मुख्य सामग्रीवर वगळा

अनोखे अंदमान - भाग ३

 उगवतीचे रंग 

अनोखे अंदमान : भाग तीन 

सेल्युलर जेलला भेट 

स्वातंत्र्यवीर सावरकरांची कोठडी पाहून आल्यानंतर खाली एका हॉलमध्ये सेल्युलर जेलचे मॉडेल आपल्याला बघायला मिळते. पूर्वी या ठिकाणी सात इमारती होत्या. आता त्यातील तीनच शिल्लक आहेत.
एखाद्या विशाल चक्राभोवती सात आरे असावेत अशा येथील या सात इमारती आहेत आणि मध्यभागी त्या सात इमारतींना जोडणारी आणि त्या सातही इमारतींवर एकाच ठिकाणाहून लक्ष ठेवता येईल अशी मध्यवर्ती इमारत किंवा टॉवर. सेल्युलर जेल म्हणजे सेल्युलर जेल मधील या कोठड्यांच्या रचनेचा उद्देश होता — पूर्ण एकाकीपणा. कैद्याला ना संवाद, ना सोबत, ना आधार. ही केवळ शारीरिक शिक्षा नव्हे, तर मानसिक छळ होता. आणि त्या कोठडीतून दुसऱ्या कोणत्याही कैद्याला पाहता येणार नाही. आता येथे असलेल्या तीन इमारतींपैकी पहिल्या इमारतीतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या ठिकाणी ठेवले होते तीच कोठडी आपल्याला पाहता येते. अन्य कोठड्या बंद आहेत परंतु गजांच्या दारातून त्या पाहता येतात. या कोठड्या आज मूक असल्या तरी एकेकाळी क्रांतिकारकांच्या झालेल्या छळाच्या त्या साक्षीदार आहेत.सेल्युलर जेल मधील या कोठड्यांच्या रचनेचा उद्देश होता — पूर्ण एकाकीपणा. कैद्याला ना संवाद, ना सोबत, ना आधार. ही केवळ शारीरिक शिक्षा नव्हे, तर मानसिक छळ होता. 

इथे असलेल्या अन्य दोन इमारती पाहता येत नाहीत. त्यापैकी एका इमारतीत एक हॉस्पिटल सुरू असल्याचे सांगण्यात येते.

स्वा. सावरकरांची कोठडी पाहिल्यानंतर खाली समोरच्या बाजूला दिसतो ते फाशी घर – मृत्यूचं प्रवेशद्वार. या वास्तूचा सर्वात अस्वस्थ करणारा भाग म्हणजे फाशी घर. तुरुंगाच्या एका बाजूला असलेली ही जागा अतिशय साधी पण भयानक आहे. एक लाकडी चौथरा, तीन दोरखंड – एकाच वेळी तिघांना फाशी देता यावी अशी रचना. परत परत फाशी देण्याचा त्रास नको म्हणून एकाच वेळेला तीन कैद्यांना फाशी द्यायचं आणि त्यांना पुरण्यातील येत असे ते तीन खड्डे देखील तेथील कैद्यांकडूनच खणून घेतले जायचे. तिथे उभं राहून फक्त एकच विचार मनात आला – किती सहजपणे इथे माणसांचे प्राण घेतले गेले असतील ! इथे जीवन दुर्मिळ होते आणि मृत्यू स्वस्त !

त्या दोरखंडांकडे पाहताना शरीर थरथरतं, आणि डोळे आपोआप ओलावतात. इतिहासातल्या त्या ओळी आठवतात – "काही माणसं मरून जगतात, काही  जिवंत राहून मरतात." इथले कैदी मात्र मृत्यू स्वीकारून अमर झाले. स्वा. सावरकरांना समोरच दिसेल अशा पद्धतीची ही सगळी व्यवस्था होती असे म्हणतात की ज्यावेळी इतर कैद्यांना फाशी देण्यात येत असे, त्यावेळी सावरकरांना मुद्दाम कोठडी बाहेर आणून त्या घटनेचे साक्षीदार करण्यात येई. उद्देश हा असायचा की ते सगळे पाहून त्यांचे मनोधैर्य खच्ची व्हावे. परंतु मातृभूमीसाठी अवघं आयुष्य समर्पित करणाऱ्या या नरसिंहाचा निश्चय पक्का होता. मातृभूमीच्या चरणी समर्पित होण्यासाठीच हे फुल उमललं होतं. ही भयंकर वास्तू, या पोलादी गज असलेल्या कोठड्या, कैद्यांना दिल्या जाणाऱ्या यातना त्यांचे मनोधैर्य खच्ची करू शकल्या नाहीत.

सेल्युलर जेलचा मुख्य भाग पाहिल्यावर मी परिसरात फेरफटका मारायला सुरुवात केली. ज्या भिंतींनी मला आतल्या कहाण्या ऐकवल्या होत्या, त्यांच्याच सावलीत अजून काही खुणा मला साद घालत होत्या.

जेलच्या प्रवेशद्वाराजवळच एक छोटंसं पण अंतर्मुख करणारं संग्रहालय आहे. आत पाऊल टाकल्यावर काळोख्या भूतकाळाचे यथार्थ प्रतिबिंब डोळ्यांसमोर उभं राहतं. स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो, त्यांची कैदेतून लिहिलेली पत्रं, जुनं सामान – सगळं काही खूप बोलकं वाटतं. एक फोटो होता – शृंखलाबद्ध असलेल्या कैद्याचा. त्या डोळ्यांतली शांतता आणि वेदना अजूनही जिवंत होती.

प्रांगणाच्या मध्यभागी उभा आहे एक स्मृतिस्तंभ – त्यावर कोरलेली आहेत शेकडो स्वातंत्र्यसैनिकांची नावं. त्याच्याजवळच त्यांची स्मृती जागवणारी एक अखंड ज्योती आहे. भोवताली आहे एक छोटी बाग आणि त्यात विखुरलेली बाकं. हा एक विरंगुळ्याचा नव्हे, तर मनात विचार जागवणारा भाग आहे. तिथे थोडावेळ बसताना जाणवलं – स्वातंत्र्याचा अर्थ आपण विसरलो तर हे स्मारक व्यर्थ ठरेल. या 

एका कोपऱ्यात जुने फोटो लावलेली एक गॅलरी आहे. त्या फोटोमधून दिसतं – तुरुंगाचं जुनं रूप, कैद्यांचे संघर्ष, उपोषणाचे प्रसंग. बाजूलाच आहे एक जुनी विहीर, जी कैद्यांच्या पाण्याच्या गरजा भागवायची. आज ती कोरडी असली तरी आठवणींनी भरलेली आहे.

एका कोपऱ्यात एका पत्र्याच्या शेडमध्ये ज्याला त्या काळात इंग्रज कारखाना म्हणत असत ती वास्तू आहे. ही वास्तू म्हणजे जणू कैद्यांचा छळ करण्याची हक्काची जागा. त्या ठिकाणी एक कोलू आहे. कैद्यांना तेल काढताना हा कोलू फिरवावा लागत असे. त्याला एक लोखंडी दांडा आहे. एखाद्या बैलासारखा हा कोलू फिरवावा लागत असे. अपेक्षित तेवढे तेल निघाले नाही तर फटक्यांची शिक्षा तयारच असायची. त्याशिवाय कैद्यांना नारळाच्या काथ्यापासून दोरही वळावा लागे. त्यांच्याकडून अपेक्षित प्रमाणात कोणतेही काम झाले नाही तर फटके मारण्यात येत असत. कैद्यांना फटके मारण्यासाठी एका  त्रिकोणी लाकडी किंवा लोखंडी फ्रेमवर उभे करण्यात येत असे. ती फ्रेम आजही तिथे ठेवली आहे. त्यावर कैद्यांचे हात पाय बांधले जात असत आणि उघड्या पाठीवर आणि पार्श्वभागावर फटके मारले जात. त्यातून रक्त येत असे. कधीकधी मांसाचे तुकडेही लोंबत असत. शिक्षा म्हणून त्यांना तागापासून तयार करण्यात आलेले जाडेभरडे कपडे घालण्यास सांगितले जाई. तेथील उष्ण हवामानात असा पोशाख घालून काम करावे लागे. हे सगळे पाहिले की अंगावर शहारा येतो. अत्यंत विपरीत परिस्थितीत तेथे असलेल्या उष्ण हवामानात केवळ आपल्या देशासाठीच सगळे काही समर्पण करणाऱ्या क्रांतिवीरांनी हा छळ कसं शोषला असेल त्याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. आज आम्ही या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवणार आहोत की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या कोठडीत ठेवण्यात येत असे तिचे वर्णन तर वर केले आहेच. अनेक क्रांतिवीरांची अवस्था अशीच होती. पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारक या ठिकाणी इंग्रजांनी काळ्यापाण्याची शिक्षा म्हणून आणून ठेवले होते. सगळ्यांच्या कोठड्यांमध्ये राहण्यासाठी अपुरी जागा होती. एकटेपण तर कायम सोबतीला होते. आपण तोंडात अन्नाचा एखादा घासही घेणार नाही असे निकृष्ट प्रतीचे अन्न दिले जाई. त्या कोठड्यांमध्ये नैसर्गिक विधीसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. रात्रीच्या वेळी कैद्यांना फक्त एक मातीचे भांडे दिले जाई. त्यातच त्यांना मूत्रविसर्जन करावे लागे. शौचविधीसाठी सुद्धा कोणतीही वेगळी व्यवस्था नव्हती. त्यासाठी एक तर सकाळपर्यंत थांबावे लागे. किंवा जर कोठडीतच ते विधी करावे लागले तर ते साफ करण्याची जबाबदारी पुन्हा कैद्यांवरच येई. रात्रीच्या वेळी डास, मच्छर, पिसवा त्रास देत असत. झोप लागली किंवा नाही लागली तरी सकाळी उठून काम करावे लागत असे. असे सगळे कष्ट आणि यातना आपल्या देशभक्तांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सोसल्या त्यांची नुसती आठवण आली तरी अंगावर शहारा येतो. त्यांनी केलेल्या या कष्टाची जाणीव आज क्वचितच दिसते. 

याच परिसरात संध्याकाळच्या वेळेला लाईट अँड साऊंड शो चे आयोजन केले जाते. त्यावेळी या सेल्युलर जेल चा इतिहास अक्षरशः जिवंत होतो. हा शो आम्ही पाहिला आणि अक्षरशः थरारून गेलो. कारण तिथे होणारा लाईट अँड साऊंड शो ऐकणं आणि पाहणं हा एक अनोखा अनुभव होता. अंधार पडल्यानंतर प्रकाशाच्या झोतात एक-एक कोठडी उजळत होती आणि मागे ऐकू येत होता तो एक गंभीर आवाज:

"मी आहे सेल्युलर जेल… मी पाहिलं आहे रक्त, पाहिलं आहे बळ, आणि ऐकल्या आहेत मौनातील किंकाळ्या…"

स्वा. सावरकर, बटुकेश्वर दत्त, डेव्हिड बॅरीसारखे उन्मत्त इंग्रज अधिकारी, उपोषण करणारे कैदी – या सगळ्यांचं जणू पुन्हा दर्शन होतं. हा शो केवळ माहिती देत नाही, तो इतिहास अनुभवायला लावतो. या साऊंड शो मध्ये नासिरुद्दीन शहा, ओम पुरी, टॉम अल्टर यासारख्या दिग्गज कलाकारांचे आवाज वापरल्यामुळे तो अत्यंत प्रभावी झाला आहे.

प्रत्येक प्रकाशझोतासोबत वातावरण भारून जातं. एखाद्या कोठडीवर प्रकाश पडतो आणि तिथून एक आवाज येतो — जणू इतिहास जिवंत होतो. काही प्रसंगांनी मन सुन्न होतं, काहींनी डोळे पाणावतात. येथे लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं आठवल्याशिवाय राहत नाही. ए मेरे वतन के लोगो, जरा आंख में भरलो पानी, जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी.

सेल्युलर जेलला भेट देणं म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, तो एक आत्मानुभव आहे. इथे आल्यावर इतिहास पुस्तकातला राहत नाही – तो तुमच्या श्वासात मिसळतो. त्या भिंती, त्या कोठड्या, तो अंधार, आणि ते क्षण – सगळं काही तुमच्याबरोबर निघतं, तुमच्या अंतःकरणात जागा घेतं.

 सेल्युलर जेलसारख्या तीर्थस्थळाला भेट देऊन तेथून न संपणारी ऊर्जा सोबत घ्यायची असते. 

अशा भारावलेल्या अवस्थेतच आम्ही सगळे हॉटेलला परतलो, पण मन मात्र तिथेच अडकून पडलं होतं. रात्री झोपताना डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा त्या कोठड्या येत होत्या.

त्या वीर क्रांतिकारकांनी आपलं आयुष्य गमावून आपल्यासाठी स्वातंत्र्याचा जो दीप प्रज्वलित केला… त्याच प्रकाशात आपण आज मोकळा श्वास घेत आहोत. त्यांचे आपल्यावर हे मोठे ऋण आहेत. कधीही न  फिटणारे ! (  क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

११/४/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...