सफर संपवून दुपारी आम्ही नॉर्थ बे या ठिकाणी आलो. हे ठिकाण तर अतिशय सुंदर आहे. आमचा संपूर्ण दिवस जणू निळ्या हिरव्या रंगाच्या स्वप्नात रंगला होता असे म्हणावे लागेल.
नॉर्थ बेच्या किनाऱ्यावर पाऊल टाकताच एका वेगळ्याच आनंदाच्या लहरी आपल्याला व्यापतात. पायांखालची शुभ्र वाळू, समोर फेसाळणाऱ्या लाटा, आणि आजूबाजूच्या झाडांवरून ऐकू येणारासारस पक्ष्यांचा किलबिलाट— जणू एक निसर्गसंगीत सुरू झालंय असं वाटतं.
इथेच ठरल्याप्रमाणे आमच्यातील पर्यटकांनी वॉटर स्पोर्ट्स चा आनंद लुटला. आमच्यातील जे वयाने तरुण होते त्यांनी साहसी वॉटर स्पोर्ट्स आनद थरार अनुभवला. आम्ही एका सेमी सबमरीनमध्ये बसून समुद्र तळाचे अद्भुत दृश्य पाहिले. जणू पाण्याखालील रंगपंचमीच आम्ही अनुभवात होतो. एक वेगळेच विश्व आमच्या डोळ्यासमोर होते. बोटीच्या काचेतून दिसू लागलं एक इंद्रधनुष्य. कोरल्सच्या विविध आकृती – मेंदूच्या रेघांप्रमाणे, फुलांचं गालिचा वाटावा अशा रंगांमध्ये, विविध रंगी देखण्या माशांचे सुंदर थवेच्या थवे आमच्या समोरून पोहत जात होते – हे सगळं एखाद्या कल्पनारम्य चित्रासारखं वाटत होतं.
या ठिकाणी पाणी इतकं पारदर्शक आहे की समुद्राच्या अगदी तळापर्यंत दिसू लागतं – मग ते फक्त पाहणार पुरत नाही तर आपण त्या सौंदर्यात हरवून जातो.
दिवसाच्या शेवटी, किनाऱ्यावर बसून मी समुद्राकडे पाहत होतो.
आता सूर्य कलतोय, निळ्या सागरावर आता सोनेरी रंगाची चादर पसरतेय. या सगळ्या वातावरणात माणूस स्वतःला विसरतो आणि निसर्गगाश एकरूप होतो. रॉस आयलंड आणि नॉर्थ बे ही दोन वेगवेगळी ठिकाणे आम्ही आज पाहिली होती. अंदमानच्या या दोन बेटांनी मला केवळ दृश्य देऊन थांबवलं नाही, तर मनात खोलवर घर करून राहावं असं काहीतरी दिलं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा