मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मण होना कठीन

 उगवतीचे रंग

लक्ष्मण होना कठीन...

काही दिवसांपूर्वी सोनी टीव्हीवर श्रीमद रामायण या नावाची एक मालिका सुरू होती. रामायण किंवा रामकथा कोणीही आणि कोणत्याही प्रकारे सांगितली तरी तिची गोडी अवीट आहे. श्रीमद रामायण ही सिरीयल मी सुरुवातीपासून पाहत असल्यामुळे तिच्या पुढच्या भागात काय होते अशी उत्सुकता नेहमीच असायची. पण मध्यंतरीच्या काळात मी ती नियमितपणे पाहू शकलो नाही. आता ते धारावाहिक सोनी टीव्ही वरती नियमितपणे सुरू आहे का हेही मला माहिती नाही. परंतु त्याचे मागील काही भाग युट्युब वर उपलब्ध आहेत. त्यातील एक भाग मी पाहिला. त्या भागात प्रत्यक्ष श्रीराम भरताला असे सांगतात की राम होना सरल है, लक्ष्मण होना कठीन हैं. हे वाक्य ऐकले आणि मी आश्चर्यचकित झालो. खरोखरच राम होणं साधं सरळ आणि सोपं आहे का आणि लक्ष्मण होणं कठीण ?असं होऊ शकतं का ? पण ज्या अर्थी प्रत्यक्ष प्रभू श्रीराम असं म्हणतात तेव्हा त्यात काहीतरी तथ्य नक्कीच असलं पाहिजे. आणि मी जसजसा विचार करू लागलो, तसतशी या विधानातील सत्यता माझ्या लक्षात येत गेली.

पण हे सांगण्यापूर्वी मी या वाक्यामागील थोडी पार्श्वभूमी आपल्याला सांगतो. म्हणजे आपल्याला हा विषय उत्तम प्रकारे लक्षात येईल. पृथ्वीवरील श्रीरामांचा अवतार किंवा त्यांचे जीवनकार्य आता संपत आले होते. हे त्यांना सांगण्यासाठी काळपुरुष अयोध्येत प्रकटला होता. त्याला एकांतात श्रीरामांची भेट घ्यायची होती आणि अशी भेट घेत असताना आणि त्यांचा संवाद सुरू असताना त्यांच्यामध्ये कोणीही येऊ नये अशा प्रकारची त्याची अट होती. याप्रसंगी श्रीरामांनी लक्ष्मणाला बोलावले आणि त्यालाच दरवाजावर पहारा देण्यास सांगितले. मी एका महत्त्वाच्या चर्चेमध्ये असल्यामुळे कोणालाही आतमध्ये सोडू नकोस किंवा कोणीही आत यायचे नाही अशी सूचना त्याला दिली. जो कोणी आमच्या चर्चेत व्यत्यय आणेल त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाईल असे श्रीरामांनी जाहीर केले. लक्ष्मण दरवाज्यावर पहारा देत असताना नेमक्या अशाच वेळी शीघ्रकोपी दुर्वास ऋषी तिथे अवतरतात आणि मला रामाची भेट घ्यायची आहे असे त्याला सांगतात लक्ष्मण त्यांना विनवून सांगतो की ते एका महत्त्वाच्या चर्चेत व्यस्त आहेत आपले काही काम असले तर ते मला सांगा परंतु दुर्वास काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात ते संतापून लक्ष म्हणायला म्हणतात तू जर मला आत्ताच्या आत्ता रामाला भेटू देत नसशील तर मी अयोध्येला शाप देऊन भस्म करीन आता लक्षमणापुढे धर्मसंकट उभे राहते आत जाऊन रामाला सांगावे तर आपल्याला मृत्यूदंडाची शिक्षा होणार आणि तसे नाही केले तर दुर्वास ऋषी शाप देऊन अयोध्येची राखरांगोळी करणार. अयोध्येची अशी राख रांगोळी होण्यापेक्षा आपल्याला देहदंडाची शिक्षा मिळालेली काय वाईट ? असा विचार करून तो श्रीराम आणि काळपुरुष यांची ज्या ठिकाणी चर्चा सुरू असते तिथे जातो. त्याला पाहिल्याबरोबर अटीचा भंग झाला म्हणून काळपुरुष तिथून निघून जातो. आपल्याला प्राणाहून  अधिक प्रिय असणाऱ्या लक्ष्मणाला आता मृत्यूदंडाची शिक्षा घेण्यासाठी कसे सांगावे असा विचार मनात येऊन श्रीराम दु:खी होतात. पण चर्चेत व्यत्यय आणण्यासाठी आपण कारण झालो म्हणून लक्ष्मण स्वतःच मृत्यूदंडाची शिक्षा स्वतःहून घेण्याचे ठरवतो आणि शरयू नदीत आत्मसमर्पण करतो. त्याप्रसंगी भरत अयोध्येत नसतो. तो जेव्हा परत येतो आणि त्याला लक्ष्मणाने शरयू नदीत आत्मसमर्पण केल्याचे कळते तेव्हा तो प्रचंड चिडतो, संतापतो आणि शोक करतो. तेव्हा श्रीराम त्याला समजावताना म्हणतात, " हे भरता, शोक करू नकोस. लक्ष्मण खरोखरच महान होता. त्याने आपले कर्तव्यपालन केले आहे. राम होणे सोपे आहे. पण लक्ष्मण होणे कठीण ! " हा तो प्रसंग !

राम हा विष्णूचा सातवा अवतार. त्याला त्याचं नियोजित कार्य नियतीनं नेमून दिलेलं होतं. तो राजपुत्र होता, आदर्श राजा होता आणि मर्यादा पुरुषोत्तम म्हणून प्रजेने त्याला मान्यता दिली होती. आपल्या नियोजित कार्यानुसार वनवासात जाणे, सीतेचा शोध घेणे, रावणाशी युद्ध करणे या गोष्टी त्याला कराव्याच लागतात. परंतु लक्ष्मणाचे तसे नाही त्याच्यावर यापैकी कुठल्याही गोष्टीची बंधने किंवा सक्ती नाही. जेव्हा कैकयी दशरथ राजाकडे तिचे दोन वर मागून घेते, तेव्हा एका वराने रामाला १४ वर्षे वनवासात पाठवा आणि दुसऱ्या वराने भरताला अयोध्येचा राजा करा अशी मागणी ती करते. याप्रसंगी राम स्थितप्रज्ञ वृत्तीने आपल्या पित्याचा आदेश स्वीकारतो आणि वनवासाला निघतो. हा वनवास फक्त त्यालाच एकट्याला स्वीकारायचा आहे. परंतु रामा शिवाय लक्ष्मण एक क्षणही राहू शकत नाही. लक्ष्मणही त्याच्यासोबत वनात जातो. तो रामाची सावली आहे. आपले सुखदुःख त्याने एका रामाच्या चरणी अर्पण केले आहे. किंबहुना आपले जीवन, इच्छा, आशाआकांक्षा सर्व काही रामात विलीन केल्या आहेत. 

लक्ष्मणाने अशा बंधूप्रेमाचा आदर्श घालून दिला आहे की जो युगानुयुगे स्मरणात राहील. श्रीरामांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगात तो सहभागी आहे. त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या प्राणांचे मोल देण्याची त्याची तयारी आहे. जसे रामाचे नुकतेच लग्न झालेले असते, तसेच लक्ष्मणाचेही झालेले असते आणि आपली पत्नी उर्मिलेसोबत राजप्रसादात राहून सुखोपभोगांचा आनंद तो सहज घेऊ शकला असता.  परंतु आपली सुंदर आणि नवविवाहिता पत्नी आणि राजप्रासादातील सुखे सोडून तो श्रीरामांंबरोबर वनवासात जायला निघतो. श्रीरामांबरोबर जाताना कोणतेही मोह त्याला अडवू शकत नाहीत. असे करणे ही सोपी गोष्ट नाही. आजच्या काळात तर भावासाठी एवढा त्याग करणे ही गोष्ट अत्यंत दुर्मिळ आहे. त्याच्या या त्यागासाठी शब्द अपुरे पडतात. 

राम आणि सीतेबरोबर वनवासात असताना तो त्यांचे संरक्षण करण्यासाठी रात्री झोप घेत नाही. मारीच राक्षस जेव्हा सुवर्ण मृगाचे रूप घेऊन येतो आणि " लक्ष्मणा धाव " असा रामाचा आवाज काढून ओरडतो तेव्हा लक्ष्मण हे जाणून असतो की हे हरिण मायावी आहे आणि हा आवाज प्रभू श्रीरामांचा नाही. परंतु सीता त्यावेळी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे तो रामाच्या मदतीसाठी धावून जातो. परंतु जाण्यापूर्वी त्या कुटीभोवती एक संरक्षक रेषा आखून जातो. तीच लक्ष्मणरेषा. ही लक्ष्मणरेषा केवळ भौगोलिक नाही, तर ती त्याच्या मर्यादांचे आणि निष्ठेचेही प्रतीक आहे. आपल्या पत्नीपासून, आपल्या घरापासून तो दूर आला आहे पण सुंदर असलेल्या सीतेकडे पाहण्याचा मोह देखील त्याला होत नाही. ती त्याला मातेसमान आहे. हेच लक्ष्मणाचे मोठेपण त्याला आभाळाएवढ्या उंचीवर नेऊन ठेवते. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून मानल्या गेलेल्या श्रीरामांचा हा भाऊ देखील मर्यादांचे पालन करणारा आहे. तो श्रीरामांचा भाऊ तर आहेच परंतु तो उत्तम योद्धा, श्रीरामांचा उत्तम सेवक, मर्यादा, शौर्य, त्याग आणि समर्पण यांचे प्रतीक आहे. आपल्या भावनांवर असलेले त्याचे नियंत्रण श्रीरामांप्रमाणेच तोही स्थितप्रज्ञ असल्याचे प्रतीक आहे.

आजच्या काळात जेव्हा माणूस फक्त स्वतः पुरताच विचार करतो तेव्हा रामायणातील लक्ष्मण हे पात्र आपल्याला स्वतःपलीकडे जाऊन दुसऱ्यासाठी विचार करण्याचा संदेश देते त्याग समर्पण आणि सेवेचा संदेश त्याने दिला आहे. मी मोठा नाही. मी पेक्षा ' आम्ही ' किंवा आपण महत्त्वाचे आहोत ही भावना त्याच्या भूमिकेतून अधोरेखित होते. शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हणताना आपण सारे भारतीय माझे भाऊ आहेत असे म्हणतो परंतु प्रत्यक्षात मात्र सख्खा भाऊ सख्ख्या भावाच्या जीवावर उठलेला दिसतो. अशी अनेक उदाहरणे आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतात .म्हणूनच लक्ष्मणाचे उदाहरण या दृष्टीने अत्यंत भव्य, उदात्त, आदर्श आणि अनुकरणीय आहे.

तसे पाहिले तर राम होणे देखील सोपे नाहीच. तो मनुष्याकडून देवत्वाकडे होणारा प्रवास आहे आणि महर्षी वाल्मिकींना हेच आपल्यापुढे प्रामुख्याने ठेवायचे आहे. परंतु त्याचबरोबर लक्ष्मण होणे हे त्याहूनही कठीण आहे. ही गोष्ट राम आणि लक्ष्मण यांच्या संबंधांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते. हे दोन्हीही बंधू बंधूप्रेमाचा एक अनोखा आदर्श आपल्यासमोर ठेवतात. अर्थात भरत आणि शत्रुघ्न हे देखील बंधुप्रेम, त्याग आणि समर्पण यांचा आदर्श आहेतच. परंतु या लेखामध्ये आपण श्रीरामांनी भरताला जे सांगितले फक्त त्याचाच विचार केला. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१४/४/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...